Friday, October 27, 2017

राष्ट्रीय एकता दौडमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 27:- स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय एकता दिवस व स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त नांदेड शहरात आयोजित राष्ट्रीय एकता दौडमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा होणार आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात करावयाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी  अरुण डोंगरे बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, पोलीस उपाअधीक्षक विश्वभंर नांदेडकर, जिल्हा क्रिडा अधिकारी गंगालाल यादव , तहसीलदार किरण अंबेकर तसेच शिक्षण , राष्ट्रीय सेवा योजना, महानगरपालिका आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   
दिनांक 31 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7-30 वाजता नांदेड शहरातील महात्मा गांधी पुतळा ते जुना मोंढा टावर या मार्गाने एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. यात पोलीस विभागासह इतर दलही सहभागी होणार आहेत दै अशाच प्रकारच्या राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन नांदेड शहरातही करण्यात येणार आहे. या दौडमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, खेळाडू, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी, सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, महिला, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी, उद्योजक व त्यांचे प्रतिनिधी, नागरिक यांनी सहभागी होणार आहेत. यावेळी एकता दिवसाची शपथही देण्यात येणार आहे.  या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आवाहन केले आहे.

0000
उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कारासाठी
सुक्ष्म, लघू उद्योगांना अर्ज करण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 27 :- जिल्ह्यातील लघु उद्योजकांकडून सुक्ष्म व लघु उद्योग घटकांसाठीच्या उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार सन 2017 या वर्षासाठी शुक्रवार 24 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी कळवले आहे.
      उद्योग संचालनालयाच्यावतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सुक्ष्म व लघु  उद्योगांना पुरस्कार दिले जातात. प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे  15 हजार रुपये व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.
      जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी  पुढीलप्रमाणे अटी पुर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या  वेळीउद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी या कार्यालयाकडे स्थायीरित्या नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील सतत दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी, थकबाकीदार असू नये. उद्योग घटकास यापूर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे. नांदेड जिल्हयातील लघु उद्योजकांनी मंगळवार 24 नोव्हेंबर 2017 पुर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांचेकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

000000
लोकशाही दिनाचे 6 नोव्हेंबर रोजी आयोजन
नांदेड, दि. 27 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकू घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्‍यात येतो. त्यानुसार सोमवार 6 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्‍याचे व न स्विकारण्‍याबाबतच्‍या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्‍यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्‍वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्‍यात येणार नाहीत. त्‍यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे.
यादिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हास्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास  सुरुवात करण्यात येईल.  
न्यायप्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील  महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल , असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
  पिक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 27 :-  कृषि विभागांतर्गत नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या पाच तालुक्यांमध्ये तुर, कापुस पिकांसाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे पिकावरील किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात आला आहे.
कपाशीवरील पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी बायफेनथ्रीन 10 इसी 16 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीसाठी फेनप्रोपॅथ्री 10 इसी 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तुर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रती हेक्टरी 5 कामगंध सापळे 50 मीटर अंतरावर लावावेत, असे आवाहन नांदेड विभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

00000
कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या
शेती विषयक माहितीची ऑनलाईन नोंदणी
नांदेड, दि. 27 :- कापुस उत्पादक शेतकऱ्यांची शेती विषयक माहितीची नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे करण्यात येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला कापुस पिकाबाबतची नोंदणी वगळता इतर दुसऱ्या कोणत्याही पिकाचे तुर, मुग, उडीद, सोयाबिन माहिती नोंदणी करण्याचे अधिकार नाहीत. कृषि उत्पन्न बाजार समितीकडे फक्त कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. खरेदी विक्री संघाकडे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी यापुर्वी केली असल्यास या माहितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीने फक्त कापुस उत्पादनाबाबतच्या माहितीची नोंद त्यामध्ये करावयाची आहे, असे राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक यांनी कळविले आहे.
कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीच्या नोंदणी संदर्भात पुढील बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी ही अधिकृत नोंदणी धारकाकडून म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फतच करण्यात येत आहे. इतर दुसऱ्या ठिकाणी ही नोंदणी होणार नाही. नोंदणी ही खाजगी व्यक्ती, संस्थाकडून अथवा स्वयं ऑनलाईन नोंदणी करण्याची व्यवस्था नाही. कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी ही फक्त कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फतच करण्यात येत असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ही सेवा नि:शुल्क आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाद्वारे सोयाबीन, मुग, उडीद, तुर उत्पादक शेतकऱ्यांची शेती विषयक माहितीची नोंदणी खरेदी विक्री संघामार्फत केली जाते. खरेदी विक्री संघाकडे शेतकऱ्यांनी अशी नोंदणी केली असल्यास ही नोंदणी गृहीत धरुन कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावर फक्त कापुस पिकाबाबतच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या सात/बाराचा उतारा व पीक पेरा याबाबीचा समावेश करणे अनिवार्य आहे. Neml संगणक प्रणालीमध्ये यापुर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी केली असल्यास ही माहिती Fetch करण्याची व्यवस्था ही प्रणालीमध्ये करण्यात आलेली आहे. अशी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड क्रमांक त्या शेतकऱ्यांची शेती विषयक पुर्व नोंदणी झालेल्या माहितीचे विवरण दिसुन येईल. खरेदी विक्री संघामार्फत कापुस पिकाबाबतची नोंदणी केली जात नाही. या प्रणालीमध्ये कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती विषयक माहितीची नोंदणी करण्याची सुविधा ही फक्त कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फतच करण्यात येणार आहे.

