Monday, October 22, 2018


डॉ. कुलदीपक यांचा
तत्परतेमुळे रुग्णाचे प्राण वाचले
नांदेड, दि. 19 :- अमोल देसाईराव देशमुख या व्यक्तीस झटके येत असल्यामुळे तो श्रीनगर येथे रस्त्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्याक्षणी डॉ. कुलदीपक यांनी या रुग्णास जिल्हा रुग्णालय येथे दाखल करुन योग्य ते उपचार केले. डॉ. कुलदीपक यांनी तात्काळ केलेल्या उपचारामुळे रुग्णाची सद्यस्थिती  स्थिर असल्याचे दिसून आले.
येथील श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीपक हे काही खासगी कामानिमित्त शनिवार 20 ऑक्टांबर रोजी सायं 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास बाहेर गेले असता श्रीनगर येथील बेंगलोर बेकरीच्या बाजूस श्रीनगर येथील अमोल देसाईराव देशमुख या व्यक्तीस झटके येत असल्यामुळे तो रस्त्यात पडल्याचे निदर्शनास आले.
डॉ. कुलदीपक यांनी प्रसंगावधान राखून केलेल्या सेवेबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन आय भोसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच.आर. गुंटूरकर तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कोणत्याही व्यक्तीने अपघात प्रसंगी बघ्याची भूमिका न घेता अपघात ग्रस्त व्यक्तीचा प्राण कसा वाचू शकेल यासाठी योग्य ती मदत करावी, जेणेकरून अशा अपघातग्रस्त व्यक्तींचा जीव वाचू शकेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कदम यांनी केले आहे.
0000


ऊसावर हुमणीचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन
नांदेड, दि. 22 :- सद्यस्थितीत अनेक भागात ऊसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. प्रतिकुल हवामान,कमी पाऊसमान यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव आढळुन येत आहे. हुमणी ही किड ऊसाची पांढरी मुळे खात असल्याने ऊस उत्पादनात मोठया प्रमाणात घट येण्याची शक्यता असते. त्यामुळे या किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. हुमणी ही किड बहुभक्षी किड असुन भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये आढळुन येते.
            हुमणी किडीच्या प्रामुख्याने दोन महत्वाच्या प्रजाती महाराष्ट्रामध्ये आढळुन येतात. यापैकी होलोस्ट्रॅकिया सिराटा या जातीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने महाराष्ट्रच्या नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, धुळे, सांगली, कोल्हापुर इत्यादी जिल्हात दिसुन येतो आणि ल्युकोफोलीस लेपिडोफोरा या प्रजातीचा तीव्र प्रादुर्भाव महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्हयाच्या पश्चिम भागात दिसुन येतो.
हुमणीचा नुकसानीचा प्रकार
         हुमणीचा प्रथम अवस्थेतील अळया सुरुवातीच्या काळात कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजिविका करतात व त्यांनतर ऊसाची तंतुमय मुळे खातात,तर प्रौढ भुंगा बाभुळ,कडुलिंब ,बोर इत्यादी झाडावर उपजिविका करतात. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो. या अळयांनी झाडाची मुळे कुरतडल्यामुळे प्रादुर्भाव झाडे सहजरीत्या उपटली  जातात. तसेच जोराचे वादळ आल्यास ही झाडे कोलमडुन पडतात. हुमणीमुळे उगवणीत 40 टक्के नुकसान होऊ शकते.
आर्थिक नुकसानीची पातळी
        हुमणीची एक अळी प्रति चौरस मिटर क्षेञावर आढळयास तसेच झाडांवर सरासरी 20 किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे आढळयास किड व्यवस्थापनांचे उपाय योजावेत.
हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन
        पिक काढणी नंतर खोल नांगरट करुन घ्यावी. त्यामुळे उघडया पडलेल्या अळया गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकुन माराव्यात.
शेतातील ढेकळे फोडुन घ्यावीत,जेणेकरुन ढेकळांमध्ये असलेल्या हुमणीच्या विविध अवस्थतील अळयांचा नाश होता. या साठी रोटाव्हेटर किंवा तव्याचा कुळव देखील वापरता येईल.
पावसाच्या पहिल्या सरीबरोबरच भुंगेरे जमिनीतुन बाहेर येण्यास सुरुवात होते. संध्याकाळी भुंगेरे झाडांवर दिसुन येतात. हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो. या काळातच बाभुळ, बोर व कडुलिंबाची
 झाडे हलविल्यास झाडाच्या पानांवरील भुंगरे जमिनीवर  पडतात. हे पडलेले भुंगरेरे गोळा करुन रॉकेलमिश्रीत  पाण्यात टाकल्याने अर्ध्या तासात ते मरतात. भुंगेरे मेल्याने एक पिढी नष्ट होते. त्यामुळे त्यांचा जीवनक्रम खंडित होवुन पुढील नुकसान टळते.
सुर्यफुल पिकाबरोबर ऊसाची फेरपालट करावी जेणेकरुन हुमणीचा प्रादुर्भाव कमी होईल.
भुंगेरे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळयांचा एक हेक्टर क्षेञात एक प्रकाश सापळा वारण्यास सुचवावे. या सापळयातील भुंगे गोळा करुन नष्ट करावेत.
पिकास पाणी देताना ते जास्त काळ साचुन राहिल या कडे लक्ष द्यावे. जेणेकरुन साचलेल्या पाण्यामध्ये अळया गुदमरुन मरतील.
हुमणीग्रस्त शेतातील सुकलेली  पिकांची रोपे उपटावीत व मुळाशेजारील अळयांचा रॉकेलमिश्रीत  पाण्यात नाश करावा.
जैविक उपाय
हुमणी किड अनेक पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे, त्यामुळे पक्षी थांबे लावावेत.
हुमणीवर नियंञण ठेवण्यासाठी तिचा नैसर्गिक शञुचा अतिशय महत्वाचा वाटा आहे.त्यामुध्ये बगळा, चिमणी, कावळा घार इ. पक्षी व मांजर,कुञा, रानडुक्कर, मुंगुस, उंदीर इ. प्राणी हुमणीच्या अळया आवडीने खातात.
दोन किलो परोपजीवी बुरशी बिव्हेरिया बॅसियाना व मॅटेरायझियम अनिसोपली 20 किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळुन  पिक लागवडी अगोदर एक हेक्टरजमिनीत मिसळावी म्हणजी प्रथमावस्थेतील अळयांचा बुरशीमुळे नाश होईल.
जिवाणु (बॅसीलस पॉपीली) व सुञकृमी (हेटरो- हॅब्डेटीस) हे होलोट्रॅकिया हुमणीचे नैसर्गिक शञु आहेत.
हुमणीच्या अळीला रोगग्रस्त करण्याऱ्या सुञकृमीचा वापर करावा यासाठी 50 मिली ई.पी.एन कल्चर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन जमिनीवर फवारावे किंवा 2.5 लिटर ई.पी. एन कल्चर प्रति हेक्टर या प्रमाणाने ठिंबक /प्रवाही सिंचनातुन देणे तसेच पावडर स्वरुपात असल्यास 3 किलो प्रती हेक्टर या प्रमाणे वापरावे.
रासायनिक उपाय
जमिन तयार करताना अथवा शेणखतामधुन फोरेट (10 टक्के दाणेदार) 25 किलो प्रती हेक्टरी या प्रमाणात वापर करावा.
हुमणीच्या नियंञणासाठी पहारीच्या सहाय्याने बुंध्यालगत किंवा दोन बुंध्याच्या मध्ये छोटासा खडडा घ्यावा. या कामी ऊस पिकात खत घालन्याची जी पहार आहे. तिचा वापर करावा. फवारणी पंपाचे नोझल काढुन बुंध्यालगत 40 मिली क्लोरोपायरि फॉस 10 लिटर पाण्यात मिसळुन  या द्रावणाची बंध्यालगत तयात केलेल्या खडयात आळवणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000



टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या
 पाण्याचे नियोजन करावे
- पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर
·         मुखेड, नायगाव खै. येथे टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा
·         शेतकऱ्यांशी मंत्री जानकर यांनी साधला संवाद

नांदेड दि. 22 :- टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे,असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले.
मुखेड व नायगाव खै. तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा श्री. जानकर यांचे अध्यक्षतेखाली तेथील तहसील कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  
बैठकीस आमदार तुषार राठोड, आमदार वसंतराव चव्हाण, डॉ. मिनल पाटील-खतगावकर, दशरथ लोहबंदे, माणिक लोहगावे, व्यंकटराव पाटील-गोजेगावकर, मुखेड नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, उपजिल्हाधिकारी एच. बी. महेद्रकर, पंचायत समिती सदस्य संजय पाटील शेवाळकर, परमेश्वर पाटील, मुखेड तहसीलदार अतुल जटाळे, नायगाव खै. तहसीलदार सुरेखा नांदे, गटविकास अधिकारी चंद्रशेखर रामोड, बी. च. फुफाटे, तालुका कृषि अधिकारी श्री. शितोळे यांची उपस्थिती होती.  
श्री. जानकर म्हणाले, नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. विद्युत पुरवठ्याबाबत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे. जलयुक्त शिवार अभियानाची कामे कमकुवत करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे. शेतकऱ्यांनी शेतीबरोबर दुग्धव्यवसायावरही भर देण्यात यावा, असेही निर्देश श्री. जानकर यांनी बैठकीत दिले.   
श्री. जानकर यांनी मुखेड तालुक्यातील बेरळी, होकर्णा तांडा, होकर्णा, खरपखंडगाव, सलगरा तर  नायगाव खै. तालुक्यातील रातोळी, रातोळी तांडा, आलुवडगाव, टाकळी तमा, मरवाळी तांडा आदि गावांना भेटी देऊन शेतीतील पिकांच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शेतकरी, ग्रामस्थ, सरपंच, कृषि विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.     
या बैठकीत मुखेड व नायगाव खै. तालुक्यातील पाणीसाठा, खरीप पेरणीत केलेल्या कामांची माहिती, ज्वारी, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, कापूस पिक कापणी प्रयोग, खाजगी विहीर बोअर अधिग्रहण अहवाल , टँकरद्वारे पाणी पुरवठा केलेली गावे, पशुधनासाठी चारा उपलब्धता , मग्रारोहयो अंतर्गत चालू असलेल्या व सेल्फवरील कामांची माहिती, पैसेवारी विद्युत, पाणी प्रश्न, शेत रस्ते, तसेच रिक्त पदांचा आढावा सादरीकरणाद्वारे घेण्यात आला. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी, गावातील सरपंच, ग्रामस्थांची उपस्थिती होती.
नायगाव (ब) येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयास राज्याचे  पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी भेट दिली. यावेळी सहा. आयुक्त पशुसंवर्धन खुणे एस. बी., पशुसंवर्धन विकास अधिकारी एस. बी. चौहाण यांनी सर्व चिकित्सालयातील उपलब्ध सोयी सुविधांची माहिती दिली.
00000000

उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर
करण्‍याची मुदत सहा ऐवजी बारा महिने 
      नांदेड दि. 22 :-  राखीव जागेवर निवडून आलेल्‍या उमेदवारांनी त्‍यांचे जात वैधता प्रमाणपत्र सहा महिण्‍याऐवजी बारा महिण्‍यात सादर करण्‍याबाबत अद्यादेश जारी करण्‍यात आला आहे. सदर सुधारणा अद्यादेशामुळे निवडून आलेल्‍या उमेदवारांना त्‍यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍यास आणखी सहा महिण्‍यांची मुदत वाढ मिळाली आहे.
