Saturday, April 8, 2017

समता सप्ताहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचे
माहितीपट जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रदर्शीत करणार
बार्टीच्या समतादूत प्रकल्पाकडून नियोजन
नांदेड, दि. 8  :- भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने डॅा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्यावतीने जिल्ह्यात डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच्या माहितीपट शाळा, महाविद्यालये आणि गावा-गावात प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यातून डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट विद्यार्थी, तरूण आणि विविध घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती समतादूत प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी मुंजाजी कांबळे यांनी दिली आहे.
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास आजपासून सुरवात झाली, असून हा सप्ताह डॅा. आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत डॅा.आंबेडकर यांच्याविषयीचे माहितीपट प्रदर्शित करण्याची संकल्पना बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी मांडली. समतादूत प्रकल्पाच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे तसेच विभागीय प्रकल्प संचालक डॅा. श्रीकांत देशमुख यांनी त्यासाठी राज्यभराचे नियोजन केले आहे. यात डॅा. आंबेडकर यांच्या विषयीच्या दोन माहितीपटांचा समावेश करण्यात आला आहे. फिल्मस् डिव्हीजन आँफ इंडियाने या दोन्ही माहितीपटांची निर्मिती केली आहे. सुमारे सोळा मिनिटांच्या मराठी भाषेतील माहितीपट ए.व्ही. भाश्यम यांनी तयार केला आहे. तर दुसरा विस्तृत आणि तपशीलवार असा इंग्रजी भाषेतील बाहत्तर मिनिटांचा माहितीपट जब्बार पटेल यांनी तयार केला आहे.
हे माहितीपट शाळा, महाविद्यालये, गावा-गावात तसेच कार्यालयांसाठी एकत्रितरित्या प्रदर्शित करण्याचे नियोजन असल्याचे प्रकल्प अधिकारी श्री. कांबळे यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यात एकूण बावीस समतादूत आहेत. या समतादूतांकरवीही या माहितीपटांचे तालुकास्तरावर आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शन करण्यात येणार आहे.
प्रकल्प अधिकारी श्री. कांबळे, समता दूत अविनाश जोंधळे यांनी या माहितीपटांच्या जिल्हा तसेच तालुकास्तरावरील प्रदर्शनांसाठी नियोजन सुरु केले आहे. हे माहितीपट पाहण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...