Friday, December 22, 2023

 वृत्त क्र. 888 

अडचणीतल्या महिलांसाठी हक्काचा शासकीय आधार 

नांदेड (जिमाका) दि. 22 :-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. येथे 18 ते 60 वर्षापर्यंत निवाऱ्याची आवश्यकत असणाऱ्या निराधार, विधवा, कुमारी माता, परित्यक्ता, अत्याचारीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुर्नवसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. येथे आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली जाते. 

तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्षापुढील महिलांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी, पुनर्वसनाच्यादृष्टिने त्यांच्या विवाहकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. येथे शिक्षण व प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना आवश्यकतेनुसार प्रवेश दिला जातो. समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गाने न जाता समस्येचे निराकरण होईपर्यंत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा लाभ घ्यावा. प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1 ते 3 यावेळेत अधिक्षक माता अनुसया शासकीय महिला वसतिगृह (राज्यगृह) हॉटेल भाईजी पॅलेसच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डाणपुल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे किंवा दुरध्वनी क्रमांक 02462-233044 येथे संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्यगृहचे अधीक्षक वर्ग-2 एस. एम. पुजलवार यांनी केले आहे.

00000 

 वृत्त क्र. 887 

जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी

राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागाचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- सन 2024 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी  https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन 7 जानेवारी 2024 पर्यंत जास्तीत जास्त नाव नोंदणी करावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त यांनी केले आहे.

 

जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 1 जानेवारी 2002 नंतर जन्म झालेल्या तरुणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा आहे. ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा.

0000

 वृत्त क्र. 886 

फिरत्या वाहनावरील दुकानासाठी

दिव्यांगांना अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून राबविण्यात येणारी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदारांना नावनोंदणी (अर्ज) करण्यासाठी नुकतेच पोर्टल सुरू करण्यात आले आहे.

 

दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी ttps://evehicleform.mshfdc.co.in   ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.  या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. 4 जानेवारी 2024 रोजी स. 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

 

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात 10 जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या. यांच्या स्तरावरून सुरू आहे.

 

या योजनेचा उद्देश दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा आहे.

0000

 वृत्त क्र. 885 

27 डिसेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड जिल्ह्यात बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या कालावधीत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

हा मेळावा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पहिलामाळा शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, आनंदनगर रोड बाबानगर नांदेड येथे होईल. या रोजगार मेळाव्यामध्ये नामंकित कंपनीकडून मुलाखत घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

0000

 वृत्त क्र. 884 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत

शेतकऱ्यांनी राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्याचा लाभ घ्यावा 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- कृषि विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांचे राज्याबाहेरील अभ्यास दौरा आयोजीत करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्याचा कालावधी 7 दिवसांचा आहे. त्यात फलोत्पादन पिकांशी निगडीत प्रशिक्षण संस्थेमध्ये तांत्रिक मार्गदर्शन वर्ग व  प्रात्यक्षिके आयोजीत करण्यात येणार आहे. तसेच प्रक्षेत्र भेटी, प्रगतशील शेतकऱ्यांच्या शतावर भेटी व विपनन केंद्रे व फलोत्पादन क्षेत्रामध्ये विशेष काम करणाऱ्या खाजगी कंपन्यांना भेटी याप्रमाणे कार्यक्रम नियोजीत आहे. 

जिल्ह्यातील इच्छुक फळे, फुले, भाजीपाला व मसाला पिके उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 883 

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

27 डिसेंबर रोजी अर्धापूर, मुदखेड येथे मेळावा 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी पंचायत समिती सभागृह अर्धापूर पंचायत समिती सभागृह मुदखेड येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकु900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 

मेळाव्यास येताना आधार कार्ड. पॅन कार्ड,रहिवासी दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,दोन फोटो,व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

000000

वृत्त क्र. 882 

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

26 डिसेंबर रोजी नायगाव, बिलोली येथे मेळावा 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी  मंगळवार 26 डिसेंबर 2023 रोजी पंचायत समिती सभागृह नायगाव पंचायत समिती सभागृह बिलोली येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

या मेळाव्यात कर्ज मंजुरी प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा  लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकु900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. 

