Saturday, January 25, 2025

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

 

76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात

मागील 4 वर्षातील जिल्हा क्रीडा पुरस्काराचे होणार वितरण

 

 

नांदेड, दि. 25 जानेवारी :-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त व नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हयात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येतो. यामध्ये जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्याचे, योगदानाचे मुल्यमापन व्हावे त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या पासुन इतरांनी प्रेरणा घ्यावी या हेतून जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. त्याकरीता जिल्हयातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांच्याकडून सन 2020-21, 2021-22, 2022-23, व 2023-24 (4 वर्षे) या वर्षातील पुरस्काराकरीता अर्ज मागविण्यात आले होते.

 

 

या पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या अर्जाची जिल्हा क्रीडा पुरस्कार निवड समिती मार्फत छाननी करण्यात आली असून गुणांकनानुसार वर्षेनिहाय पुरस्कारसाठी पात्र झालेल्या पुरस्कारार्थीची नावे खालीलप्रमाणे आहेत. सन 2021-22 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (पुरुष) सुशिल गणेशराव कुरुडे- जिम्नॅस्टिक्स, सन 2022-23 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (पुरुष) डॉ. अनिल सुरेंद्र पाटील- जिम्नॅस्टिक्स, सन 2023-24 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (महिला) श्रीमती वैशाली बालाजी पाटील जोगदंड-आर्चरी, तर गुणवंत खेळाडू म्हणुन सन 2020-21 मार्तंड बालाजी चेरले (पुरुष)-आर्चरी, कु.अंजली अशोक भालेराव (महिला)- जिम्नॅस्टिक्स, सज्जन सुभाष गयाबाई भिमराव (दिव्यांग) मैदानी, सन 2021-22 आकाश मारोती बगाटे (पुरुष)- जिम्नॅस्टिक्स, कु. आकांक्षा मारोती सोनकांबळे (महिला)- जिम्नॅस्टिक्स, गिरबनवाड योगेश निर्मलाबाई गणपतराव (दिव्यांग)- मैदानी, सन 2022-23 जहागीरदार तेजबीर सिंघ चरणकमलजीतसिंघ (पुरुष)- आर्चरी, कु.सौख्या स्वप्ना घेवारे (महिला)- जिम्नॅस्टिक्स, दत्ता व्यंकाबाई देऊबुभा भारती (दिव्यांग)- मैदानी, सन 2023-24 पुजारी कैवल्य कैलास (पुरुष)- जिम्नॅस्टिक्स, कु.सृष्टी बालाजी जोगदंड (महिला)- आर्चरी व पॅरा बॅडमिंटन या खेळामध्ये पॅरा जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिप सन 2022 (टोकीयो- जापान)- ब्रांझ मेडल, पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड ॲबीलीटी क्रीडा स्पर्धा सन 2023 (थायलंड)- तृतीय क्रमांक, पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पीयनशिप सन 2024 (थयलंड)- सहभाग, या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेले असल्याने त्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने सहाय्यक क्रीडा अधिकारी या पदावर थेट नियुक्ती दिलेली असल्यामूळे त्याच धर्तीवर नांदेड जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2023-24 गुणवंत खेळाडू (दिव्यांग) म्हणुन कु.लताताई परमेश्वर उमरेकर दिव्यांग बॅडमिंटन यांना थेट पुरस्कार सन 2023-24 प्रदान करण्यात येणार आहे.

 

 

या कार्यक्रमकरीता जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडा प्रेमींनी जास्तीत-जास्त मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

 

00000

 #प्रजासत्ताकदिन

 रंगीत तालीम पूर्ण

दरम्यान, आज सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भातील रंगीत तालीम घेण्यात आली. सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व पथकांची पाहणी केली. तसेच उद्या होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सादरीकरण करणाऱ्या सर्व चमूंना आवश्यक सूचना दिल्या.
0000





 वृत्त क्र. 101

पालकमंत्री अतुल सावे यांचा हस्ते आज प्रजासत्ताक दिनाला झेंडावंदन 

 मुख्य समारंभ पोलीस कवायत मैदानावर 

 शासकीय समारोह सकाळी ९. १५ वाजता 

 राष्ट्रीय पोषाखात अर्धा तास आधी उपस्थित रहा 

 विविध संकल्प चित्ररथ,यावर्षीचे आकर्षण 

नांदेड दि. 2​5 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या​ हस्ते उद्या रविवारी सकाळी ९.१५ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन होणार आहे. पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय वजीराबाद नांदेड येथे मुख्य समारोह होणार असून सर्व निमंत्रितांनी अर्धा तास आधी स्थानापन्न होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड येथील पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्या त्यांच्या शुभहस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी ते जिल्ह्याला संबोधितही करतील. यावेळी होणाऱ्या पथसंचलनामध्ये जिल्ह्यातील विकास कामांवर आधारित अनेक चित्ररथ, झाँकी,पोलीस दलाचे पथसंचलन, शाळांचे पथसंचलन, विविध उपलब्धीचे सादरीकरण पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय येथे बघायला मिळणार आहे. याशिवाय विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्व निमंत्रितांनी आपल्या आरक्षित जागी ध्वजवंदनाच्या अर्धा तास आधी स्थानापन्न व्हावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री अतुल सावे हे शनिवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथून वाहनाने नांदेडला पोहोचणार आहेत.

