Friday, September 2, 2022

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 107 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, लोहा 1 असे एकुण 2 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 422 एवढी झाली असून यातील 1 लाख 720  रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 4  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 5,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 5 असे एकुण 10 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 17 हजार 173
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 96 हजार 331
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 422
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 720
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- निरंक

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- नांदेड जिल्ह्यात शनिवार 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 3 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन  

नांदेड (जिमाका) दि. 2 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 5  सप्टेंबर 2022 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात लोकशाही दिन आयोजित केला आहे.  

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.  

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.  

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 

 महिला व बालविकास विभागाच्यावतीने पोषण माह सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 

 नांदेड (जिमाका) दि. 2 :-   महिला व बालविकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाड्यांमध्ये राष्ट्रीय पोषण माह सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील दोन बालगृह, एक निरिक्षण गृह, दोन विशेष दत्तक गृह येथे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी एम. एस. वाघमारे यांनी सही पोषण देश रोशन व स्वस्थ बालक बालिका या संकल्पनेवर आधारित पोषण माह कार्यक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. 

या कार्यक्रमाला भारतीय जीवन विमा महामंडळाचे उपव्यवस्थापक पाडुरंग भातलवंडे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजवंतसिंग कदम, जिल्हा परिवीक्षा सदस्य अे. पी. खानापुरकर, एस. के. दवणे, एस. आर. दरपलवार, ग. वि. जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमात शून्य ते 18 वयोगटातील बालकांची वजन व उंची मापन, बालकांचे वैयक्तिक  स्वच्छता, कृती कार्यक्रम वारंवार हात धुणे, नखे कापणे, केस कापणे, सनिटॉयझरचा वापर, वस्तुची साफ सफाई व निर्जतुकीकरण, बालगृह स्वच्छता-पाणी याबाबतची माहिती देण्यात आली. याप्रसंगी बालगृहातील सर्व प्रवेशितांचे अद्यावत अहवाल, बालगृहात आरोग्यदायी किचन गार्डन करणे, बालगृहातील बालक, कर्मचारी यांच्यात आहार नियोजन, प्रतिनियुक्त अन्न, स्वच्छतेबाबत चर्चा घडवून आणणे, राष्ट्रीय पोषण माह या अभियानावर आधारित चित्रकला स्पर्धा, कविता स्पर्धा, फिल्प शो अशा विविध स्पर्धा, पथनाट्य बालगृहातील बालकांसाठी घोषवाक्य लिहिणे, इत्यादी उपक्रम राबविणार असल्याची माहिती एम.एस.वाघमारे यांनी दिली.

000000

 

 अंगणवाडी सेविकांचे कार्य सामाजिक उत्तरदायित्वाचे आदर्श प्रतीक

आमदार बालाजी कल्याणकर

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- अंगणवाडी सेविका विविध आव्हानांवर मात करत केवळ शासकीय सेवा म्हणून नव्हे तर सामाजिक उत्तरदायित्व म्हणूनही तेवढ्याच जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडीत असतात. तुमचे योगदान व हे काम करतांना येणाऱ्या अडचणी मी जाणून असून अंगणवाडी दुरूस्ती पासून ते इतर सेवा-सुविधा कसा उपलब्ध करता येतील याबाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी तरोडा बु. येथे आयोजित राष्ट्रीय पोषण माह 2022 या कार्यक्रमात ते बोलत होते.   

 

यावेळी जिल्हा परिवीक्षा अधिकारी खानापुरकर, परिविक्षा अधिकारी जिंदमवार, राष्ट्रमाता विद्यालयाचे संचालक अवधुत क्षीरसागर, मुख्याध्यापक नरवाडे, श्री. शहाणे, श्री. सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. पोषण माहमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून यात पोषण रॅली, ॲनिमिया कॅम्प, महिला व किशोरींना मार्गदर्शन करणे, स्वस्थ बालक-बालिका स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा शिसोदे यांनी केले तर सुत्रसंचलन मुख्यसेविका वैशाली मेघमाळे यांनी केले. शेवटी आभार रेखा पडोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्यसेविका अर्चना शेटे, शकुंतला पेंद्र, प्रतिभा खिराडे, सुनंदा ढाकरे, सेविका व मदतनिस यांनी परिश्रम घेतले.

000000   




  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...