Wednesday, March 9, 2022

 जिल्ह्यातील दहा नगरपरिषदेच्या

सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहिर


·   आक्षेप, हरकती, सूचना असल्यास मुदतीत सादर करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यात मे 2020 ते फेब्रुवारी 2022 मध्ये मुदत संपलेल्या कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदांच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम-2022 जाहिर करण्यात आला आहे. या नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभाग रचनेवर ज्या कोणत्याही व्यक्तींचे आक्षेप, हरकती, सूचना असतील तर त्यांनी कारणासह, संबंधित नगरपरिषदांच्या मुख्याधिकारी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात गुरुवार 10 मार्च ते मंगळवार 17 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत लेखी सादर करावे. मुदतीनंतर आलेले आक्षेप, हरकती, सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

या कार्यक्रमानुसार या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आालेली संबंधित नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे  (महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 चे कलम 10 नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

000000

 नांदेड जिल्ह्यात एक व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 660 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 779 एवढी झाली असून यातील 1 लाख 74 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 14 रुग्ण उपचार घेत असून यात 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 691 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे झारखंड येथील एक कोरोना बाधित आढळला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकुण 2 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 9 असे एकुण 14 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 82 हजार 681

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 63 हजार 869

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 779

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 74

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 691

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-10

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-14

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1. 

 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

दहावी परीक्षेचे अर्ज नियमित शुल्कासह भरण्याची सुविधा
नांदेड (जिमाका) दि. 9 :- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होत आहे. या परीक्षचे अर्ज नियमित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने सोमवार 14 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुदतीनंतर अर्ज भरण्यासाठीचे संकेतस्थळ बंद करण्यात येणार आहे.
मार्च-एप्रिल 2022 इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी खाजगी विद्यार्थी म्हणून नाव नोंदणीसाठी अर्ज केलेल्या परंतु प्रस्तावामध्ये त्रुटी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवार 10 मार्च 2022 पर्यंत त्रुटींची पूर्तता करून 12 मार्च 2022 पर्यंत नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन मुदतीत परीक्षेचे अर्ज भरावे. याची सर्व मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
000000

लोककलांच्या माध्यमातून विविध विकास योजनांचा जिल्ह्यात जागर 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जनसामान्याच्या विकासासाठी विविध लोकाभिमूख योजना शासनाने हाती घेतल्या आहेत. या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने लोककला पथकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहचवली जात आहे. 

राज्यातील महाविकास आघाडी शासनाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे आव्हान समर्थपणे पेलून अनेक नवीन महत्त्वपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत. ज्यांच्यासाठी या योजना आहेत त्या लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने ही विशेष प्रसिद्धी मोहीम राबविली जात आहे. या अनुषंगाने नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 16 तालुक्यात आजपासून महाविकास आघाडी शासनाच्या योजनांचा जागर करण्यात येणार आहे. यासाठी शासनाच्या यादीवरील लोककलापथकांतील गुणवत्तानुक्रमाणे 5 संस्थाची निवड करण्यात आली आहे. 

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने या पारंपारिक माध्यमातून लोककलांचा जागर करण्यात येणार आहे. शासकीय योजनांचा जागर करण्यासाठी शासन निर्णयात नमूद जिल्ह्यातील राम मनोहर लोहिया प्रतिष्ठान विकास महामंडळ दगडगाव, ता. लोहा, सजामाता बहुउद्देशिय सांस्कृतिक कला प्रतिष्ठान गवळेवाडी, पो. दापका (गु) ता. मुखेड, शिवशक्ती कलामंच, शिवनेरीनगर विमानतळ परिसर नांदेड, जनजागृती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था डोंगरगाव ता. मुदखेड, कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व व्यायामशाळा कुंचेली ता. नायगाव या संस्थाच्यावतीने कार्यक्रम सुरू आहेत. 

दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची या घोषवाक्यासह आजपासून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बाजाराच्या ठिकाणी, आठवडी बाजार या गर्दीच्या ठिकाणी हे कलापथक शासनाच्या योजनांवर आधारीत एकूण 59 कार्यक्रम सादर करणार आहेत. 

यापैकी आज जनजागृती बहुउद्देशिय सेवाभावी संस्था डोंगरगाव यांच्यामार्फत हिमायतनगर येथील गणपती मंदिरासमोर कार्यक्रम सादर करण्यात आला. शिवशक्ती कला मंच शिवनेरीनगर या कलापथकामार्फत अर्धापूर बसस्टॅडच्यासमोर खंडोबा मंदिराजवळ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष छत्रपती कानोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक पंडीतराव लंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अर्धापूर तालुक्यातील देळूब येथे दुसरा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन देळूबचे सरपंच अजेर पठाण यांनी केले तर उपसरंपच अनिल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कै. सोपानराव तादलापूरकर क्रीडा मंडळ व व्यायामशाळा कुंचेली यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कोर्टाच्या बाजूला देगलूर येथे कार्यक्रम सादर केला आहे. यावेळी तडखेलचे पोलीस पाटील, पत्रकार सोनकांबळे व जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत विकास योजनांची माहिती या मोहिमेद्वारे प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्यक्त केला आहे.

00000








 


महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...