Friday, September 18, 2026

वृत्त क्रमांक 

दुष्काळाची बनावट यादी सोशल मीडियावर व्हायरलबाबत प्रशासनाकडून खुलासा

कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

नांदेड, दि. १९ : जिल्ह्यात दुष्काळग्रस्त गावांची यादी जाहीर झाल्याचा दावा करणारी बनावट यादी सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. ही यादी अधिकृत नसून शेतकरी व नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पिकांची व पर्जन्यमानाची वस्तुस्थिती तपासण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुष्काळाबाबत शासनस्तरावरून अधिकृत निर्णय झाल्यानंतर संबंधित यादी व आदेश अधिकृत माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येतील.

त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नये तसेच त्या पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

00000

 वृत्त 

भरती परीक्षा सुधारणांवर चर्चेसाठी उपस्थित राहण्याचे विभागीय आयुक्तांचे आवाहन

२१ सप्टेंबर रोजी उच्चस्तरीय समिती भेट देणार 

छत्रपती संभाजीनगर, दि. १८ :- राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी गठित उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी कार्यालयात भेटण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या भेटीसाठी विद्यार्थी, परीक्षार्थी व संबंधित घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, अभ्यासिका चालक-मालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था तसेच परीक्षा पद्धतीबाबत सूचना मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी भेटसाठी उपस्थित राहून आपले अनुभव व सूचना समितीसमोर मांडाव्यात. यापूर्वी ई-मेलद्वारे सूचना व अभिप्राय सादर केलेल्या विद्यार्थी व संबंधित घटकांनीही बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा, तसेच परीक्षा प्रक्रियेतील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत याबाबत चर्चा होणार आहे. परीक्षा पद्धतीशी संबंधित विविध घटकांना प्रत्यक्ष चर्चेत सहभागी होऊन आपल्या सूचना मांडण्याची संधी मिळणार आहे.

भरती परीक्षा पद्धती अधिक सक्षम करण्यासाठी विद्यार्थी, परीक्षार्थी, क्लास चालक-मालक व संबंधित संस्थांनी या बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना मांडाव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.

---

 वृत्त 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील पिकांच्या स्थितीची करणार प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांशी साधणार संवाद

मुंबई, दि.१८ सप्टेंबर : राज्यातील काही भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतीपिकांवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती महसूल विभागातील विविध भागांना भेटी देऊन ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. तसेच, या दौऱ्यादरम्यान दोन्ही महसूल विभागांतील पिकांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकींना संबंधित पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाची स्थिती आणि त्याचा शेतीपिकांवर होत असलेल्या परिणामाचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ कार्यालयीन पातळीवरील अहवालातून जाणून न घेता मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि बळीराजाशी थेट संवाद साधावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा दौरा होत आहे.

या दौऱ्यात पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची सद्यस्थिती, सुकलेल्या किंवा नुकसानग्रस्त पिकांची पाहणी तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेतली जाणार आहे. यासोबतच स्थानिक प्रशासन, कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित यंत्रणांकडूनही परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे.

“शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी केवळ कार्यालयातील अहवाल पुरेसे नाहीत; त्यांच्या बांधावर जाऊन, त्यांच्या पिकांची आणि परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणे आवश्यक आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे एकटे सोडले जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या दौऱ्यात शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, पिकांची सद्यस्थिती आणि स्थानिक पातळीवरील अडचणी समजून घेतल्या जातील. प्रत्यक्ष पाहणी आणि उपलब्ध वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे परिस्थितीचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न केले जातील,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी जाणून घेऊन परिस्थितीनुसार तातडीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. 

१९ सप्टेंबर : नांदेडमध्ये आढावा बैठक; नांदेड–हिंगोली–वाशिममध्ये पिकांची पाहणी

दि.१९ सप्टेंबर रोजी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्याची सुरुवात नांदेड येथून होणार आहे. सकाळी १० वाजता जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता नांदेड जिल्ह्यातील पुयणी येथे पिकांची पाहणी करण्यात येणार आहे. पुढे हिंगोली जिल्ह्यातील बोराला व हिवरा, तसेच वाशिम जिल्ह्यातील झोडगा, सुपखेला, वरुड बुद्रुक, कुपटा आणि खेरडा या गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे. पावसाचे प्रमाण, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर सायंकाळी अकोला येथे मुक्काम करण्यात येणार आहे.

२० सप्टेंबर : अकोला येथे अमरावती विभागाचा आढावा

दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात अमरावती महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीस पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विभागातील पिकांची सद्यस्थिती, पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०५ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजित उद्घाटन व शिवार फेरी कार्यक्रमास कृषीमंत्री उपस्थित राहतील.

000

वृत्त क्रमांक 

सेवा संकल्प अभियानातून नांदेड जिल्ह्यात आरोग्य सेवांना गती

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विशेष आरोग्य तपासणी, जनजागृती व सेवा उपक्रम

नांदेड (जिमाका), दि. १८ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नांदेड जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या घटकापर्यंत सुलभ, दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली.

या अभियानात ‘नागरिक प्रथम’ हा दृष्टिकोन ठेवून विविध आरोग्य तपासण्या, विशेष आरोग्य शिबिरे, उपचार व जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड वाटप

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत पात्र नागरिकांना कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचारासाठी ‘वय वंदना कार्ड’ प्राधान्याने वितरित करण्यात येणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तसेच मोतीबिंदू तपासणीवर विशेष भर देण्यात येणार आहे.

माता-बाल आरोग्य व अॅनिमिया निर्मूलनावर भर

तीव्र व मध्यम रक्ताक्षय असलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष मोहीम राबवून आवश्यक उपचारांसह FCM (Ferric Carboxy Maltose) इंजेक्शन देण्यात येणार आहे. स्तनपानाबाबत जनजागृती तसेच किशोरवयीन मुला-मुलींसाठी क्षमता बांधणी कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत.

३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी

‘तिशीचा पल्ला—तपासणीचा सल्ला’ या उपक्रमांतर्गत ३० वर्षांवरील नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाबासाठी घरोघरी तसेच आरोग्य केंद्रांवर तपासणी करण्यात येणार आहे.

दुर्धर आजारग्रस्त बालकांचा शोध

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (RBSK) बालकांमधील जन्मजात दोष व दुर्धर आजारांचा शोध घेऊन आवश्यक शस्त्रक्रिया व मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील प्रतिविष उपचार, रेबीज प्रतिबंधक लस, हायड्रॉक्सीयुरिया तसेच मधुमेह व उच्च रक्तदाबावरील आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

याशिवाय रक्तदान शिबिरे, अवयवदान संकल्प, पोषण व अॅनिमिया जनजागृती, व्यसनमुक्ती, दिव्यांगजन सहयोग तसेच जन्म-मृत्यू नोंदणी व दाखले वितरण यांसारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. क्षयरोग रुग्णांचा शोध घेऊन उपचार सुरू नसलेल्या रुग्णांची संख्या किमान ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्टही अभियानांतर्गत ठेवण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व दुर्बल घटकांनी आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आयुष्मान आरोग्य मंदिर किंवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन अभियानांतर्गत उपलब्ध मोफत तपासणी व आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी केले आहे.

****

वृत्त क्रमांक   नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण   22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार नांदेड(जिमाका), दि. 19: नांदेड तालुक्...