Wednesday, August 5, 2026

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

वृत्त क्रमांक 

मराठी भाषा संवर्धनासाठी शासनाचे व्यापक उपक्रम 

नांदेडमध्ये साहित्यिकांशी मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा संवाद 

मराठी भाषा संवर्धनासाठी जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र स्थापन केले जाणार 

नांदेड, दि. 5 ऑगस्ट : मराठी भाषेचे संवर्धन, जतन, विकास आणि प्रसारासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करण्यात येणार असून, या केंद्रामार्फत मराठी भाषेच्या संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रमांचे नियोजन, समन्वय, नियमन आणि नियंत्रण केले जाणार आहे. यासाठी या केंद्रात मराठी भाषा अधिकारी यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. या माध्यमातून मराठी भाषेच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात उद्योग डॉ. उदय सामंत यांनी आज जिल्ह्यातील साहित्यिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदिप गायकवाड, साहित्यिक श्रीकांत देशमुख, आदींसह ज्येष्ठ साहित्यिक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

प्रारंभी डॉ. सामंत यांनी मराठी भाषा संवर्धन, जतन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी उपस्थित साहित्यिक, लेखक आणि मराठी भाषा अभ्यासकांशी मुक्त संवाद साधत मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रसाराबाबत त्यांच्या अपेक्षा, सूचना व मागण्या जाणून घेतल्या. साहित्यिकांनी मांडलेल्या सर्व सूचना आणि मागण्यांची शासन सकारात्मक दृष्टीने निश्चितच दखल घेईल. तसेच संबंधित प्रश्नांचे  निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. सामंत यांनी यावेळी दिली. 

ते म्हणाले की, मराठी भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे ही मराठी भाषेसाठी ऐतिहासिक बाब ठरली आहे. मराठी भाषेला जागतिक स्तरावर कायमस्वरूपी अधिष्ठान मिळावे, या उद्देशाने लंडन येथे 'छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्रा'साठी भव्य इमारत खरेदी करण्यात आली आहे. या इमारतीच्या खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत पाच कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा शिक्षण, संशोधन, साहित्य प्रसार, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जागतिक स्तरावरील मराठी उपक्रमांना नवे व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

याशिवाय, ऐरोली (नवी मुंबई) येथे मराठी भाषा विभागाचे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबई येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य आणि आधुनिक मराठी भाषा भवनाचे कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात प्रत्येक विभागीय स्तरावर तसेच जिल्हास्तरावर मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आगामी काळात मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असेही डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील अमराठी नागरिकांनाही मराठी भाषा सहज शिकता यावी, यासाठी शासनाने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 70 हजार अमराठी नागरिकांना मराठी भाषा विभागामार्फत मराठी शिकविण्यात यश आले आहे. याशिवाय, अमराठी भाषिकांना मराठी भाषा अधिक सुलभपणे शिकता यावी आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने लवकरच मराठी भाषा शिकण्यासाठी मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठी साहित्यिकांना अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी साहित्य क्षेत्रातील पुरस्कारांमध्येही वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. शेवटी आभार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मानले.

00000
















 वृत्त क्रमांक 

युवकांनी नाविन्यपूर्ण उद्योग उभारणीवर भर द्यावा : उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत 


·         मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून नवउद्योजक घडविण्याच्या सूचना ;

·         एमआयडीसीमधील दुहेरी करप्रणाली रद्द, पायाभूत सुविधांच्या विकासावर भर 

नांदेड, दि. 5 ऑगस्ट : राज्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी युवक-युवतींनी पारंपरिक व्यवसायाबरोबरच नाविन्यपूर्ण उद्योग प्रकल्प उभारण्यावर भर द्यावा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक युवक, महिला आणि नवउद्योजकांना उद्योग स्थापनेसाठी प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिक, तांत्रिक व प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. 

जिल्हा उद्योग केंद्र नांदेड येथे आयोजित बैठकीत जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेताना तसेच उद्योजकांच्या समस्या जाणून घेताना ते बोलत होते.

