Tuesday, August 8, 2023

वृत्त क्र. 484

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मूल्यासाठी 9 ऑगस्ट रोजी प्रत्येक कार्यालयात घेतली जाईल शपथ
नांदेड (जिमाका) दि. 8 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मूल्यांना समोर ठेवून “मेरी माटी मेरा देश” अंतर्गत संपूर्ण देशभर एक विशेष मोहिम हाती घेतली आहे. 9 ऑगस्ट क्रांतीदिनापासून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा सुरू होत असून केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशभर याचे नियोजन केले गेले आहे. याअंतर्गत 9 ऑगस्ट रोजी प्रत्येक शासकिय, निमशासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था शाळा-महाविद्यालय, शासकीय महामंडळे आदी सर्व ठिकाणी सकाळी 10 वा. पंचप्रण शपथ घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.
भारतीय स्वातंत्र्याचे मूल्य डोळ्यासमोर ठेवून घेतल्या जाणाऱ्या शपथेचा मजकूर शासनातर्फे निर्गमीत केला आहे. “आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू” असा शपथेचा मजकूर सर्व कार्यालयांना पाठवून त्या-त्या विभाग प्रमुखांना आदेश दिलेले आहेत.
00000

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी ची पुर्तता करण्याचे आवाहन

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या

अर्जातील त्रुटी ची पुर्तता करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नविन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पद्धतीने तपासणी सुरु आहे. त्यानंतर नविन अर्जांची तपासणी केली जाणार आहे.  ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपुर्ण कागदपत्राअभावी त्रुटीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी http://www.syn.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर भेट देवून अर्जातील त्रुटीची पुर्तता एसएमएस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसात करावी, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त बी.एस. दासरी यांनी केले आहे.

 

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यात येते. दिनांक  १३ जुन २०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीवर ज्या कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे, त्याची प्रत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे समक्ष सादर करावा असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

 वृत्त क्र. 481

मध केंद्र योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशा पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. यासाठी पात्र व्यक्ती / संस्थाकडुन अर्ज मागविण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, उद्योग भवन, एमआयडीसी परिसर शिवाजीनगर, नांदेड या कार्यालयाशी भ्रमणध्वनी क्रमांक 8390290213 किंवा दुरध्वनी क्रमांकावर 02462-240674 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

योजनेची वैशिष्टे- मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणुक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी/ विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती करणे आहे.

या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. वैयक्तीक माधपाळ पात्रतेसाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य. वय 18 वर्षापेक्षा जास्त व 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. केंद्र चालक प्रगतशील मधपाळ व्यक्ती पात्रतेसाठी किमान 10 वी उत्तीर्ण, वय वर्ष 21 पेक्षा जास्त अशा व्यक्तीच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिच्या नावे एक एकर शेती जमीन किंवा भाडेतत्वावर घेतलेली शेत जमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्रचालक संस्था पात्रतेसाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. एक एकर शेत जमीन स्वमालकीची / भाडयाने घेतलेली असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. अटी व शर्तीमध्ये लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चीत केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.

00000

पीएम किसान योजनेच्या वंचित शेतकऱ्यांसाठी 7 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन

                                              पीएम किसान योजनेच्या वंचित शेतकऱ्यांसाठी

7 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 8 :- पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्याचे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत वितरीत होणार आहे. या लाभापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत विशेष मोहीम आयोजित करण्‍यात आली आहे.  याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण आल्‍यास संबंधित तलाठी  / तहलिसदार / तालुका कृषि अधिकारी व बॅक शाखा यांच्‍याशी संपर्क करून थांबलेला लाभ सुरू करून घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

या मोहिमेत सातबारा, 8 अ व फेरफार असा भूमी अभिलेख तपशील खात्‍याशी न जोडल्‍यामुळे  लाभ थांबलेले सूरू करणे. ज्‍या शेतकऱ्यांनी स्‍वतः ऑनलाईन नवीन नोंदणी केली आहे त्‍यांचा लाभ सुरू करणे. ज्‍या लाभार्थ्‍यांचे बॅकेला आधार क्रमांक व मोबाईल  क्रमांक जोडले नाहीत ते जोडून लाभ सुरळीत सुरू करणे. तसेच लाभार्थ्‍यांचा आधार क्रमांक पीएम किसान पोर्टल खात्‍याशी जोडून ई-केवायसी करणे इ. बाबींची पूर्तता केली जाणार आहे.

जिल्‍हयातील 62 हजार 667 लाभार्थी यांची सातबारा, 8अ व फेरफार असा भूमी अभिलेख तपशील, आधार क्रमांक न जोडल्‍यामुळे तसेच ई-केवायसी न केल्‍यामुळे  लाभार्थी अद्याप लाभापासून वंचीत असल्‍याचे निदर्शनास आले आहे.  ज्‍या लाभार्थ्‍यांची भूमि अभिलेख नोंदीप्रमाणे माहिती (सातबारा, ८अ व फेरफार तपशील) भरलेली नाही, त्‍यांनी संबंधित तलाठी कार्यालय / तहसिल कार्यालय येथे आवश्‍यक माहिती (सातबारा, 8 अ  व फेरफार इ.) द्यावी.  लाभार्थ्‍यांनी स्‍वतः ऑनलाईन नवीन नोंदणी केली आहे, त्‍यांनी पडताळणीसाठी आवश्‍यक कागदपत्रासह (सातबारा, 8अ  व फेरफार, आधार क्रमांक, बॅंक तपशील) इ. मा‍हिती संबंधित तहसिलदार कार्यालय येथे जमा करून लाभ सुरू करून घ्‍यावा.

