Wednesday, October 26, 2016

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 26  :- जिल्ह्यात मंगळवार 8 नोव्हेंबर 2016  रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनांची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात मंगळवार 25 ऑक्टोंबर ते 8 नोव्हेंबर  2016 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमूद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.                        
     00000
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 26 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा गुरुवार 27 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी 6 वाजेपासून शनिवार 26 नोव्हेंबर 2016 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

000000
नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी
आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही
नांदेड, दि. 26 :-  महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी आज एकही नामनिर्देशनपत्र दाखल केले नाही, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

0000000
तीन दिवस दिवाळी पहाट महोत्सव 2016
बंदाघाट येथे होणार - जिल्हाधिकारी सुरेश काकाणी
 नांदेड दि. 26 :- शहरात शनिवार 29, रविवार 30, सोमवार 31 आक्टोंबर 2016 रोजी दररोज सकाळी 5.30 ते 8.30 वाजेपर्यंत तीन दिवस दिवाळी पहाट महोत्सव-2016 बंदाघाट येथे जिल्हा प्रशासन, महापालिका आणि सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने सादर होणार आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
शनिवार 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 5.30 वा. पं. कुमार गंधर्व यांचे नातू व प्रख्यात गायक भुवनेश कोमकळी (देवास म.प्र.) आणि श्रीमती हेमा उपासनी (मुंबई) यांचा निर्गुणी भजन, सुफी, मराठी गझल, संत मीराबाई व संत कबिराच्या रचनांवर कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन गोविंद पुराणीक हे करणार आहेत. याच दिवशी सकाळी 8.30 वा. कविता शिरपूरकर (संपर्क क्र.9420668508) या मुली आणि महिलांकरीता रांगोळी स्पर्धा घेणार आहेत.
रविवार 30 ऑक्टोबर 2016 सकाळी 5.30 वा. स्वयंवर प्रतिष्ठान ``रंग अभिषेकी`` प्रख्यात गायक आणि संगीत दिग्दर्शक पं.जितेंद्र अभिषेकी रचित बंदीश, ठुमरी, नाटयपद, अभंग मुंबईच्या प्रख्यात गायक डॉ. राजा काळे यांची कन्या सुप्रसिद्ध गायिका अमृता काळे व पं.अजय चक्रवर्ती यांचे शिष्य अभिजीत अपस्तंब हे दोघे सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. सुनील नेरलकर करणार आहेत.
सोमवार 31 आक्टोंबर सकाळी 5.30 वा. गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप.सोसायटी लि.नांदेड यांच्यावतीने  पत्रकार विजय जोशी निर्मित व संगीतकार प्रमोद देशपांडे यांच्या संगीत संयोजनाखाली प्रभाती सुर नभी रंगती हा स्थानिक कलावंताचा भक्ती गीत व भाव गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. गजानन पिंपरखेडे हे करणार आहेत. यात कु. वर्धिनी जोशी, शर्वरी हिरवे, तेजश्री देशपांडे, कल्याणी जोशी, समिक्षा चंद्रमोरे व इतर गुणी कलावंत सहभागी होणार आहेत.
व्यासपीठ, बैठक व्यवस्था, ध्वनीक्षेपण व्यवस्था, महानगरपालिका व गुरुद्वारा बोर्ड करणार असून रोज सकाळी `दिवाळी नाष्टा` लंगर साहिब गुरुद्वारा करणार आहे. यासोबत इन्टॅच तर्फे नांदेडचा सांस्कृतिक वारसा दर्शवणारे फोटो प्रदर्शन व माँ गोदावरी श्रमसेवा परिवाराच्या कार्याचे चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे.
प्रत्यक्ष बंदाघाट येथे कार्यक्रमास हजर राहून दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकांना देवून दिवाळी उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनामधील सर्व संस्था कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्या तरी अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत जिल्हा प्रशासनाच्यावतीने मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली उपायुक्त रत्नाकर वाघमारे संयोजक म्हणून काम पाहणार आहेत.

---000---
अल्पसंख्याक विकास विभागाचे
प्रधान सचिव श्याम तागडे यांचा दौरा
             नांदेड दि. 26 :-  राज्य अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            शुक्रवार 28 ऑक्टोंबर 2016 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अल्पसंख्याक विकास विषयी आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत नांदेड येथील वक्फ बोर्डाच्या मालमत्ताची पाहणी करतील. रात्री शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव व मुक्काम. शनिवार 29 ऑक्टोंबर 2016 रोजी सकाळी नांदेड येथून परभणीकडे प्रयाण करतील.

0000000
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त
एकता दौंडीचे सोमवारी आयोजन
             नांदेड दि. 26 :-  सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस म्हणून 31 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्याबाबत सूचना निर्गमित केली आहे. सोमवार 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीची सुरुवात महत्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सुरु होणार असून जुना मोंढा टावर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन एकता दिनाची शपथ घेवून कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांनी राष्ट्रीय एकता दौडीमध्ये सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने सूचित केले आहे.

0000000
दक्षता जनजागृती सप्ताहास सोमवारपासू प्रारंभ
             नांदेड दि. 26 :- भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी प्रशासन याकरीता राज्य शासनाच्यावतीने सोमवार 31 ऑक्टोंबर ते  शनिवार 5 नोव्हेंबर 2016 या  कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
            याअंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यासंदर्भात परिपत्रकान्वये विविध विभागांना निर्देशित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी परिपत्रकात नमूद केल्यानुसार कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...