Friday, September 17, 2021

 नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा शासन निर्णय निर्गमित;

१०० खाटांऐवजी ३०० खाटांच्या रुग्णालयास मान्यता

पालकमंत्री अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे आभार

 

            मुंबईदि. १७-  नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांवरुन ३०० खाटांत श्रेणीवर्धन करण्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली असूनयाबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या रुग्णालयात खाटांची संख्या वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता.

            नांदेड शहरासह जिल्ह्याची वाढती लोकसंख्या पाहता जिल्हा रुग्णालयातील १०० खाटा अपुऱ्या पडत होत्या. कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या काळात या रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. दरम्यानया जिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याची मागणी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली होती. त्यानुसार नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० खाटांवरुन ३०० खाटा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

            ३०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाची नवीन अत्याधुनिक इमारत सध्याच्याच जागेत बांधली जाणार असूनवाढीव आवश्यकतेनुसार पदनिर्मितीही केली जाणार आहे. या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनामुळे जिल्ह्यातील गरजूंना वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार आणि वाढीव सुविधा उपलब्ध होतील. मराठवाडा मुक्तिसंग्रामच्या ७४ व्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा रुग्णालयाचे ३०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याचा शासन निर्णय निर्गमित होणे ही नांदेडकरांसाठी मोठी भेट असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या निर्णयासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.

००००

 जिल्ह्यात एकाचा मृत्यू तर 3  कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 797 अहवालापैकी 766 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. तसेच आज रोजी एकही अहवाल कोरोना बाधित आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 303 एवढी असून यातील 87 हजार 621 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 30 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील गोन्डला येथील 75 वर्षाच्या एका महिलेचा 15 सप्टेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आज जिल्ह्यात बिलोली तालुक्यांतर्गत 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.  

 

आज 30 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, खाजगी रुग्णालय 4  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 24 हजार 30

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 20 हजार 738

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 303

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 621

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-31

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-30

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

00000

 ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम रब्बी हंगाम 2021-22 अंतर्गत

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- ग्राम बिजोत्पादन योजनेत जिल्ह्यातील नांदेड ग्रामीण, तरोडा, बारड, मालेगाव, भोकर, भोसी, सिंधी, उस्माननगर, पेठवडज, बारूळ, कलंबर, सोनखेड, माळाकोळी, इस्लापुर, बोधडी, किनवट, वाई, हदगांव, पिंपरखेड, निवघा, हिमायतनगर, शहापूर, देगलूर, रामतीर्थ, सगरोळी, जारीकोट, मांजरम, कुंटुर, जांब बु., मुक्रामाबाद, चांडोळा या महसूल मंडळाची निवड करण्यात आली आहे. या निवडण्यात आलेल्या महसूल मंडळातील गावातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर 25 सप्टेंबर 2021 अर्ज करावीत. 

राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत (एन एम एटी) बियाणे व लागवड साहित्य उपअभियान कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगाम 2021-22 मध्ये फार्म सेव्हड् सिड वृध्दीगत करून शेतकरी स्तरावर बियाणे बदल दरात वाढ करण्याच्या उद्देशाने या उपअभियानांतर्गत हरभरा व गहु या पिकासाठी ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम कृषि विभाग व महाबिज यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. 

जिल्ह्यास हरभरा पिकासाठी 6462 क्वि. व गहु पिकासाठी 940 क्वि.चे लक्षांक प्राप्त आहे. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत प्रति शेतकरी 1 एकरच्या मर्यादेत लाभ मिळणार आहे. हरभरा पिकासाठी 10 वर्षाच्या आतिल (जात- फुले विक्रम, राजविजय-202, AKG-1109, फुले विक्रांत) बियाण्यासाठी 25 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे व 10 वर्षावरील (जात-जॅकी-9218, दीग्वीजय, विजय, विशाल, विराट) बियाण्यासाठी 12 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे. तसेच गहु पिकासाठी 10 वर्षाच्या आतिल (जात- फुले समाधान, NPAW-1415) बियाण्यासाठी 20 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे. 10 वर्षावरील (जात-MACs-6222, HI-1544, GW-496, लोकवन) बियाण्यासाठी 10 रुपये प्रति किलो अनुदान देय आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आनिवार्य आहे. 

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी नजीकच्या सामुहिक सेवा केंद्रे, ठिकाणी जाऊन किंवा ज्या शेतकऱ्यांकडे android स्मार्ट मोबाईल वरून गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MahaDBT Farmer हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यावे. सदर सुविधा वापरकर्ता आयडी व आधार क्रमांक आधारीत असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाईल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर सदर ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यास अनेक शेतकरी अर्ज करू शकतील. अधिक माहितीसाठी संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

00000

 

 मराठवाडा गौरव गीताच्या ध्वनीफितीचे

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- अनेक साधू संताच्या वास्तव्यातून मराठवाड्यांची भूमी पूनित झाली आहे. मराठवाड्याचे अंतरंग व संस्कृती गोदावरीने समृध्द केली आहे. मराठवाड्याच्या विकासाची ज्यांनी पायाभरणी केली, त्या स्व. शंकरराव चव्हाण यांच्या सत्कारानिमित्त मराठवाडा गौरव गीताचा जन्म झाला. त्या गौरव गीताच्या ध्वनीफितीचे लोकार्पण सार्वजनिक बांधकामंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होत असल्याचा आनंद अधिक आहे, अशा भावना ज्येष्ठ कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनी व्यक्त केल्या.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या आणि शिक्षण व महिला व बालकल्याण समिती यांच्यावतीने आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून मराठवाडा गौरव गिताचे विमोचन याप्रसंगी करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुनिल लहाने, आदींची उपस्थिती होती. 

या मातीचा पुण्याईचा टिळा कपाळी लावू जोवर वाहे गोदामाई तोवर गाणे गाऊ या गौरव गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. माझी जन्मभूमी जरी परभणी असली तर नांदेड ही माझी कर्मभूमी राहिली आहे. यामुळे या भूमिचे आणि मातीचे मी सदैव ऋणी आहे, असेही लक्ष्मीकांत तांबोळी म्हणाले. 

नंदीग्राम महिला गौरव पुरस्काराचे वितरण

महिलांचा सुप्तगुणांना वाव मिळावा आणि महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी नांदेड मनपाच्या शिक्षण, महिला व बालविकास विभागाच्यावतीने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून नंदिग्राम कर्मयोगिनी पुरस्काराचे वितरण सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रंसगी शिक्षण, आरोग्य व प्रशासकिय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. शिक्षिका आनंदी विकास देशमुख, प्राध्यापिका रेश्मा धनंजय डोईफोडे, वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल सुचिता संजय टेकमवार, प्रशासकीय अधिकारी श्रध्दा उदावनकर, योगशिक्षक अनिता नेरळकर, महिला उद्योजिका उषाताई बेंद्रीकर पाटील, शितल भंडारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

00000



 मराठवाडा मुक्ती संग्रामातील व्यक्तीचित्रे प्रदर्शनाचा

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते शुभारंभ 

·         जिल्ह्यातील 75 शाळांमध्ये मुक्ती संग्रामाचा इतिहास पोहचविण्यावर भर

·         जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या स्वच्छता रथाचा शुभारंभ 

नांदेड (जिमाका), दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या आणि भरीव योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसेनानीच्या कार्याची ओळख सामान्य जनतेला व शालेय विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भर दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील 75 शाळांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी व हौतात्म्याच्या व्यक्तीचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ आज माता गुजरिजी विसावा उद्यानात ध्वजारोहन कार्यक्रमानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे हस्ते संपन्न झाला. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता रथाचा शुभारंभ पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने व विविध विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने 17 सप्टेंबर या दिवसांचे औचित्य साधून स्वातंत्र्य सेनानीच्या कार्याची व चळवळीची ओळख सर्व जनता व शालेय विद्यार्थ्यांना होण्यासाठी या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनासाठी डॉ. मंगला बोरकर यांच्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील व्यक्तीचित्रे या पुस्तकाच्या आधारे स्वातंत्र्यसेनानी व हौत्यात्म्याची माहितीवर आधारित 75 शाळांमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. तसेच गाव पातळीवर जनजागृती करण्यासाठी डिजिटल मोबाईलच्या मदतीने हे प्रदर्शन गावातील बाजार व प्रमुख चौकात दाखविण्यात येणार आहे.

