Tuesday, October 16, 2018

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे 
नांदेड विमानतळावर स्वागत 
 
नांदेड दि. 16 :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे आज सकाळी नांदेडच्या श्री गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आगमन झाले.  जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या समवेत राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचेही आगमन झाले. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  यांनी पुष्पगुच्छ त्यांचेही देवून स्वागत केले.    
यावेळी महापौर श्रीमती शिलाताई भवरे, महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रमजान मुलानी, जिल्हा परिषदेचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसीलदार किरण अंबेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यम संकुलाचे संचालक डॅा. दिपक शिंदे यांनी स्वागत केले. यानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव हे लातूर दौऱ्यावर हेलिकॉप्टरने रवाना झाले.   
दुपारनंतर लातूर येथील कार्यक्रम आटोपून राज्यपाल महोदयांचे पुन्हा हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळावर आगमन झाले व त्यांचे विमानाने मुंबईकडे प्रयाण झाले. यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. 


महात्मा फुले विकास महामंडळाच्या
कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 16 :-  अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सन 2018-19 या आर्थिक वर्षात महामंडळाच्या राज्य शासन पुरस्कृत 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनांचा लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या अर्जदारांना महामंडळाच्या www.mahatmaphulecorporation.com/applications या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
इच्छूक अर्जदारांना महामंडळाकडून कर्ज घेण्यासाठी अर्जदारांनी त्यांचे स्वत:चे ई-मेल खाते वापरुन ऑनलाईन पद्धतीने कर्ज मागणी अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी मागणी अर्जाची मुळ प्रत व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित, स्वयंसाक्षांकित प्रती जिल्हा कार्यालयात स्वत: सादर करावीत. त्रयस्त व्यक्तीकडून अर्ज किंवा इतर कोणतेही कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
000000


6 व 7 डिसेंबर रोजी नांदेड येथे
नांदेड ग्रंथोत्सवाचे आयोजन
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 16 :- 6 व 7 डिसेंबर 2018 या कालावधीत नांदेड येथे नांदेड ग्रंथोत्सव-2018 चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयाच्यावतीने ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित समन्वय समितीची मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सदस्य म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक देवकरे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर, जिल्हा ग्रंथालय संघटनेचे सचिव राजेंद्र हंबीरे, जिल्हा प्रकाशन संघटनेचे निर्मलकुमार सुर्यवंशी, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे आदि उपस्थित होते.
प्रारंभी समन्वय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशिष ढोक यांनी प्रस्ताविक करुन ग्रंथोत्सवाच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. सर्व सदस्यांच्या उपस्थितीत चर्चा घेऊन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित केली. 6 व 7 डिसेंबर 2018 या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय येथे करण्यात येईल. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडीने सुरुवात होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन राहिल तसेच दोन दिवस याठिकाणी ग्रंथप्रदर्शन व विक्रीची व्यवस्था करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी कथाकथन, परिसंवाद यासारखे साहित्यप्रेमीसाठी कार्यक्रम राहतील. शेवटी सायंकाळी समारोप व बक्षिस वितरण समारंभ होईल. याप्रमाणे कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून यासाठी सर्व साहित्यप्रेमी नागरिकांचा सक्रीय सहभाग घेण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी डोंगरे यांनी स्पष्ट केले. या ग्रंथोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त साहित्यप्रेमी व वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी आयोजनाची जबाबदारी विविध विभाग व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना सोपविण्यात आली आहे.
000000


अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 16 :- अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या 15 कलमी कार्यक्रमानुसार  सन 2018-19  साठी अल्पसंख्याक समाजातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती  योजनचे ऑनलाईन  अर्ज  भरण्याची प्रक्रिया 15 ऑक्टोबर पर्यंत होती. परंतु आत्ता 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत ऑनलाईन  अर्ज  पर्यंत भरता येतील  
          सन 2018-19  या वर्षासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचे  केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केवळ ऑनलाईन भरावयाचे आहेत. सन 2018-19   या वर्षी रीनिवल व फ्रेश विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे याबाबत सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.)  नांदेड यांनी केले आहे. 
000000



डॉ. .पी.जे. अब्दूल कलाम यांचे जीवन प्रेरणादायी
- डॉ. गोविंद हंबर्डे
नांदेड दि. 16 :- डॉ. . पी. जे. अब्दूल कलाम यांनी अत्यंत प्रतिकूल रिस्थितीशी सामना करीत आपले शिक्षण पुर्ण केले. एक यशस्वी शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी, असे प्रतिपादन डॉ. गोविंद हंबर्डे यांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. .पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने आयोजीत "ग्रंथप्रदर्शन, वाचनध्यास उपक्रम, ईबुक्सचे वाचन" या कार्याक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन अप्पर कोषागार अधिकारी महेश राजे यांच्या हस्ते झाले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, निर्मलकुमार सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उदघाटक अप्पर कोषागार अधिकारी श्री. राजे यांनी आम्ही सुध्दा ग्रंथातून प्रेरणा घेऊनच घडलो असे मत व्यक्त केले. लेखाधिकारी श्री. पाचंगे यांनी वाचनाचे महत्व सांगतांना विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ वाचन करण्यात घालावा अशी सूचना केली. निर्मलकुमार सुर्यवंशी यांनी वाचनाचे फायदे सांगितले. प्रास्ताविकात आशिष ढोक यांनी वाचन प्रेरणा दिनानिमीत्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यामागचा हेतू विषद केला.
यावेळी निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, नियमीत वाचक असलेले व वाचन संस्कृती वृधींगत होण्यासाठी स्वत: घरोघरी जाऊन वैयक्तीक फिरत्या ग्रंथालयामार्फत प्रयत्न करणारे श्री. कडगे (काका) व नियमीत वाचक  पारसकर यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वाचन प्रेरणा दिनानिमीत्त डॉ .पी.जे.अब्दुल कलाम, महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षनिमीत्त,  . दी. माडगुळकर व पु. . देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमीत्त त्यांच्या निवडक ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. वाचकांनी वाचनध्यास उपक्रमांतर्गत ई बुक्स व ग्रंथाचे वाचनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रताप सुर्यंवशी तर आभार शिवाजी पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. कर्वे, श्री. गाडेवाड,  संजय पाटील , श्री कळके, मयुर कल्याणकर यांनी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थी, वाचक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...