विशेष लेख
दि. 5 मार्च 2025
पर्यावरण जपणे – आपले कर्तव्य
पर्यावरण म्हणजे पृथ्वीवरील प्रत्येक जिवाच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार. हवा, पाणी, सुपीक जमीन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा समतोल टिकवून पर्यावरण आपल्याला जगण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी प्रदान करते. मात्र, मानवी हस्तक्षेप, औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. मात्र हा समतोल बिघडण्याची कारणे शोधून मानवाने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जागतिक तापमानवाढ, जलप्रदूषण, हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिवापर यामुळे पर्यावरण संकटात आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा हा दुष्काळप्रवण प्रदेश असल्याने येथे पाण्याची कमतरता, भूजल पातळी घटणे, आणि शेतीला होणारे नुकसान या समस्या अधिक गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे जलसंधारण आणि वृक्षसंवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
मराठवाड्यातील अवर्षण
मराठवाडा हा पावसाच्या कमी प्रमाणामुळे कायमच दुष्काळाच्या सावटाखाली असतो. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वारंवार दुष्काळ पडतो.
कमी आणि अनियमित पाऊस यामुळे येथील शेतकरी भूजलावर अवलंबून असतात. अतिरेकी पाण्याचा उपसा आणि जंगलतोड यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. पाण्याअभावी पिके सुकतात, उत्पन्न घटते आणि शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढतो.
यावर उपाय म्हणजे पाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि वृक्षारोपण. याच उद्देशाने राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार’ योजना सुरू केली आहे.
जलयुक्त शिवार, महत्त्वाचा प्रकल्प
महाराष्ट्र सरकारने 2016 साली ‘जलयुक्त शिवार अभियान’ सुरू केले. याचा मुख्य उद्देश राज्यातील गावे दुष्काळमुक्त करणे आणि भूजल पातळी वाढवणे हा आहे.
या योजनेअंतर्गत होणाऱ्या प्रमुख उपाययोजना:
1. नाले आणि ओढे खोदून रुंद करणे – पावसाचे पाणी साठवून जमिनीत मुरवण्यासाठी.
2. तलाव आणि विहिरींचे पुनरुज्जीवन – जलसाठा वाढवण्यासाठी गाळ काढणे.
3. शेतीच्या बांधावर झाडे लावणे – मृदा धूप रोखणे आणि जमिनीत आर्द्रता टिकवणे.
4. ठिबक व फवारणी सिंचनाचा प्रसार – पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब.
5. सिंचन व्यवस्थापन सुधारणा – गाव पातळीवर पाण्याचे योग्य नियोजन करणे.
ही योजना योग्यप्रकारे राबवली गेल्यास मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर होऊ शकते आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळू शकते. मात्र, स्थानिक लोकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे.
मानव आणि वन्यजीव संघर्ष
वनतोड आणि शहरीकरणामुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत. यामुळे जंगलातील प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये आणि शेतात घुसतात.
विशेषतः नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसर, जो घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे, येथे वाघ, बिबटे, अस्वल, हरिण आणि नीलगाय मोठ्या प्रमाणात आढळतात. जंगलतोड झाल्यामुळे हे प्राणी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करतात. काही वेळा मानव आणि वन्यजीव संघर्षामुळे जीवितहानीही होते.
एप्रिल - मे जलसंधारणाचे महिने
एप्रिल आणि मे महिना हा जलसंधारणाच्या कामासाठी अतिशय उपयुक्त असा महिना असतो, त्यामुळे या दोन महिन्यात तलावाचे, नाल्याचे, जलसाठ्याचे खोलीकरण ,रुंदीकरण अतिशय आवश्यक असते. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होते. याला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. पाणी पातळी कमी झाल्यामुळे अनेक तलावातील गाळ काढून शेतीमध्ये टाकल्या जाऊ शकतो. तसेच धरणातील गाळ काढून शेतीमध्ये टाकला जाऊ शकतो. छोटे बंधारे. कोल्हापुरी बंधारे. विहिरी लगतच्या नाल्यांचे खोलीकरण, विहिरींचा उपसा, विहिरींचे खोलीकरण, याकडे देखील या महिन्यात लक्ष देणे आवश्यक आहे. एप्रिल, मे व जून चा पंधरवाडयात या सर्व कामांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे.
जून, जुलै, वृक्षारोपणाचे महिने
आपला निसर्ग स्वतःच बऱ्याच गोष्टी करून घेतो. मात्र निसर्गाची अपरिमित हानी आपण केली आहे. त्यामुळे या निसर्गाला फुलण्यात, फळण्यात, मदत करणे आवश्यक आहे. उन्हाळा जसा जलसंधारणाच्या कामासाठीचा आवश्यक कालावधी असतो. तसाच जून जुलै हा महिना सृष्टीला देण्याचा महिना असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीत जे पेराल ते नक्की उगवते. निसर्ग तशी तुमची वाट पाहत नसते. ती सृजनशीलता निसर्गामध्ये उपजतच आहे. कोट्यवधी वर्षापासून हा क्रम सुरू आहे. मात्र आमच्या अतिक्रमणाने निसर्गातील क्रम बदलायला लागले आहे. त्यामुळे यंदाचा जून जुलै महिना मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा ठरेल याची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत : मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे,ज्या ठिकाणी दुष्काळाच्या झळा कायम लागतात त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविणे अतिशय आवश्यक आहे. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचा अभिनव उपक्रम राबवल्या गेला होता. यावर्षी देखील आपल्या प्रत्येकाच्या हाताने किमान एक वृक्ष लावला गेला पाहिजे,अशी शपथ आपण प्रत्येकाने जरी घेतली तरी जलसंधारणाचे मोठे काम आपल्या हातून होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात आपल्या घरातील मुलाबाळांपासून तर परिवारातील सर्व सदस्यांपर्यंत प्रत्येकाने एक झाड लावण्याचा संकल्प या उन्हाळ्यातच करणे आवश्यक आहे.
