Thursday, October 11, 2018


धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समिती
क्षेत्रातील गावात दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड, दि. 12 :- धर्माबाद कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर 2018 रोजी मतदान व 4 नोव्हेंबर 2018 रोजी मतमोजणी होत आहे. त्यासंबंधी धर्माबाद बाजार समितीच्या क्षेत्रातील मतदान होत असलेल्या ठिकाणी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत.  
मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये, याकरीता मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी मतदान होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-3, एफएल-2 एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
यामध्ये धर्माबाद बाजार समितीच्या क्षेत्रातील गावात (मतदान होत असलेली गावे) मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून व मतदानाचा दिवस 3 नोव्हेंबर 2018 रोजी संपुर्ण दिवस. मतमोजणी होत असलेल्या शहर / गावात मतमोजणीचा दिवस 4 नोव्हेंबर 2018 रोजी मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत हा आदेश लागू राहील. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे.
000000



दारु विक्री बंदचा आदेश
नांदेड, दि. 12 :- जिल्ह्यात व शहरात गुरुवार 18 ऑक्टोंबर 2018 रोजी दसरा व शुक्रवार 19 ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी विसर्जन करण्यात येणार आहे. त्याअर्थी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवून अनुचित प्रकार घडू नये, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आदेश काढले आहेत.
या आदेशात म्हटले आहे, गुरुवार 18 ऑक्टोंबर रोजी  दसरा निमित्त जिल्ह्यातील सर्व मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या व शुक्रवार 19 ऑक्टोंबर रोजी दुर्गादेवी विसर्जन निमित्त नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीतील सर्व सीएल-3, एफएल-4, एफएल-3, एफएल-2, एफएल / बिआर-2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात नमुद केले आहे. 
00000

मतदार जनजागृतीसाठी रॅली, चित्रकला, रांगोळी स्‍पर्धा ; राजकीय पक्षांची बैठक 16 रेाजी
महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्‍यासाठी आशा वर्कर, बचत गट,
आंगणवाडी सेविका गावा-गावात ; लोहा तालुक्‍यातील चित्र
लोहा :-
                मतदार जनजागृती करण्‍यासाठी लोहा तालुक्‍यात रॅली, चित्रकला, रांगोळी आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. दरम्‍यान, मतदार यादीमध्‍ये महिला मतदारांचे प्रमाण वाढविण्‍यासाठी अंगणवाडी सेविका, बचत गट व आशा वर्कर परिचारीकांच्‍या माध्‍यमातून गावा- गावात  मतदार जनजागृती चळवळ उभी करण्‍यात आली आहे.
       जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्‍हाधिकारी निवडणूक दिपाली मोतीयाळे, कंधारचे उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगांवकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली व तहसिलदार व्‍ही.एम. परळीकर यांच्‍या नियोजनात लोहा तालुक्‍यात 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादयांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षणाचा कार्यक्रम व्‍यापक स्‍वरुपात घेण्‍यात येत आहे.
       महिला मतदारांचे मतदार यादीतील प्रमाण वाढविण्‍यासाठी लोहा तालुक्‍यातील आंगणवाडी सेविका, महिला बचत गटांची तसेच आशा वर्कर परिचारिका यांची बैठक 11 ऑक्‍टोंबर 2018 रोजी तहसिल कार्यालयात घेण्‍यात आली. सदर बैठकीत निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार एस.एम. देवराये यांनी 1 सप्‍टेंबर 2018 ते 31  ऑक्‍टोंबर 2018 या कालावधीत 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर मतदार यादयांचा विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम घेण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. तसेच लग्‍न होवून आलेल्‍या स्‍त्री मतदारांचा व अपंग महिला मतदारांचा शोध घेवून त्‍यांची नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी फॉर्म भरुन घेण्‍यासाठी माहिती दयावी, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले. याशिवाय अंगणवाडी सेवीका, आशा वर्कर्स, परिचारीका यांना मतदार सखी असे संबोधण्‍यात यावे असे जाहीर केले. सदर बैठकीस महिला व बालविकास प्रकल्‍प अधिकारी पांडे, निवडणूक विभागाचे पी.पी.बडवणे, प्रशांत आपशेट्टे, तिरुपती मुंगरे, सुर्यकांत पांचाळ यांची उपस्थिती होती.
       मतदार जनजागृती करण्‍यासाठी लोहयातील संत गाडगेबाबा महाविद्यालय व जिल्‍हा परिषद हायस्‍कुल येथे दि.01 ऑक्‍टोबर 2018 रोजी विविध कार्यक्रम घेवून महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांना आवश्‍यक मार्गदर्शन करण्‍यात आले. लोहा शहरात मतदार जागृतीबाबत भव्‍य रॅली काढण्‍यात आली. यावेळी जवळपास 400 महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झाले होते. जिल्‍हा परिषद हायस्‍कूल लोहा येथे मुख्‍याध्‍यापिका श्रीमती, जाधव यांच्‍या मार्गर्शनाखाली चित्रकला स्‍पर्धा, रांगोळी स्‍पर्धांचे आयोजन करुन विजेत्‍यांना बक्षिसांचे वितरण करण्‍यात आले.
       दरम्‍यान, मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत बुथ लेवल एजंट (बिएलए) यांची नेमणूक करणे संबंधाने सर्व राजकीय पक्षांचे अध्‍यक्ष, सचिव यांची 16 ऑक्‍टोंबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय लोहा येथे बैठकीचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदर बैठकीस उपस्थित राहण्‍याचे आवाहन तहसिलदार व्‍ही.एम. परळीकर यांनी केले आहे.  
0000

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी
लांडगेवाडी येथे केली पिकांची पाहणी  
       
नांदेड दि. 11 :-  मुग, उडीद व सोयाबीन कमी किमंतीत विक्री न करता हमीभाव केंद्रावर माल न्यावा, असे आवाहन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. लोहा तालुक्यातील लांडगेवाडी येथे  मरिबा मस्के आणि किशन वलोटे यांच्या शेतात पिकाची पाहणी केली. त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते.
श्री. देशमुख यांनी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्यावेळी शेतकऱ्यांना व सरपंचाना उपस्थित राहण्याचे सांगितले. पाणीटंचाईबाबत चौकशी केली. त्याबाबत नियोजन व आराखडा तयार करावा. पीक आणेवारी 50 पैशापेक्षा कमी असल्याबाबत व त्याप्रकारे अहवाल पाठविण्यास सांगितले. शेतमाल तारण योजना बाजार समितीने राबवावी व शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
दुष्काळी परिस्थितीच्या संदर्भाने उपस्थित जवळपास 125 शेतकऱ्यांशी श्री. देशमुख यांनी संवाद साधून आस्थेवाईकपणे विचारपूस केली. सोयाबीन पिकाचे वाढीपुर्वीच वाळून गेलेली परिस्थितीची पाहणी त्यांनी केली.
यावेळी आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, लोहा कृषी अधिकारी विश्वांभर मंगनाळे, सहाय्यक निबंधक जी. आर. कौरवार, बाजार समितीचे सचिव आनंद घोरबांड , सरपंच श्रीमती कलावती रामचंद्र बलोरे, शेतकरी, नागरिक आदींची उपस्थिती होती.
****


शेवटच्या रुग्णापर्यंत वैद्यकीय सेवा
देण्याचा सहकारी संस्थेने प्रयत्न करावा
- सहकार मंत्री सुभाष देशमुख
नांदेड दि. 11 :- शेवटच्या रुग्णापर्यंत वैद्यकीय सेवा पोहचविण्यासाठी श्री गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. येथील नंदिग्राम वैद्यकीय सहकारी संस्था मर्यादित श्री गुरुजी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. देशमुख बोलत होते.
यावेळी आमदार प्रतापराव पाटील-चिखलीकर, मधुकरराव जाधव, डॉ. सुधीर कोकरे, डॉ. अनिल तोष्णीवाल, डॉ. सुशील राठी, डॉ. संजय चव्हाण, लक्ष्मीकांत बजाज, सरपंच बंडू पावडे , संजय पाचपोर, जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस  आदिंची प्रमुख उपस्थिती होती.  
श्री. देशमुख म्हणाले, राज्यात सहकार चळवळ समृद्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून सर्वांसाठी उत्तम आरोग्य सुविधा मिळत आहेत. त्याचप्रमाणे नांदेड येथे श्री गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा निर्माण झाली आहे. या रुग्णालयाने दर्जेदार वैद्यकीय सेवा देवून राज्यात व देशात श्री गुरुजी रुग्णालय नावारुपास आणण्याचा प्रयत्न करावा. सहकारी चळवळीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, कर्तव्य जपण्याची आपली जबाबदारी असून रुग्ण सेवेसाठी सहकार रुग्णालयास सर्वांनी मदत करावी. असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
श्री. देशमुख यांनी श्री गुरुजी रुग्णालय जनसहभागातून उभे राहिलेले, जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी वाहणारे मराठवाड्यातील पहिले सहकारी तत्वावर चालणारे रुग्णालय आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्याच्यादृष्टीने संस्था देत असलेल्या योगदानास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर कोकरे तर आभार डॉ. मुकूल जोशी यांनी मानले. यावेळी रुग्णालयाचे सभासद, नागरिक आदी उपस्थित होते.
000000


बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे
विविध पिकांची क्षेत्र नोंदणी सुरु
        नांदेड, दि. 11 :-  रब्बी हंगाम सन 2018-19 मधील बीजोत्पादनाकरीता बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे विविध पिकांची क्षेत्र नोंदणी सुरु आहे. बीजोत्पादक संस्थांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी परभणी यांनी केले आहे.
            विविध रब्बी पिकांच्या बीजोत्पादनासाठी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद कार्यालयात क्षेत्र नोंदणी सुरु आहे. बीजोत्पादक संस्थांनी बीजोत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात येणाऱ्या या बीजोत्पादन कार्याक्रमाचे क्षेत्र नोंदणी प्रस्ताव बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडे सादर करण्याच्या पिकनिहाय अंतिम तारखा पुढील प्रमाणे आहेत. करडई व रब्बी ज्वारी- 31 ऑक्टोंबर 2018. हरभरा- 20 नोव्हेंबर तथा गहू व इतर पिकांसाठी- 15 डिसेंबर आहे. या तारखा क्षेत्र नोंदणीच्या अंतिम तारखा असून क्षेत्र नोंदणी अंतिम तारखेपूर्वी पिकाची पेरणी झाल्यानंतर 15 दिवसात करता येईल. त्यासाठी अंतिम तारखेची वाट पाहण्याची आवश्यकता नाही.
            क्षेत्र नोंदणीकरीता बीजोत्पादक संस्थांनी प्रस्तावासोबत बीजोत्पादक संस्थेचा परवाना, बीजोत्पादक संस्था प्रतिनिधीचे अधिकारपत्र, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी यांचेसह करण्यात येणार 500 रुपयाच्या बंधपत्रावरील करारनामा, स्त्रोत बियाणे खरेदी बिल, स्त्रोत बियाण्याचे मुळ मुक्तता अहवाल, स्त्रोत बियाणे पडताळणी अहवाल, बीजोत्पादक शेतकऱ्याच्या स्वाक्षरीत व परिपूर्ण माहिती भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, बीजोत्पादकाचे महसूल दस्तावेज ( सात / बारा व आठ-अ), बीजोत्पादकांचे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक, संस्था आणि बिजोत्पादकांमधील करारनामाची प्रत, स्त्रोत बियाणे वाटप अहवाल, गाव / पिक व दर्जा निहाय बीजोत्पादकांच्या विहित प्रपत्रातील याद्या 4 प्रतीत इत्यादी कागदपत्रांसह क्षेत्र नोंदणीचे प्रस्ताव सादर करावे.  
            क्षेत्र नोंदणी शुल्क 50 रुपये प्रती बीजोत्पादक असून क्षेत्र तपासणी शुल्क पायाभूत बीजोत्पादनासाठी 200 रुपये प्रती एक व प्रमाणीत बीजोत्पादनासाठी 150 रुपये प्रती एकर याप्रमाणे आहे.
            यासंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हास्तरीय बीज प्रमाणीकरण अधिकारी नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या कार्यालयात संपर्क साधावा, असेही आवाहन विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी परभणी यांनी केले आहे.
0000000


अल्‍पसंख्‍याक बहुल शासनमान्‍य शाळेतील
पायाभुत सोयी सुविधेसाठी अनुदान योजना
अर्ज करण्याची 30 ऑक्टोंबर मुदत  
नांदेड दि. 11 :- जिल्‍ह्यातील धार्मिक अल्‍पसंख्‍याक विद्यार्थी बहुल शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळा  यांच्याकडून पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत कमाल 2 लाख रुपये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छूक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी संपूर्ण भरलेला अर्ज जिल्‍हा नियोजन समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे मंगळवार 30 ऑक्टोंबर 2018 पर्यंत सादर  करावेत, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा उच्‍चस्‍तरीय निवड समितीचे अध्‍यक्ष अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
शासन निर्णय 7 ऑक्टोंबर 2015 व अर्जाचा नमुना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.
योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे राहतील. शासनमान्‍य खाजगी शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थामध्ये अल्पसंख्याक समाजाचे (मुस्लिम, बौध्‍द, ख्रिश्चन, जैन, शिख व पारसी मिळून) किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे. शासन मान्‍यताप्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे.
या योजनेंतर्गत पुढील पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय आहे. शाळेच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडूजी. शुद्ध पेयजलाची व्यवस्था करणे. ग्रंथालय अद्ययावत करणे. प्रयोगशाळा उभारणे / अद्यावत करणे. संगणक कक्ष उभारणे / अद्यावत करणे. प्रसानधगृह / स्वच्छतागृह उभारणे / डागडुजी करणे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक फर्निचर. इन्‍व्‍हर्टर / जनरेटरची सुविधा निर्माण करणे. झेरॉक्श मशीन. अध्‍ययनाची साधने (Learning Material) / एल.सी.डी.प्रोजेक्‍टर अध्‍ययनासाठी लागणारे विविध  सॉफटवेअर इत्‍यादी. इंग्रजी लॅग्‍वेज लॅब. संगणक हार्डवेअर / सॉफटवेअर.
या योजनेंतर्गत यापूर्वी 5 वेळा अनुदान घेतलेल्‍या शाळा / संस्‍था यावर्षी अनुदानासाठी पात्र  असणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राह धरले जाणार नाहीत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.  
0000000


मतदार नोंदणीसाठी
गृह निर्माण संस्थेने प्रयत्न करावेत 
- जिल्हाधिकारी डोंगरे
  नांदेड, दि. 11 :- मतदार नोंदणीसाठी गृह निर्माण संस्थेने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
मतदार नोंदणी जनजागृतीसाठी नांदेड शहरातील विविध सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष / सचिव यांची बैठक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा‍ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली बुधवार (10 ऑक्टोंबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे घेण्यात आली. त्यावेळी श्री. डोंगरे बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी मतदानाच्या अमूल्य हक्काची जाणीव करुन देत निवडणूक आयोगामार्फत राबविल्या जाणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. महिला, दिव्यांग आणि नवमतदार या तीन मतदार वर्गाकडे या मोहिमेमध्ये विशेष भर दिला गेला आहे. यासाठी अध्यक्ष / सचिव यांनी गृह निर्माण संस्थेत बुथ लेवल स्वयंसेवक म्हणून भूमिका पार पाडावी, असेही त्यांनी आवाहन केले.   
उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती दिपाली मोतीयेळे यांनी मतदार नोंदणी प्रक्रिया, त्यासाठी भरावयाचे अर्ज, Nvsp Portal वर नावाची आणि मतदान केंद्राची चाचणी आदी बाबीवर मार्गदर्शन केले. बैठकीस अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक सह. संस्था प्रविण फडणीस, सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.  
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...