यापुढे पी. एम. किसान योजनेचा ला सुरळीत सुरू राहण्‍यासाठी बॅंक खात्‍यास आधार क्रमांक  मोबाईल क्रमांक  जोडून डिबीटी ॲक्टीव्ह करणे करणे व  ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.  यासाठी  लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे, त्‍यांनी पोर्टलवरील फार्मर कॉर्नर पर्यायावर जाऊन मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वतः ई-केवायसी करू शकतात. तसे शक्य नसल्यास जवळच्‍या सामायिक सुविधा केंद्रावर (सीएससी केंद्रावरजाऊन स्वतःच्या आधार व मोबाईल क्रमांकाचा वापर करून ई-केवायसी करता येईल.  केंद्र शासनाने गुगल प्ले स्टोअरवर पीएम किसान जीओआय PMKISAN Gol या ॲप चा वापर करून शेतकऱ्यांचे पीएम किसान फेस ऑथेटिंकेशन द्वारे ई-केवायसी प्रमाणिकरण करण्‍याची सुविधा आहे.

00000

 वृत्त क्र. 483

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत 

नांदेड (जिमाका), दि. 8 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 2020-21,2021-222022-23 व 2023-24 या वर्षासाठी जिल्हाविभाग आणि राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी इच्छूक समाजसेविका, संस्थांकडून प्रस्ताव  मागविण्यात येत आहेत. परीपूर्ण प्रस्ताव 15 ऑगस्ट2023 पर्यत जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, शास्त्रीनगर, भाग्यनगर जवळ नांदेड येथे सादर करावेत. शासनाकडून महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जिल्हाविभाग व राज्यस्तरावर देण्यात येतो.

 

राज्यजिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला समाजसेविका तर विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्था यांनी प्रस्ताव सादर करावेत. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी महिला व बालविकास क्षेत्रात किमान 25 वर्ष कार्य केलेले असावे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात कमीत कमी 10 वर्ष कार्य केलेले असावे आणि विभागस्तरीय पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्थापब्लिक ट्रस्ट 1950 किंवा सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट नुसार पंजीबध्द असावी. तसेच संस्थेचे महिला व बाल विकास क्षेत्रातील सेवा व कार्य 7 वर्षाहून जास्त असावे. यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार/सावित्रीबाई फुले पुरस्कार अथवा दलित मित्र पुरस्कार मिळालेला नसेलअशा महिला समाजसेविका या पुरस्कारासाठी प्रस्ताव करु शकतात. अर्जदार महिलेचे कार्य जातधर्मपंथ आणि राजकिय पक्षाशी संबंधित नसावे. पुरस्कार मिळण्याची पात्रता व्यक्तिगत मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा या बाबतीत विचार करण्यात येणार नाही.

प्रस्ताव स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. राज्य स्तरावरील पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्ष कार्य केलेले असावे. विभाग स्तरावरील पुरस्कारासाठी स्वयंसेवी संस्थानी महिला व बाल विकास क्षेत्रात 7 वर्षापेक्षा अधिक कार्य केलेले असावे. जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्ष कार्य केलेले असावे. सन 2020-21,2021-222022-23 व 2023-24 यापैकी कोणात्या वर्षासाठीचा प्रस्ताव आहे ते नमुद करावे. जिल्हास्तर/विभाग स्तर/राज्यस्तर यापैकी जे असेल ते नमुद करावे. वैयक्तीक परिचय पत्रविना दुराचार प्रमाणपत्रगैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे  पोलीस प्राधिकरणाचे पत्र. सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र याप्रमाणे निकष आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आर. आर. कांगणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी

अभियानासाठी गाव पातळीवरचे नियोजन करा

-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

§  11 ऑक्टोंबर रोजी होणार विशेष उपक्रम

§  जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत दिव्यांगाची नोंदणी होणार पूर्ण

 

नांदेड (जिमाका) दि. 8 :-  विविध प्रवर्गातील दिव्यांगाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी एकाच ठिकाणी उपस्थित राहून दिव्यांगाच्या तक्रारी जाणून घेवून त्याच ठिकाणी त्याचा निपटारा केला पाहिजे. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानात सर्व संबंधित यंत्रणांनी दिव्यांगाना देण्यात येणारे सर्व लाभ एकाच ठिकाणी मिळतील यासाठी गावपातळीवरचे नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

 

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाच्या पूर्वतयारीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बापु दासरी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार तसेच विविध संबंधित विभागाचे विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.

 

राज्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यात येत्या 11 ऑक्टोंबरला या अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानात प्रत्येक विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या योजनांचा लाभ दिव्यांग लाभार्थ्यांना कसा देता येईल याची रुपरेषा निश्चित करावी. प्रत्येक विभागाने आपल्या योजनांच्या माहितीचा प्रचार करावा. जेणे करुन दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांची माहिती होईल. त्या अन्वये अभियानाच्या दिवशी दिव्यांगांना कागदपत्रांसह उपस्थित राहून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाला दिल्या.

 

या अभियानात दिव्यांगाना सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याचे व देण्यात येणाऱ्या लाभाचे सुयोग्य नियोजन यंत्रणांनी केले पाहिजे.  या अभियानात दिव्यांगाना आरोग्य विमा कवच योजनेत अर्ज भरुन घेणे, आयुष्यमान भारत कार्ड वितरण, मतदान कार्ड, महात्मा फुले जन आरोग्य योजना, कृषी विभागाच्या विविध योजना, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या योजना, निरामय योजना अशा अनेक योजनांची माहिती देण्याचे नियोजन करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सूचित केले.

0000


  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...