मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी साधला ‘लोकसंवाद’मधून राज्यातील लाभार्थ्यांशी थेट संवाद
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी
पाच ब्रास वाळू मोफत
नांदेड, दि. 2 :- प्रधानमंत्री आवास योजनेतून घर
बांधण्यासाठी पाच ब्रासपर्यंतची वाळू कोणतीही रॉयल्टी न आकारता मोफत देण्याची
घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी‘लोकसंवाद’
कार्यक्रमात केली.
शासनाच्या
विविध योजना गरजूंपर्यंत पोहचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणांची माहिती घेण्यासाठी
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आजपासून ‘लोकसंवाद’ कार्यक्रमाद्वारे लाभार्थ्यांशी संवाद सुरू केला. या कार्याक्रमाच्या
पहिल्या भागात आज राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई आवास, शबरी घरकुल, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी
योजनेच्या चांदा ते बांदापर्यंतच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट
संवाद साधला. विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या
लाभार्थ्यांबरोबरच विविध आवास योजनेतून बांधलेल्या घरातील प्रत्यक्ष
लाभार्थ्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.
प्रधानमंत्री
आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी
घरकुल योजनेचा लाभ घेताना कोणत्या अडचणी आल्या, अनुदान वेळेत
मिळाले का, शौचालयाचे बांधकाम केले का, अनेक प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी आज प्रत्यक्ष लाभार्थ्यांकडून
जाणून घेतली. यावेळी, अनुदान थेट बँकेतून मिळत असल्यामुळे
राज्य शासनाच्या योजना जलदगतीने सर्वसामान्यांपर्यंत पोचले असल्याच्या व त्या
पारदर्शकपणे राबवित असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या. राज्य शासनाने
राबविलेल्या योजनांमुळे पक्क्या व सुंदर घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचेही या
लाभार्थ्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. घरकुलाबरोबरच उज्ज्वला योजना, शौचालय योजनांचा लाभही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्धा
येथील आरती कोट्टेवार व गडचिरोली जिल्ह्यातील फुलेवाडा येथील जावेद शेख यांनी
प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधताना रेती मिळण्यास अडचणी येत असल्याचे
सांगितले. त्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील
घरांच्या बांधकामासाठी पाच ब्रासपर्यंत रेती मोफत देण्याची घोषणा केली. तसेच
यासंबंधी सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना सूचना देण्यात येणार असल्याचेही
सांगितले.
या
योजनेतील घरांच्या आराखड्यासाठी घेण्यात येणारे शुल्क माफ करण्यासंदर्भात केंद्र
शासनाशी चर्चा सुरू असून लवकरच त्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे अमरावतीतील आशा जामजोड यांच्या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री
श्री. फडणवीस यांनी सांगितले.
पंडित
दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजनाचा लाभ मिळालेल्या वर्धा जिल्ह्यातील सुनंदा
चौधरी यांनी या योजनेमुळे जागा मिळाली आणि प्रधानमंत्री आवास योजनेमुळे घराचे
बांधकाम झाल्याचे सांगितले. तर वर्ध्यातीलच सविता श्रीशैल गायकवाड या घरकाम
करणाऱ्या महिलेने प्रधानमंत्री आवास योजनेमुळे आपलं घर झाल्याचे सांगून
प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
नांदेड
मधील अर्धापूर तालुक्यातील लहान या गावातील अस्मिता राजेश वाहेवळ म्हणाल्या, कुडाचे घर असल्यामुळे इतर पाहुण्यांचे पक्के घर पाहून मुले वारंवार आपले
घर चांगले का नाही, असा प्रश्न विचारत होती. घर नसल्यामुळे
चांगले घर व्हावे, यासाठी मुले जोमाने अभ्यासाला लागली.
त्यातच प्रधानमंत्री आवास योजनेमुळे घर मंजूर झाले आणि यामुळे राज्याच्या
मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदाच थेट संवाद साधता आला असल्याची भावना व्यक्त केली.
नांदेड जिल्ह्यातील सुजाता दिगंबर सावंत यांनी रमाई आवास योजनेतून घर मिळाल्यामुळे
मुले आनंदी असून ते आपल्या मित्रमैत्रिणींना घरी आवर्जून आणत असल्याचे सांगितले.
ठाणे
जिल्ह्यातील दहिवलीचे कैलास धुळे, लातूरमधील बाबूराव साधू
कांबळे, नागपूर जिल्ह्यातील खैरी पिंजेवाड येथील दर्शना
सोलंकी, नाशिकमधील नंदा पाडेकर या लाभार्थ्यांशी त्यांच्या
नव्या घराच्या ठिकाणी संपर्क साधून मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला व घराच्या सुंदर
बांधकामाबद्दल लाभार्थ्यांचे कौतुक केले. या लाभार्थ्यांनी तसेच कोल्हापूर
जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील विष्णू राऊत यांनी राज्य व केंद्र शासनामुळे
स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले असल्याच्या भावना व्यक्त करून आपल्या नव्या
घरात भेट देण्याचे थेट निमंत्रणच मुख्यमंत्र्यांना दिले.
