Friday, June 9, 2017

गोदावरीचे प्रदुषण रोखण्यासाठी युद्धपातळीवर
उपाय योजना कराव्यात - पर्यावरण मंत्री कदम
नांदेड दि. 9 :- गोदावरी नदीचे प्रदुषण होऊ नये यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. शहरातील सांडपाणी नाल्यांद्वारे नदीत मिसळू नये यासाठी योग्य त्या उपाय योजना युद्धपातळीवर कराव्यात, असे निर्देश राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज येथे दिले.
गोदावरी प्रदुषीत केल्याबद्दल प्रसंगी महापालिकेवर कठोर कारवाईचे संकेतही श्री. कदम यांनी दिले. जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मुल्यांकन प्राधिकरण तसेच जिल्हास्तरीय पर्यावरण समितीच्या कामकाजाबाबत मंत्री श्री. कदम यांनी आज आढावा घेतला. या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे बैठक झाली.   
बैठकीस आ. सुभाष साबणे, आ. हेमंत पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर भातलंवडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे, पर्यावरण समितीचे सदस्य डॉ. अर्जुन भोसले, सुरेश जोंधळे तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नामदेव दारसेवाड आदींची उपस्थिती होती.
बैठकीत बोलतांना श्री. कदम म्हणाले की, जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठका नियमित होणे आवश्यक आहेत. या समितीच्या अध्यक्षांना दिलेल्या अधिकारांचा पुरेपुर वापर करण्यात यावा. गोदावरी नदी प्रदुषणाबाबत यापुर्वी मंत्रालयात घेण्यात आलेल्या बैठकीतील निर्देशांवर महापालिकेकडून कार्यवाही झाली नसल्याचे दिसते. गोदावरीत शहराचे सांडपाणी मिसळू नये यासाठी महापालिकेने शासन धोरणानुसार स्व:निधीतून उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगळ्या तरतुदीची गरज नाही. हा खर्च पर्यावरण धोरणानुसार बंधनकारक आहे. घनकचरा विल्हेवाट लावण्याचा प्रकल्पही पुन्हा कार्यान्वीत करण्यात यावा.
यावेळी श्री. कदम यांनी महापालिकेकडून सांडपाणी तसेच घनकचरा प्रक्रियेबाबत करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेतली. जिल्ह्यात सुरु असलेल्या स्टोन क्रशर, तसेच विविध उद्योगांकडून पर्यावरण रक्षणांच्या मानकांची काटेकोर अंमलबजावणी केली जावी यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे, असेही निर्देशीत केले. बैठकीत जिल्ह्यातील वृक्ष लागवड, तसेच पर्यावरण संवर्धनाच्या विविध बाबींचा आढावाही घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार सर्वश्री पाटील, साबणे आदींनी सहभाग घेतला.  
त्यानंतर श्री. कदम यांनी गोवर्धनघाट, उर्वशीघाट येथे प्रत्यक्ष भेट देवून गोदावरी नदीत जाणाऱ्या सांडपाण्याच्या ठिकाणाची पाहणी केली. सांडपाणी नदी मिसळू नये यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, यासाठी प्रसंगी कार्यवाहीत कुचराई करणाऱ्या यंत्रणांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही दिले. तुप्पा येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासही त्यांनी भेट दिली. तेथून उस्माननगर-शिराढोण-गळेगाव शिवारात वन विभागाच्यावतीने वृक्ष लागवड मोहिमेत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची पाहणी करण्यासाठी श्री. कदम यांनी भेट दिली.

0000000
आंतरराष्ट्रीय योग दिनात मोठया संख्येने सहभाग व्हावे
-  जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव
नांदेड दि. 9 :- योग हा वनाचा आवश्यक भाग असून निरोगी वनासाठी नियमीत योगा करावा जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी खेळाड, विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, क्रीडाप्रेमी, नागरीक, महिला आदींनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव यांनी केले आहे.  
राज्य क्रीडा युवक सेवा संचालनालय नांदेड जिल्हा क्रीडा कार्यालयच्यावतीने जिल्ह्यात  विविध ठिकाणी बुधवार 21 जून 2017 रोजी सकाळी 6.30 वा. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा रण्यात येणार आहे. जिल्हयातील योग प्रशिक्षक, योगशिक्षक तालुका क्रीडा संयोजक यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            जिल्हयात बुधवार 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा मुख्य कार्यक्रम- नांदेड जिल्हा क्रीडा संकुल बास्केटबॉल मैदान स्टेडीयम परीसर येथे क्रीडा अधिकारी एम. जे. सोनकांबळे हे कार्यक्रम प्रमुख म्हणून आहेत. लोहा तालुका- कै. विश्वनाथराव नळगे विद्यालय लोहा येथे व्ही. एल. नागेश्वर. नांदेड तालुका - तालुका क्रीडा संकुल मैदान सिडको नांदेड येथे प्रा. रमेश नांदेडकर. किनवट- बळीराम पाटील विद्यालय किनवट येथे प्रा. सय्यद फय्याज. माहूर- डॉ. शंकरराव चव्हाण विद्यालय आष्टा येथे डी. डी. चव्हाण. हदगाव- मुलींचे हायस्कुल हदगाव येथे बी. डी. काळे. हिमायतनगर- राजा भगीरथ विद्यालय हिमायतनगर येथे के. बी. शेनेवाड. कंधार- तालुका क्रीडा संकुल नवरंगपूरा कंधार येथे एम. जे. सोनकांबळे तर श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे एस. एन चिवडे. नायगाव- मा. आ. शाळा कुंटूरतांडा ता. नायगाव येथे एम. जे. सोनकांबळे व जे. आर. पवार. धर्माबाद- तालुका क्रीडा संकुल धर्माबाद येथे कृष्णा परीवाले. अर्धापूर- तालुका क्रीडा संकुल अर्धापूर भाऊराव चव्हाण विद्यालय येळेगाव येथे जी. बी. मदने. देगलूर- साधाना हायस्कुल देगलूर- सय्यद मुख्तार. बिलोली- श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल शारदानगर सगरोळी येथे नंदु जाधव. मुखेड- क्रांतीसुर्य म. ज्यो. फुले विद्यालय राजूर बु. येथे एन. आर. पोटफोडे. उमरी- कृष्ण विद्यालय सिंदी ता. उमरी येथे श्री. पवळे. भोकर- जिल्हा परिषद हायस्कुल भोकर येथे प्रकाश खोकले. मुदखेड- तालुका क्रीडा संकुल मुदखेड येथे अमृत जाधव हे कार्यक्रम प्रमुख म्हणून राहतील.
या कार्यक्रमाचे क्रीडा अधिकारी सय्यद साजीद, एम. जे. सोनकांबळे, प्रवीण कोंडेकर, क्रीडा मार्गदर्शक श्रीमती शिवकांता देशमुख, अनिल बंदेल, आनंद गायकवाड, आनंद सुरेकर, संजय चव्हाण संयोजन करीत आहेत.

0000000
"उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" उपक्रमासह विविध कामांना
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. मोटे यांनी दिल्या भेटी
नांदेड दि. 9 :- भोकर तालुक्यातील विविध गावांना जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी भेटी देवून कृषि विभागामार्फत सुरु असलेल्या कामांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.  
रोहीणी नक्षत्राचा मुहूर्तावर "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" अभियानाद्वारे दिवशी बु येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षणास मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती, खरीप हंगामातील प्रमुख पिकांच्या पीक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मौजे दिवशी येथील सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी माती परिक्षणासह नवीन जातीची लागवड, बीज प्रक्रिया, योग्य खत व्यवस्थापन, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, दोन ओळी व रोपातील योग्य अंतरासह बीबीएफ यंत्राद्वारे लागवड करण्याबाबत तसेच सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक 4 :2 या प्रमाणात लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले.  
डॉ. मोटे पुढे म्हणाले की, तालुक्यात खरीप हंगामात लागवड होत असलेल्या पिकांबाबत तसेच उत्पादीत शेतमालाच्या बाजारातील दरांबाबत माहिती देतांना जागतीक उत्पादकता व त्याचा दरावर होणारा परिणाम याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधून सविस्तर चर्चा केली. तसेच यातून मार्ग काढण्यासाठी येत्या खरीप हंगामात लागवड करताना एकाच पिकाकडे न वळता कापूस, सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी इत्यादी विविध पिकांची लागवड करावी. जेणेकरुन उत्पादीत शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळतील. त्यामुळे एकाच पिकाची लागवड न करता विविध खरीप पिकांची लागवड करण्याबाबत आवाहन करुन जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रस्तावीत कामे सर्व यंत्रणानी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.  
"उन्नत शेती-समृद्ध शेतकरी" अभियानांतर्गत भोकर तालुक्यातील दिवशी गावातील कृषि वार्ताफलकाचे फीत कापून उद्घाटन डॉ. मोटे यांच्या हस्ते करण्यात आले.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांची तसेच मागेल त्याला शेततळे कामांची पाहणी केली. मातुळ व बल्लाळ गावातील दाळीचे बांध, मागेल त्याला शेततळे, तसेच पिंपळढव, लामकणी, कुमणगाव, धारजणी, डौर, सायाळ येथील दाळीचे बांध तर सावरगाव गेट येथील वनविभागामार्फत  केलेल्या खोल सलग समतल चराची पाहणी केली. पोमनाळा येथील शेततळे कामाची पाहणी करुन कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
धारजणी येथे ठिबकवरील कापूस, तुर पिकाच्या लागवडीची तर भोकर येथील केळी पिकाची पाहणी करुन तुरीच्या विरळणीबाबत मार्गदर्शन केले. भोकर तालुक्यातील विविध गावांना भेटी देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषि विभागामार्फत चालू असलेल्या कामांची पाहणी केली.
तालुका कृषि अधिकारी आर. एम. देशमुख, मंडळ कृषि अधिकारी सदाशीव पाटील, कृषि पर्यवेक्षक सुनील चव्हाण, बी. डी. पुरी, रहिम यांच्यासह कृषि सहाय्यक सौ. कुलमुले, श्री. बल्लुरकर, लोसरवार, शिंदे, व्ही. डी. पाटील, वसमते, पवार, बारसे यांच्यासह तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बोईनवाड उपस्थित होते.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...