Monday, February 24, 2020


केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा नांदेड जिल्हा दौरा
नांदेड, दि. 24:-  केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे मंगळवार, दिनांक 25 व बुधवार, दि. 26 फेब्रुवारी, 2020 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे राहील.  
मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी, 2020 रोजी 10-30 वाजता परभणी येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण.              12-00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आगमन. 12-30 वाजता नांदेड येथून लोहाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 1-00 वाजता लोहा गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थिती.  3-15 वाजता लोहा येथून नांदेडकडे प्रयाण. 4-00 नांदेड येथे आगमन. 4-15 वाजता पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. व नांदेड येथे मुक्काम बुधवार, दि. 26 फेब्रुवारी, 2020 रोजी उदगीरकडे प्रयाण करतील.
0000


महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती, 2019 योजनेंतर्गत
सोनखेड आणि कामठा बु. येथे आधार प्रमाणीकरणास प्रारंभ

नांदेड, दि. 24:- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सोनखेड   अर्धापूर तालुक्यातील कामठा बु. येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.    
   महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्ह्यातील लोहा अर्धापूर तालुक्यातील सोनखेड कामठा बु. येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याच्या प्रक्रियेची आज सुरुवात करण्यात आली.
ग्रामपंचायत कामठा बु. येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमास श्री. प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड, श्री. सुजीत नरहरे तहसीलदार, अर्धापूर, श्री. अमरसिंह चौहान, सहायक निबंधक, सहकारी संस्था, ता. अर्धापूर, तलाठी, ग्रामसेवक, ज्येष्ठ तपासणीस, जिल्हा मध्यवर्ती बँक, शाखा अर्धापूर, ग्रामपंचायत सदस्य, गटसचिव शेतकरी उपस्थित होते.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नांदेड जिल्ह्यात लोहा अर्धापूर तालुक्यातील सोनखेड कामठा बु. येथील आधार प्रमाणीकरण   महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती या पथदर्शी योजनेचे हाती घेतले असून या दोन गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण झाल्या असून त्यांच्या आधार प्रमाणीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज झाला.
 सोनखेड येथील 261 कामठा बु. येथील 162 पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर असून त्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. सदरच्या याद्या ग्रामपंचायत, बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार असून या याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची शहानिशा करून त्यामध्ये सुधारणा केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले.    
यावेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड तहसीलदार, अर्धापूर यांनी आधार प्रमाणीकरणाच्या कामाची पाहणी केली तसेच त्यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोचपावत्यांचे वितरणही करण्यात आले.
जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार 632 शेतकऱ्यांपैकी योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या दि. २८ फेब्रुवारी, २०२० पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. असे  सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी सांगितले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 2 लाख 19 हजार 632 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास अंदाजित 1461.36 कोटी रूपयांची कर्जमाफी होऊन हे शेतकरी कर्जमुक्त होतील.
तसेच दि. 24 फेब्रुवारी, 2020 पर्यत 1 लाख 95 हजार 661 शेतकऱ्यांची माहिती बँकेद्वारे पोर्टलवर अपलोड केली असून उर्वरीत शेतकऱ्यांची माहिती बँकेद्वारे अपलोड करण्याचे कामकाज चालू आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 1545 आपले सरकार केंद्र जिल्ह्यातील सर्व बँक स्तरावर आधार प्रमाणीकरणाचे कामकाज केले जाणार आहे. शेतकऱ्यांने आपले सरकार सेवा केंद्र / सामुहिक सुविधा केंद्र / बँकेचे शाखेत जात असताना स्वत:चे आधार कार्ड, यादीमधील विशिष्ट क्रमांक, बचत खाते पुस्तक मोबाईल सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांने आपले सरकार सेवा केंद्र / सामुहिक सुविधा केंद्र /बँकेचे शाखेकडून आधार प्रमाणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था प्रवीण फडणीस यांनी सांगितले.
00000  