000000
हमी भावाने मुग, उडीद, सोयाबीन
खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु   
नांदेड, दि. 27 :- केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडमार्फत हमी भावाने मुग-उडीद खरेदीसाठी देगलूर, धर्माबाद, बिलोली येथे केंद्र सुरु आहेत. तसेच सोयाबीनसाठी नांदेड, लोहा, देगलूर, धर्माबाद, बिलोली, हदगाव, मुखेड, भोकर येथे खरेदी केंद्र सुरु आहेत. खरेदी केंद्रावर माल विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे.
 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी सोबत सात-बाराचा उतारा, सन 2017-18 चा पिकपेऱ्याची नोंद असलेला आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बॅक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत आणावी. नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना माल खरेदी केंद्रावर आणण्यासाठी भ्रमणध्वनीवर संदेश मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी आपला माल 12 टक्के पर्यंत ओलावा असलेला, काडी कचरा विरहीत, स्वच्छ, FaQ दर्जाच्या असल्याची खात्री करुन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.

0000000
माझी कन्या भाग्यश्री योजनेवर
मंगळवारी विविध स्पर्धांचे आयोजन
नांदेड, दि. 27 :- महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयामार्फत माझी कन्या भाग्यश्री सुधारीत योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या मुली व मुलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ (निबंध स्पर्धा), स्त्री भृण हत्या (वक्तृत्व स्पर्धा), महिला सक्षमिकरण (घोषवाक्य स्पर्धा) या स्पर्धेचे आयोजन मंगळवार 31 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 11 वा. नांदेड जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाचे सभागृह येथे करण्यात आले आहे.
जिल्हा स्तरावरील प्रथम दोन क्रमांकांना विभागस्तरावर तर विभागीय स्तरावरील प्रथम क्रमांकांना राज्यस्तरावर सहभागाची संधी देण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावरील प्रथम दोन क्रमांकांना पालकमंत्री महोदयांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. तर विभागीय स्तरावरील व राज्य स्तरावरील प्रथम क्रमांकास मुख्यमंत्री व मंत्री महिला व बाल विकास विभाग यांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे. जास्तीतजास्त मुला व मुलींनी या तिन्हीही स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.वि.) यांनी केले आहे.

00000
राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदत
नांदेड, दि. 27 :- राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पात्र व्यक्तींनी या पुरस्कारांसाठी अर्ज करावेत असे  आवाहन    नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.यांनी आज येथे केले.
राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, (साहसी अपंग खेळाडूंसह) संघटक, कार्यकर्ते यांचसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला कार्यकर्तीस जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच जेष्ठ क्रीडा महर्षीसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत. अर्जदाराने कामगिरीचा तपशील देऊन विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्जाची एक प्रत गुरुवार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे कार्यालयीन वेळेत सादर कराव.  
            सन 2014-15 2016-17 या वर्षासाठी मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या-त्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावरील कनिष्ठ वरिष्ठ गटातील पदक विजेते पुरुष महिला खेळाडू (साहसी अपंग खेळाडूंसह), कार्यकर्ते, संघटक, तसेच क्रीडा मार्गदर्शकांचे विहित नमुन्यातील अर्ज बंधित राज्य संघटनेचा कार्यकारणीच्या ठराव शिफारशीसह सादर करावेत. अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा 1 ऑक्टोंबर 2012 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वर उपलब्ध असून संगणक सांकेताक क्रमांक 201209261427360500 असा आहे. यापूर्वी सन 2014-15 या पुरस्कार वर्षासाठी ज्यांनी अर्ज सादर केले होते त्यांनी पुन्हा नवीन शासन निर्णयाच्या नियमावलीनुसार नव्याने अर्ज सादर करावेत, असेही आवाहन नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
000000


शासनास जमीन विक्रीसाठी तयार
असणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज करावेत
नांदेड, दि. 27 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या दारिद्रयरेषेखालील भुमीहीन शेतमजुरांना बागायत जमीन 2 एकर व जिरायत 4 एकर जमीन वाटप करणेसाठी खरेदी करावयाची आहे. एका गटात किमान 10 एकर किंवा त्यापेक्षा अधीक निर्विवाद जमीन शासकीय दराने नियमानुसार विक्री करण्यास तयार असलेल्या जमीन मालकांनी तात्काळ जमीन विक्रीस तयार असल्याबाबत संमतीपत्र व सातबारा उताऱ्यासह अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जिल्हास्तरीय समिती नांदेड यांनी केले आहे.

00000
बारावीच्या मार्च 2018 परीक्षेसाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे वेळापत्रक जाहीर
नांदेड, दि. 27 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या मार्च 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या तारखा मंडळाने जाहीर केल्या आहेत.
परीक्षेस नियमित प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पुर्वीचे खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणारे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात यावेत.
माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची मुदत नियमित शुल्कासह 17 ऑक्टोंबर पर्यंत होती. विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरावयाची मुदत मंगळवार 31 ऑक्टोंबर 2017 पर्यंत आहे. शाळांनी बँकेत चलन सादर करावयाची मुदत बुधवार 1 नोव्हेंबर 2017 पर्यंत. विभागीय मंडळाकडे चलन व विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाच्या तारीख मंगळवार 7 नोव्हेंबर 2017 आहे.
मंगळवार 31 ऑक्टोंबर 2017 पर्यंत शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या एक्सलमध्ये मुद्रीत कराव्यात. परीक्षेची अर्ज ही ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावीत. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन भरलेल्या अपलोड केलेल्या अर्जांच्या याद्या वर दिलेल्या तारखांप्रमाणे तसेच प्रचलित पद्धतीप्रमाणे बँक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे शुल्क भरुन चलनाची प्रत विभागीय मंडळाकडे जमा करावी. नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारेच भरण्यात यावे. अर्जामध्ये शासन आदेशानुसार विद्यार्थ्यांने त्याचा आधारकार्ड क्रमांक भरणे अनिवार्य आहे. या कालावधीमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑनलाईन प्री-लिस्ट प्रिंट करुन घ्याव्यात व विद्यार्थ्यांमार्फत प्री-लिस्टची तपासणी करुन त्याच्या ऑनलाईन दुरुस्त्या 31 ऑक्टोंबर 2017 पर्यंत करणे आवश्यक आहे. मंडळामार्फत वेगळी प्री-लिस्ट दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

0000000

लेख क्र. 15

आरोग्य योजनेत नांदेड अग्रेसर
            देशाच्या आर्थिक व समाजिक उन्नतीमध्ये आरोग्यास अनन्यसाधारण महत्व आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातुन सन 2005 पासुन राज्यात तसेच केंद्रात आरोग्याशी निगडीत अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आरोग्यासाठी अधीकची आर्थिक तरतुद केली असून, उपलब्ध सुविधांचे एकत्रिकरण, विविध घटकांचा समन्वय व आरोग्यामध्ये जनतेचा सहभाग वाढवून, आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यात येत आहे.
            राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा उद्देश, विविध आरोग्याच्या योजना प्रभावीवणे राबवून, माता व बालकांच्या मृत्युचे प्रमाण कमी करणे, पोषण व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सार्वजनिक सुविधा उपलब्ध करुन देणे, माता व बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे, एकात्मिक प्राथमिक आरोग्य सुविधांचा वापर वाढविणे, लोकसंख्या स्थिर राखुन, लिंग आणि लोकसंख्येचे प्रमाण समान राखणे, स्थानिक परंपरागत आरोग्य पद्धती सक्षम करणे व आयुषला मुख्य प्रवाहात आणणे हा आहे.
            नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागात 65 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 377 उपकेंद्राच्या माध्यमातुन वेगवेगळ्या आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. त्यानुसार जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती व दारिद्रय रेषेखालील मातांना संस्थेत प्रसुतीसाठी आर्थिक लाभ देण्यात येत असून सन 2016-17 (मार्च 2017 अखेर ) 15 हजार 81 (91 टक्के) मातांना लाभ देण्यात आलेला आहे. यावर्षी जुन 2017 अखेर 1 हजार 685 (10 टक्के) मातांना लाभ देण्यात आलेला आहे.
            कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सन 2016-17 ( मार्च 2017 अखेर ) 17 हजार 943 (109 टक्के) स्त्री शस्त्रक्रियाचे उद्दीष्ट साध्य झाले असून यावर्षी 872 स्त्री शस्त्रक्रिया (5 टक्के) जुन 2017 अखेर झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पुरुषांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. यासाठी व्यापक जनजागृती व प्रोत्साहन करण्यात येत आहे.
            संस्थात्मक प्रसुतीसाठी नांदेड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून मागील चार वर्षात नांदेड जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय व खाजगी रुग्णालयामधून 95 टक्क्यापेक्षा जास्त प्रसुती या संस्थेमध्ये झाल्या आहेत. मागील वर्षी 2016-17 मध्ये मार्च 2015 अखेर 42 हजार 347 (99 टक्के) प्रसुती या संस्थेमध्ये झाल्या आहेत.
            संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण वाढविण्यासाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत 102 व 108 टोल फ्री क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचा दृष्य परिणाम दिसून येत आहे. याअंतर्गत 24 तास विविध सेवा पुरवल्या जात आहेत. यामध्ये गरोदर मातांची नोंदणी, तपासणी, औषधोपचार, बाळांतपणे, प्रयोगशाळा तपासण्या, सिझेरियन सेक्शन, रक्त संक्रमण या मोफत सुविधांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालयामध्ये सामान्य प्रसुती झालेल्या मातेस तीन दिवस तर सिझेरियन प्रसुती झालेल्या मातेस 7 दिवस मोफत आहार देण्यात येतो. नवजात अर्भकांना 0 ते 1 वर्षापर्यंत उपचारासाठी दाखल झाल्यास नोंदणी, तपासणी व औषधोपचार या सेवा मोफत पुरविल्या जातात. गरोदर मातांना बाळांतपणाच्यावेळी व अर्भकांना घर ते रुग्णालय, रुग्णालय ते रुग्णालय ( संदर्भसेवेसाठी) आणि रुग्णालय ते घर अशी वाहतुक सेवा मोफत पुरविण्यात येत आहे.
 राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम
            या कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या व अंगणवाडी बालकांच्या तपासणीसाठी नांदेड जिल्ह्यात 43 वैद्यकीय पथक कार्यरत असून वर्षातुन दोनवेळेस या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते, तसेच विविध गंभीर आजारावर औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात, सन 2016-17 च्या मार्च 2017 अखेर एकुण 116 विद्यार्थ्यांवर ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात टेलिमेडिसीन सेंटर
            टेलिमेडिसीन सेंटर हे उपजिल्हा रुग्णालय हदगाव, गोकुंदा व नांदेड येथे कार्यान्वित असून, याद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, केईएम मुंबई, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर, नानावटी रुग्णालय मुंबई व सर जे.जे. रुग्णालय मुंबई या रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे मार्गदर्शन घेण्यात येते व आवश्यकता भासल्यास संदर्भ सेवा देण्यासाठी संदर्भीत करण्यात येते.
नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र अधिक अद्यावत करण्यासाठी दुरावस्था दुर करुन आरोग्य केंद्राच्या सौंदर्यी करण्याकरिता कायपालट योजना राबविण्यासाठी 21 प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करण्यात आली आहे. या नाविन्यपुर्ण योजनेमधून या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत व बाह्य स्वरुप आरोग्यदायी व आनंददायी बनविण्यात आले आहे.
नाविन्यपुर्ण उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात डासमुक्त अभियान अंतर्गत गावपातळीवर आरोग्य यंत्रणेमार्फत प्रभाविपणे जनजागरण करण्यात येत असून शोषखड्ड्यांच्या माध्यमातून गावे गटारमुक्त व डासमुक्त करण्यात येत आहेत. या सोबत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन, क्षयरोग व एड्स नियंत्रण, किटकजन्य आजार व साथरोग नियंत्रण, अंधत्व निर्मुलन, सिकलसेल नियंत्रण, असांसर्गिक आजार प्रतिबंध इत्यादी कार्यक्रमातही नांदेड जिल्ह्याचे कार्य उल्लेखलीनय आहे.
आशा कार्यक्रम
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विशेषत: ग्रामीण जनतेला आरोग्य सेवा यशस्वीरित्या आणि सातत्याने मिळाव्या हा दृष्टीकोन समोर ठेवून सर्वांसाठी आरोग्याच्या आशा पुन्हा प्रकाशित झाल्या. ग्रामीण पातळीवर अभियानाचा एक भाग म्हणून प्रत्येक गावामध्ये स्त्री आरोग्य स्वयंसेविका आशाची निवड करण्यात आली असून ही मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती आहे. सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये 215 आशा व बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये 1 हजार 208 एकुण 1 हजार 423 आशा कार्यकर्ती कार्यरत आहेत.
आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासनाच्या विहित 48 निकषांच्या आधारे नांदेड जिल्ह्याने सातत्यपुर्ण प्रगती केली असल्याने राज्य स्तरावर सन 2016-17 मध्ये मार्च 2017 अखेर नांदेड जिल्हा हा आरोग्य विषयक योजना राबविण्यामध्ये 34 जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. यापुढेही आरोग्य विभाग आरोग्य सेवा प्रभाविपणे राबविण्यासाठी कटीबद्ध आहे.
 - संकलन जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
000000


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...