Tuesday, August 11, 2026
वृत्त क्रमांक
‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’च्या आयोजनाबाबत
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
नांदेड दि. 11 ऑगस्ट :- मृद व जलसंधारण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकररावजी नाईक यांचा जन्मदिन 21 ऑगस्ट हा दिवस ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने राज्यात 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आज 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
शाश्वत विकासासाठी मृदसंधारण व जलसंधारणाबाबत राज्यव्यापी जनजागृती करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने 21 ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ (Maha Walkathon-Walk for Water) या उपक्रमाचे राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
तसेच येत्या 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ‘जलसंधारण सप्ताह’ प्रभावीपणे साजरा करण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक नियोजन करून समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिल्या.
0000
(विधि व न्याय विभाग)
वृत्त क्रमांक
राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई
• ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन
नांदेड दि. 11 ऑगस्ट :- राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम आदी समारंभाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा वापर करताना, भारतीय राष्ट्रध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, संस्था, संघटना आदीसह नागरीकांनी दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे तसेच मराठवाडयात 17 सप्टेंबर आणि इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. अशा कार्यक्रमात प्लास्टिकेचे ध्वज वापरल्याने, कार्यक्रमानंतर फाटलेले कागदी तसेच प्लास्टिकचे ध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले असतात, पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. राष्ट्रध्वजाचा उचीत सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत स्पष्ट तरतूद आहे. ध्वजसंहितेच्या कलम 2.2 (x) मधील प्रयोजनासाठीच कागदी राष्ट्रध्वज वापरता येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये उल्लेख नमूद नाही. याचा विचार करता ध्वजसंहितेच्या तरतुदींचे पालन करावे. तसेच कोणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी जनजागृती करण्याकरिता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कार्यक्रम पार पडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्तत: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. त्यांनी असे खराब झालेले, माती लागलेले ध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्याकडे सुपुर्द करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी सुपूर्द केले असे ध्वज गोणी किंवा कपडयामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावे. अशाप्रकारे बांधलेले राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक नष्ट करण्याबाबत परिपत्रकात व ध्वजसंहितेत स्पष्ट सूचना आहेत. त्यानुसार खराब झालेल्या ध्वजाची विल्हेवाट लावण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर केलेल्या उपरोक्त व्यवस्थेबाबत सर्व शासकीय कार्यालये, अर्धशासकीय कार्यालये, स्थानिक प्राधिकरणे व शैक्षणिक संस्था यांनी योग्य ती दखल घ्यावी व कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.
00000
वृत्त क्रमांक
नांदेड जिल्ह्यातील 44 उमेदवार तीन वर्षांसाठी पालिका सदस्य होण्यास अपात्र
नांदेड, दि. 11 ऑगस्ट : नांदेड जिल्ह्यातील १२ नगरपरिषदा व एका नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये पार पडली. या निवडणुकीत उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा विहित कालावधीत व विहित पद्धतीने हिशोब संबंधित कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक होते.
मात्र, निवडणूक खर्चाचा हिशोब विहित मुदतीत व विहित पद्धतीने सादर न करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील 44 उमेदवारांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १६(१ड) अन्वये तीन वर्षांच्या कालावधीसाठी पालिका सदस्य होण्यास अनर्ह ठरविण्यात आले आहे.
याबाबतचे आदेश दि. २७ जुलै २०२६ रोजी निर्गमित करण्यात आले असून, संबंधित उमेदवारांची नावे दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
अनर्ह ठरविण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये उमरी नगरपरिषद ६, भोकर नगरपरिषद २, लोहा नगरपरिषद १, हिमायतनगर नगरपंचायत १४, धर्माबाद नगरपरिषद ६, किनवट नगरपरिषद ७, मुखेड नगरपरिषद ३ आणि कंधार नगरपरिषद ५ अशा एकूण ४४ उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणूक खर्चाचा हिशोब विहित वेळेत सादर करणे हे प्रत्येक उमेदवाराचे कायदेशीर कर्तव्य असून, त्याचे पालन न केल्यास कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
00000
वृत्त क्रमांक
नांदेडमध्ये सीबीजी प्रकल्पांना चालना ; प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागांनी समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी कर्डिले
नांदेड, दि. 11 ऑगस्ट : नांदेड जिल्ह्यात CBG धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विविध विभागांनी परस्पर समन्वय ठेवावा. व्यक्ती अथवा कंपन्यांना प्रकल्प उभारणीदरम्यान कोणतीही अडचण येणार नाही, याची संबंधित विभागांनी काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
तसेच, जिल्ह्यात जैवविघटनशील कचऱ्यापासून स्वच्छ ऊर्जानिर्मितीला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांनी CBG निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. बैठकीस विविध विभागाचे सदस्य असलेले अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 5 मे 2026 रोजी जारी केलेल्या ‘महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण, 2026’ ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा कॉम्प्रेस्ड बायोगॅस समन्वय समितीची (DBCC) बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली.