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राजाराम गुठळे, विविध विभागांचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते. 

बैठकीत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेत पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज मंजुरी, अनुदान वितरण, प्रशिक्षण आणि उद्योग मार्गदर्शनाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याच्या सूचना मंत्री डॉ. सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्ह्यात नवउद्योजकांची संख्या वाढविण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासनाचा लाभ पोहोचविण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, अग्निशमन सुविधा आणि इतर मूलभूत सेवा उद्योगांना वेळेत उपलब्ध झाल्यास नवीन गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. 

यावेळी त्यांनी औद्योगिक वसाहतींमधील अग्निशमन सेवा शुल्क प्रति चौरस मीटर १ रुपये ७० पैसे करण्याची माहिती दिली. तसेच उद्योजकांना यापुढे दुहेरी कर भरावा लागणार नसून, चालू महिन्यापासून केवळ एकच एमआयडीसी कर आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

एमआयडीसी परिसरातील विद्युत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक प्रस्ताव लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगून, प्रलंबित विकासकामे आणि उद्योगसंबंधित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक आणि समन्वयात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बैठकीदरम्यान उद्योजकांनी औद्योगिक वसाहतींमधील विविध समस्या, पायाभूत सुविधांतील त्रुटी, वीज, पाणीपुरवठा, करप्रणाली आणि प्रशासकीय प्रक्रियेसंदर्भातील अडचणी मांडल्या. त्यावर मंत्री डॉ. सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करून प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. 

जिल्हा उद्योग केंद्र आणि एमआयडीसी यांनी परस्पर समन्वयाने कार्य करून उद्योजकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत सेवा उपलब्ध करून द्याव्यात. उद्योगवाढीसोबत स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी सर्व यंत्रणांनी परिणामकारकपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची उद्दिष्टे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात यावी. या कामाचा पुढील तीन महिन्यांनंतर पुन्हा आढावा घेण्यात येईल, असे सांगून डॉ. सामंत यांनी नांदेड जिल्ह्याने औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रात राज्यात आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

00000











वृत्त क्रमांक 

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळात साधली उल्लेखनीय प्रगती 

नांदेड, दि. 5 ऑगस्ट : प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनात पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि थकीत कर्जवसुलीला प्राधान्य देत बँकेच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय प्रभावीपणे राबविण्यात आले असून त्याचे सकारात्मक परिणाम बँकेच्या कामकाजावर दिसून येत आहेत. 

दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 3 एप्रिल 2026 रोजी संपुष्टात आल्याने विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी 27 एप्रिल 2026 रोजी संचालक मंडळ निष्प्रभावित करून बँकेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी नांदेडचे सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर अपर निबंधक तथा सहसचिव सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मुंबई यांच्या निर्देशानुसार विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था लातूर यांनी 20 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची बँकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांनी 22 मे 2026 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर बँकेच्या कामकाजात गती आणत विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केली. 

प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामगिरी

जून व जुलै 2026 या दोन महिन्यांत बँकेच्या मासिक बैठका नियमित घेण्यात आल्या. या बैठकींमध्ये एकूण 70 ठरावांना मंजुरी देऊन बँकेच्या कामकाजाला गती देण्यात आली. 

जिल्हा परिषद संबंधित पगारदार सहकारी पतसंस्थांच्या थांबलेल्या थकीत कर्जवसुलीचा प्रश्न प्राधान्याने हाताळण्यात आला. ज्यामध्ये बँकेचे व पगारदार पतसंस्थेचे सभासदाकडून सुमारे 15 कोटी इतकी थकबाकी असलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी संबंधितांना निर्देश देण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याशी पत्रव्यवहार व चर्चा करून कर्जवसुलीची प्रक्रिया नियमित सुरू केली. 

कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कारखान्याच्या मालमत्तेवर बँकेचा बोजा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली. मा. दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार सातबारा उताऱ्यावर बँकेचा बोजा नोंदविण्यात आल्यामुळे अनुत्पादित 10 कोटी रुपये कर्जाच्या वसुलीचा मार्ग मोकळा झाला. 

बँकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या प्रकरणांवर कठोर भूमिका घेत अपहार, अफरातफर व नियमबाह्य कर्जवाटपात दोषी आढळलेल्या तीन कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तसेच कासराळी शाखेतील अपहार प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईद्वारे बँकेच्या हिताला बाधा आणणाऱ्या कोणत्याही गैरप्रकारास माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला.

0000

 वृत्त क्रमांक 

शेतकऱ्यांसाठी देशाबाहेरील अभ्यास दौरा योजना 2026-27 साठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड, दि. 5 ऑगस्ट : नांदेड तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनी राज्य शासनाच्या "देशाबाहेरील अभ्यास दौरा राज्य पुरस्कार योजना सन 2026-27 अंतर्गत अर्ज करावेत, असे आवाहन अर्धापूरचे तालुका कृषी अधिकारी विशाल बि-हाडे यांनी केले आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांना जगभरातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळावी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी समजून घेता यावी तसेच शेतमाल निर्यातीला चालना मिळावी, या उद्देशाने कृषी विभागामार्फत परदेश अभ्यास दौरा योजना 2026-27 राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 5 पात्र शेतकऱ्यांना युरोप व चीन येथे प्रगत शेतीचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. 

नांदेड जिल्ह्यासाठी प्राप्त लक्षांक

·         एकूण लाभार्थी : 5 शेतकरी

·         महिला शेतकरी : 1 जागा

·         कृषी पुरस्कार प्राप्त/पीक स्पर्धा विजेते : 1 जागा

·         इतर सर्वसाधारण शेतकरी : 3 जागा 

पात्रतेचे निकष

·         अर्जदार शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्टधारक) असावा.

·         अभ्यास दौऱ्यासाठी जाणारा लाभार्थी स्वतः शेतकरी असावा.

·         शेतकऱ्याचा अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे.

·         शेतकऱ्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती असावे.

·         शिधापत्रिकेची (रेशन कार्ड) छायाप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

·         सहलीला प्रस्थान करण्याच्या दिवशी शेतकऱ्याचे वय किमान 25 वर्षे पूर्ण असावे. 

अर्ज सादर करण्याबाबत

परदेश अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्धापूर येथे गुरुवार 20 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. अर्धापूर तालुक्यातील तसेच पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी साधावी, असे आवाहन अर्धापूरचे तालुका कृषी अधिकारी विशाल बि-हाडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अर्धापूर येथे संपर्क साधावा.

0000000

 

 वृत्त क्रमांक 

फेब्रुवारी-मार्च 2027 च्या 10वी-12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांच्या फॉर्म क्र. 17 ची ऑनलाइन नोंदणी सुरू 

नांदेड, दि. 5 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांच्या फॉर्म क्र. 17 द्वारे ऑनलान नावनोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 

इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकरिता सर्व शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये मंडळाच्या अटी शर्तीनुसार नावनोंदणी करण्याकरिता उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी सर्व विद्यार्थी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या कार्यकक्षेतील विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. 

फेब्रु-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज (फॉर्म नं. 17) ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत. 

विद्यार्थ्यांनी नियमित नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद नमूद केलेल्या केलेल्या शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची मुदत शनिवार 1 ऑगस्ट ते बुधवार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे. 

विद्यार्थ्यांनी विलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरुन अर्जाची प्रत (print out), ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पाहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची मुदत (प्रति विद्यार्थी शंभर रुपये) गुरुवार 1 ऑक्टोबर ते गुरुवार 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे. 

विद्यार्थ्यांनी अतिविलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरून मूळ अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या शाळेत/कनिष्ठ महाविद्यालयात जमा करण्याची मुदत (प्रति विद्यार्थी प्रति दिन रु. 20) शुक्रवार 16 ऑक्टोबर ते शनिवार 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत आहे. नियमित, विलंब, अतिविलंब शुल्काने नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या या तारखा आहेत.

