Monday, May 19, 2025

वृत्त क्रमांक 513

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड दि. 19 मे :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 मे चे 6 वाजेपासून ते 19 जून 2025 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन वादग्रस्त जागा, ज्याची चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मे 2025  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

वृत्त क्रमांक 512

नांदेड शहरात २० तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही                                                                                  

नांदेड दि. 19 मे : नांदेड शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने १९ मे २०२५ रोजी नांदेड शहरातील भाग्यनगर, तरोडा नाका व छत्रपती चौक इत्यादी ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 20 तंबाखू विक्रेत्यांकडून  7 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशनाखाली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी  डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सटेबल बालाजी पाटील व पोलीस कॉन्सटेबल पठाण उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक 511

पशुसंवर्धन दिनानिमित्त रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

लसीकरण ३१ मे पर्यत सुरु

                                                                                                                                                                            नांदेड दि. 19 मे : पशुसंवर्धन दिनानिमित्त उद्या 20 मे रोजी रेबीज मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्वानांमध्ये रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. 

                                                                                                                                                                            या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व पाळीव व भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस मोफत फक्त नोंदणी शुल्कामध्ये दिली जाणार आहे. हे लसीकरण मोहीम स्वरूपात 31 मे पर्यंत सुरू राहणार आहे. नांदेड शहरामध्ये शासकीय जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय देगलूर नाका, महानगरपालिका नांदेड संचालित पशुवैद्यकीय दवाखाना अशोक नगर नांदेड येथे, पेट नेस्ट क्लिनिक शिवाजीनगर पोलीस स्टेशन जवळ,   पॉज क्लिनिक श्याम टॉकीज जवळ , डॉक्टर अजेश शर्मा यांचे पेट क्लिनिक भाग्यनगर , व डॉग वर्ल्ड स्टेडियम कॉम्प्लेक्स, नांदेड येथे लस उपलब्ध होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये ही लस टोचली जाणार आहे.

सर्व नागरिकांनी या मोहिमेचा फायदा घेऊन आपल्या श्वानाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

वृत्त क्रमांक 510

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 19 मे :- राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

सोमवार 19 मे 2025 रोजी सातारा येथून सोयीनुसार नांदेड येथे मुक्काम व राखीव. 

मंगळवार 20 मे 2025 रोजी सायं. 6.30 वा. मारोतराव व्यंकटराव पाटील (कवळे गुरूजी) यांच्या मुलाच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थिती. स्थळ : विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय परिसर पिंपळगाव (म) राष्ट्रीय महामार्गालगत नांदेड. त्यानंतर सोयीनुसार नांदेड येथुन मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्रमांक 509

शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटूंबियांची

पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतली सात्वंनपर भेट 

सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही           

नांदेड दि. 19 मे : देगलूर तालुक्यातील तमलूर या गावाचे भुमिपूत्र शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटूंबियाची राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज देगलूर येथील त्यांच्या घरी सात्वंनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी काळजी करु नका, शासन सदैव आपल्या पाठीशी असून, मी स्वत: लक्ष घालून सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाशक कुमार, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिची उपस्थिती होती.

देगलूर तालुक्यातील तमलूर या गावाचे भुमिपूत्र शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांचे 6 मे रोजी श्रीनगर येथे कर्तव्यावर असतांना मृत्यू झाला. भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांच्या पत्नीला व भावाला त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीसाठी योग्य ती मदत करण्यात येईल. तसेच त्यांना शासनाच्या योजनेच्या माध्यमातून पक्के घरकुल देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

त्यांच्या पेन्शनची कार्यवाही व शासनाकडून इतर सर्व देय मदत व लाभ वेळेत मिळतील यादृष्टीने मी स्वत: पाठपुरावा करीन असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत मदत त्वरीत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. यावेळी त्यांनी त्यांचा एक महिन्याचा पगाराचा धनादेश शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटूंबियांना सुर्पूद केला. 

00000






18.5.2025

 वृत्त क्रमांक 508

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा                 

नांदेड दि. 18 मे :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे सोमवार 19 मे 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. 

सोमवार 19 मे 2025 रोजी सकाळी 7 वा. छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने देगलूर जि. नांदेडकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. देगलूर जि. नांदेड येथे आगमन व शहीद जवान सचिन यादवराव वनजे यांच्या घरी सांत्वनपर भेट. दुपारी 1 वा. देगलूर जि. नांदेड येथून शासकीय विश्रामगृह, नांदेडकडे वाहनाने प्रयाण. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 4.50 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून डॉ. शंकरराव चव्हाण पुतळा, व्हीआयपी रोड नांदेडकडे वाहनाने प्रयाण. सायं. 5 वा. डॉ. शंकरराव चव्हाण पुतळा, व्हीआयपी रोड, नांदेड येथे आगमन व तिरंगा रॅली कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 7 वा. तिरंगा रॅली कार्यक्रमाच्या समारोपानंतर छत्रपती संभाजीनगरकडे वाहनाने प्रयाण.

00000

वृत्त क्र. 645     पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्ह्यातील 7 पंचायत समित्यांना शासकीय वाहनां चे वितरण   नांदेड 20 जून - न...