या धोरणांतर्गत नागरी सेंद्रिय, कृषी तसेच इतर जैवविघटनशील कचऱ्याचा कच्चा माल म्हणून वापर करून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती करण्यात येणार आहे. कचऱ्याचे विलगीकरण, संकलन व प्रक्रिया करून त्याचे स्वच्छ ऊर्जेत रूपांतर करणे, घनकचरा व्यवस्थापनाला चालना देणे, कचरा विल्हेवाटीसाठी लागणाऱ्या जागेवरील भार कमी करणे तसेच हरितगृह वायू उत्सर्जन कमी करून पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यावर या धोरणात भर देण्यात आला आहे.
CBG प्रकल्पाची किमान कार्यान्वयन क्षमता 20 टन प्रतिदिन (TPD) असणे आवश्यक असून, प्रकल्पांना व्यवहार्यता तफावत निधी (VGF) अंतर्गत प्रति टन कमाल 75 लाख रुपये, तर एकूण मर्यादा 15 कोटी रुपयांपर्यंत राहील.
बैठकीत जिल्हा सह आयुक्त तथा समितीचे सदस्य सचिव यांनी सांगितले की, CBG निर्मितीसाठी देगलूर तालुक्यातील दोन प्रस्ताव कार्यालयास प्राप्त झाले आहेत. या प्रस्तावांच्या अनुषंगाने तसेच जिल्ह्यातील इतर संभाव्य प्रकल्पांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
00000
वृत्त क्रमांक
उद्योग संचालनालयाचे नामकरण उद्योग आयुक्तालय ; नांदेडचे उपविभागीय कार्यालय बंद
नांदेड, दि. 11 ऑगस्ट : उद्योग संचालनालयाचे नामकरण आता उद्योग आयुक्तालय असे करण्यात आले आहे. तसेच नांदेड येथील उपविभागीय कार्यालय बंद करण्यात आले असून, या कार्यालयाचे सर्व कामकाज सह आयुक्त (उद्योग व सेवा), छत्रपती संभाजीनगर विभाग, विकास भवन, दुसरा मजला, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.
यापुढे नांदेड येथील उपविभागीय कार्यालयाशी संबंधित पत्रव्यवहार व कामकाजासाठी संबंधितांनी छत्रपती संभाजीनगर येथील सह आयुक्त (उद्योग व सेवा) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
दूरध्वनी : (0240) 2331105
ई-मेल : diroaurangabad@maharashtra.gov.in
यापुढे अधिक्षकीय उद्योग अधिकारी, उपविभागीय कार्यालय, नांदेड या कार्यालयास करावयाच्या पत्रव्यवहाराबाबत झालेल्या या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) अमोल इंगळे यांनी केले आहे.
000000
वृत्त क्रमांक
जिल्हा उद्योग केंद्राच्या पदनामात बदल ; महाव्यवस्थापक ऐवजी
‘उप आयुक्त (उद्योग व सेवा)’ असा उल्लेख करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 11 ऑगस्ट : सुधारित आकृतीबंधानुसार जिल्हा उद्योग केंद्रातील ‘महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र’ हे पदनाम बदलून ‘उप आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र’ असे करण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार करण्यात आलेल्या या पदनाम बदलाची नोंद घेऊन पुढील सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार तसेच कार्यालयीन कामकाजात ‘उप आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र’ या सुधारित पदनामाचा उल्लेख करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त अमोल इंगळे यांनी केले आहे.
00000
वृत्त क्रमांक
महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीचा नांदेड जिल्हा दौरा
नांदेड, दि. 11 ऑगस्ट : महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती 19 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून या समितीचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 19 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे उपस्थित. सकाळी 9.30 ते 10 वा. पर्यंत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती यांच्यासमवेत अनौपचारीक चर्चा स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सकाळी 10 ते दुपारी 12 वा. जिल्हाधिकारी व जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका अधिकाऱ्यासमवेत चर्चा. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.