 महाराष्‍ट्र ग्रामपंचायत आधिनियम आणि महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यामध्‍ये आणखी सुधारणा करण्‍याकरिता शासनाच्‍या ग्रामविकास विभागाने 10 ऑक्‍टोंबर 2018 रोजी सुधारित अध्‍यादेश जारी केला असून 11 ऑक्‍टोंबर 2018 रोजीच्‍या महाराष्‍ट्र शासन राजपत्रात प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे. त्‍यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागासवर्ग यातील व्‍यक्‍तींसाठी राखीव असलेल्‍या जागेवर निवडणूक लढविण्‍यास इच्‍छूक असलेली व्‍यक्‍ती, नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिका-याने दिलेले जात प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्‍या दिनांकापासून सहा महिण्‍याच्‍या मुदतीच्‍या आत सादर करणे आवश्‍यक होते. सदर मुदतीत आणखी सहा महिण्‍याची वाढ करुन आता 12 महिण्‍याच्‍या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.
       सदर आदेशाच्‍या प्रारंभाच्‍या दिनांकापूर्वी कोणत्‍याही व्‍यक्‍तीने जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र प्राप्‍त केलेले असेल मात्र, असे प्रमाणपत्र दाखल केलेले नसेल अशा व्‍यक्‍तीने जर या आदेशाच्‍या प्रारंभाच्‍या दिनांकापासून पंधरा दिवसांच्‍या मुदतीच्‍या आत असे प्रमाणपत्र सादर केले तर अशी कोणतीही व्‍यक्‍ती प्रस्‍तुत पंचायत कायद्यांच्‍या तरतूदी अन्‍वये अनर्ह ठरली असल्‍याचे मानण्‍यात येणार नाही, परंतू या अद्दयादेशाच्‍या प्रारंभाच्‍या दिनांकापूर्वी राज्‍य निवडणूक आयोगाने अशा व्‍यक्‍तीचे रिक्‍त पद करण्‍यासाठी आधीच निवडणूक घेतली असेल किंवा निवडणूक घेण्‍यासाठी कार्यक्रम घोषित  केला असेल त्‍याबाबतीत या कलमाच्‍या तरतूदी लागू होणार नाहीत, असे  अद्यादेशात नमूद करण्‍यात आले आहे. 
00000



गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत
  10 लाख 86 हजार मुला-मुलींचे लसीकरण 
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 22 :-  जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम 27 नोव्हेंबर ते पुढील पाच आठवडे या कालावधीत राबविण्यात येणार असून या मोहिमेत नांदेड जिल्ह्यातील 9 ते 15 वर्षे वयोगटातील 10 लाख 86 हजार 744 मुला-मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली. 
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेची जिल्हास्तरीय कार्यबल गटाची दुसरी बैठक जिल्हाधिकारी यांचे दालनात जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विद्या झिने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर, डॉ. सुरेशसिंग बिसेन, शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (मा.) अशोक देवकरे, कुंडगीर, डॉ. बद्दिओद्यीन, समाज कल्याण अधिकारी कुंभारगावे, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल वसे यांची प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, राज्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम येत्या नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शाळा व अंगणवाडीत मुला-मुलींचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण, महानगरपालिका, खाजगी वैद्यकीय डॉक्टर, सामाजिक व सेवाभावी संस्था यांचा सहभाग राहणार आहे. सीबीएससी, खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे संस्था चालक व मुख्याध्यापकांची बैठक शिक्षणाधिकारी घ्यावी तसेच बालरोग तज्ज्ञांनी खाजगी दवाखाण्यात गोवर-रुबेला लसीकरणाचे माहितीपत्रक लावावेत, असे निर्देश श्री. डोंगरे यांनी दिले. 
ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. आयएपी व आयएमए बालरोग तज्ञांमार्फत मोहिमेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेत संबंधीत वयोगटातील मुला-मुलींना पूर्वीचे लसीकरण ग्राह्य न धरता गोवर-रुबेलाची लस प्रशिक्षीत व्यक्तमार्फत दिली जाणार आहे. या मोहिमेसाठी लागणाऱ्या लसीची मागणी (शहरी व ग्रामीण) ची नोंदविण्यात आली आहे. या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांची संख्या 6 लाख 55 हजार 619 (शहरी, ग्रामीण, मनपा) असून तर शालेय बाहेर लाभार्थ्यांची संख्या 4 लाख 31 हजार 125 एवढी आहे. एकुण लाभार्थ्यांची संख्या 10 लाख 86 हजार 744 आहे. या मोहिमेतील आयोजित आरोग्य सत्राची संख्या 7 हजार 987 द्वारे प्रशिक्षीत आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा व पालकांचा या मोहिमेत संपूर्ण सहभाग घेण्यात येत असून शालेयस्तरावर  शिक्षक व पालक तसेच शिक्षक व विद्यार्थी संवाद मेळावा आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
00000


टंचाई काळात अनधिकृत पाण्याचा उपसा करु नये ;
पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी पथकाची नियुक्ती
नांदेड दि. 22 :-  नांदेड जिल्‍हयांत चालू वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्‍यमान झाले असल्‍याने बहुतांश भागात पाणी टंचाई सदृष्‍य परिस्थ्‍िाती उद्भवली आहे. या टंचाई सदृष्‍य परिस्थितीमुळे पाणी टंचाई समस्‍या निर्माण होत आहे.
जिल्‍हयांतर्गत असलेले मोठे, मध्‍यम, लघुप्रकल्‍प, लघुतलाव, नदीनाले, विहीरी इ. पाण्‍याचे उद्भवातुन अनधिकृत पाण्‍याचा उपसा होत असल्‍यास तो तात्‍काळ बंद करणे आवश्‍यक आहे. त्‍याचप्रमाणे मोठया, मध्‍यम व लघु प्रकल्‍पांच्‍या बुडीत क्षेत्रातील विहीरीवरुन सिंचनासाठी होणारा अनधिकृत उपसा पुर्णपणे बंद करुन विद्युत मोटारी जप्‍तीची कार्यवाही करणे गरजेचे आहे.
            त्‍याअनुषंगाने अनधिकृत उपसा होऊ नये व आरक्षीत पाणीसाठा सुरक्षित ठेवण्‍याच्‍यादृष्‍टीने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करणेसाठी तालुकास्‍तरावर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी (महसुल) यांचे अध्‍यक्षतेखाली संयुक्‍त पथक निर्माण करण्‍यात आले आहे. या पथकात प्रत्‍येक तालुक्‍यासाठी तहसीदार सदस्‍य  सचिव राहतील व इतर गटविकास अधिकारी, मुख्‍याधिकारी नगरपरिषद, उपविभागीय अभियंता पाटबंधारे, उपविभागीय अभियंता, महाराष्‍ट्र विद्युत वितरण कंपनी, तालुका कृषी अधिकारी, स्‍थानिक पोलिस निरिक्षक हे सदस्‍य  राहतील. 
या पथकाने ग्रामीण भागातील जनतेला पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय करण्‍यासाठी विहीरी अथवा अन्‍य जलाशयातुन पिण्‍याकरीता पाणी उपलब्‍ध करुन देण्‍याचे दृष्‍टीने आवश्‍यकतेनुसार खाजगी लोकांचे जलसाठे अधिग्रहीत करण्‍यात यावेत. तसेच महाराष्‍ट्र भूजल अधिनियम 2009 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. उपविभागीय अधिकारी (महसुल) यांनी दर 15 दिवसांत समितीची बैठक घेवुन अनुपालन अहवाल त्‍याच दिवशी दिलेल्‍या प्रपत्रात जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा.
उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी (महसुल) यांनी त्‍यांचे अध्‍यक्षतेखाली अनधिकृत उपसा थांबविणे व जलसाठे संरक्षित ठेवण्‍यासाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या संयुक्‍त पथकास सहाय करणेसाठी या समिती अंतर्गत प्रत्‍येक तालुक्‍यासाठी प्रकल्‍पस्‍तरीय समिती (फिरते पथक ) स्‍थापन करावे. या समितीत पुढील विभागाचे कर्मचारी संबंधीत प्रकल्‍पाचे शाखा अभियंता, कालवा निरिक्षक / माजेणीदार / बीट प्रमुख / चौकीदार (यापैकी सद्यस्थितीत उपलब्‍ध असलेले), शाखा अभियंता महावितरण, स्‍थानिक पोलिस उप‍निरिक्षक, शाखा अभियंता किंवा एक कर्मचारी नगरपालिका प्रशासन, मंडळ अधिकारी / तलाठी, ग्रामविस्‍तार अधिकारी / ग्रामसेवक, पोलिस पाटील यांचा समावेश राहील.
या दोन्‍ही समितीसाठी जिल्‍हास्‍तरावर समन्‍वय अधिकारी म्‍हणुन कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे ( दक्षिण) विभाग हे काम पाहतील.  
प्रकल्‍पस्‍तरीय पथकाने पाटबंधारे जलाशयातील अवैध पाणी उपसा होऊ नये, वीज चोरी होऊ नये तसेच टंचाई सद्ष्‍य परिस्थिती निर्माण होऊ नये याबाबत कार्यवाही करावी. त्‍याचप्रमाणे अनधिकृत उपसा होत असलेल्‍या विहीरीवरील विद्युत कनेक्‍शन कट करावे तसेच पाणी उपसा करणा-या खाजगी व्‍यक्‍तीवर नियमानुसार कार्यवाही करावी तसेच आवश्‍यक असल्‍यास गुन्‍हा नोंदविण्‍याची कार्यवाही करावी. तसेच अहवाल वेळोवेळी उपविभागीय अधिकारी (महसुल) यांचेकडे सादर करणे अपेक्षीत राहील. त्‍याचप्रमाणे ग्रामीण भागातील जनता व  लोकप्रतिनिधी यांचेकडून प्राप्‍त होणा-या तक्रारी संदर्भात तातडीने स्‍थळपाहणी करुन तक्रारीचे निराकरण करण्‍यात यावे. 
जिल्‍हयातील पाणीपातळी दिवसंदिवस कमी होत असल्‍याने महाराष्‍ट्र विद्युत वितरण विभागाने पाटबंधारे प्रकल्‍पाचे परिसरातील विहीरीवरील अवैध वीज कनेक्‍शन तात्‍काळ बंद करुन आवश्‍य‍क असल्‍यास नियमाप्रमाणे संबधीतावर गुन्‍हे नोंदविणेबाबतची कार्यवाही करावी. त्‍याचप्रमाणे ज्‍या प्रकल्‍पात अत्‍यल्‍प पाणीसाठी आहे अशा परिसरातील कोणत्‍याही शेतक-यास सिंचनासाठी विद्युत जोडणीस परवानगी देण्‍यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांनी निर्गमीत केले आहेत.  
000000




नांदेड जिल्हा नियोजन
समितीची 29 ऑक्टोंबरला बैठक
नांदेड दि. 22 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांचे अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार 29 ऑक्टोंबर 2018 रोजी दुपारी 12.30 वा. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस विषय सूचीनुसार आवश्यक त्या अद्यावत माहितीसह संबंधीत अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे. प्रतिनिधी पाठवू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. 
