Wednesday, February 6, 2019


हरभरा पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 6 :- जिल्ह्यात हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु असून किड संरक्षणासाठी शेतकऱ्यांना कृषि संदेश देण्यात आला आहे.
हरभरा घाटेअळीसाठी इमामेक्टीन बॅझोएट 5 एस जी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. तसेच मर रोगाची लक्षण दिसून आल्यास अशी झाडे उपटून नष्ट करावीत व हरभरा पिकास पाणी देणे टाळावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
00000


राष्ट्रीय लोकन्यायालयाचे
जिल्ह्यात 9 मार्चला आयोजन
नांदेड, दि. 6 :-  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्याकडून शनिवार 9 मार्च 2019 रोजी नांदेड जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय तसेच कौटुंबिक, कामगार व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयात दिवाणी, मो. अ. दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच बँकांची प्रकरणे आदी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच विद्युत कंपनी, विविध बँका, भारत संचार निगम यांचे थकीत येणेबाबतची दाखल पूर्व प्रकरणे आणि विविध मोबाईल कंपन्यांचेही थकीत रक्कमेबाबत प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.
            यावेळी विधीज्ञ, विविध विमा कंपनी, भूसंपादन, मनपा, महसूल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या लोकन्यायालयात संबंधितांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. जी. मेहरे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे.
00000


कर्करोग दिन सप्ताह निमित्त
275 रुग्णांची तपासणी  
नांदेड, दि. 6 :- जागतिक कर्करोग दिन व सप्ताह निमित्त येथील श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय श्यामनगर तसेच नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे विविध ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक बी. पी. कदम व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बीपी, शुगर व कर्करोगासाठी 275 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
नांदेड येथील स्त्री रुग्णालय येथे 85 स्त्री रुग्णांपैकी 17 स्त्रियांची गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी तसेच  जिल्हा रुग्णालय व प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड येथील 190 रुग्णांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. 
या शिबिरास जिल्हा रुग्णालय येथील जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी, डॉ. अनुप्रिया गहेरवार, डॉ. मनुरकर, डॉ. साईप्रसाद शिंदे, विवेक दीक्षित, अधिपरिचारिका सारिका ताथोडे, संध्या पंडित, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, कल्पना घरटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बेटकर, सचिन कोताकोंडावार, सामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाड यांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली.
00000


ऊस, चारा पिकाचे नवीन वाण उपलब्ध
नांदेड, दि. 6 :- ऊसाचे नवीन वाण VSI08005 वसंतदादा शुगर इन्‍स्‍टूट मांजरी पुणे यांनी विकसित केले आहे. हे वाण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्‍त असून कृषि व्‍यवसायासाठी लाभदायक आहे.
दुष्‍कळ परिस्थितीत चारा पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी तसेच जनावरासाठी महत्‍वाची आहे. यासाठी चारा पिकाचे हायब्रीड नेपीअर HBN-10  हे वाण अधिक उत्‍पादन देणारे आहे. दोन्‍ही पिकांचे बियाणे जिल्‍हा फळरोपवाटि‍का धनेगाव नांदेड येथे विक्रीसाठी उपलब्‍ध आहे. संबंधितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
ऊस वाण -VSI-08005 वसंतदादा शुगर इन्‍स्‍टूट , मांजरी पुणे येथील वाणाची वैशिष्‍टे पुढील प्रमाणे आहेत.  परिपक्‍वता १२ ते १४ महिने, उत्‍पादन -१४४.६४ टन / हे., साखर उतारा  -२१.९३ टन / हे. रसातील साखरेचे प्रमाण -२०.७१ टक्‍के. CO-0310 मादी-   या संकरातून VSI 08005या वाणाची निर्मिती
CO-८६०११नर  - करण्‍यात आलेली आहे. दक्षिण  भारतात ९ राज्‍यात उत्‍पादन अव्‍वल स्‍थानात आहे. या उसाला तुरे  येत नाही. VSI-ने सिंधुदूर्ग येथील अंबोली उस प्रजनन केंद्रात विकसीत केलेला VSI-08005  हा उसाचा वाण उस व साखर उत्‍पादन अव्‍वल ठरला आहे.उंची -२० फुट, कमी पाण्‍यावर चांगला साखर उतारा देणारी एकमेव वाण आहे. हेक्‍टरी उत्‍पादनात अग्रेसर. एक / दोन डोळा पध्‍दतीने लागवडीस योग्‍य. अडसाली, पुर्व हंगामी, सुरू या तिनही हंगामासाठी लागवडीस उपयुक्‍त. हे वाण कमी खर्चात जास्‍त उत्‍पादन देणारी, पाण्‍याचा ताण सहन करणारी, सरळ वाढणारी, खोडवा पिकाचे जास्‍त उत्‍पादन देणारी, तंतुमय पदार्थाचे अधिक प्रमाण असल्‍याने या वाणाची निर्मीती करण्‍यात आली आहे. कांडी कोड ,काणी, तांबेरा व रेड रॉट या रोगांना मध्‍यम प्रतिकारक आहे. हे वान 2017 मध्‍ये विकसीत केलेला आहे .
चारा पीक हैब्रीड नोपिअर:- HBN-10 :- नेपिअर गवत व बाजरा यांच्‍या संकरातुन HBN-10 या वाणची निर्मीती केलेली आहे. प्रति ५० प्रति खुंट, अंतर  ५० बाय ५० से.मी वर लागवड करणे योग्‍य -१६ हजार खुंठ प्रति एकर. लागवड कालावधी जुन - जुलै किंवा वर्षातून कधीही करता येते. पहिली कापणी -६० ते ७५ दिवसानी त्‍यानंतर ३० ते ४५ दिवसानी असे वर्षातून ६ ते ८ कापणी मिळतात. उत्‍पन -१०० -१५० टन / एकर / वर्ष. पीक अर्थिकदृष्‍टया ३ वर्ष घेता येते. त्‍या पि‍काचा खोडवा ३ वर्षे घेता येतो. अर्थिकदृष्‍टया फायदेशीर आहे. पौष्‍टीक मुल्‍य :-.प्रथिने  -९.३० टक्के, कॅल्‍शीयम -०.८८ टक्के, स्‍फुरद  -०.२४ टक्के, पचनता -५८ टक्के,  तंतुमय पदार्थ १६.२० टक्के, अशी माहिती उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
00000


