Monday, May 19, 2025

वृत्त क्रमांक 512

नांदेड शहरात २० तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही                                                                                  

नांदेड दि. 19 मे : नांदेड शहरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री तसेच कोटपा २००३ कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकाने १९ मे २०२५ रोजी नांदेड शहरातील भाग्यनगर, तरोडा नाका व छत्रपती चौक इत्यादी ठिकाणी अचानक धाडी टाकून एकूण 20 तंबाखू विक्रेत्यांकडून  7 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला. ही कार्यवाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या निर्देशनाखाली व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके व नोडल अधिकारी  डॉ. हनमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

या पथकात जिल्हा सल्लागार डॉ. शितल चातुरे, मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड, व केस रजिस्ट्री सहाय्यक सुनील तोटेवाड तसेच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्सटेबल बालाजी पाटील व पोलीस कॉन्सटेबल पठाण उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच शैक्षणिक अथवा शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठवण होत असल्यास जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तक्रार नोंदवून नांदेड जिल्हा तंबाखू मुक्त करण्याच्या या अभियानास सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी