Friday, March 31, 2023

 मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांचा यथोचित गौरव करु

 –खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

▪️अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकास अभिवादनाने शुभारंभ

नांदेड (जिमाका) दि. 31 :- मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हा जुलमी रझाकारा विरोधी दिलेला सशस्त्र लढा होता. या लढयात स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेत्वृत्वाखाली अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. शांतीच्या मार्गाने आंदोलने केली. निझामाच्या अत्याचाराची परिसीमा वाढतच गेल्याने सशस्त्र उठावही करावे लागले. यात हुतात्मा गोविंद पानसरे यांनी दिलेले योगदान व हौतात्म्य कोणीही विसरु शकत नाही. मराठवाड्याच्या मुक्ती लढ्यात ज्याचे योगदान राहीले आहे, ज्यांनी आंदोलनात सहभाग घेतला त्यांच्या प्रती शासन कृतज्ञता बाळगुन आहे. जे स्वातंत्र्य सैनिक आज ह्यात आहेत अशा सर्वाचा सन्मान व्हावा ही राज्य शासनाची भुमिका असून त्यांचा प्रातिनिधीक अभिवादन आपण आज पासून करत आहोत असे प्रतिपादन खासदार तथा समितीचे अध्यक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा प्रातिनिधीक शुभारंभ आज अर्जापूर येथे हुतात्मा गोविंद पानसरे यांच्या स्मारकाला अभिवादन करुन करण्यात आला. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, स्वातंत्र्यसैनिक व माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, जिल्ह्यातील निमंत्रित स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार सुभाष साबणे, प्रा. एल.के.कुलकर्णी, प्रविण साले, सरपंच पंतगे, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, समितीचे सदस्य प्रा. सुनिल नेरलकर, लक्ष्मण संगेवार, प्रा. निवृत्ती कौसल्ये, आनंदी विकास, यशवंत गादगे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार तसेच मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवा निमित्त सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत शासन गठीत समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य यांची उपस्थिती होती. आमदार जितेश अंतापूरकर यांनी हुतात्मा पानसरे यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

हे वर्ष आपण मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करीत आहोत. या स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी योगदान दिले त्या सर्वाचा सन्मान झाला पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान प्रत्येक विद्यार्थी, नागरिकांपर्यत गेले पाहिजे. यादृष्टीने जिल्ह्यात 1 मे रोजी 6 लाख विद्यार्थी राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करतील असे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले.  

या समारंभात जिल्ह्यातील 15 स्वातंत्र्य सैनिकांचा प्रातिनिधिक स्वरुपात शासनाच्यावतीने स्मृतिचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

मराठवाडा अमृत महोत्सवाच्या दृष्टीने सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत शासनाने समिती गठीत केली. या समितीच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याचा गौरव करण्यात येवून त्यांचा इतिहास सर्वसामान्यापर्यत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे मा.आमदार गुरुनाथ कुरुडे यांनी जाहिर कौतूक केले. याबाबत शासनाचे स्वातंत्र्यसैनिक मा.आमदार गुरुनाथ कुरुडे यांनी सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्यावतीने प्रातिनिधीक आभार मानले.

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा शुभारंभ हा मराठवाडा मुक्ती संग्रामाला प्रकाशात आणण्याचा उपक्रम आहे. हा लढा सामान्य माणसानी लढला. हुतात्मा गोविंद पानसरे यांच्यासारखा बाहेर जिल्ह्यातून आलेल्या माणसाने 6 हजार शाखा उभ्या केल्या. आपल्या संघटन कौशल्यातून शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात संघटन केले. रझाकाराच्या जुलमी राजवटीला प्रत्युंतर देताना लोकामध्ये मोठया प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे निजामाने त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. याच कालावधीत त्यांना हौतात्म आले. त्यांच्या मृत्युनंतर 1 महिन्यांनी अर्जापूर येथे 10 हजार लोक जमा झाले होते. मराठवाडा मुक्ती संग्राम हा भारतीय मुक्ती संग्रामाचा एक भाग आहे. सन 1938 मध्ये हा लढा सुरु झाला. या संग्रामातील हजारो घटना संकलित करुन येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचविणे  हीच खरी श्रध्दाजंली ठरेल असे महाविद्यालयाचे इतिहास तज्ज्ञ एल.के. कुलकर्णी यांनी त्यांच्या व्याख्यानातून उपस्थितांना सांगितले.

यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्याच्या कार्याचा गौरव करुन त्यांनी केलेल्या कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला आनंदी विकास व त्यांच्या संचाने मराठवाडा गीताचे सादरीकरण केले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी क्षिरसागर यांनी तर सुत्र संचालन चौधरी सर यांनी केले.

जिल्ह्यातील 14 स्वातंत्र्य सैनिकांचा प्रातिनिधीक स्वरुपात यावेळी सत्कार करण्यात आला. यात स्वातंत्र्य सैनिक तात्याराव गुणाजी मुळे, बाजीराव धोंडीबा गारोळे, राजाबाई पांडोजी क्षिरसागर, नारायण सिताराम शिंदे, सरुबाई नारायणसिंह ठाकूर, गंगाधर अमृता वडजे, माजी आमदार गुरुनाथ कुरुडे, माधवराव गोविंद कंधारे, रामराव ज्ञानोबा पयना पल्ले, गणपतराव रामजी वडजे, रामराव नरसिंगराव जुरावार, चंदन मौनाजी देवघरे,गंगाधरराव हनुमंतराव पिंपळे, शंकर पिराजी वंचेवार, दिगंबरराव बापुराव पोतदार यांना समितीच्यावतीने स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.  
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...