Thursday, March 5, 2026

वृत्त क्रमांक  

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियानाचे 7 मार्च रोजी सोनखेड येथे आयोजन

नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड, दि. 5 मार्च :- लोहा तालुक्यात 7 मार्च ते 8 मे 2026 याकालावधीत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान” टप्पा 1 चे मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून, आपल्या प्रलंबित कामाचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.

त्यानुसार लोहा तालुक्यात 7 मार्च रोजी सोनखेड याठिकाणी सामान्य जनतेच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी लोहा प्रशासनाच्यावतीने“ छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान” टप्पा 1 चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता हनुमान मंदिर परिसर, पोलीस स्टेशनच्या समोर सोनखेड येथे संपन्न होणार आहे. प्रशासकीय पारदर्शकता आणि गतिमानता वाढवण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे

शिबिराचा मुख्य उद्देश :

शासकीय कार्यालयात हेलपाटे न घालता, नागरिकांना त्यांच्या हक्काचे दाखले, कागदपत्रे आणि योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, हा याशिबिराचा मुख्य उद्देश आहे. “ शासन आपल्यादारी या योजनेला बळकटी देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिरात उपलब्ध असणाऱ्या प्रमुख सेवा :- विविध दाखले वाटप, ॲग्रीस्टँक, 

सातबारा अद्यावत करणे, पी.एम.किसान, प्रलंबित फेरफार निकाली, तुकडेबंदी कायद्याच्या अनुषंगाने कार्यवाही, ई-मोजणी सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, पाणंद रस्त्याबाबत कार्यवाही,  लोकसेवा हक्क कायदा, तात्काळ सेवा, अभिलेख दुरुस्ती, हेल्पडेस्क इतर अनुषंगिक विषय असणार आहेत.

0000

 वृत्त क्रमांक  

निशुल्क ग्रंथालय सदृश अभ्यासिकेचा लाभ घ्यावा

नांदेड दि.५ मार्च :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड अंतर्गत जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी निशुल्क ग्रंथालय सदृश अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा, बँकिंग, रेल्वे भरती तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक संदर्भ पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये चालू घडामोडी, वर्तमानपत्रे, विविध मासिके आदी साहित्याचा समावेश आहे.

तसेच सुशिक्षित युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिरे तसेच ऑनलाईन व ऑफलाईन समुपदेशन कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येतात.

तरी जिल्ह्यातील गरजू युवक-युवतींनी या निशुल्क ग्रंथालय सदृश अभ्यासिकेचा लाभ घ्यावा. प्रवेशासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पहिला मजला, शासकीय तंत्र प्रशाला केंद्र, आनंदनगर रोड, बाबानगर, नांदेड येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

 वृत्त क्रमांक  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत

जिल्हा-तालुकास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

नांदेड दि. 5 मार्च :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2024-25 पासून महाराष्ट्र स्तरावर ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असून अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना राबवली जात आहे. सदरील योजना ही जिल्हास्तर तसेच तालुका स्तरावरती राबविण्यात येते.

नुकतेच 23 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय भवन नांदेड या ठिकाणी एक दिवसीय महाविद्यालयांची मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेअंतर्गत कार्यक्रमाचे अध्यक्षपदी संतोष चव्हाण, सहय्यक लेखाअधिकारी समाज कल्याण कार्यालय नांदेड व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती लक्ष्मी गायके, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक तसेच कार्यालयीन अधीक्षक, स.क.नांदेड. व स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील जालिंदर गायकवाड तसेच तालुकास्तरीय वरील प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री शाहू जुनियर कॉलेज लोहा प्राचार्य श्री.फाजगे, नांदेड जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्य व कर्मचारी समतादूत हे कार्यक्रमास उपस्थित होते. 

तसेच सदरील कार्यशाळेचे प्रास्ताविक श्रीमती अंजली नरवाडे, तालुका समन्वयक यांनी केले व श्रीमती गायके यांनी उपस्थित महाविद्यालयातील कर्मचारी यांना सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी सूचना दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सदर योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी व जे विद्यार्थी वस्तीगृह प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत महाविद्यालय स्तरावरती कार्यशाळा घेऊन त्यांच्या अडचणींचे निरसन करण्यासाठी त्यांनी सूचित केले.

