Thursday, September 1, 2022

 वृत्त क्र.  815 

तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले भोगरवाडा

सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल !

 

कृषि अधिकाऱ्यांनी एक दिवस गावात देऊन

शेतकऱ्यांच्या मनात जागविला विश्वास 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील भोगरवाडा हे आदिवासी गोंड जमातीचे गाव. "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभिनव पथदर्शी उपक्रमामुळे या गावाच्या आत्मविश्वासाला आज नवी जोड मिळाली. निमित्त ठरले नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचे भोगरवाडा गावात शेतकऱ्यांसमवेत संपूर्ण दिवसभर राहणे, त्यांच्या सोबत शेतशिवार फेरी करून पीक पद्धतीला समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरले. गावातील शेतीलापूरक ठरेल अशी पीक पद्धती लक्षात घेणे व शेतकऱ्यांना या बदलापर्यंत विचाराच्या जवळ आणणे हा उद्देश सफल करीत भोगरवाडा गावाने या उपक्रमातून सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून आम्ही विकसित करू असा आत्मविश्वास निर्माण केला.   

या गावातील शेतकरी पिढीच्या रिवाजानुसार कापूस व सोयाबीन या पिकावर अधिक भर देत आले आहेत. गावाच्या चोहुबाजुला डोंगर आणि झाडी. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने पाण्याची पातळी ही बऱ्यापैकी या गावात चांगली आहे. निलगाय, हरण, रानडुक्कर यांच्या त्रासापासून व होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी त्यातल्या त्यात गावातील शेतकऱ्यांनी कापसाला जवळ केले. मात्र यातून आर्थिक गणित सावरेलच याची शाश्वती नाही. यापासून प्रवृत्त करून त्यांच्या हाती नवीन पीक पद्धती देणे, त्यांना अधिक उत्पादन घेता यावे यासाठी उच्च तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हे आवश्यक होते. शासनाच्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी अंतर्गत प्रत्यक्ष कृषि अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना शेतीच्या विकासाचा आज नवा मार्ग गवसला. 

ज्योतिराम पांडुरंग तुमराम या आदिवासी शेतकऱ्याच्या घरी चलवदे थांबले. तुमराम यांची चार एकर जमीन या गावात आहे. नवीन तंत्रज्ञान आम्ही आत्मसात करायला तयार असून शासनाने ज्या योजना दिल्या आहेत त्याचा अधिक डोळस वापर करू असे त्यांनी सांगितले.    

भोगरवाडा गावातील शिवार व येथील जमीन फलोत्पादनासाठी चांगली आहे. येथे सिताफळ, पेरू चांगल्या पद्धतीने पिकू शकतील. ज्यांना फलोत्पादन शक्य नाही त्या शेतकऱ्यांनी हळदी सारखे पीक उत्तम पद्धतीने घेण्यासाठी पुढे सरासवले पाहिजे. इथल्या जमिनीचा पोत चांगला असून सेंद्रीय खताच्या माध्यमातून या गावाला सेंद्रीय हळदीचे गाव म्हणून विकसीत करण्यात मोठा वाव असल्याचे रवीशंकर चलवदे यांनी सांगितले. 

या भागात निलगाय, हरण, रानडुक्कर सारखे प्राणी शेतीच्या पिकांना हानी पोहोचवतात. हे लक्षात घेता वन विभागाच्या नियमानुसार शेत शिवाराच्या भोवताली मोठा चर करणे याबाबत शक्य-अशक्यता पडताळून पाहिली जाईल, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. येथे उष्णतेचे प्रमाण लक्षात घेता सौर ऊर्जा आणि ठिबक सारखे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी जवळ केले तर यात मोठा बदल साध्य करता येईल. याचबरोबर दुग्धव्यवसाय, बकरी पालन, कुक्कुटपालन याला मोठा वाव असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगून शेतकऱ्यांच्या मनात नवा विश्वास निर्माण केला.

00000






 वृत्त क्र.  814 

पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक 

 नांदेड (जिमाका) दि. 1 :-  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्याबाबत शासनाच्या सूचना प्राप्त आहेत. ज्‍यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना योजनेचा पुढील कालावधीचा लाभ मिळण्‍यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. 

