Sunday, April 27, 2025

  वृत्त क्रमांक 441

उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा दौरा 

नांदेड दि. 27 एप्रिल :- राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.   

सोमवार 28 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे आगमन व स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याचा भुमिपूजन कार्यक्रम व नागरी सत्कार समारंभास उपस्थिती.  दुपारी 12 वा. परोटी तांडा येथून मोटारीने किनवट तालुक्यातील मानसिंक नाईक तांडाकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. मानसिंक नाईक तांडा येथे आगमन व आमदार भिमराव केराम यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वा. मानसिंक नाईक तांडा येथून मोटारीने पुसदकडे प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्रमांक 440

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दौरा 

नांदेड दि. 27 एप्रिल :- राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.   

सोमवार 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 8.30 वा. श्रीक्षेत्र नरसी नामदेव ता. सेनगाव जिल्हा हिंगोलीकडे प्रयाण करतील. 

0000


वृत्त क्रमांक 439

टंचाईग्रस्त देगलूर, मुखेड तालुक्याची तहान भागणार

नांदेड दि. 27 एप्रिल :- लेंडी आंतरराज्य प्रधान प्रकल्प हा महाराष्ट्र व तेलंगणा राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पाची पाणी वापर क्षमता 5.23 टीएमसी इतका असून प्रकल्पामुळे 26 हजार 924 हेक्टर इतके क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 

काल 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या उपस्थितीत लेंडी प्रकल्पाच्या घळभरणीबाबत आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये नागरी सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच कामाच्या नियोजनाबाबत माहिती घेण्यात आली. प्रकल्पग्रस्तांसाठी वाढीव कुटूंब पुर्नवसन अनुदान वाटप करणे, शेतकऱ्यासाठी सानुग्रह अनुदान वाटप करणे व पहिल्या टप्प्यातील  7 गावातील भुखंड वाटप करणे इत्यादी गोष्टीचा परामर्श घेण्यात आला. 

या बैठकीस उपजिल्हाधिकारी पुर्नवसन मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिक्षक अभियंता देगलूर दाभाडे, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, कार्यकारी अभियंता, लेंडी प्रकल्प देगलूरचे विवेकानंद तिडके, कार्यकारी अभियंता  महावितरण पेंडारकर, तहसिलदार मुखेड जाधव, पोलीस निरीक्षक श्री. तिडके, श्री. टाक शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील हंगरगेकर, सरपंच भिंगोली गाढवे, उपसंरपंच सोनकांबळे आदीची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले बैठकीचा समारोप करताना देगलूर व मुखेड तालुक्यातील पाणी टाचाईची परिस्थीती विशद केली. येणाऱ्या काळात देगलूर व मुखेड तालुक्याला पाण्याची भीषण पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्यामुळे आता आगामी काळात याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. देगलूर, मुखेड तालुक्याची तहान भागविण्यासाठी आंतरराज्यीय  लेंडी प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे. लेंडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व आवश्यक गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. घळभरणी केल्यास धरणात 145.15 दलघमी 5.23 टीएमसी उपयुक्त पाणी साठा निर्माण होईल. यामुळे देगलूर व मुखेड तालुक्याची तहान भागेल. तसेच समांतरपणे मुखेड तालुक्यातील बुडीत होणाऱ्या सर्व गावांचा प्रश्न त्वरीत मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. 

शेतकऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान वाटप, वाढीव कुटूंब पुर्नवर्सन अनुदान वाटप, भुखंड वाटप तसेच सर्व गावातील नागरी सुविधा लवकरात लवकर पुर्ण करुन प्रकल्पग्रस्तांना स्थानांतरीत करण्याचे व प्रकल्पाचे घळभरणीचे आदेश जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिले आहेत.

00000

 वृत्त क्रमांक 438

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता  

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना  

नांदेड, २७ एप्रिल:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 26 एप्रिल 2025 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 27 एप्रिल 2025 या दिवसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. 27 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच तुरळक ठिकाणी वातावरण उष्ण व दमट राहण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

या गोष्टी करा 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

  वृत्त क्रमांक 437

"नागरिकांनो पाणी जपून वापरा"- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले                                                                                                                

नांदेड दि. २७ एप्रिल :- नांदेड जिल्ह्याचे तापमान ४३ अंशाच्यावर गेले आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे. परिणामी मे महिन्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जाण्यांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

                                                                                                                                                              शनिवार २६ एप्रिल, २०२५ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन केले  होते. या बैठकीमध्येल निवासी उपजिल्हाजधिकारी महेश वडदकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता अजय दाभाडे, कार्यकारी अभियंता चौगले, जिल्हा प्रशासन अधिकारी गंगाधर इरलोड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपाचे प्रतिनिधी इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच व्हीसीव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगर परिषदचे मुख्याधिकारी हे सहभागी होते.                                                                          

सध्या मानार प्रकल्पात ४६ टक्के, विष्णुपूरी प्रकल्प ३१ टक्के, मध्यम प्रकल्प २९ टक्के, उच्च पातळी बंधारे ३६ टक्के, लघु प्रकल्प १९ टक्के पाणी साठा शिल्लक असून हा साठा माहे जून अखेरपर्यंत पुरेसा आहे. परंतु जून मध्ये पर्जन्यमान कमी झाल्यास टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

सध्या जिल्ह्यात १४ टॅंकर व ९१ विहीर अधिग्रहणाव्दारे पाणी पुरवठा चालू असून आणखी ६ टॅंकर व १९७ विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजुरीच्या स्तरावर आहेत. नळ योजना दुरुस्ती २१५ प्रस्ताव, पूरक नळ योजना ६६ व नविन विंधन विहीर ७४० अशा विविध योजनांना प्रशासकीय मान्याता देण्यात आली असून सदर कामे प्रगतीपथावर आहेत. 

मुखेड तालुक्यामध्ये  वाडी तांडयावर टॅंकर व विहीर अधिग्रहणाची संख्या जास्त असल्यामुळे जल जीवन मिशनची कामे तात्काळ पूर्ण करुन टंचाईग्रस्तॅ वाडी/तांडयावरील टंचाईची समस्या मिटवावी तसेच जलयुक्त शिवारची कामे हाती घ्यावीत, अशा सुचना संबंधित विभागास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिल्या आहेत.

मे महिन्यात टंचाईची तीव्रता वाढणार असल्या मुळे विविध जलाशयातून/कॅनालव्दारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची चोरी होणार नाही यादृष्टीने अनाधिकृत मोटारी जप्ता करण्याशबाबत पथकांची नियुक्ती  करण्यात यावी. जलयुक्त शिवाराची जास्तीत जास्त कामे हाती घेऊन पूर्ण केल्यास सिंचनासाठीच्या पाण्याची आवश्यकता कमी होईल त्यादृष्टीने संबंधित विभागाने कार्यवाही करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

00000

  वृत्त क्रमांक 535   पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा   नांदेड दि. 25 मे :- राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल ...