Tuesday, January 10, 2017

   शाळकरी राघवेंद्रची संवेदनशीलता ;
 साठवलेल्या पैश्यातून शहीद जवानांसाठी दिला निधी
नांदेड दि. 10 :- नांदेड येथील शाकुंतल स्कुल फॉर एक्सलन्स या शाळेतील विद्यार्थी राघवेन्द्र महेश पाटोदेकर वय 10 वर्षे याने साठवलेले पैश्यांतून शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी  2 हजार 500 रुपये देऊ केले. राघवेंद्रच्या संवेदनशिलतेला साथ म्हणून त्याच्या वडिलानेही या निधीत भर घालून 4 हजार 600 रुपये जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड यांच्याकडे सुपूर्द केले. 
सीमेवर  शहीद  होणारे जवान तसेच जिल्ह्यातील  शहीद जवान संभाजी यशवंत कदम  यांच्या वीरमरणामुळे राघवेन्द्र याला आपणही सैनिकांसाठी मदत करावी असे सुचले. त्याने वडील महेश पाटोदेकर यांच्याकडून  सायकल घेण्यासाठी म्हणून पैसे साठवणे सुरु केले. शिक्षक असलेले महेश पाटोदेकर यांनी सैनिक कल्याण कार्यालयात  सहपरिवार येवून  राघवेंद्रने  साठवलेल्या  2 हजार 500 रुपयांसह स्वताकडील 2 हजार 100 रुपये असे एकुण 4 हजार 600 रुपये सैनिक कल्याण संघटक कमलाकर शेटे यांच्याकडे जमा केले.  राघवेंद्र व त्याच्या कुटुंबियांच्या संवेदनशीलतेमुळे यावेळी  उपस्थीत असलेले माजी सैनिकांचे मने भारावून गेली.  राघवेन्द्र याने सैन्यात अधिकारी  होण्याची इच्छा व्यक्त केली व यासाठी सैनिक स्कुल सातारा येथे  प्रवेश घेण्याचा मनोदयही व्यक्त केला. ‍
 याप्रसंगी कार्यालयात उपस्थित सर्वांना सशस्त्र सेना ध्वजदिन निधीची माहिती संजय देशपांडे  यांनी देवून आवाहन केले, संस्था किंवा व्यक्ती या स्वयंस्फूर्तीने सैनिकांच्या कल्याणासाठी निधी जमा करु शकतात.  सदरचा निधी जमा करावायाचा असल्यास त्यांनी धनादेश किंवा धनाकर्ष  जिल्हाधिकारी व अध्यक्ष जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड यांच्या नावे काढून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावा. जमा केलेला निधी हा आयकर कायदा 1961 मधील कलम 80जी (5)(vi) अन्वये करमुक्त करण्यात आलेला आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर व्ही. व्ही. पटवारी यांनी पाटोदेकर परिवाराचे आभार मानले.  

0000000
प्रजासत्ताक दिन मुख्य समारंभाची पूर्वतयारी बैठक संपन्न 
नांदेड, दि. 10  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 67 वा वर्धापन दिन गुरूवार 26 जानेवारी 2017 रोजी आहे. त्यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ नांदेड येथील पोलीस मुख्यालय कवायत मैदान वजिराबाद येथे होणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
बैठकीस महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अकुंश पिनाटे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक विश्र्वंभर नांदेडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर, तहसिलदार प्रकाश ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, शिक्षण, क्रीडा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत ध्वजारोहण समारंभाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी महत्त्वपुर्ण निर्देश दिले. त्यामध्ये पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर मुख्य समारंभ होणार असल्याने त्याठिकाणच्या ध्वजस्तंभाच्या परिसराची डागडूजी, मैदान परिसराची स्वच्छता, आसन व्यवस्था, शामियाना, ध्वनीक्षेपक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह परिसरातील वाहतूक व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था याबाबींस समावेश होता. यादिवशी क्रीडा विभाग, शिक्षण विभागानी आयोजित करावयाच्या प्रभातफेरी, सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यासह विविध विभागांचे चित्ररथ, संचलन आदी बाबत चर्चा झाली व त्यांच्या काटेकोर नियोजनाचे निर्देश देण्यात आले. मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 9.15 वा. होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे, यासाठी इतर कार्यालये, संस्था आदींनी त्यांचे ध्वजारोहणाचे समारंभ सकाळी 8.30 वा. पुर्वी किंवा सकाळी 10.00 वा.च्या नंतर आयोजित करण्यात यावेत, असेही आवाहनही यावेळी करण्यात आले.
ध्वजसंहितेचे काटेकोर पालन व्हावे. राष्ट्रध्वजाचा यथोचित सन्मान राखण्यात यावा, याबाबत यंत्रणांनी जनजागृती करावी, असेही यावेळी सांगण्यात आले.
प्रजासत्ताक दिनी वितरीत करावयाचे पुरस्कार, प्रमाणपत्र, पारितोषिके याबाबत शासन परिपत्रकात उल्लेख असेल अशाच बाबींबाबत 22 जानेवारी 2017 पर्यंत संबंधीत विभागाने वेळेत यादी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी, असे आवाहनही करण्यात आले.  

00000000
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर
नांदेड दि. 10 :-  नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण आज येथे जाहीर करण्यात आले. त्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे सोडत काढण्यात आली. चक्रानुक्रमे व सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेले  हे आरक्षण 14 मार्च 2017 पासून सुरू होणाऱ्या पुढील अडीच वर्षांकरिता लागू राहील.
आरक्षण सोडतीस उपजिल्हाधिकारी सौ. अनुराधा ढालकरी, तहसिलदार डॅा. अरविंद नरसीकर, नायब तहसिलदार डी. एन. पोटे, जी. एन. धसकनवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य, नागरीक आदींची उपस्थिती होती.
सोडतीत पंचायत समितीनिहाय निर्धारित करण्यात आलेले सभापती पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे :-  कंधारअनुसूचित जाती. नायगांव खै. - अनुसूचित जाती (महिला). हदगाव – अनुसूचित जाती (महिला). माहूर – अनुसूचित जमाती. बिलोली – अनुसूचित जमाती (महिला). किनवट – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. मुखेड – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग. अर्धापूर – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला). भोकर - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला). नांदेड – सर्वसाधारण. उमरी – सर्वसाधारण. लोहा – सर्वसाधारण. देगलूर – सर्वसाधारण. हिमायतनगर – सर्वसाधारण (महिला). मुदखेड – सर्वसाधारण (महिला). धर्माबाद – सर्वसाधारण (महिला).
या आरक्षण सोडतीत सात पंचायत समित्यांचे सभापती पद सर्वसाधारणसाठी राहीले असून, त्यापैकी तीन पदे महिलांसाठी असतील. तीन पंचायत समित्यांचे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून, त्यापैकी दोन महिलांसाठी राखीव राहतील. दोन पंचायत समित्यांचे पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले असून, त्यापैकी एक महिलेसाठी राखीव राहणार आहे. चार पंचायत समित्यांचे पद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून, त्यापैकी दोन पदे महिलांसाठी राखीव राहतील.
आरक्षण सोडतीत उपजिल्हाधिकारी सौ. ढालकरी यांनी सादरीकरणाद्वारे आरक्षण पद्धतीची माहिती दिली. त्यानुसार चक्रानुक्रमे व सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. त्यासाठी शालेय विद्यार्थी ऋतुजा दिवेकर आणि रितेशसिंह परदेशी यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी पुढील अडीच वर्षांसाठी निर्धारित करण्यात आलेले आरक्षण जाहीर केले. आरक्षण सोडत काढण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध घटकांचे यावेळी आभार मानण्यात आले.

0000000
आरटीओकडून वाहन चालक परवान्यांचे
काम शुक्रवारपासून नव्या सारथी प्रणालीद्वारे
नांदेड दि. 10 :-  प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुक्रवार 13 जानेवारी 2017 पासून नवीन शिकाऊ परवान्यांचे कामकाज सारथी 3.0 जुन्या ऐवजी सारथी 4.0 या नवीन प्रणालीद्वारे ऑनलाईन सुविधा सुरु करण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.
शुक्रवारी 13 जानेवारी रोजी नवीन शिकाऊ परवाना (अनुज्ञप्ती / लायसन्स) सोबतच पुढील सेवा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एंडोर्समेंट करिताचे शिकाऊ अनुज्ञप्ती / लायसन्स. नवीन पक्के परवाना ( अनुज्ञप्ती / लायसन्स. पक्की अनुज्ञप्ती / लायसन्स नुतनीकरण. दुय्यम पक्की अनुज्ञप्ती / लायसन्स. अनुज्ञप्ती / लायसन्स मधील नाव दुरुस्ती व पत्ता बदल. अनुज्ञप्ती / लायसन्स माहिती. अनुज्ञप्ती / लायसन्स संदर्भातील इतर अनुषंगिक कामे या प्रणालीद्वारेच केली जाणार आहेत.
अर्जदारांना www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे व आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. शुल्क भरणा एसबीआय ईपे ही सुविधा वापरुन क्रेडीट, डेबीटकार्ड, नेट बँकींगद्वारे भरता येते. सारथी 4.0 वर देण्यात येणाऱ्या सेवांकरिता शासनाने एसबीआयमध्ये सीएससी Wallet चा समावेश करण्यात आला आहे. या शासनमान्यता प्राप्त सिटीजन सर्व्हिसेस केंद्रामार्फत सुद्धा अर्ज भरणे व शुल्क अदा करता येते. अर्जदारास अर्जाच्या शुल्का व्यतिरिक्त केंद्रास प्रति अर्ज 20 रुपये अदा करावे लागतील.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ऑनलाईन अर्ज करावे व त्याकरिता लागणारे शुल्क ऑनलाईन सेवेद्वारे भरुन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000000
सार्वजनिक, खाजगी आस्थापनांन कर्मचाऱ्यांची
माहिती ऑनलाईन भरणे बंधनकारक
नांदेड दि. 10 :- सेवायोजन कार्यालये अधिनियम (रिक्त पदे सक्तीने अधिसुचित करण्यास भाग पाडणे ) अधिनियम, 1951 व त्याअंतर्गत नियमावली 1960 अन्वये सेवायोजना कार्यालयात सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनाना डिसेंबर 2016 अखेरचे त्रेमासिक विवरण ईआर-1 ऑनलाईन भरुन पाठविणे तसेच ऑनलाईन भरणे अत्यावश्यक व बंधनकारक आहे.

तसेच जानेवारी 2017 या महिन्याचे मासिक वेतन देयक दाखल करताना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनानी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहितीबाबतचे माहे डिसेंबर 2016 अखेरचे ईआर-1 विवरण  ऑनलाईन भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडल्याशिवाय वेतन देयके स्विकारले जाणार नाहीत. याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. सर्व कार्यालयांना युजर आयडी व पासवर्ड यापुर्वीच कळविण्यात आलेले आहे, असे उल्हास सकवान, सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड  यांनी कळविले आहे.                                                                     0000000
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी रोजी
जिल्ह्यात चित्रकला स्‍पर्धांचे आयोजन
नांदेड दि. 10 :-  मतदारांमध्‍ये जागृती व्‍हावी यादृष्‍टीने भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी  25 जाने रोजी राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्‍यात येतो. यावर्षीही सर्व तालुकास्‍तरावर व मतदान केंद्रावर राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्‍यात येणार आहे. त्यासाठी जिल्‍हयातील तालुकास्तरावर 15 ते 17 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी महत्‍व प्रत्‍येक मताचे या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.
आयोगाने यंदाच्‍या वर्षी नवमतदारांवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. त्‍यानुसार आयोगाने यंदाच्‍या वर्षी "सक्षम करुया युवा व भावी मतदार हे घोषवाक्‍य जाहीर केलेले आहे. त्‍यास अनुसरुन युवा मतदारामध्‍ये विशेषत: वय वर्षे 15 ते 17 या वयोगटातील ( इयत्ता 9 ते 12 वी ) भावी मतदारामध्‍ये जागृती व्‍हावी यादृष्‍टीने विविध स्‍पर्धांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. 
याअनुषंगाने जिल्‍हयातील सर्व तालुक्‍यामध्‍ये वय वर्षे 15 ते 17 या वयोगटातील विद्यार्थींसाठी महत्‍व प्रत्‍येक मताचे या संकल्‍पनेचा वापर करुन चित्रकला स्‍पर्धा आयोजित करण्‍यात आलेल्‍या आहेत. यामधून उत्‍कृष्‍ट दोन चित्रांची निवड करून त्‍यांना पुरस्‍कृत करण्‍यात येणार आहे. प्रत्‍येक तालुक्‍यातील विजेत्‍यामधून जिल्‍हा स्‍तरावर दोन विजेत्‍यांची निवड करून त्‍यांची नामांकन पुरस्‍कारासाठी राज्‍य स्‍तरावर पाठविण्‍यात येणार आहेत. 
याशिवाय प्रत्‍येक तालुक्‍यात वक्तृत्‍व स्‍पर्धा , रांगोळी स्‍पर्धा , quiz , घोषवाक्‍य स्‍पर्धा , युवा मतदार महोत्सव , रन फॉर वोट , निबंध स्पर्धा , रॅली इत्‍यादीचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. या विविध स्‍पर्धासाठी भरघोस प्रतिसाद मिळत आहे.  काही निवडक महाविद्यालयात मतदान यंत्राद्वारे मतदानाची प्रक्रिया समजावून सांगण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.

0000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...