अवैध वाळु उत्‍खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे
--- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांचे निर्देश
नांदेड, दि. 24:- जिल्‍हास्‍तरीय वाळु संनियत्रण समिती बैठक जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्या अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीमध्‍ये जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी जिल्‍हास्‍तरीय वाळू संनियत्रण समितीच्‍या बैठकीमध्‍ये अवैध वाळु उत्‍खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी निर्देश दिले आहेत. यामध्‍ये प्रामुख्‍याने खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता  एस. के. सब्बीनवार, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता गजेंद्र राजपूत, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्‍ठ भु-वैज्ञानिक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, व प्रादेशिक अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळ, नांदेड इ. उपस्थित होते.
अवैध वाळु उत्‍खनन व वाहतुकीच्‍या तक्रारींच्‍या अनुषंगाने जिल्‍हास्‍तरावर तक्रार निवारण कक्ष स्‍थापन करण्‍यात यावे. या तक्रार निवारण कक्षामध्‍ये 24X7 कर्मचारी यांची नियुक्‍ती करावी. ज्‍या ग्रामपंचायतीमध्‍ये अवैध रेती उत्‍खनन/वाहतुक होत असेल अशा ग्रामपंचातीच्‍या ग्राम दक्षता समितीस जबाबदार धरुन त्‍यांचे विरुध्‍द नियमानुसार कार्यवाही अनुसरण्‍यात येईल. उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे संयुक्‍त समिती स्‍थापन करुन सदरील समितीमार्फत ज्‍या चौक्‍या/नाक्‍यावरुन अवैध वाहतुक होत असतील अशांची यादी तयार करुन जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. तसेच प्रत्‍येक चौकीच्‍या ठिकाणी महसुल, पोलिस व इतर विभागाच्‍या अधिकारी/कर्मचारी यांच्‍या नियुक्‍त्‍या करुन अवैध वाहतुक करणा-या वाहनांविरुध्‍द कार्यवाही करण्‍यात यावी. तसेच या चौकीच्‍या ठिकाणी सीसीटिव्‍ही कॅमेरा ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. तसेच जिल्‍हयातील उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दर आठवडयाला संयुक्‍त बैठक आयोजित करुन सदरील बैठकीमध्‍ये त्‍यांचे कार्यक्षेत्रात अवैध रेती उत्‍खनन/वाहतुकीसंदर्भात केलेल्‍या कार्यवाही बाबत आढावा घेऊन जिल्‍हास्‍तरीय समितीकडे प्रस्‍तावित करण्‍यात यावे. महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व नायब तहसिलदार व पोलिस विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस उपनिरिक्षक व सहायक पोलिस निरिक्षक यांचे संयुक्‍त भरारी पथके गठीत करण्‍यात यावे. सदरील पथकामार्फत अवैध रेती उत्‍खनन व वाहतुकीच्‍या अनुषंगाने तात्‍काळ कार्यवाही करणेसंदर्भात निर्देश दिले आहेत. अवैध रेती उत्‍खनन व वाहतुकीच्‍या अनुषंगाने पोलिस व महसुल विभागाने एकत्रित कार्यवाही करण्‍यात यावी. तसेच अवैध रेती वाहतुकीमध्‍ये क्षमतेपेक्षा जास्‍त वाहतुक करत असताना पकडलेली वाहने परिवहन विभागाकडे  मोटार वाहन कायद्यानुसार कार्यवाही करणेसाठी देण्‍यात यावी.  मोटार वाहन कायद्यानुसार सदरील वाहनाची नोंदणी रद्द करण्‍याची कार्यवाही करण्‍यात यावी.
0000


ग्रामीण भागातील शाश्वत विकासासाठी गतिमानता हवी
--- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर
नांदेड, दि. 24:- महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी वरिष्ठ सनदी अधिकारी तथा कार्यकारी संचालक उमाकांतजी दांगट यांच्या उपस्थितीत विभागस्तरीय बैठक घेण्यात आली.
सदरील बैठकीस संबोधताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर म्हणाले की, ग्राम प्रवर्तक यांनी ग्रामस्थांना शासकीय योजनांची परिपूर्ण व व्यवस्थित माहिती देऊन व शासकीय योजनांचा कृती संगम करून गावाचा विकासात्मक दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पारगमन धोरणानुसार गावातील पूर्ण झालेल्या शासकीय योजना व प्रकल्प शासन प्रचलित नियमानुसार संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करावेत, तसेच शिल्लक राहिलेली कामे पारगमन प्रक्रियेत पूर्ण करण्यात यावीत. गावाचा सामाजिक व आर्थिक विकास होणेसाठी ग्राम परीवर्तक, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शाश्वत विकासाचे धोरण अवलंबून योग्य ती विकासाची दिशा देण्यात यावी, जेणेकरून गावांना सोयीसुविधा उपलब्ध होऊन संबंधित गावे खऱ्या अर्थाने सक्षम बनतील असे सांगितले.
कार्यकारी संचालक तथा माजी वरिष्ठ सनदी अधिकारी श्री दांगट यांनी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील ज्या ग्राम प्रवर्तकांनी यशस्वीरित्या फेलोशिप पूर्ण केली आहे, अशा ग्राम प्रवर्तकांना त्यांनी मागील तीन वर्षापासून घेतलेल्या अमूल्य अनुभवाच्या आधारे भविष्यातील चांगल्या संधी उपलब्ध करून घ्याव्यात असे सूचित केले. पारगमन ग्रामपंचायतीच्या संदर्भात ग्राम कोष अंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम संबंधित ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित करावे तसेच शिल्लक असलेल्या निधीचे कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या.
या बैठकीमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी किनवट तालुक्यातील संबंधित पाच गावे गौरी, प्रधानसांगवी, दिगडी, धामदरी, कनकवाडी या ग्रामपंचायतीची सखोल व परिपूर्ण माहिती दिली.
सदरील बैठकीचे प्रास्ताविक व प्रस्तुती नोडल अधिकारी सुपेकर यांनी केली, या बैठकीला मुंबईचे वरिष्ठ अधिकारी दिलीप बायस, मधुकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परभणी व बीड तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...