अन्
‘देवेंद्र’च्या रुपात देव धावून आला…
इचलकरंजी
येथील ज्योत्स्ना दशरथ घोडके म्हणाल्या, माझे कच्चे घर होते. मात्र,
घराची पडझड झाली होती. त्याचवेळी मुलीचे बाळंतपण आले होते. त्या
विवंचनेत असतानाच प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकूल मंजूर झाल्याचा निरोप
अधिकाऱ्यांनी स्वतःहून दिला अन् ‘देवेंद्रच्या रुपात देव’
भेटल्याचा आनंद झाला. घराचे बांधकाम झाल्यामुळे मुलीचे बाळंतपणाचे
दिवस सुखरुप झाल्याच्या भावना व्यक्त केल्या.
कोल्हापूर
जिल्ह्यातील कृष्णात पांडुरंग निकम यांनी सांगितले, पक्के घर
बांधल्यामुळे आनंद झाला असून माझ्या मित्रांनी घरावर लावलेल्या कृ.पा. निकम या
नावाच्या पाटीवर बदल करून‘देवेंद्र – मोदीजी
कृ पा’ असा बोर्ड लावला असल्याचे सांगितले.
यावेळी
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सन 2022 मध्ये सारा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना प्रत्येक
बेघर कुटुंबाकडे आपला हक्काचा निवारा असावा, असा निर्धार प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यासाठी या कार्यक्रमाला त्यांनी गती दिली आहे.
देशातील लाखो कुटुंबे स्वत:च्या घराचे स्वप्न पाहत आहेत. त्यांचे स्वप्न
साकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या चार वर्षात देशात सव्वा कोटी घरांची
निर्मिती करण्यात आली आहे. या घरांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात भरीव वाढ
करण्यात आल्याने आता तुलनेने मोठ्या आकाराची आणि सोईसुविधायुक्त घरे दिली जाणार
आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेने करण्यात येत असून अनुदानाची रक्कम
थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री
आवास योजनेअंतर्गत राज्यात 12 लाख घरांची निर्मिती
करण्याचे नियोजन केले असून 6 लाख घरांचे काम सुरू आहे. पुढील
वर्षी अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील एकही गरजू कुटुंब घराविना वंचित राहू
नये, याचा निर्धार केला आहे. नुकतेच प्रधानमंत्री श्री. मोदी
यांच्या हस्ते शिर्डी येथे राज्यातील अडीच लाख घरकुलांचे वितरण करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेची संपूर्ण कार्यवाही योग्य पद्धतीने होऊन पात्र
लाभार्थ्यालाच तिचा लाभ मिळावा हा प्रयत्न आहे. या माध्यमातून प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांचे मजबूत भारताचे व गरिबीतून देशाला बाहेर काढण्याचे स्वप्न पूर्ण
होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
आधुनिक
माध्यमाद्वारे एकाच वेळी राज्यातील सर्व जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी थेट संवाद
साधणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरले. लाभार्थ्यांशी
संवादाचे थेट प्रक्षेपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या devendra.fadnavis
या फेसबुक पेजवर, @Dev_Fadnavis या ट्विटर
हॅण्डलवर आणि DevendraFadnavis या यूट्यूब चॅनलच्या
माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR
या फेसबुक पेज आणि youtube.com/maharashtradgipr यूट्यूब चॅनलवरून आणि पार्थ इन्फोटेकच्या http://elearning.parthinfotech.in/
या लिंकवरून करण्यात आले होते.
नांदेडच्या
लाभार्थ्यांशीही
मुख्यमंत्री
फडणवीस यांनी साधला संवाद
जिल्ह्यातील
प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना (नागरी व ग्रामीण) चा लाभ घेतलेल्या
लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद
साधून त्यांनी घेतलेल्या योजनेच्या लाभाबाबत माहिती घेतली. येथील जिल्हाधिकारी
कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्स कक्षात त्यांनी विविध लाभार्थ्यांशी हा लाईव्ह
संवाद साधला.
यावेळी
अर्धापूर तालुक्यातील लहान या गावातील अस्मिता राजेश वाहेवळे, सुजाता दिगांबर सावंत, विशाखा राजू लोणे, विजया दिगांबर वाहेवळे तसेच नांदेड येथील माया विजय धुतराज, पंढीरानाथ पाबळे, सुदर्शन वाडेकर या लाभार्थ्यांनी
मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधून
घरासाठी लाभ घेतलेल्या योजनेविषयी माहिती दिली. प्रधानमंत्री आवास योजना व रमाई
आवास योजनेंतर्गत घराचा लाभ घेतलेले पार्वतीबाई देशमाने, खंडू
डाके, संभा बरकमकर, शांताबाई जाधव,
जिजाबाई बरडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
000000