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नये 

दरम्यान, उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या विविध परिपत्रकाचे पालन करण्यात यावे. राष्ट्रध्वज संहिता पालन व्हावी. तसेच कुठेही प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नये, असे निर्देश प्रशासनाने दिले आहे. 

८.३० पूर्वी किंवा १० नंतर ध्वजारोहण करा 

राज्य शासनाने शासनाच्या ९.१५ च्या मुख्य समारोहाला लक्षात घेऊन इतर सर्व कार्यालय आणि शासकीय व निमशासकीय संस्थांनी त्यांचे ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी ८.३० पूर्वी किंवा १० वाजता नंतरच आयोजित करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांचे काटेकोर पालन सर्व कार्यालयाने करावे, शासकीय, निमशासकीय संस्थांनी मुख्य समारोहाच्या आधी किंवा नंतर दिलेल्या वेळेत ध्वजारोहण करावे, अशी सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

पालकमंत्र्यांचा २६ चा दौरा 

रविवार 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून पोलीस कवायत मैदान नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9 ते 10.25 वाजेपर्यंत भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज वंदन, संचलन समारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

उदया सकाळी 10.30 ते 10.50 वाजेपर्यंत आमदार श्रीजया चव्हाण भोकर विधानसभा क्षेत्र यांच्या “युवा उमेद” नामक फेसबुकपेजच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- यशवंत कॉलेज नांदेड.

सकाळी 11 वा. श्री आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ- एफ.एम.होंडा शोरुम समोर मामा मराठा हॉटेलच्यापाठिमागे हिंगोलीगेट रोड नांदेड.

सकाळी 11.15 वा. श्री आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड येथून शासकीय वाहनाने हैद्राबादकडे प्रयाण करतील. 

रंगीत तालीम पूर्ण 

दरम्यान, आज सकाळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात प्रजासत्ताक दिनाच्या संदर्भातील रंगीत तालीम घेण्यात आली. सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व पथकांची पाहणी केली. तसेच उद्या होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सादरीकरण करणाऱ्या सर्व चमूंना आवश्यक सूचना दिल्या.

0000

वृत्त क्र. 100

पात्र नवमतदारांनी उत्साहाने मतदार यादीत नावे नोंदवावी 

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आवाहन


नांदेड, दि. २५ जानेवारी :- ज्या तरुण-तरुणींनी 1 जानेवारी 2025 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत त्यांनी अत्यंत उत्साहाने आपली नावे मतदार यादीत नोंदवावी. तसेच आपल्या मित्रांना सुध्दा मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन  स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने,उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वरकड, निवडणूक नायब तहसिलदार नितेशकुमार बोलोलू, नायब तहसीलदार इंद्रनील गरड यांच्यासह जिल्ह्यातील बीएलओची उपस्थिती होती.

कुलगुरु डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, सशक्त लोकशाही ही मतदार व मतदान या दोन बाबींवरच अवलंबून असते. तसेच मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे हक्क आहे. मतदार होऊन मतदान करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रथमच मतदार यादीत ज्यांची नावे समाविष्ट झाली आहेत असे नवमतदार कु.सुरभी नितेशकुमार बोलोलू, कु.रिया खडके, दिव्यांग मतदार शिवराज गणेशराव गिरडे, सौरभ गिरडे, पवन गिरडे यांना कुलगुरू डॉ चासकर यांनी निवडणूक कार्ड देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ सचिन खल्लाळ यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करायचा यामागचा उद्देश म्हणजे नवमतदार वाढले पाहिजेत अशा शब्दात त्यांनी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली. राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील बि.एल.ओ., पर्यवेक्षक, ग्राम महसूल अधिकारी, समन्वयक व अंगणवाडी ताईंचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार तहसीलदार संजय वरकड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस.व्हि.भालके, जमील,  मकरंद भालेराव, बी.एस.पांडे, श्री. घडलिंगे, श्री. भुसेवार, मोहम्मद आखीब , शेख अजहर यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रारंभी कुलगुरू डॉ चासकर यांनी मतदाराची पुढील प्रतिज्ञा दिली. “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.”

00000






वृत्त क्र. 99

 जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त बैठक 

नांदेड,दि. २५ जानेवारी : राज्याची राजभाषा असलेला मराठी भाषेच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक नुकतीच पार पडली.