दुपारी 12 ते दुपारी 12.30 वा. पोलीस अधीक्षक नांदेड कार्यालयातील अधिकाऱ्यांसमेवत चर्चा. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड. दुपारी 12.30 ते दुपारी 1 वा. नांदेड-वाघाळा महानगरपालिका नांदेड कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 1 ते दुपारी 1.30 वा. अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय नांदेड कार्यालयातील अधिकाऱ्यांसमेवत चर्चा. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.
दुपारी 2 ते 3 वा. पर्यंत राखीव. दुपारी 3 ते 3.30 वा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड कार्यालयातील अधिकाऱ्यासमेवत चर्चा. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 3.30 ते सायं 4 वाजेपर्यत महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनी नांदेड कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. सायं. 4 ते 6.30 वाजेपर्यत जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा स्थळ- जिल्हा परिषद कार्यालय नांदेड. सायं 6.30 ते रात्री 8 वाजेपर्यत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.
गुरुवार 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 वा. पर्यंत किनवट प्रकल्प कार्यालयातंर्गत भेटी, पाहणी आणि संबंधित अधिकाऱ्यासमवेत चर्चा. स्थळ- आश्रमशाळा, वसतीगृह व यंत्रणानिहाय इत्यादी कामांना भेटी व चर्चा. त्यानंतर शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मुक्काम.
शुक्रवार 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठकीस उपस्थिती. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.
000000
वृत्त
मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
मंगळवार, दि. ११ ऑगस्ट, २०२६.
मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
* भूसंपादनाचा मोबदला विलंबाने अदा झाल्यास, देण्यात येणाऱ्या व्याज दरांत सुधारणा. भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ७२ मध्ये सुधारणा करण्यात येणार. (महसूल विभाग)
* नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपन्यांचा समूह किंवा विशेष वहन यंत्रणा (Special Purpose Vehicles (SPVs) कंपन्यांमधील अंतर्गत जमीन हस्तांतरणाच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात माफ करण्याचा निर्णय़. (महसूल विभाग)
* नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांकरीता खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कात २५ % सूट. (महसूल विभाग)
* राज्याच्या कृषि विभागात कृषि संचालक, सहसंचालकांसह चार पदांच्या निर्मितीस मान्यता. कृषि विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंधानुसार पदांना मान्यता. कृषि संचालक (कृषी अभियांत्रिकी, मालमत्ता व्यवस्थापन व अॅग्रीस्टॅक), कृषि सह संचालक (सांख्यिकी), कृषि सह संचालक (माहिती व तंत्रज्ञान) ही प्रतिनियुक्तीची २ पदे. अपर संचालक, अॅग्रीस्टॅक (महसूल) अशा पदांना मान्यता. (कृषि विभाग)
* लातूर जिल्ह्यातील किल्लारी (ता. औसा) येथील श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) यांच्याकडून भांडवली खर्च व खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेण्यास मंजुरी. कारखान्याचा १८ कोटी नऊ हजार रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगम पाठविण्यात येणार. (सहकार व पणन विभाग)
* स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर खाजगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याच्या नियमांमध्ये बदल. मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता. (कौशल्य विकास व उद्योजकता विभाग)
* वरीष्ठ महाविद्यालयांमध्ये समाजकार्य अशी स्वतंत्र विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी सुरु करता येणार. तसेच समाजकार्य महाविद्यालयांमध्येही कायम विनाअनुदान तत्वावर नवीन अभ्यासक्रम, अतिरिक्त तुकडी सुरू करता येणार. (उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग)
* नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व सरकारी वकील कार्यालय होणार. यासाठी आवश्यक न्यायीक अधिकारी व कर्मचारीवृंद यांच्या पदांना तसेच खर्चाच्या तरतुदीस मान्यता. (विधि व न्याय विभाग)
-00000-
वृत्त आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्यांत करावी– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांची ...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
वृत्त क्रमांक 974 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “ स्वस्थ नारी , सशक्त परिवार ” राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ “ स्वस्थ नारी , ...
-
अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी 192 धारकांची प्रतिक्षा यादी घोषित आक्षेपाबाबत 30 ऑक्टोंबरची मुदत नांदेड , ( जिमाका ) दि. 22 :- ...




