Sunday, August 9, 2020

 वृत्त क्र. 746    

217 व्यक्तींना कोरोनातून बरे झाल्याने सुट्टी

 141 बाधितांची भर तर चोघांचा मृत्यू  

नांदेड (जिमाका) दि. 9 :-  रविवार 9 ऑगस्ट रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 217 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 141 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकुण 1 हजार 188 अहवालापैकी  1 हजार 6 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 3 हजार 297 एवढी झाली असून यातील 1 हजार 632 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 1 हजार 528 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 87 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.   

रविवार 9 ऑगस्ट रोजी  गणेशनगर नांदेड येथील 47 वर्षाचा पुरुष, नायगाव पांगरेनगर येथील 57 वर्षाचा पुरुष, नांदेड देगलूर नाका येथील 56 वर्षाचा पुरुषाचा नांदेड येथे खाजगी रुग्णालयात तर नांदेड मदिनानगर येथील 22 वर्षाचा पुरुषाचा शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 120 एवढी झाली आहे.  

 आज बरे झालेल्या 217 कोरोना बाधितांमध्ये शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णूपूरी नांदेड येथील 19, नायगाव कोविड केअर सेंटर येथील  5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल 4, देगलूर कोविड केअर सेंटर 4, हदगाव कोविड केअर सेंटर 27, अर्धापूर कोविड केअर सेंटर 3, औरंगाबाद येथे संदर्भित 1, बिलोली कोविड केअर सेंटर 8, किनवट कोविड केअर सेंटर 10, मुखेड कोविड केअर सेंटर 28, पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे 83, उमरी कोविड केअर सेंटर 14, मुदखेड कोविड केअर सेंटर 10, खाजगी रुग्णालय येथील 1 असे एकूण 217 कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड मनपाक्षेत्र 15, धर्माबाद तालुक्यात 3, बिलोली तालुक्यात 1, भोकर तालुक्यात 1, कंधार तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 1, हिंगोली 1, बीड 1, नांदेड ग्रामीण 2, देगलूर तालुक्यात 20, हदगाव तालुक्यात 1, किनवट तालुक्यात 1, मुखेड तालुक्यात 11, परभणी 1, लातूर 1, बुलढाणा 1 असे एकुण 62 बाधित आढळले.

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 34, बारड 1, बिलोली तालुक्यात 9, किनवट तालुक्यात 1, नायगाव तालुक्यात 7, धर्माबाद तालुक्यात 1, अर्धापूर तालुक्यात 16, भोकर तालुक्यात 1, देगलूर तालुक्यात 5, मुखेड तालुक्यात 2, कंधार तालुक्यात 2 असे एकूण 79 बाधित आढळले.

जिल्ह्यात 1 हजार 528 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 191, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 622, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 38, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 88, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 30, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 115, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 112, लोहा कोविड केअर सेंटर येथे 12, हदगाव कोविड केअर सेंटर 40, भोकर कोविड केअर सेंटर 13,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 18, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 13, किनवट कोविड केअर सेंटर येथे 13, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 23, मुदखेड कोविड केअर सेटर 8, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 20,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 16, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 25, बारड कोविड केअर सेंटर 4, खाजगी रुग्णालयात 119 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 5, निजामाबाद येथे 1, हैदराबाद येथे 1 तर मुंबई येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 

 जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

 सर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 908,

घेतलेले स्वॅब- 21 हजार 357,

निगेटिव्ह स्वॅब- 16 हजार 327,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 141,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 3 हजार 297,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 11,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 8,

मृत्यू संख्या- 120,

रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 हजार 632,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 528,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 286, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 87.

 प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

 

गणेशोत्सव मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमीत

 नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढत चाललेला प्रादुर्भाव व रुग्णसंख्या विचारात घेऊन 22 ऑगस्ट 2020 रोजी साजरा करण्यात येत असलेला गणेशोत्सव सणासंदर्भात शासन परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत.

 कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 हा 13 मार्च 2020 पासुन लागु करुन खंड 2, 3,4 मधील तरतुदींनुसार अधिसूचना निर्गमीत केली आहे. केंद्र शासनाकडून 22 मार्च 2020 पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यानंतर पुढे विविध टप्प्यामध्ये लॉकडाऊन 30 जुलै 2020 पर्यंत वाढविण्यात आले होते. त्यानंतर शासन व जिल्हा स्तरावरुन कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

 शासन परिपत्रकाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संपुर्ण नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत 22 ऑगस्ट 2020 रोजी साजरा करावयाच्या गणेशोत्सव सणासंदर्भात पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे.

 ·         सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल.

·         कोवीड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्याच पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.

·         श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपती 2 फुटांच्या मर्यादेत असावी.

·         यावर्षी शक्य तो पारंपारिक गणेशमुर्ती ऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तींचे पुजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्य तो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरुन आगमन व विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत: व कुटुंबियांचे कोरोना साथीच्यारोगापासून रक्षण होईल.

·         उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.

·         सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे जसे रक्तदान आयोजीत करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

·         आरती, भजन, किर्तन किंवा अन्य, धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदुषणा संदर्भातील नियमांचे व तरतुदीचे पालन करण्यात यावे.

·         श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

·         गणपती मंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीलनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येवून दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे (फिजीकल डिस्टीन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

·         श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीतकमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरीष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रीतरित्या काढण्यात येऊ नयेत.

·         महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

·         कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुर्नवसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनाने विहित केलेल्या व नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच यानंतर प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक राहील.

 

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह भारतीय दंडसंहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी  प्रक्रिया संहिता 1973 व आपत्तीय व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील. परंतु आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...