अमिताभ बच्चन यांच्या हस्ते
फेब्रुवारीचा लोकराज्यप्रकाशित
        
मुंबई, दि. 6 : फेब्रुवारी 2019 च्या लोकराज्यचे प्रकाशन आज सह्याद्री अतिथीगृहात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या अंकाचे अतिथी संपादक पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते. उत्कृष्ट अंकाबद्दल श्री. बच्चन यांनी प्रशंसा केली.
            या अंकात गाळ मुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियानाच्या यशस्वीतेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख, मुख्यमंत्री यांनी कृषी व घरकूल योजनेतील लाभार्थ्यांशी साधलेल्या लोकसंवादाचा संपादित लेख व पाणीपुरवठा व स्वच्छतेतील राज्याची भरारी यावर आधारीत लेख या अंकाचे वैशिष्ट्य आहे. स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या यशस्वी कामगिरीचा आढावा या अंकात घेण्यात आला आहे.
            या अंकात सीआयआयच्या जागतिक परिषदेचा वृत्तांत, कृषी क्षेत्रातील डिजिटल क्रांती, सेंद्रिय शेती, बांबू लागवड, जागतिक पशुप्रदर्शन, पीक विमा, स्मार्ट शाळा, उद्योग क्षेत्रातील राज्याची भरारी, फेक न्यूज, नोंदणी व मुद्रांक शुल्क, गेल्या वर्षभरातील महत्त्वपूर्ण घडामोडी, प्रेरणा व राज्यसेवेची तयारी कशी करावी यासंबंधी लेखांचाही या अंकात समावेश करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या उमेदवारांसाठी हा अंक उपयुक्त आहे. अंकाची किंमत 10 रुपये असून अंक सर्वत्र उपलब्ध आहे.
          
  या कार्यक्रमाला केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर, जागतिक बँकेचे हिशाम काहीन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.



प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
अंमलबजावणीचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
नांदेड, दि. 6 :- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी राबविण्यासाठी कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे परिपत्रक 4 फेब्रुवारी 2019 नुसार योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
या योजनेच्या अनुषंगाने कालबद्ध कार्यक्रम देण्यात आला असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करुन अहवाल वेळोवेळी सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी संबंधीत विभागाला दिले आहेत. या योजनेच्या कार्यपद्धतीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर सनियंत्रण समिती गठीत करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटूंबाला प्रती वर्षे 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
00000


जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 6 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 12 फेब्रुवारी 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
00000


जलसमृद्धी यंत्रसामुग्री व्याज अर्जसहाय्य
योजनेंतर्गत पात्र अर्जदारांची सोडत
नांदेड, दि. 6 :- जलयुक्त शिवार अभियान तसेच जल व मृदसंधारणाचे कामे करण्यासाठी जलसमृद्धी  (अर्थमुव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत उर्वरित पात्र अर्जदारांमधून शुक्रवार 8 फेब्रुवारी 2019 रोजी कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह नांदेड येथे सकाळी 11 वा. अर्थमुव्हर्स यंत्रसामुग्री वाटपासंदर्भात सोडत काढण्यात येणार आहे.
अर्जदारांनी सोडतीच्या वेळी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हास्तरीय समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण फडणीस यांनी केले आहे. याअंतर्गत जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या यादीतील 43 पात्र लाभार्थ्यांना कर्जवाटपासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 20 जानेवारी 2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे
नांदेड विमानतळावर स्वागत

नांदेड, दि. 6 :- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर आज आगमन झाले. यावेळी नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.   
मुख्यमंत्री श्री फडणवीस यांचेसमवेत राज्याचे ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांचेही आगमन झाले. 
तसेच आमदार राम पाटील रातोळीकर, पोलीस अधीक्षक संजय जाधव, मनपा आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, माजी राज्यमंत्री डी. बी. पाटील, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता गुरप्रीत कौर सोडी, भाजपचे संतूक हंबर्डे, संजय कोडगे यांनीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे हिंगोली दौऱ्यावरुन हेलिकॉप्टरने आज दुपारी 4.35 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन झाले व त्यानंतर त्यांचे विमानाने मुंबईकडे प्रयाण झाले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फसके, धनंजय पाटील, तहसिलदार किरण अंबेकर आदींची उपस्थिती होती.


000000

( छायाचित्रे – विजय होकर्णे, नांदेड )

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...