00000



 अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत मलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे

नांदेडच्या सांडपाणी‍ व्यवस्थापनावर अधिक भर

- पालकमंत्री अशोक चव्हाण

 

·         माता गुजरीजी विसावा उद्यानातील मलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण 

नांदेड, जिमाका दि. 17 :- नांदेड महानगराच्या वाढत्या विस्तार व विकासाला गती देतांना महानगरातील पर्यावरण संतुलनासाठी व सांडपाणी, मलशुद्धीकरणाच्या शास्त्रोक्त उपाययोजनेवरही आपण भर दिला आहे. महानगरातील सर्व सांडपाणी सरळ गोदावरी पात्रात जाऊ नये यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून विविध ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत 9 प्रकल्प हाती घेतले असून यातील 5 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. विसावा उद्यान येथील 1 लाख 50 हजार लिटर क्षमतेच्या मलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण करतांना समाधान असल्याच्या भावना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या. 

नांदेड वाघाळा शहर महागनरपालिकेच्याअंतर्गत माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयसोलेटेड एमबीबीआर तंत्रज्ञानावर आधारीत बांधण्यात आलेल्या मलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने व इतर मान्यवर उपस्थित होते.

मलशुद्धीकरणाच्या या 9 प्रकल्पात विसावा उद्यान, अबचलनगर, आर्सजन, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे तीन प्रकल्प दीड लाख लिटर क्षमतेचे आहेत. शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे 1 लाख लिटर, शनीघाट येथे 8 लाख लिटर तर सावित्रीबाई फुले शाळा व बाबानगर येथे 2 लाख लिटर क्षमतेचे प्रकल्प आहेत. यातील विसावा उद्यान, अबचलनगर, अर्सजन व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील दोन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. इतर ठिकाणच्या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. 

या प्रकल्पात भूमीगत गटारातून नाल्याचे घाण पाणी पंपींग करुन बांधण्यात आलेल्या स्टोरेज टँकमध्ये साठा करण्यात येते. साठा केलेले घाण पाणी पंपींग करुन प्रक्रियेसाठी मोठ्या टाकीत सोडण्यात येते. या टाकीत प्रक्रियेनंतर पाण्यातील घन स्वच्छ होते. हे पाणी कार्बन फिल्टरमध्ये सोडण्यात येऊन त्या पाण्यावर युव्ही सिस्टीमद्वारे शुद्ध करुन हे पाणी उद्यानातील झाडे, बांधकाम, शेती व साफ-सफाईच्या कामांसाठी वापरण्या योग्य केले जाते. हे पाणी बांधकामासाठी मनपातर्फे अल्पदरात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

000000







 मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध रस्ते विकासासह

हैद्राबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील

-         सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण 

नांदेड, जिमाका, दि. 17 :-मराठवाड्याच्या सर्वागिण विकासाचा मार्ग हा मुंबई, पुणेसह जवळ असलेल्या हैद्राबाद महानगराच्या रस्ते विकासातून अधिक समृध्द होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वत: मराठवाडा विकासासाठी दक्ष असून या भागातील विकासाच्या प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. नांदेड-जालना समृध्दी महामार्गाला त्यांनी तात्काळ मंजुरी देवून ही कटिबध्दता अधिक दृढ केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. नांदेड महानगरपालिकेच्यावतीने आयोजित शहरातील महात्मा फुले मार्केट पुनर्विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने व इतर मान्यवर उपस्थित होते. 

स्वयंरोजगाराच्या संधी वाढण्यासाठी मोठी महानगरे अधिक सुलभ पध्दतीने, समृध्दी महामार्गाने जोडल्या गेली तर त्या-त्या ठिकाणी विकासालाही गती मिळेल. यादृष्टीने विचार करुन मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाशी नांदेड जोडता यावे या उद्देशाने आपण नांदेड-जालना या समृध्दी महामार्गाच्या कामाला गती दिली आहे. मुंबई-पुणे-औरंगाबाद-जालना-नांदेड पाठोपाठ आता नांदेड ते हैद्राबाद या नवीन ग्रीन फिल्ड मार्गासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याशी भेटून लवकरच मार्ग काढू, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

लोकसंख्येच्या वाढत्या गरजेनुसार विविध सेवा व सुविधा महानगरपालिके अंतर्गत उपलब्ध करुन देताना त्यातील गुणवत्ता व सातत्य जपणे हे अधिक महत्वाचे आहे. याचबरोबर ज्या सुविधा पुरविल्या जात आहेत त्यांचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेसारख्या स्वायत्त संस्थाना उत्पनाची साधने वाढविण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नांदेड येथील महात्मा फुले मार्केट पुनर्विकास योजनेतून जुन्या भाडेकरुना सामावून घेत याठिकाणी निर्माण होणारे नवीन व्यापारी संकुल हे नांदेडच्या वैभवाचे प्रतिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

सुमारे पन्नास हजार चौ.फूट जागेचे हे बांधकाम एका वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प आहे. लोकांनी याला चांगले सहकार्य केले तर हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. विकासाच्या प्रक्रीयेत नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. याचबरोबर मनपाचीही तेवढीची जबाबदारी आहे. चांगल्या सुविधा नागरिकांपर्यत पोहचविण्यात जर कुणाचा अडथळा येत असेल, तर अशा व्यक्तीविरुध्द कठोर कारवाई करुन सुविधा व कामाच्या दर्जेला प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मनपाला केल्या. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी सदर व्यापारी संकुलाची माहिती दिली. मान्यवराचे स्वागत केले.

0000






 लोकशाही मूल्यांच्या दृष्टिने मराठवाडा मुक्तीचा लढा अधिक मोलाचा

- पालकमंत्री अशोक चव्हाण 

·         मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 73 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

नांदेड (जिमाका) दि. 17 :- मराठवाडा मुक्तीचा लढा हा जात धर्म पंथ यांच्यापलीकडे सार्वभौम प्रजासत्ताकासाठी, लोकशाहीची मूल्य जपली जावीत यासाठी होता. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देवून मराठवाडा मुक्तीचा हा लढा दिला. हा लढा कोण्या एका जातीच्या विरोधात नाही तर लोकशाहीला मारक असलेल्या प्रवृतीच्या विरोधात होता, मानवी मूल्यासाठी होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे निसंदिग्ध प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 73 वा वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, विधानपरिषद सदस्य अमर राजुरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे, विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी आदी उपस्थित होते. 

ज्या लोकशाही मूल्यांसाठी महात्मा गांधी आग्रही होते, त्याच लोकशाही मूल्यांपासून प्रेरणा घेवून स्वामी रामानंद तीर्थ घडले. मराठवाडा मुक्तीचा हा लढा लोकशाही मूल्यांसाठीचा लढा होता. एका बाजुला भारताला स्वातंत्र्य देताना दुसऱ्या बाजुला ब्रिटिशांनी हैदराबादसह असंख्य संस्थाने तशीच ठेवून त्यांना मर्जीप्रमाणे कारभाराची मुभा दिली. त्याकडे आपण अभ्यासूवृत्तीने पाहिले पाहिजे. मुळात अखंड भारतात फूट पाडण्याची ती राजनिती होती. अलीकडच्या काळात इतिहासातील संदर्भाचे वाचन हे ठराविक जातीच्या चौकटीतून मांडण्याचा प्रघात वाढीस लागला आहे. नव्या पिढीपासून जर इतिहासाच्या पानातील सत्य दडवून ठेवले तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

लोकशाही मूल्यांतील लोककल्याणकारी राज्याचा संकल्प महाराष्ट्राने घेतला आहे. हे राज्य लोककल्याणाचे आहे या कर्तव्यनिष्ठेला आपण प्राधान्य दिलेले आहे. यातूनच लोकाभिमूख प्रशासनाचा पाया भक्कम झालेला आहे, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनासह जी विविध आव्हाने निर्माण झाली आहेत त्यात नैसर्गिक आपत्तीची, पर्यावरणातील असमतोलाची, अतिवृष्टीची, वातावरणातील आमूलाग्र बदलाच्या आव्हानांची भर पडली आहे. 

गेल्या जुलैपासून अतिवृष्टीच्या नैसर्गिक संकटात नांदेड जिल्ह्यात 25 व्यक्ती मृत्यूमुखी पडले आहेत. हजारो हेक्टर भूमी पुराच्या पाण्याने खरडून गेलेली आहे. अनेक शेतकरी उद्ध्वस्त होवून पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. शासन अशा सर्व शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरतेने उभे असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावेळी हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास मानवंदना व मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

00000







वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...