 राजभाषा मराठी आता अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त आहे. या भाषेचा वापर स्थानिक स्तरावर सर्व केंद्र व राज्य शासनाच्या कार्यालयाने करावा, पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय,महामंडळ, केंद्र शासनाच्या अख्यत्यारित असणारी सर्व कार्यालये, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी बँका, सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठी भाषेचा वापर वाढविण्यात यावा.

या पंधरवड्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावी अशी सूचना यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशासन तसेच मराठी भाषा समिती सचिव अजय शिंदे यांनी यावेळी केले.

 जिल्हा मराठी भाषा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आहेत. तर उपजिल्हाधिकारी सामान्य अजय शिंदे सदस्य सचिव आहेत.या बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनील सुर्यवंशी , रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी भाषेचे प्राध्यापक पृथ्वीराज तौर, व्याकरणतज्ञ श्रीमती प्रतीक्षा गौतम तालंगकर, प्रकाशक विनायक येवले, मराठी भाषेच्या संदर्भात काम करणाऱ्या विविध संस्था, प्रकाशन संस्था, भाषातज्ञ, विद्यापीठाचे मराठी भाषा प्रमुख, ग्रंथालय चळवळीतील मान्यवर, जिल्हा ग्रंथपाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यात विविध स्तरावर या संदर्भातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. भाषा संवर्धन संदर्भात पुढील काळामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. या कार्यक्रमांमध्ये नवी दिल्ली येथे अॅट होम या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे मराठीचे प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज तौर यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

0000

         





वृत्त क्र. 98

 जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यालय स्वच्छतेला प्रारंभ 

 शंभर दिवसांच्या सातसूत्री कार्यक्रमाची धडाक्यात अंमलबजावणी 

नांदेड दि. २५जानेवारी : शंभर दिवसांच्या नियोजनात ७ सुत्री कार्यक्रमाचा अंमल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्धारित केल्याप्रमाणे नांदेड जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाला धडाक्यात सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हा स्थानावरील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय ,यांची स्वच्छता प्रशासनाने सुरु केली आहे.

24 व 25 जानेवारीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अनेक जिल्हास्तरावरील कार्यालयाला भेट देऊन स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. या मोहिमेमध्ये उपविभागीय अधिकारी तहसीलदार व सर्व विभाग प्रमुख सहभागी झाले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर प्रशासन, निवडणूक, सामान्य प्रशासन, नियोजन विभाग, लेखा वित्त विभाग, आपत्ती व निवारण विभाग, उपविभागीय कार्यालय ,तहसील कार्यालय, याशिवाय नांदेड येथील विविध कार्यालयाची स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे. दस्ताऐवजीकरण,संगणकीकरण, सात बंडलमध्ये विभागलेल्या संचिका, लेख्यांची विभागणी, याबाबत प्रत्येक कार्यालय स्वच्छता मोहीम पाळत आहे.

     शंभर दिवसांचे नियोजन करताना दोन दिवसांपूर्वी महसूल विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी ७ सुत्री कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शुक्रवार व शनिवारी ही मोहीम मोठ्या प्रमाणात नांदेड मुख्यालयात राबविण्यात आली.

         प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर सर्व कार्यालयात सात सूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व विभागांना त्यांच्या वेबसाईट अपडेट करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. नागरिकांची सनद व दर्शनी माहिती अपडेट करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. सूचनाफलक व अन्य बाबी अद्यावत करणे, कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांना, लाभार्थ्यांना, तातडीने आवश्यक मदत दिली गेली पाहिजे, अभ्यागतांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली पाहिजे, तक्रार निवारण्याची योग्य पद्धत कार्यालयात अस्तित्वात असली पाहिजे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. जिल्ह्याच्या विकासात, सहभागात, गुंतवणुकीत वाढ होईल अशा पद्धतीची कार्यालयीन व्यवस्था तयार करण्यात यावी, प्रस्तावांचा तात्काळ निपटारा व्हावा, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी. तसेच अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखीव ठेवावेत असे निर्देश देण्यात आले आहे.

   त्यामुळे पुढील तीन महिने 100 दिवसाचा कार्यक्रम निर्धारित करण्यात आला आहे. या सर्व अंमलबजावणीचा दर आठवड्याला आढावा जिल्हाधिकारी स्वतः घेणार आहेत.

   जिल्हाधिकारी अभिजीत राऊत निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी प्रत्येक कार्यालयाला भेट देऊन साफसफाई स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपविभागांना त्यांनी भेटी दिल्या. तसेच उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी देखील त्यांनी पाहणी केली. यानंतर जिल्ह्यातील कार्यालयाच्या आकस्मिक भेटीचे नियोजन करण्यात आले आहे.






    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...