शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीत
सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया
नांदेड, दि. 27:- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधीनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी चाचण्यांचे आयोजन करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. तरी जिल्हयातील खेळाडूंनी चाचणीसाठी आपले अर्ज 5 जुलै, 2024 पर्यंत श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक ॲथलेटिक्स-9657092794 ) यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळसेवा प्रवेश प्रक्रिया या खेळनिहाय कौशल्य चाचणीबाबत अर्हता खालीलप्रमाणे आहे. खेळनिहाय प्रवेश मर्यादा विचारात घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे.
सरळ प्रवेश प्रक्रिया:- क्रीडा प्रबोधीनीतील असलेल्या सबंधीत खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्षेआतील आहे, अशा खेळाडूंना सबंधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो. यामध्ये निवासी करीता आर्चरी, हॅन्डबॉल, बॉक्सींग, कुस्ती, बॅडमिंटन, अनिवासीकरीता - ॲथलेटिक्स, जलतरण, शुटींग, सायकलींग, हॉकी, फुटबॉल, ज्युदो, टेबलटेनिस, वेटलिफटींग, जिम्नॅस्टिक्स याखेळाचा समावेश आहे.
खेळनिहाय कौशल्य चाचणी :- क्रीडा प्रबोधीनीतील असलेल्या सबंधीत खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना ज्यांचे वय 19 वर्षाआतील आहे, अशा खेळाडूंना सबंधीत खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चीत केला जातो. यामध्ये हॅन्डबॉल, जलतरण, सायकलींग, फुटबॉल, ज्युदो व जिम्नॅस्टिक्स याखेळाचा समावेश आहे.
वैद्यकीय चाचणी :- या चाचण्यांमध्ये निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय पथकाद्वारे चाचणी घेऊन क्रीडा प्रबोधिनीमध्ये शारीरिकदृष्टया सुदृढ खेळाडूंची निवड अंतिम करण्यात येते.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सन 2024-25 साठी सरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी प्रवेश प्रक्रीया व खेळ निहाय कौशल्य चाचणी कार्यक्रम तपशील पुढीलप्रमाणे आहे.
जिल्हास्तर नावनोंदणी अंतिम दिनांक 5 जुलै, 2024 पर्यंत आहे. (जन्मतारखेचा दाखला, आधारकार्ड, खेळाडूचे प्रमाणपत्र छायांकीत प्रत सोबत आणावे.), विभागस्तर चाचण्यांचे आयोजन सरळ प्रवेश 8 जुलै, 2024 व कौशल्य चाचणी 9 जुलै,2024 (स्थळ कळविण्यात येईल.), राज्यस्तरीय चाचण्याचे आयोजन सरळ प्रवेश 15 जुलै, 2024 व कौशल्य चाचणी 16 जुलै,2024 रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे येथे होणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
000000