खाजगी विद्याथ्र्यांना इ. 10 वी व इ. 12 वी साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी. खाजगी विद्यार्थ्यांनी इ. 10 वी, इ. 12 वी साठी नावनोंदणी अर्ज त्यांच्या यापूर्वी शिकलेल्या शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामधून भरणे अनिवार्य आहे. त्यासाठी त्यांनी मागील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतिक क्रमांक, विषय योजना, माध्यम, शाखा (Stream) व इतर आवश्यक माहिती घेऊनच नोंदणी करावी व परराज्यातील, परदेशातील विद्यार्थ्यांने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या रहिवासी दाखल्यावरील पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. 

नावनोंदणी अर्ज करतांना विद्यार्थ्यांनी http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Student Comer या option चा बापर करावा, अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी / इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. विद्यार्थ्यांने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वतःजवळ ठेवावा, ऑनलाईन अर्ज भरताना सदर मूळ कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. काही कारणास्तव विद्यार्थ्यांकडे दुय्यम शाळा सोडल्याचा दाखला असेल तर त्याची मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. 

कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर,मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो (pdf) काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोहोचपावतीची प्रिंटआऊट व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करावयाची आहेत. 

खाजगी विद्यार्थी नावनोंदणी शुल्काचा तपशील इ. दहावी व बारावीसाठी रुपये 1 हजार 110 नाव नोंदणी शुल्क + शंभर प्रक्रिया शुल्क. तर 100 रुपये विलंब शुल्क प्रति विद्यार्थी व 20 रुपये अतिविलंब शुल्क प्रति विद्यार्थी प्रति दिन राहील. 

इ. 10 वी / 12 वी फेब्रु-मार्च 2027 परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी (फॉर्म नं. 17) नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPL/Net Banking द्वारे) भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्याबाबतची पोहोचपावती विद्यार्थी / संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयास त्यांच्या Login मध्ये प्राप्त होईल. 

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांनी त्याच्या यापूर्वी शिकलेल्या माध्यमिक शाळेचे नाव व पत्ता नमूद करणे आवश्यक आहे . या माध्यमिक शाळेने परीक्षेचे आवेदनपत्र अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक / तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे.

ब) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असून नावनोंदणी करतांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागील शाळेचे उच्च माध्यमिक शाळेचे नाव व पत्ता नमूद करणे आवश्यक आहे . या उच्च माध्यमिक शाळेने आवेदनपत्र अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक / तोंडी, श्रेणी विषय संदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कार्यवाही करावयाची आहे. 

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ट व्हावयाचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्र / युडीआयडी कार्डची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ / माध्यमिक महाविद्यालयाकडून माहिती प्राप्त करून घ्यावी. 

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इ. 5 वी किंवा इ. 8 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इ. 10 वी साठी ( 17 नं.) खाजगी विद्यार्थी म्हणून नावनोंदणी करता येईल. ऑनलाईन अर्ज भरतांना अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत वेबसाईटवर दिलेल्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी. तसेच पात्र विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहीत केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष 

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 5 ऑगस्ट : राज्याचे कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दौरा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे 12 व 13 ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

बुधवार 12 ऑगस्ट 2026 रोजी हिंगोली येथून सायंकाळी 6 वा. नांदेडकडे प्रयाण. रात्री 8 वा. विश्रामभवन नांदेड येथे आगमन व मुक्काम. गुरूवार 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मिशनसंबंधी आढावा बैठकीस उपस्थिती. त्यानंतर सोईनुसार अमरावतीकडे प्रयाण करतील.

000

आज 5 ऑगस्ट 2026 रोजी सायं. 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे मा. ना. उदय सामंत, मंत्री उद्योग व मराठी भाषा यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा #मराठी भाषा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ते जिल्ह्यातील मराठी भाषा, साहित्य, कला व प्रकाशन क्षेत्रातील मान्यवरांशी #संवाद साधणार आहेत. तरी नांदेड जिल्ह्यातील मराठी भाषा, साहित्य, कला व प्रकाशन क्षेत्रातील मान्यवरांनी या बैठकीस मोठया प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.




  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी