Sunday, December 18, 2016

जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी 74.18 टक्के मतदान; आज मतमोजणी

 जिल्ह्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी
74.18 टक्के मतदान; आज मतमोजणी
नांदेड, दि. 18 :- जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच  नगरपरिषदांच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. जिल्ह्यातील 283 मतदान केंद्रांवर मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीसाठी सरासरी 74.18 टक्के मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी त्या-त्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्यालयी सोमवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
जिल्ह्यातील (कंसात प्रभाग संख्या) देगलूर (12), धर्माबाद (09), बिलोली, कुंडलवाडी, उमरी, मुखेड, कंधार, हदगाव, मुदखेड (प्रत्येकी 08) या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच अध्यक्ष पद निवडीसाठी आणि माहूर व अर्धापूर (प्रत्येकी 17) नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले. नगरपरिषद व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या जागांसाठी 793 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 53 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीने निवडणूक कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केली. निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह अन्य चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निरिक्षक नियुक्त करण्यात आली होती. याशिवाय संबंधीत नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक अधिकारी असे एकूण 33 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. मतदानासाठी 778 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. निवडणुकीसाठी मतदारांची संख्या 2 लाख 3 हजार 676 इतकी आहे. सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. सुरुवातीच्या टप्प्यात धीम्यागतीने मतदान झाले. पण नंतरच्या टप्प्यात मतदानास वेग आला. दुपारी 3.30 पर्यंत जिल्ह्यात सरासरी 56.58 टक्के मतदान झाले.
नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे - धर्माबाद नगरपरिषद- 70.73 टक्के, उमरी - 72.33, हदगाव - 66.52, मुखेड - 73.66, बिलोली - 69.48, कंधार -83.12, कुंडलवाडी - 81.46, मुदखेड - 71.45, देगलूर -  74.68. अर्धापूर नगरपंचायत- 78.46, माहूर नगरपंचायत - 78.57 टक्के.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  यांनी सकाळी मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय आणि संपर्क प्रस्थापित केला. नगरपरिषद प्रशासन विभागाच्या प्रशासनाधिकारी विद्या गायकवाड यांनीही संनियंत्रण समितीद्वारे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच मतदान केंद्राध्यक्ष आदी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांशी समन्वय साधण्यास सुरवात केली. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच 283 मतदान केंद्रावर सुरळीतपणे आणि शांततेत मतदान प्रकियेस सुरवात झाली.
मुख्य निवडणूक निरिक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे तसेच निवडणूक निरीक्षक यांच्याकडून विविध मतदान केंद्रांना भेट देऊन, तेथील व्यवस्थेबाबत आढावा घेणे व मतदारांच्या सुविधांबाबत निर्देश दिले. निवडणूक निरिक्षकांनीही विविध मतदान केंद्राना भेटी देऊन, तेथील सुविधांचा आढावा घेतला. मतदानासाठी जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे कुठेही अनुचीत प्रकार न घडता मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. मतमोजणी त्या-त्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्यालयी होणार आहे. त्यासाठीही निवडणूक यंत्रणेने सज्जता ठेवली आहे.  

0000000
अल्पसंख्याकाच्या विकास योजनांसाठी
प्रशासन कटीबद्ध - जिल्हाधिकारी काकाणी
अल्पसंख्याक हक्क दिन कार्यक्रम साजरा
नांदेड दि. 18 :- अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटीबद्ध आहे. समाजाच्या शैक्षणीक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठीच्या प्रयत्नांना नेहमीच प्राधान्य देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे सांगीतले. या समाजातील तरुणांनी शिक्षण आणि आपल्या स्वत:च्या क्षमता विकासावर लक्ष केंद्रीत करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. काकाणी बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमा डॉ. राजवंत सिंघ कदम्‍ब, डॉ. मोहम्मद अब्‍दुल बशीर यांचीही व्याख्याने झाली.
कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण  विकास यंत्रणेचे संचालक जी. बी. सुपेकर, अल्पसंख्याक विकास समिती सचिव तथा उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एस. एस. राठोड, जुबेर अहमद, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी. टी. यशवंते, मौलाना आझाद विकास महामंडळाचे सदस्य आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, अल्‍पसंख्‍यांक समाज विविध धर्म, जाती, पंथ, प्रांत, भाषा, प्रथा, परंपरा यामध्ये विखुरला आहे. पण घटनेने देशाती सर्व घटकांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, धार्मिक याबाबत समान अधिकार दिलेली आहेत. अल्‍पसंख्‍यांक हक्‍क दिवस म्‍हणून साजरा करताना अल्‍पसंख्‍यांकांच्‍या उन्‍नतीसाठी काय करता येईल याचा विचार करावा लागेल.  कमतरतांवर कशी मात करता येईल आणि नेमकी बलस्थाने काय काय आहेत यावर लक्ष केंद्रीत करणे आवश्‍यक आहे. अल्पसंख्याक समाजातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शिष्‍युवृतीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारची पुस्तके उपलब्ध करणे, त्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांचे समुह करून विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन करणे असे प्रयत्न करता येतील. पोलीस भरती पूर्व परिक्षा प्रशिक्षण वर्गासाठी अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थ्‍यांमध्‍ये स्‍पर्धा असायला पाहिजे, जास्‍तीत जास्‍त संख्येने लाभ घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या विविध समाजातील तरुणांनी डिजीटायझेशनच्या युगातील कौशल्य आत्मसात करावीत. शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकासांच्या प्रशिक्षण, योजनांमध्ये सहभाग घ्यावा. त्याद्वारे आपली आणि समाजाची उन्नती साधावी, अशी अपेक्षाही श्री. काकाणी यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी डिजीटल पेमेंट रोकडरहित (कॅशलेस) व्यवहार, आधार लिंकिंग अशा संकल्पनाबाबतही सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाडॉ.राजवंतसिंघ कदम्‍ब आणि डॉ. मोहम्मद अब्‍दुल बशीर यांची अल्‍पसंख्‍यांक नागरिक त्‍यांच्‍या घटनांत्‍मक व कायदेशीर हक्‍कांची जाणीव-माहिती बदल राज्‍यघटनेत असलेल्‍या विविध कलमांच्‍या संदर्भात माहिती सांगितली. अल्‍पसंख्‍यांकांना राष्‍ट्रीय विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहातील समावेशाची आवश्‍यकतेबाबत सभागृहाचे लक्ष वेधले. उपजिल्हाधिकारी श्रीमती ढालकरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच शेवटी आभारही मानले.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...