000000


तात्पुरते फटका परवाना अर्ज करण्यास मुदतवाढ
नांदेड दि. 22 :- तात्पुरते फटका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्याच्या कालावधीची मुदतवाढ मंगळवार 23 ऑक्टोंबर 2018 पर्यंत देण्यात आली आहे. या व्यतीरिक्त 19 ऑक्टोंबर 2018 नुसार केलेल्या जाहीर प्रगटनामध्ये दिलेल्या अटी व शर्ती कायम राहतील, अशी माहिती जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
यावर्षी दिपाली उत्सव 6 ते 9 नोव्हेंबर 2018 या कालावधीत साजरी होत आहे. त्याअनुषंगाने नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परावाना अर्ज विस्फोटक अधिनियम 2008 नुसार 4 ते 19 ऑक्टोंबर 2018 या कालावधीत विक्री व स्विकारले जाणार होती. या कालावधीस 23 ऑक्टोंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.  
000000


रब्बी हंगाम आपत्कालीन पिक
नियोजन आराखडा व्यवस्थापन
नांदेड दि. 22 :- खरीप 2018 हंगामामध्ये जुन ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या 76 टक्के इतके पर्जन्यमान झाले आहे. त्याचप्रमाणे परतीचा पाऊस देखील समाधानकारक न झाल्याने पुरेशा ओलाव्याअभावी रब्बी हंगामातील पिकांवर देखील याचा परिणाम होणार आहे.
त्यामुळे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री करुनच पेरणी करण्यात यावी. यासंदर्भात केंद्र शासनाने जिल्हानिहाय आपत्कालीन पीक आराखडा ICAR या संस्थेने तयार केला असून केंद्र शासनाच्या www.crida.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हास्तरावर स्थानिक परिस्थितीनुसार कृषि विद्यापीठ / कृषि संशोधन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या सल्ल्याने रब्बी हंगामातील पीक नियोजन आराखडा तयार करण्यात यावा. दुष्काळ सदृश्य परिस्थिती / दुष्काळात फलोत्पादन पिकांचे व्यवस्थापन करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
रब्बी हंगामातील आपत्कालीन पीक नियोजनाचे अनुषंगाने पुढील प्रमाणे सर्वसाधारण सुचना देण्यात येत आहेत. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा /  सिंचनाची सुविधा असल्याशिवाय पेरणी करण्यात येऊ नये. रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी, मका, करडई, सूर्यफुल यासारखी पिके घेण्यात येतात. मध्यम व कमी कलावधीत पक्व होणाऱ्या जातींचा तसेच कमी पाण्यावर येणारी आणि कृषि विद्यापीठांनी ज्या भागांकरिता शिफारस केली आहे अशा पिकांचे नियोजन करण्यात यावे. जमिनीत ओलावा टिकविण्याकरिता आच्छादन पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी पेरणी केलेल्या पीकामध्ये 21 दिवसानंतर कोळपणी करुन, पीकांना मातीची भर द्यावी. पिकामध्ये आंतरमशागतीची कामे वेळेत करण्यात यावीत. त्यामुळे तणांचा बंदोबस्त होऊन जमिनीचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या वाढीच्या कालावधीत तुषार / ठिबक पद्धतीने पिकांना पाणी देऊन पाण्याचे व्यवस्थापन करण्यात यावे. फळबागामध्ये आच्छादनासाठी झाडाच्या बुंध्याभोवती वाळलेले गवत, धसकटे, पालापाचोळा इत्यादींचे आच्छादन करावे. फळबागांना पाण्याचा ताण पडू नये म्हणून केओलीन 8 टक्के किंवा पोटॅशियम नायट्रेट 1 ते 2 टक्के याप्रमाणात फवारणी करावी. फळबागेमध्ये 1 टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. तसेच खोडांना 10 टक्के बोर्डोपेस्ट लावावी. पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असलेल्या भाजीपाल्यांचे वाण लागवडीकरिता निवड करावी. ज्या जिल्हृयात चारा टंचाई असेल अशावेळी सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास प्राधान्याने चारा पिके घेण्यात यावी, असे पुणे कृषि आयुक्तालयाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) यांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...