त्‍यानुषंगाने ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्‍यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in  या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान अँपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वतः ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल किंवा  ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) येथे प्रति लाभार्थी 15 रुपये दराने ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

000000

 

 वृत्त क्र.  813

 इयत्ता दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल

शुक्रवार 2 सप्टेंबर रोजी ऑनलाईन जाहीर होणार   

नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट 2022 व इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल ऑनलाईन शुक्रवार 2 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर होणार असून निकालाची कार्यपद्धती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे राहिल.  

राज्यात नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर शुक्रवार 2 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वा. जाहीर करण्यात येणार आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.  

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी व बारावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रामणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन इयत्ता 10 वीसाठी http://verification.mh-ssc.ac.in व इयत्ता बारावीसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.  

गुणपडताळणीसाठी शनिवार 3 सप्टेंबर ते सोमवार 12 सप्टेंबर 2022 पर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार 3 सप्टेंबर ते गुरुवार 22 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबीट कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीआय, नेटबँकिंग याद्वारे भरता येईल.  

जुलै-ऑगस्ट 2022 पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.  

सन 2023 मधील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ट होणारे व आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) द्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडीट घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने स्विकारली जातील. त्याच्या तारखा मंडळामार्फत जाहीर करण्यात आलेल्या आहेत.  

मार्च 2022 मध्ये प्रथम नोंदणी करुन परीक्षेस उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार (क्लास इम्प्रव्हमेंट स्किम) योजनेतर्गंत परीक्षेस दुन:श्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. मार्च 2022 परीक्षेसाठी प्रथमच प्रविष्ठ झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना श्रेणीसुधारण्यासाठी मार्च 2023 परीक्षा ही अंतिम संधी असेल यांची नोंद घ्यावी. त्यामुळे त्यापूर्वीचे असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 वृत्त क्र.  812

 अंमली पदार्थ विक्रीची माहिती मिळाल्यास  

तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला कळवा

- न्यायाधीश डी. एम. जज 

·  विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन   

 नांदेड (जिमाका) दि. 1 :-  किशोरवयीन मुलं-मुली जर डॉक्टरांचा सल्ला नसतांनाही वारंवार खोकल्याचे औषध व इतर औषधी खरेदी करत असतील तर त्यावर केमीस्ट व ड्रगीस्ट यांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पतीची लागवड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. याची कोणत्याही स्वरुपात जर कुठे विक्री होतांना कोणाच्या जर तसे निदर्शनास आले तर त्याबाबत नागरिकांनी  तात्काळ संबंधित  पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी, असे स्पष्ट प्रतिपादन न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव डी. एम. जज यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्यावतीने कायदेविषयक शिबिराचे आयोजन  स्कॉलर्स कॉमर्स क्लासेस नवीन मोंढा नांदेड येथे करण्यात आले होते. या शिबिरात त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांना ॲण्‍डी  रॅगींग  अॅक्ट, ट्राफिक   रुल्स, ॲसिड  अॅटक  व अंमली  पदार्थामुळे पीडीत  व्यक्तींना विधी सेवा सहाय्य  आणि  अंमली पदार्थाचे  निर्मूलन योजना 2015 या बाबत कायदेविषयक माहिती देण्यात आली.   

मेडिकल स्टोअर्स चालकांच्या सतर्कतेमुळे किशोरवयीन मुला-मुलींना अंमली पदार्थाच्या सेवनाच्या आहारी जाण्यापासून रोखता येते हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. युवा पिढीला अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून रोखण्याचे हे महत्वपूर्ण कार्य आहे. यात नागरिक अधिक सजगता बाळगतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव डी. एम. जज यांनी व्यक्त केला.

 यावेळी सहाय्यक प्रादेशीक परिवहन अधिकारी संदीप निमसे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम याबाबत, दिपाली डी. डोणगावकर, यांनी ॲन्टी रॅगींन ॲसिड अटॅक याविषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन  प्रा. सौरभ अग्रवाल यांनी केले तर आभार  जीवन इन्नानी यांनी मानले.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...