Friday, July 11, 2025

 वृत्त क्र. 720 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात

हिमालया बेबी फिडिंग सेंटरचा लोकाअर्पण सोहळा   

 

नांदेड दि. 11 जुलै :- महिला सक्षमिकरण अंतर्गत स्तनपान करणाऱ्या महिलांना हक्काची जागा आणि समानतेची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हिमालय कंपनीच्या सी.एस.आर निधीतून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे दोन हिमालया वेबी फीडिंग पॉड नुकतेच बसवण्यात आले आहे. यासाठी हिमालया बेबी फिडिंग प्रकल्प समन्वयक असिफ भट यांनी मोलाची मदत केली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबईच्या अधिनस्त राज्यस्तरावर सी.एस.आर कक्ष स्थापन करण्यात आलेला असुन या कक्षाचे सचिव विजय गायकवाड समाजसेवा अधीक्षक यांच्यामार्फत समाजसेवा अधीक्षक विभागाच्या समन्वयाने नांदेड येथे वेबी फीडिंग पॉड उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागातील ओ.पी.डी. क्र. 118 स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग आणि ओ.पी.डी.क्र. 127 बालरोग विभाग येथे हिमालया बेबी फीडिंग सेंटर बसविण्यात आले. या बेबी पॅडमध्ये एकाच वेळेस चार स्तनदा माता यांना बाळांना दूध पाजन्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या स्तनदा मातांना बाळाला स्तनपान करण्यासाठी एक खासगी आणि सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. तसेच मातांना बाळासोबत थोडा वेळ विश्रांती घेता यावी यासाठी आरामदायी जागा ही बेबी पॉड येथे उपलब्ध असणार आहे.

 

सदर हिमालया बेबी फीडिंग सेंटरचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते नुकतेच 9 जुलै  रोजी संपन्न झाले. सदर कार्यक्रमास रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, डॉ. एस. आर. वाकोडे, प्राध्यापक व विभाग प्रमुख, स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र, डॉ. इस्माईल इनामदार, विभाग प्रमुख, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग व डॉ. शिवानंद देवसरकर, उप वैद्यकीय अधीक्षक, सर्व समाजसेवा अधीक्षक तसेच परिचर्या संवर्गातील कर्मचारी व रुग्ण व रुग्णनातेवाईक हे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवा अधीक्षक राजरत्न केळकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता अनिल नागमवाड, संतोष मुंगल, विजय खरात, संजय रत्नपारखी व दिपाली पेटकर या समाजसेवा अधीक्षक यांनी परिश्रम घेतले.

00000




 

 

 वृत्त क्र. 719 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याची सूचना 

नांदेड दि. 11 जुलै :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जामध्ये ऑनलाईन पोर्टलवर SEND BACK द्वारे त्रुटींची पूर्तता करता आली नसलेल्या विद्यार्थ्यांची यादी समाज कल्याण आयुक्त यांच्या स्तरावरून या कार्यालयास उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 याच वर्षातील विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाईन अर्जासह संपूर्ण कागदपत्रे छायांकितप्रत 14 ते 28 जुलै 2025 पर्यंत समाज कल्याण कार्यालय नांदेड येथे स्वतः विद्यार्थ्यांनी दाखल करावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहेत. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक सन 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना 10 जून 2025 पर्यंत त्रुटींची पूर्तता करण्याबाबतची संधी देण्यात आली होती. परंतू ऑनलाईन पोर्टल वरील तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थांकडून त्रुटीची पूर्तता करण्यात आली नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे यासाठी विद्यार्थ्यांना त्रुटीची पूर्ततेकरिता मुदतवाढ देण्याबाबतचे आयुक्तालयाने निर्देश दिले आहेत.

 

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जून 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.

000000

वृत्त क्र. 718 

कर्ज योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 11 जुलै :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता अनुदान योजना भौतिक उद्यीष्ट 75, प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयापर्यंत आहे. बीज भांडवल योजना भौतिक उद्यीष्ट शंभर प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपये ते 70 हजार रुपया पर्यंत आहे. थेट कर्ज भौतिक उद्यीष्ट 100 प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपयापर्यंत मुख्यालयाकडून प्राप्त झाले आहे. या योजना महामंडळामार्फत राबवली जाते. या योजनांचे कर्ज प्रस्ताव नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजातील अंतर्भाव असलेल्या 12 पोटजातीतील इच्छुक अर्जदारांकडून मागविण्यात आली आहे.

 

नांदेड जिल्हातील मांग/मातंग समाजातील ईच्छुक अर्जदाराचे वय 18 वर्ष पुर्ण असावे व 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. शहरी व ग्रामीण अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे तसेच अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन या योजनेत साधारणपणे समाविष्ट लघु व्यवसाय जसे मोबाईल सर्व्हिसिंग, रिपेअरिंग, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक वस्तु रिपेअरिंग (फ्रीज,ऐसी, टिव्ही, मायक्रोवेव्ह, लॅपटॉप, कॉम्प्युटर) होर्डवेअर, ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग, फुड प्रोडक्ट, प्रोसेसिंग, किराणा दुकान, जनरल, स्टेशनरी स्टोअर्स, मेडीकल स्टोअर्स, फॅब्रीकेशन, वेल्डिंग, हार्डवेअर व सेनटरी शॉप, प्रिंटींग, शिवणकला, झेरॉक्स, लॅमिनेशन, हॉटेल, कॅटरिंग सेर्विसेस, मंडप डेकोरेशन, क्रिडा साहित्य, स्पोर्ट शॉप, फास्ट फुड सेंटर, ज्यूस सेंटर, क्लॉथ रेडिमेड गारमेंटस शॉप, मोटार मेकॅनिक रिपेअर, शेतीशी निगडीत पुरक जोडव्यवसाय इत्यादी व्यवसायासाठी कर्ज मागणी अर्ज करता येईल.

 

कर्ज प्रस्ताव दोन प्रतीत पुढील ठिकाणी स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थीत राहुन दाखल करावे त्रयस्त, मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. उद्यिष्टापेक्षा जास्त कर्ज प्रस्ताव प्राप्त झाल्यास शासन निर्णय 14 मे 2012 नुसार लाभार्थ्याची निवड लॉटरी पध्दतीने केली जाईल.

 

थेट कर्ज योजने अंतर्गत सन 2023-24 या वर्षातील पात्र कर्ज प्रस्तावातुन उद्दीष्टानुसार लॉटरी पध्दतीने लाभार्थींची निवड करण्यात आली असून उर्वरीत राहिलेले जुने कर्ज प्रस्ताव शासन निर्णाया प्रमाणे रद्य समजण्यात यावे.

 

कर्ज प्रकरणासाठी कागदपत्रे

जातीचा दाखला. उत्पन्नाचा दाखला. रेशनकार्डची झेरॉक्स प्रत. आधार कार्डची झेरॉक्स प्रत. पॅनकार्डची झेरॉक्स प्रत. दोन पासपोर्ट फोटो. व्यवसायाचे दरपत्रक (कोटेशन). व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या ठिकाची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा, (नमुना नं 8, लाईट बिल व टॅक्स पावती).  ग्रामपंचायत, नगरपालीका, महानगरपालीका यांचे नाहरकत प्रमाणपत्र किंवा शॉप अॅक्ट परवाना. व्यवसायासंबधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. शैक्षणिक दाखला. अनुदान किंवा कर्जाचा लाभ न घेतलेले प्रमाणपत्र. अर्जदाराचे सिबील क्रेडिट स्कोअर 500 असावा. अर्जदाराने आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा. प्रकरणा सोबतची सर्व कागदपत्रे स्वत:च्या स्वाक्षरीने साक्षांकित करावी.

 

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल इत्यादी वरील योजनेचे कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील झेरॉक्स हस्तलिखि, टंकलिखित केलेला अर्ज महामंडळाच्या कार्यालयात विनामुल्य मिळेल, असेही आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एन. पवार यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्र. 717   

 

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा

 

नांदेड दि. 11 जुलै :- राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिक स्पर्धा खरीप हंगाम 2025 साठी आयोजित करण्यात आल्या आहेत.  खरीप हंगाम सन 2025 पिकस्पर्धेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.

 

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल हा उद्देश ठेवून राज्यात कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

 

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. 

 

पिक स्पर्धेतील पिके

खरीप पिकात ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन या सहा पिकांचा समावेश आहे.

 

पात्रता निकष

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवशक्य आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पीकस्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

 

कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ). ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन. 7/12, 8- उतारा. जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास). पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा. बँक खाते चेक, पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत.  

 

अर्ज करण्याची मुदत

खरीप हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढील प्रमाणे राहील. मुग, उडीद पिकासाठी 31 जुलै 2025. ज्वारी, मका, तूर, सोयाबीन पिकासाठी 30 ऑगस्ट 2025 राहील. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी.

 

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क

पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम तिनशे रुपये राहील व आदिवासी गटासाठी रक्कम एकशे पन्नास रुपये राहील. सहभागी शेतकऱ्यांनी प्रवेश शुल्क स्वतः 0401 पिक संवर्धन 104 शेती क्षेत्रापासून प्राप्त जमा रक्कमा (00) (02) पीक स्पर्धा योजनेखालील जमा रक्कमा 0401047301 या शिर्षामध्ये शासकीय कोषागारात विहीत मुदतीत जमा करावे.

  

बक्षिसाचे स्वरूप

पहिले, दुसरे, तिसरे यानुसार तालुका पातळीवर  5 हजार,  3 हजार, 2 हजार त्याप्रमाणे जिल्हा पातळीवर 10 हजार, 7 हजार, 5 हजार तर राज्य पातळीवर 50 हजार, 40 हजार, 30 हजार रुपये बक्षिस सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस स्वरुपात दिले जाईल.

 

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागाचे www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर किंवा सबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन कृषि कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

#जागतिकव्याघ्रदिन #नांदेड