मेळाव्यास येताना आधार कार्ड. पॅन कार्ड,रहिवासी दाखला,शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,दोन फोटो,व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.  ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

000000

 वृत्त क्र. 881

 

पीक कापणी प्रयोगानुसार

नांदेड जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षाही कमी

 

नांदेड (जिमाका) दि. 22 :- नांदेड जिल्ह्यातील 1562 महसूल गावांमध्ये 15 डिसेंबर 2023 रोजी खरीप हंगाम 2023 अन्वये अंतिम पैसेवारी ही 50 पैसे पेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे. आणेवारी काढण्याची पद्धत शासनाने निश्चित करून दिलेली आहे. आणेवारी ही केवळ पर्जन्यमानावर अवलंबून नसते. पीक कापणी प्रयोगानुसार ही पैसेवारी जाहीर केली जाते.

 

यंदा नांदेड जिल्ह्यात 99 टक्के पर्जन्यमान झाले असले तरी पावसाळ्याच्या पहिल्या कालखंडात काही तालुक्यातील महसुली मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. काही मंडळांमध्ये पर्जन्यमानाच्या कालावधीत 15 ते 21 दिवसांचा खंड पडलेला होता. खंड पडलेल्या पावसामुळे हलक्या जमिनीवर असलेले सोयाबीन पीक करपून गेल्याचे प्रशासनाच्या पाहणीत आढळून आले आहे.  मध्यम आणि भारी जमिनीमध्ये असलेल्या सोयाबीन पिकांची वाढ खुंटलेली जाणवली. परिणामी पिकांच्या उत्पन्नात घट देखील झाल्याच्या नोंदी आहेत. शेतीचे उत्पन्न कमी झाल्यामुळे पैसेवारी हा कृषी उत्पादनाचा इंडिकेटर कमी होतो. पिक विमा कंपनीने  स्वतंत्र सर्वेक्षण करून अतिवृष्टी हा ट्रिगर लक्षात घेऊन मध्यावधी नुकसान जाहीर केले आहे.

 

मध्यम किंवा गंभीर दुष्काळ

ज्या तालुक्यांमध्ये मध्यम किंवा गंभीर दुष्काळ असल्याचे सूचित करणारा ट्रिगर- 2 लागू होतो त्या तालुक्यांमध्ये पिकांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण अर्थात ग्राउंड ट्रुथींग  केली जाते. या ग्राउंड ट्रुथींग  नुसार मध्‍यम किंवा  गंभीर स्‍वरुपाचा दुष्‍काळ जाहिर केला जातो. नांदेड जिल्ह्याची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आलेली असली तरी देखील जिल्ह्यात अद्यापही दुष्काळ व्यवस्थापन संहिते मधील तरतुदीनुसार दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही.जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान साडेसातशे मि.मी पेक्षा कमी झाले आहे अशा जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 25 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे.जिल्ह्याची पैसेवारी कमी असणे म्हणजे कोरडा दुष्काळ नव्हे.पैसेवारी ही पर्जन्यमानासोबतच पर्जन्याचे असमान वितरणपिकांवरील रोगराईकीटकांचा प्रादुर्भाव आदी घटकांवर आधारित असते. सोयाबीन हे नांदेड जिल्ह्याचे  मुख्य खरीप पीक आहे. या पिकावर यल्लो मोजॅक व्हायरसखोडकुजमूळकूज या बुरशीजन्य आजारांमुळे देखील मुख्य उत्पन्न असलेल्या सोयाबीनची उत्पादकता घटली आहे. नांदेड जिल्ह्याची पीक पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी असली तरी दुष्काळ व्यवस्थापन संहिते मधील तरतुदीनुसारच दुष्काळ जाहीर केला जातो. 

0000

वृत्त क्र. 880

माळेगाव यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरातून सहकार्याची भूमिका आवश्यक

नांदेड (जिमाका) दि. 22 :- आपल्या नांदेड जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक, तेलंगणा राज्यातील अनेक भक्तांचा ओढा हा माळेगावकडे असतो. असंख्य लोकांचे माळेगाव येथील खंडोबा कुलदैवत असून येथील जत्रा ही मागील अनेक वर्षांपासून भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखल्या गेले आहे. याचबरोबर येथील यात्रेत असंख्य भक्तांना करमणुकीसह वेगळा विरंगुळाही मिळतो. लहान-मोठे सर्वच यात्रेत आनंद घेतात. पूर्वापार परंपरेने ही यात्रा सुरू असून या यात्रेतील विविध उत्सवाला सकारात्मकतेने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याची प्रशासकीय भूमिका अधिक महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. 

