Friday, January 31, 2025

वृत्त क्र. 135

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड दि. 31 जानेवारी :- नांदेड जिल्ह्यात 1 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपासून ते 17 फेब्रुवारीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 1 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपासून ते 17 फेब्रुवारी 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. 

त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

वृत्त क्रमांक  134

जिल्हा कोषागार कार्यालयाकडून 

नांदेड पोलिस सदानंद सपकाळे यांचा सन्मान 

नांदेड दि. 31 : संचालनालय, लेखा व कोषागारे, कर्मचारी कल्याण समितीकडून विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता कोषागारे कर्मचारी नांदेड यांना पोलिस कॉन्स्टेबल सदानंद सपकाळे यांनी सलामी व पथसंचलन यांचे प्रशिक्षण देऊन तयार केले. कोषागारे कर्मचारी यांनी सुंदर असे सलामी व पथसंचलन केले आणि विभागीय क्रीडा स्पर्धामध्ये प्रथम पारितोषिक आणले आहे. त्याबद्दल नांदेड पोलिस दलात कार्य करणारे पोलिस कर्मचारी सदानंद सपकाळे यांना जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड अलंकृताल कश्यप बगाटे, बालाजी देशमाने, अध्यक्ष कर्मचारी संघटना नांदेड यांनी पुष्प आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा कार्याचा गौरव केला व पुढील कार्यास शभेच्छा दिल्या.

0000





वृत्त क्रमांक  133

राज्य युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड दि. 31 जानेवारी :- राज्य युवा पुरस्कारासाठी युवक अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांची गत तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मुल्यांकन विचारात घेण्यात येणार असून राज्य युवा पुरस्कार सन 2023-24 साठी अर्ज शनिवार 15 फेब्रुवारी 2025 पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक राहणार आहे.

राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून मोठया संख्येने युवावर्ग, संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याच्या युवाधोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य युवा पुरस्कार शासन निर्णय 12 जानेवारी 2013 नुसार देण्यात येतात.

सन 2023-24 या वर्षात राज्यस्तरावर राज्य युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रिय विभागस्तर नुसार प्रत्येक विभागातील 1 युवक, 1 युवती व 1 नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे स्वरुप युवक-युवती यांना रोख 50 हजार रुपये, संस्थेस 1 लाख रुपये तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. राज्यातील जास्तीतजास्त युवा व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था यांनी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक  132

इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी परीक्षा

कॉपीमुक्त अभियानाच्या कार्यवाहीत अंशत: बदल 

नांदेड दि. 31 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणारी इ. 12 वी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च व इ. 10 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आल्या आहेत.

सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याची कार्यवाही करण्याबाबत 17 जानेवारी रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. परंतू या निर्णयाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत. त्यामुळे या निर्णयात अंशत: बदल करण्यात येत असून फेब्रुवारी-मार्च 2025 च्या इ. 12 वी व इ. 10 वी परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. 

कोरोना काळातील सन 2021 व सन 2022 या दोन परीक्षा वगळून मागील 5 वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च 2018, 2019, 2020,2023 2024 या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत अशा परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा, उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येणार आहे. 

फेब्रुवारी-मार्च 2025 च्या इ. 10 वी व इ. 12 वी परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्हयात इ. 10 वी व इ. 12 वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा राहील. 

शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांच्या सहकार्याने परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठेपथक कार्यरत राहील अशी कार्यवाही करण्याबाबत सर्व विभागीय मंडळे व सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.

00000


#महात्माफुलेजनआरोग्ययोजना

Maharashtra DGIPR


 








 

नांदेड ग्रंथोत्सवाला आज पासून सुरुवात झाली. २८ फेब्रुवारी व १ मार्च दोन दिवस हा ग्रंथोत्सव होत आहे. सकाळी ८.३०ला ग्रंथ दींडी काढण्यात आली. य...