काही सोपे उपाय...
1. शेतीच्या बांधावर मोठी झाडे लावणे – यामुळे जंगल आणि शेती यामधील सीमारेषा ठरवता येईल. उत्पन्नाचे स्त्रोतही वाढेल ज्या परिसरात जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे ही वृक्ष लागवड आपले शिवार सुशोभित करण्यापासून तर भविष्यातील कमाईचे साधन म्हणूनही करता येईल.
2. वन्यजीव संरक्षण आणि जनजागृती – शेतकऱ्यांना योग्य माहिती देऊन पर्यावरणपूरक उपाययोजना शिकवणे. म्हणजे जसे की वानर येतात म्हणून शेतामध्ये झाडेच ठेवू नये हे चुकीचे आहे. वन्य जीवन पासून संरक्षण ही बाब वेगळी मात्र त्यांच्याही अधिवासाचा सन्मान करण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे.
3. पाणथळ भाग व जलाशय निर्माण करणे – जंगलातच प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून त्यांना शेतीत जाण्यापासून रोखणे. आपल्या भागातील जंगलांची अनावश्यक वृक्षतोड झाली नाही तर जंगलातील प्राणी शेताकडे येणार नाही.त्यामुळे वृक्षतोड होणार नाही.ज्या परिसरात वृक्षतोड झाली आहे. त्या परिसरातील वृक्षारोपण मोठ्या प्रमाणे व्हावे. जंगले संरक्षित व्हावी. त्या ठिकाणी पाणथळे निर्माण व्हावी. उन्हाळ्यात सौर ऊर्जेवरील मोटर पंप मार्फत जंगली जनावरांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, अशा उपायोजना आवश्यक आहे.
मृदासंवर्धन आणि धूप रोखणे
शेतीसाठी सर्वात मोठा धोका म्हणजे जमिनीची धूप. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे मातीचा कस कमी होतो आणि सुपीक माती वाहून जाते.पावसाळ्यात जास्त प्रमाणात मृदा धूप होते आणि शेतीसाठी उपयुक्त जमीन कमी होते.यावर उपाय म्हणजे मृदासंवर्धन. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण रुंदीकरण, आडवे उभे चर तयार करणे आधी उपायोजनातून मृदा संवर्धन आणि धूप रोखण्याचे काम होणे खूप आवश्यक आहे.
वृक्षारोपण:
1. शेतीच्या बांधावर आणि डोंगराळ भागात झाडे लावणे.
2. पावसाचे पाणी अडवण्यासाठी गटार बंधारे आणि लहान जलाशय बांधणे.
3. सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणे.
4. शाळांमधून वृक्षारोपणाची शपथ घेणे
5. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वृक्षारोपण तसेच जंगलातील तात्पुरत्या बंधार्यांसाठी प्रेरित करणे
6. गाव पातळीवर महानगर पातळीवर विविध उपक्रम राबविणे
7. वृक्ष लागवडीची चळवळ निर्माण करणे आवश्यक आहे
सार्वजनिक सहभाग
पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही. तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राज्य सरकारने जलयुक्त शिवार, माझी वसुंधरा अभियान, वृक्षारोपण मोहीम आणि जलसंधारण योजना अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र लोकांमधून या योजना लोक चळवळीत रूपांतरित झाल्या पाहिजे केवळ ही कामे सरकारी ठरू नये लोकांची याबाबतची मानसिकता बदलीने व या कामांमध्ये सार्वजनिक सहभाग वाढविणे असा प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे. विदेशामध्ये सीड बॉल सारख्या मोहिमेतून वृक्ष लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 140 कोटीच्या देशातील प्रत्येक हाताने एक वृक्ष जरी लावला तर किती मोठे जंगल तयार होईल. फिरायला गेल्यानंतर सीडबॉल फेकल्या गेले तर जंगलातील विविधता वाढायला मदत होईल. आपल्यासाठी,आपल्या ओळखीचे चिरंतर आठवण देणारे एक झाड जरी आपण लावू शकलो तर किती आनंद होईल..?
आपण काय करू शकतो ?
१. झाडे लावा आणि त्यांचे संरक्षण करा – जास्तीत जास्त वृक्षारोपण करा.
२. पाण्याचा अपव्यय टाळा – जलसंधारणासाठी कृती करा.
३. वन्यजीव आणि जंगलांचे रक्षण करा – जंगलतोड थांबवा आणि नैसर्गिक अधिवास वाचवा.
४. कचरा व्यवस्थापन सुधारावा – प्लास्टिकचा वापर कमी करावा
५. शासनाच्या पर्यावरणपूरक योजनांमध्ये सहभागी व्हा – जलसंधारण, वृक्षारोपण आणि जैवविविधता संवर्धनासाठी प्रयत्न करा.
अशा छोट्या छोट्या उपाययोजनामधून देखील आपण मोठे करू शकतो. मराठवाड्यासारख्या भागात दुष्काळ का याचा विचार घराघरात जर झाला आणि त्यावर प्रत्येक घरात उपाय योजना सुचवल्या गेली प्रत्यक्षात अमलात आली गेली तर ती एक मोठी क्रांती ठरेल.जर आपण आजच सकारात्मक पाऊल उचलले, तर भविष्यातील पिढ्यांसाठी एक समृद्ध आणि पर्यावरणपूरक महाराष्ट्र घडवू शकतो. चला, एकत्र येऊन पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करूया!
तन्मयप्रसाद टाके ,
पर्यावरण स्नेही, नागपूर