श्री क्षेत्र माळेगाव येथील यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून नियोजनाच्या दृष्टीने आज माळेगाव येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस खासदार सुधाकर श्रृंगारे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय अधिकारी शरद मंडलीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, माळेगावच्या सरपंच कमलाबाई रुस्तुमराव धुळगंडे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, पशुवैद्यकिय विभागाचे उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भुपेंद्र बोधनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

यात्रेच्या परंपरेप्रमाणे येथील पशुप्रदर्शन, शंकरपट याकडे भाविकांचा अधिक ओढा असतो. यासाठी खासदार सुधाकर श्रृंगारे व माझी सहमती आहे. पशुधनाच्या विविध स्पर्धेसह पशुपालकांचा, प्रगतशील शेतकऱ्यांचा, यात्रेत आपले कौशल्य दाखविणाऱ्या कलावंतांची अपेक्षा ही यात्रेच्या माध्यमातून खंडेरायाच्या दरबारात योग्य तो सन्मान व्हावा एवढीच अपेक्षा असते. यासाठी जिल्हा परिषदेने विशेष खबरदारी घेऊन प्रत्येकाच्या हक्काचे सन्मान हे त्या-त्या कार्यक्रमातच दिले जावेत याची विशेष काळजी घ्यावी, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले. 

येथील घोड्यांचा बाजार हे या यात्रेचे वैशिष्ट्ये आहे. यात्रेकरूंना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचा एक दुसरा व्हेरिएंट आला असून त्याबाबत देशपातळीवर खबरदारी व काळजी घेतली जात आहे. अशा स्थितीत आरोग्याशी तडजोड नको. यात्रेतील भाविकांसह सर्वांना पिण्याचे पाणी हे तपासणी करूनच दिले पाहिजे. याचबरोबर बाजारात विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची वेळोवेळी तपासणी करून कसल्याही प्रकारची विषबाधा अथवा अनुचीत प्रकार होणार नाही याची खबरादारी घेण्याचे निर्देश खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी दिले. माळेगावसह माझ्या मतदारसंघातील असलेल्या गावांच्या विकास कामांना आजवर 50 कोटी रूपये एवढा निधी उपलब्ध करून देता आला याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. 

यात्रेतील पावित्र्य, सामाजिक सलोखा, शांतता याबाबत कोणतीही तडजोड जिल्हा प्रशासनातर्फे केली जाणार नाही. यात्रेत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस विभाग दक्ष आहे. याचबरोबर माळेगावच्या ग्रामस्थही अधिक दक्षता घेतील, असा विश्वास प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला. 

यात्रेच्या सुरक्षेच्यादृष्टीने सुमारे 1 हजार 338 पोलीस कर्मचारी पोलीस विभागातर्फे नेमण्यात आले आहेत. यात 400 होमगार्ड आहेत. यात्रेतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षतेच्यादृष्टिने सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. याचबरोबर अशा ठिकाणी हायमास्क लावले जाणार असून सीसीटीव्हीचे नियंत्रण हे पोलीस कक्षात ठेवण्यात आले आहे. यात्रेतील भक्ताच्या आनंद उत्सवाला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले असून यात जर कोणी अडथळा अथवा गैरकृत्य केल्यास अशा संबंधीत व्यक्तींविरूद्ध तातडीने कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. 

10 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या पाच दिवसांच्या कालावधीत विविध महोत्सव व उपक्रमाचे आयोजन केले आहे. यात 10 जानेवारी रोजी देवस्वारी-मिरवणूक व विविध स्टॉल्सचे उद्घाटन, 11 जानेवारी रोजी कृषी प्रदर्शन, विविध स्पर्धा, पशु प्रदर्शन, 12 जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल, 13 जानेवारी रोजी लावणी व कलामहोत्सव, 14 जानेवारी कला महोत्सव व समारोप असे प्राथमिक नियोजन असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात आली. 

पशुपक्षी बाजार व खरेदी विक्री

सदर यात्रा ही जवळपास एक महिनाभर चालते. यात इथला जनावराचा बाजार हा सर्वदूर ओळखला जातो. यात घोडे, उंट, गाय, बैल, म्हैस, रेडे, गाढव, शेळया, मेंढया, कुत्रे आदी पशु पक्षी इतर राज्यातूनही लोक घेवून येतात. शासनाचा वन्य पशुपक्षांचा कायदा अंमलात आणल्यापासून कायद्याप्रमाणेच आता हा बाजार भरतो. कायद्यातील तरतुदीप्रमाणे या यात्रेतील इतर सर्व उपक्रम यशस्वी घेण्यासाठी योग्य ते नियोजन केले जाईल असे जिल्हा परिषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

0000













  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...