शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या
अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना
नांदेड
दि. 3 :- अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन, निवास व इतर शैक्षणीक सुविधांसाठी आवश्यक ती रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 6 जानेवारी 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना" राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. यासाठी परिपूर्ण अर्ज गुरुवार 16 मार्च 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करावेत असे आवाहन, सहायक
आयुक्त समाजकल्याण यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणीक संस्था ज्या ठिकाणी आहे अशा स्थानिक ठिकाणचा रहिवासी नसावा. सन 2016-17 या वर्षामध्ये इयत्ता 11 वीचे विद्यार्थी इयत्ता 12 वीनंतर प्रथम वर्षात प्रवेश घेणारे पदविका, पदवीचे विद्यार्थी आणि प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या पदव्युत्तर पदवी पदवी / पदवीकाचे विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जाणार आहे. तसेच सन 2017-18 पासुन पुढे हा लाभ 11 वी व 12 वीचे विद्यार्थी आणि 12 वी नंतर प्रथम वर्ष पदविका ,पदवी व पदव्युत्तर पदवीका व पदवीच्या विद्यार्थ्यांना सुध्दा दिला जाणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व त्यांच्या पात्रतेची किमान टक्केवारी 2017
टक्के असावी. दिव्यांग विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यासाठी इयत्ता 10
वी , 12 वीमध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी या योजनेस पात्र होणार नाहीत. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा व कुंटूबांचे / पालकांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:च्या नावे राष्ट्रीयकृत / शेडयुल बँकेत खाते उघडणे व आधार क्रमांकाशी सलग्न करणे अनिवार्य आहे. विद्यार्थी शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे इयत्ता 10 वी किंवा 12 वी नंतरचे अभ्यास क्रमामध्ये प्रवेशित असावा त्यास कोणत्याही शासकिय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. बारावी नंतरच्या तसेच पदवी नंतर पदव्युत्तर पदवी / पदवीका अभ्यासक्रम हा दोन वर्षा पेक्षा कमी कालावधीचा नसावा व विद्यार्थी केवळ प्रथम वर्षात प्रवेशित असावा. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेले महाविद्यालय व अभ्यासक्रम यास राज्य शासन वा संबधीत तत्सम सक्षम प्राधिकारी यांची मान्यता असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवडलेला विद्यार्थी संबधीत अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. सदर सवलत शैक्षणीक कालावधीत जास्तीजास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल. विद्यार्थ्यांने खोटी माहिती व कागदपत्रे देवून या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणीक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नौकरी व व्यवसाय करीत असल्यास किंवा इतरमार्गाने या योजनेचा लाभ घेवून गैर वापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कारवाईस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12
टक्के व्याजासह वसुली केली जाईल.
वरील अटीची तसेच शासन निर्णयातील तरतुदीची पुर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित जोड पत्र क्रमांक एक मधील अर्ज त्यासोबत जोडपत्र क्रमांक दोन मध्ये नमुद कागदपत्राच्या सांक्षाकिंत प्रती जोडून परिपूर्ण अर्ज गुरुवार 16
मार्च 2017 पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज व जोडपत्र तसेच 6 जानेवारी 2017 रोजीचा शासन निर्णय समाज कल्याण कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी संबधीत विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , ग्यानमाता शाळे समोर, नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
0000000