समाज कल्याण कार्यालय अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेमध्ये पीपीटी मार्फत शासन निर्णयातील नियम व अटी नुसार सविस्तर मार्गदर्शन उपस्थित सर्व महाविद्यालयाच्या प्रतिनिधींना देण्यात आले त्यामध्ये उपस्थितांचे प्रश्नांचे निरसन करून सदरील योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्र महाविद्यालयांमार्फत विहित वेळेमध्ये व योग्यरीत्या पूर्तता करण्याकरिता सहकार्य करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन पांपटवार तालुका समन्वयक यांनी केले तर श्रीमती राणी गडगीळे समाजकल्याण निरीक्षक, स्वाधार विभाग प्रमुख यांनी सदर कार्यशाळा व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली व  आनंद झंपलवाड कनिष्ठ लिपिक, स्वाधार विभाग, श्री बालाजी खूपसे तालुका समन्वयक यांनी अथक परिश्रम घेऊन सदर कार्यशाळेचे नियोजन केले तेव्हा नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय महाविद्यालयांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या व विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निरसन होण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरती मार्गदर्शनपर कार्यशाळा घेणेबाबत अवगत करण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वाधार योजनेला पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेडच्या वतीने आवाहन करण्यात येते की, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र झालेले आहेत त्यांनी बँक खाते तपशील ऑनलाइन भरून घ्यावे तसेच ज्या विद्यार्थ्यांना अर्ज सेंड बॅक आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली त्रुटीची पूर्तता योग्यरित्या विहित वेळेत पूर्ण करावी आणि येणाऱ्या अडचणी बाबत आपल्या प्रवेशित महाविद्यालयातील समानसंधी केंद्र व संबंधित योजनेचे कामकाज पाहणारे कर्मचारी यांना संपर्क साधावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे समाज कल्याण नांदेड यांच्यामार्फत केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक  

नवीन सेवार्थ प्रणाली ई-बील संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 6 मार्च तर इतर तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी 10 मार्च रोजी प्रशिक्षणाचे आयोजन 

नांदेड, दि. 5 मार्च :-जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत नांदेड जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी नवीन सेवार्थ प्रणाली ई-बील संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 6 व 10 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी परिसरातील कॅबिनेट हॉल, नियोजन भवन, येथे करण्यात आले आहे. तरी लेखा विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे. 

नांदेड तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांच्यासाठी शुक्रवार 6 मार्च रोजी सकाळी 11 वाजता तर नांदेड वगळता इतर सर्व तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी यांचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी मंगळवार 10 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

संबंधित या प्रशिक्षण कार्यक्रमात नवीन सेवार्थ प्रणालीच्या कार्यपध्दती, अद्ययावत वैशिष्टे तसेच व्यवहारातील अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात अपर कोषागार अधिकारी वैशाली ताटपल्लेवार, अपर कोषागार अधिकारी नामदेव राठोड, नियुक्त मास्टर ट्रेनर तथा कनिष्ठ लेखापाल शंकर दुमाने, लेखालिपिक प्रमोद शिंदे, बसवेश्वर वाळके, सुनिल संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. तरी सर्व संबंधित विभागानी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व वेळेवर उपस्थित राहावे, असेही आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 

00000

वृत्त क्रमांक  

गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज; 

14 वर्षांच्या मुलींसाठी 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

                                                                                                                                                                        नांदेड, दि. 5 मार्च :- महिलांमधील गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात विशेष एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने जिल्ह्यात ही लस 8 मार्च 2026 पासून राबविण्यात येणार आहे. राज्यात, जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:

 लक्ष्य गट (Beneficiaries): ज्या मुलींनी वयाची 14 वर्षे पूर्ण केली आहेत (14 ते 15 वयोगटातील मुली), अशा सर्व मुलींना हे लसीकरण करण्यात येणार आहे.

 एकच डोस पुरेसा: या मोहिमेअंतर्गत 'क्वाड्रिवॅलेंट' एचपीव्ही लस दिली जाणार असून, या वयोगटातील मुलींसाठी लसीचा फक्त एकच डोस संरक्षणासाठी पुरेसा आहे.

 लसीकरण कोठे होईल ?: हे लसीकरण सर्व सरकारी आरोग्य केंद्रांवर (उदा. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि महापालिका रुग्णालये) उपलब्ध असेल.

 नोंदणी प्रक्रिया : पालकांना 'U-WIN' पोर्टलवर स्वतःहून नोंदणी करता येईल किंवा लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊनही नोंदणीची सोय उपलब्ध आहे.

                                                                                                                                                                        गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि लसीचे महत्त्व :

भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख आजार आहे. ९९.७ टक्के प्रकरणांमध्ये हा कर्करोग 'ह्युमन पॅपिलोमा व्हायरस' (HPV) च्या संसर्गामुळे होतो. प्रतिबंधात्मक लस घेतल्यास या कर्करोगापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते.

पालकांना आवाहन:

"ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. लसीकरणानंतर ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. काहीवेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी थोडे दुखणे यांसारखी किरकोळ लक्षणे दिसू शकतात, जी २-३ दिवसांत आपोआप बरी होतात. आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या 14 वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे," असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी किंवा आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000



  वृत्त क्रमांक     पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे सोमवारी धर्माबाद येथे आयोजन नांदेड, दि. 6 मार्च :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवार...