Wednesday, April 16, 2025

वृत्त क्रमांक 398

जल व्यवस्थापन कृती पंधरवाड्यात

दुसऱ्या दिवशी गुणनियंत्रण प्रशिक्षण
 
नांदेड दि. 16  एप्रिल : राज्याच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार 15 ते 30 एप्रिल या काळात आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत येणाऱ्या नांदेड पाटबंधारे विभागाने दुसरा दिवस गुणनियंत्रण प्रशिक्षणाने साजरा केला. 30 एप्रिल पर्यंत जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन अधिक्षक अभियंता अजय दाभाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे.
 
काल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्ह्यातील जलव्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत विविध मान्यवर तसेच शेतकरी, पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत विभागस्तरावरील शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. आज दुसऱ्या दिवशी जलसंपदा अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. उद्या 17 एप्रिलला जिल्ह्यातील विविध कार्यालयामध्ये स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय तसेच जलपूर्नभरण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  
 
आज उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (भूविकास) विभाग नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात सहाय्यक अभियंता तारेख नदीम यांनी मंडळांतर्गत कार्यरत सर्व तांत्रिक अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेतले. यावेळी गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीमती एस.सी. डोंगळीकर, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. जगताप, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प (भूवि) विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. बिराजदार, नांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) कार्यकारी अभियंता ए. एस. चौगले, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर)चे कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोड, विष्णुपूरी प्रकल्प विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता पी. आर. मुदगल, देगलूर लेंडी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.पी. तिडके, वसमतनगर पूर्णा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. बिराजदार यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.  
0000




  वृत्त क्रमांक 397

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी

आधार व आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून घ्यावी   

नांदेड दि. 16 एप्रिल :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी करणे तसेच आस्थापना, नियोक्ते यांनी कागदपत्रे तपासणीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याशी 30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उमेदवार तसेच आस्थापना, नियोक्ते यांनी घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. 

कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या शासन निर्णय 9 जुलै 2024 अन्वये  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते.  आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानुसार आता शासन निर्णय दि.10 मार्च 2025 अन्वये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी यांचे विद्यावेतन डीबीटीद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी 10 मार्च  2025 किंवा त्यापूर्वी आपले 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थी यांना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव 5 महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छूक उमेदवारांची आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे ( उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे. 

त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त, जिकौविरोवउमाकें यांचेकडे सादर करणे अनिवार्य आहे. यापुढे Aadhar Seeded DBT होऊ शकेल. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते Aadhar Seeding करून घ्यावी. ज्या आस्थापना हे या योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी घेण्यास इच्छूक आहेत त्या आस्थापनांची शासन निर्णयानुसार कार्य प्रशिक्षणार्थी सामावून घेण्याची क्षमता आवश्यक कागदपत्रांची तपासणी/पडताळणी करूनच उमेदवारांना आस्थापनेवर रुजू करून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

शासन निर्णय दिनांक 10 मार्च 2025 नुसार आधार व कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच, प्रत्येक प्रशिक्षणार्थी यांची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे. ज्या बँक अकाऊंटला आधार लिंक आहे, तोच बँक अकाऊंट नंबर योजनेच्या विद्यावेतन डीबीटीसाठी नमुद करणे आवश्यक आहे. 

प्रशिक्षणार्थ्यांच्या आधार पडताळणीची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Intern Login               Sign up             आधार नं. प्रविष्ट करणे           सेंड OTP                Verify OTP  The intern enters the received OTP  Successful Login and Access, Once OTP verification is successful, the intern gains access to the system. 

सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापना यांनी याबाबत काही अडचण असल्यास आपल्या जिल्हयातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयात  9420040964, 7083096554 या भ्रमणध्वनी क्रमांकावर प्रत्यक्ष संपर्क करावा.

00000

  वृत्त क्रमांक 396

किनवट तालुक्यातील बॉक्सिंग खेळाडू अजय पेंदोर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित  

शुक्रवारी पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण    

नांदेड दि. 16 एप्रिल :- शालेय शिक्षण व क्रीडा विभागद्वारा आयोजीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ सन 2022-23 व सन 2023-24 चा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वा. शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल) म्हाळुंगे-बालेवाडी पुणे येथे संपन्न होणार आहे. या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण समारंभ करीता जिल्हयातील खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.  

किनवट तालुक्यातील अजय पेंदोर (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू) यांच्या कामगीरीची दखल घेवून महाराष्ट्र शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 ने अजय पेंदोर (आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडूं) यांना 3 लाख रुपये रोख, स्नमानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात येणार आहे. ही बाब किनवट तालुक्याची, संपूर्ण जिल्ह्याची, महाराष्ट्र व देशाकरीता गौरवाची आहे. 

अजय पेंदोर (आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू) हे  89 वी इलाईट पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सन 2019-20 (अकोला)- सुवर्ण पदक, 90 वी ईलाईट पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सींग अजिंक्यपद स्पर्धा सन 2023 (बुलढाणा)- सुवर्ण पदक, 77 वी युथ मुले महाराष्ट्र राज्य बॉक्सींग अजिंक्यपद स्पर्धा सन 2018 (सातारा)- सुवर्ण पदक, 4 वी ईलाईट पुरुष राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप सन 2019 (हिमाचल प्रदेश)- रौप्य पदक, 5 वी ईलाईट पुरुष राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप सन 2021 (कर्नाटका)- कांस्य पदक, ऑल इंडिया आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप सन 2019 (उदयपूर, राजस्थान)- रोप्य पदक (बेस्ट चॅलेंजर), खेलो इंडिया युथ गेम्स (पुणे, महाराष्ट्र) सन 2019- रोप्य पदक, 63 वी राष्ट्रीय शालेय बॉक्सींग क्रीडा स्पर्धा 2017-18 (19 वर्षे मुले)- सुवर्ण पदक (बेस्ट बॉक्सर), 58 वी राष्ट्रीय शालेय बॉक्सींग क्रीडा स्पर्धा 2012-13 (14 वर्षे मुले) मध्य प्रदेश- सुवर्ण पदक, 57 वी राष्ट्रीय शालेय बॉक्सींग क्रीडा स्पर्धा 2011-12 (14 वर्षे मुले) दिल्ली- सुवर्ण पदक, 59 वी राष्ट्रीय शालेय बॉक्सींग क्रीडा स्पर्धा 2013-14 (14 वर्षे मुले) भटींडा (पंजाब)- रोप्य पदक व इतर असी महत्वाची कामगीरी केली असुन त्यांना सतिषचंद्र भट (राज्य क्रीडा मार्गदर्शक, अकोला) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असून सद्यस्थितीत ते अकोला येथे प्रशिक्षण घेत असून भारतीय रेल्वे विभाग मध्ये नौकरीस आहेत. 

अजय पेंदोर (आंतरराष्ट्रीय बॉक्सींग खेळाडूं) यांचे जिल्हयात सर्वत्र कौतुक होत असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी व जिल्हयातील विविध एकविध खेळसंघटनेचे पदाधिकारी, मार्गदर्शक, प्रशिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.  

याप्रसंगी कार्यालयातील क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, सी. आर. होनवडजकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, विपूल दापके, वरिष्ठ लिपिक संतोष कनकावार, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण आदि उपस्थित होते.

000



शेतरस्त्यांचे  प्रश्न पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी "सस्ती अदालत" उपक्रम राबविणार - विभागीय आयुक्त दिलीप गावडे

“संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्तांचा आठ जिल्हयातील शेतकऱ्यांशी वेबिनारद्वारे संवाद

छत्रपती संभाजीनगर, दि.16 एप्रिल, (विमाका) :- शेतकरी बांधवांसाठी आपल्या शेतात जाण्यायेण्यासाठी शेतरस्ता, पाणंद रस्ता अत्यंत महत्वाचे असतात. गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले शेत रस्ते, पाणंद रस्ते मोकळे करुन देण्यासाठी तालुका पातळीवर सस्ती अदालत उपक्रम राबविण्याचे निर्देश आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले. शेतकरी बांधवांनी शेतरस्ते मोकळे देण्यासाठीच्या या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले.  

मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील  शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. आज शेतरस्ते  शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबत विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी संवाद साधला. यावेळी अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार, अपर आयुक्त के.आर.परदेशी, उपजिल्हाधिकारी उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे यांच्यासह संबंधित निवासी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी उपस्थित होते. 

विभागीय आयुक्त श्री.गावडे म्हणाले, जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करावी, शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. अशी रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत. असे स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी यापूर्वीच दिले आहेत.

त्यासाठी विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांशी या वेबिनारच्या माध्यमातून चर्चा आणि अडचणीचे निराकरण करण्यासाठी त्यांनी वेबीनार घेतला. 

संभाजीनगर जिल्ह्यातील ईसारवाडी ता.पैठण येथील शेतकऱ्यांनी शेतरस्त्याबाबत आपली अडचण मांडली. विशाल घुले यांनीही पाणंद रस्त्याची समस्या बोलून दाखविली. वायगाव ता.पैठण येथील बबन बोबडे यांनी शेतरस्त्यासाठी प्रशासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. वैजापूर तालुक्यातून विपीन काळे यांनी गावात गावनकाशा ठळक स्वरुपात लावला तर गावातील शेतरस्ते मोकळे होण्यास मदत होईल, तसेच गट मोजणी करून हद्द निश्चित करावी अशी मागणी केली.  याबाबत विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी श्री.काळे यांनी मांडलेली कल्पना निश्चितपणे चांगली असल्याचा उल्लेख केला. यामुळे शेतरस्ते, पाणंद रस्ते मोकळे होतील, संबंधित तालुका प्रशासनाने याबाबत कार्यवाही करावी तसेच नवीन रस्ते गाव नकाशात समाविष्ठ करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावा, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून धोरणात्मक निर्णयासाठी राज्याच्या जमाबंदी विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल असेही श्री.गावडे म्हणाले. 

लातूर जिल्ह्यातून रामेश्वर शेटे, सुदर्शन पाटील, बळीराम पाटील, एकनाथ पांढरे यांनी शेतरस्त्याच्या अडचणी मांडल्या. याबाबत जिल्हा प्रशासनाने मोहिम स्वरुपात कालबद्ध कार्यक्रम राबवावा तसेच तालुका पातळीवर सस्ती अदालत उपक्रमाचे तातडीने नियोजन करावे. असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. 

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून भारत परबते यांनी पाणंद रस्ते, अतिक्रमणाबाबत आपली अडचण सांगितली. तसेच इतर शेतकऱ्यांनीही शेतरस्त्याबाबतच्या आपल्या अडचणी विषद केल्या. 

हिंगोली जिल्ह्यातील अविनाश नरवडे यांनी शेतरस्ते अतिक्रमणाचा विषय सांगितला. याबाबत गरज तपासून पोलीस बंदोबस्तात रस्ता मोकळा करावा असे निर्देश दिले. विनोद राठोड यांनी पिंपळवंडी रस्त्याचा प्रश्न मांडला. त्यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

जालना जिल्ह्यातील बदनापूर येथून लक्ष्मण कुऱ्हाडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. आमच्या गावात पाणंद रस्ते नाहीत, गेल्या अनेक वर्षांपासून आमचा यासाठी प्रयत्न सुरू आहे. शेतात जाण्यायेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. श्री.कुऱ्हाडे यांच्या अडचणीबाबत विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी जालना जिल्हा प्रशासनाने हा विषय मार्गी लावून यासोबतच इतर शेतकरी बांधवांचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने सस्ती अदालतीचे आयोजन करावे असे निर्देश दिले. 

बीड जिल्ह्यातील शिरुर कासार, गेवराई येथील शेतकरी बांधवांनी आपल्या शेतरस्त्यांसंदर्भातील अडचणी मांडल्या. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री.स्वामी यांनी शेत रस्ते मोकळे करण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. 

धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा येथून शेतकऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. 

परभणी जिल्ह्यातूनही अनेक शेतकऱ्यांनी शेतरस्ते, पाणंद रस्ते याबाबतच्या समस्या मांडल्या. याबाबत लवकरच सस्ती अदालत उपक्रम हाती घेणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

शेतरस्ते, पाणंद रस्ते बाबतच्या या संवादात मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातून संवाद साधण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी चर्चेत सहभागी झाले होते. विभागीय पातळीवरुन ज्या शेतकऱ्यांशी आज संवाद होऊ शकला नाही त्या शेतकरी बांधवांशी संबंधित जिल्हा, तालुका प्रशासनाने सस्ती अदालतीच्या माध्यमातून संवाद साधून त्यांचे शेत रस्त्यांचे प्रश्न तत्परतेने मार्गी लावावेत असे निर्देश विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिले. 

अपर आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी शेतरस्ते व त्याबाबतच्या कायद्याबाबत माहिती दिली. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जिल्हा व तालुका प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. 

**







 वृत्त क्रमांक 395

नवनियुक्त तलठ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात

 महसूलमध्ये कर्मचाऱ्यांना एआयचेही प्रशिक्षण 

नांदेड दि. 16  एप्रिल : महसूल विभागाचे काम अधिक गतीशील करण्यासाठी नव्या दमाच्या तलाठ्यांना आता आर्टीफिशीयल इंटिलिजन्स अशा नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यासोबतच ई -फेरफार व अन्य आवश्यक बाबींचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाले आहे. 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यामध्ये ऑनलाईन उपक्रमासंदर्भात पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ईफायलींगमध्ये अग्रेसित झाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनात दाखल झालेल्या नव्या 122 तलाठ्यांच्या प्रशिक्षणामध्ये नवतंत्रज्ञानाचा महसूलमध्ये वापर संदर्भात आज दिवसभर प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, शरद वानखेडे, निळकंठ पाचंगे, संतोष निलावार यांच्यासह विविध तंत्रस्नेही अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले.

0000





 महत्वाचे वृत्त क्रमांक 394

महिन्याभरात शेत पांदण रस्त्यांचे अर्ज निकाली काढा

विभागीय आयुक्तांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद  

नांदेड दि. 16  एप्रिल : कुणी शेतावर, कुणी बांधावर, कुणी दुकानात तर कुणी दुपारच्या उन्हात झाडाखाली खाटेवर पहुडलेला. मात्र तरीही विभागीय आयुक्त आपल्याशी बोलतात या उत्सुकतेपोटी शेकडो शेतकऱ्यांनी आज 'संवाद मराठवाड्याशी ' या कार्यक्रमात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी नांदेड जिल्ह्याने शेतरस्ते, शिव रस्ता, पांदण रस्ते व शेतीच्या रस्त्यासंदर्भात सुरू केलेल्या कार्यवाहीला महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नांदेड जिल्ह्याने यासंदर्भात यापूर्वीच घेतलेल्या पुढाकाराचे कौतुकही केले.  

छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी वेगवेगळ्या लाभांच्या व जिव्हाळ्यांच्या योजनासंदर्भात वेबिनारसत्र 'संवाद मराठवाड्याशी ' या उपक्रमांतर्गत सुरू केले आहे. विभागीय आयुक्त आपल्या मोबाईलवर थेट उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद असून आज 8 जिल्ह्यातील शेकडो शेतकरी आपल्या प्रलंबित शेतमार्गांसाठी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.

 अर्जदार ,संबंधित तहसिलदार तसेच विभागीय आयुक्त एकाचवेळी उपस्थित असल्याने अनेक प्रश्न त्याक्षणी त्यांनी सोडवले गेले.याशिवाय या रस्त्यासंदर्भात अर्ज करतांना घ्यावयाची काळजी यासंदर्भातील कायदे व विशिष्ट कालमर्यादेत हे कार्य पूर्ण करण्याबाबत यंत्रणेला विभागीय आयुक्तांनी दिलेली ताकिद यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.  

नांदेड जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनात शेती संदर्भातील सर्व रस्त्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी देखील यासंदर्भात बैठक घेऊन पांदण रस्ते व अन्य रस्त्यांचे प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील अन्य जिल्ह्याच्या तुलनेत नांदेडमध्ये यासंदर्भात मोठ्याप्रमाणात कामे सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या 1 हजार 129 अर्जांपैकी 420 रस्ते मोकळे झाले आहेत तर 709 रस्ते प्रलंबित आहेत. या अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही आज या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली. 

आजच्या बैठकीला नांदेड येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी पूनर्वसन संजीव मोरे, तहसिलदार विपीन पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी रस्त्यासंदर्भातील एक दिवसाचा सेमिनार आयोजित करण्यात येईल. पावसाळ्याच्या आत सर्व रस्त्यांचे आदेश काढले जातील. यासाठी आयुक्त कार्यालयाने सुचविल्याप्रमाणे सस्ती अदालत आयोजित करण्यात येईल, असे स्पष्ट केले. विभागीय आयुक्तांनी महिनाभरात नांदेड मधील सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश यावेळी दिले.

00000











 वृत्त क्रमांक 393

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश  

नांदेड दि. 16 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यात 17 एप्रिलच्या सकाळी 6 वाजेपासून ते 1 मे 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 17 एप्रिल सकाळी 6 वाजेपासून ते 1 मे 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. 

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 वृत्त क्रमांक 392

पैनगंगा को-ऑपरेटीव्ह सोसायटीची निवडणूक जाहीर 

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले निवडणूक अधिकारी 

नांदेड दि. 16  एप्रिल : पैनगंगा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., शेंदारकर, कॉम्पलेक्स आनंदनगर नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली. 

ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-​ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजीनगर दिल्ली-110029 यांनी त्यांचे पत्र दिनांक 18 मार्च 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी  निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे. 

संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकुण 9 संचालक निवडून द्यावयाचे असून त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून 6, अनुसूचीत जाती-जमाती मतदारसंघातून एक आणि महिला राखीव मतदार संघातून दोन संचालकाची निवड करावयाची आहे. सदर संस्थेच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रमासह 21 एप्रिल 2025 संस्थेच्या पात्र मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. तर 22 ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे, प्राप्त झालेल्या आक्षेपाची छाननी 28 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत करण्यात येऊन 1 मे 2025 रोजी संस्थेच्या सभासदांची अंतिम मतदार यादी दुपारी 3 वा. प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

दि. 2 ते 6 मे 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. प्राप्त नामनिर्देशनपत्राची प्रसिद्धी 6 मे 2025 रोजी दु. 5 वा. करण्यात येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी 10 मे 2025 रोजी करुन वैध नामनिर्देशन पत्राची प्रसिध्दी 10 मे 2025 रोजी दु. 5.00 वा. करण्यात येणार आहे. तसेच  14 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येतील. त्यानंतर निवडुन द्यावयाच्या उमेदवारांची यादी  14 मे 2025 रोजी दु. 5.00 वा. प्रसिध्द करण्यात येणार आहे. आवश्यकता असल्यास 18 मे 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी 19 मे 2025 रोजी सकाळी 8 वा. करण्यात येणार आहे. 

को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथॉरीटी नवी दिल्ली यांच्याकडून मंजूरी प्राप्त झाल्यानंतर 23 मे 2025 रोजी संचालक मंडळ निवडणुकीचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे. पैनगंगा मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., शेंदारकर, कॉम्प्लेक्स आनंदनगर नांदेडच्या सर्व सभासदांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन पैनगंगा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि., शेंदारकर कॉम्पलेक्स् आनंदनगर निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आवाहन केले आहे. संस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम संस्थेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे शेंदारकर कॉम्पलेक्स्, आनंदनगर नांदेड येथील मुख्य कार्यालयात पहावयास मिळेल.

00000

 वृत्त क्रमांक 391

इस्त्रोच्या भूमीतून भरारीचे पंख घेऊन परता : महेश  वडदकर 

नांदेड समाज कल्याणचे 60 विद्यार्थी श्रीहरीकोटाला रवाना 

नांदेड दि. 16  एप्रिल : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो ही देशाची अंतराळ संशोधनातील महत्त्वाची संस्था असून या ठिकाणावरून आकाशात भरारी घ्यायचे पंख आणि त्यासाठी लागणारे बळ घेऊन परत या, अशा शब्दांमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी विद्यार्थ्यांना आज शुभेच्छा दिल्या. समाज कल्याण विभागातील 60 गुणी विद्यार्थ्यांची एक टीम शैक्षणिक सहलीसाठी श्रीहरिकोटा येथे आज रवाना झाली. 

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड कार्यालय अधिनस्त शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी इस्त्रो येथे विमानाने रवाना झाले. त्यांना निरोप देताना श्रीहरीकोटा येथे आपण शैक्षणिक सहलीसाठी जातो आहे आणि त्या ठिकाणावरून नांदेडसाठी येतांना मोठ्या स्वप्नाची भरारी घेऊन येतो आहे, हे लक्षात ठेवावे असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.  

यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी या विद्यार्थ्यांपैकी काहींनी आंतराळशास्त्र सारख्या विभागात काम केल्यास मला आनंदच होईल. हा एक प्रशिक्षण दौरा असून विद्यार्थ्यांना नव्या क्षेत्रातील भरारी देण्यासाठी राज्य शासनाने आयोजित केला आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्री. मिनगिरे यांच्या मार्गदर्शनात हा कल्पक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.   

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा, माहूर, हदगाव, उमरी, नायगाव येथील प्रत्येकी शाळा 15 विद्यार्थी-विद्यार्थीनी असे एकूण 60 विद्यार्थी व त्यांचे काळजीवाहक म्हणुन सोबत शिक्षक, कर्मचारी हे सदर शैक्षणिक सहलीसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) श्रीहरीकोटा येथे 16 ते 19 एप्रिल 2025 या कालावधी जात आहेत.    

यावेळी समाज कल्याण अधिकारी विलास केंद्रे, सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी हे उपस्थित होते. हे विद्यार्थी हैद्राबाद येथून विमानाने जाणार आहेत. त्यांना आज हैद्राबादला बसने रवाना करण्यात आले. अधिकाऱ्यांनी  हिरवी झेंडी दाखवून सहलीस रवाना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांपटवार यांनी केले तर आभार रामदास पेंडकर यांनी मानले.

0000





  वृत्त क्रमांक   451   जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड दि. 28 एप्रिल :   महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्...