Tuesday, November 12, 2024

वृत्त क्र. 1075

दुसऱ्याच्या प्रचाराचे गाणे वापरणाऱ्या उमेदवारावर गुन्हा दाखल 

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर :- विधानसभा निवडणुकीमध्ये लोहा मतदारसंघात एका उमेदवाराने दुसऱ्या उमेदवाराचे गाणे वापरल्यासंदर्भात लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रचार साहित्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची (एमसीएमसी) परवानगी आवश्यक आहे. मात्र ही परवानगी तर घेतलीच नाही उलट नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांचे गाणे वापरले तसेच प्रचारात लोकांची दिशाभूल केली. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आशाबाई श्यामसुंदर शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी प्रमोद एकनाथ शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी 88-लोहा यांना यासंदर्भात तक्रार दिली आहे. लोहा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाच्या आशाबाई श्यामसुंदर शिंदे  निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याच नावाशी साधर्म्य असणाऱ्या अन्य अपक्ष महिला उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी शेकापच्या आशाबाई यांच्या प्रचार गीताची कॉपी केली असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये श्यामसुंदर शिंदे यांनी अपक्ष महिला उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे हे प्रचार गीत आणि आमचे नेते कै. भाई केशवराव धोंडगे, गुरुनाथ कुरुडे यांचे छायाचित्र प्रचारात वापरत असून गाडी क्र. एमएच 26 एडी 9286 महिंद्रा बोलेरो व अन्य गाड्यांद्वारे अपप्रचार करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी लोहा यांनी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून अहवाल घेतला होता. अपक्ष उमेदवार आशाताई श्यामसुंदर शिंदे निशाणी ट्रक यांनी कक्षाकडून जाहिराती ईलेक्ट्रॉनिक माध्यमाकडून प्रसारित करण्यास परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रचार गाणे विनापरवानगी वापरणे, नेत्यांचे चेहरे व व्हिडीओ प्रचारासाठी वापरणे व त्याद्वारे मतदारांची दिशाभूल करणे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 171, कलम 174 व कलम 223 अंतर्गत अज्ञात वाहनचालकाच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

00000

 लक्षवेध

अत्यंत महत्त्वाचे

 मा. संपादक महोदय,

अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रचाराच्या प्रेस नोट जशाच्या तशा उमटत आहेत. कृपया किमान बातमीचे शीर्षक. साधारण इंट्रो यामध्ये बदल करण्याबाबत कृपया उपसंपादकांना सूचना द्यावी. जसाच्या तशा कॉपी-पेस्ट होऊ नये. सारख्या बातम्या सनियंत्रण समितीकडून पेड न्यूज झाल्यास उमेदवारांच्या खात्यात त्याचे देयक जाहिरातींच्या दरानुसार खर्च जमा करावा लागेल. कृपया सहकार्य करावे, ही नम्र विनंती🙏🏻 💐

वृत्त क्र. 1074

'वोट करेंगा वोट करेंगा, सारा नांदेड वोट करेंगा '























वृत्त क्र. 1073

विनापरवानगी बल्क व्हाईस मेसेज टाकणाऱ्या तीन उमेदवारांना नोटीस

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर :- निवडणूक काळामध्ये उमेदवारांनी प्रचार साहित्याची पुर्वपरवानगी घेणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. व्हिडीओ, ऑडिओ, बल्क मेसेज, ऑडिओ मेसेज, प्रचाराची रिल, छोटे व्हिडीओ याची परवानगी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कक्षाकडून घ्यावी लागते. मात्र अशा पध्दतीची परवानगी न घेणाऱ्या तीन उमेदवारांना नांदेड उत्तर चे निवडणूक निर्णय अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी नोटीस बजावली आहे. 

माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती जिल्ह्यामध्ये स्थापन झाली आहे. प्रसारमाध्यमाचा वापर करताना उमेदवारांनी निवडणूक आयोगाचे निर्देश पाळणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एमसीएमसीची परवानगी आवश्यक आहे. मात्र बल्क व्हाईस मेसेज पाठविणारे निवडणुकीतील उमेदवार श्रीमती संगीता विठ्ठल पाटील, देशमुख मिलींद उत्तमराव, बालाजी देविदास कल्याणकर यांनी परवानगी न घेताच बल्क मेसेज प्रसारित केल्याचे निर्देशास आले आहे. 

यासंदर्भात जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, नांदेड यांनी याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी 86-नांदेड उत्तर यांनी अवगत केले. त्यामुळे दि. 12 नोव्हेंबर रोजी या संदर्भातील नोटीस बजावण्यात आली आहे. एमसीएमसी कक्षाची परवानगी न घेता प्रसारित केलेल्या बल्क एसएमएस संदेशासाठी 24 तासाच्या आत खुलासा करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. 

यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी उमेदवारांनी मुक्त वातावरणात प्रचार प्रसार करावा, मात्र नियमाचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ईलेक्ट्रानिक्स फॉरमॅटमधील सर्व ऑडिओ, व्हिडीओ साहित्याला परवानगी आवश्यक आहे. तसेच बल्क एसएमएस, व्हाईस एसएमएस प्रसारित करणाऱ्या कंपन्यानी उमेदवारांकडून परवानगी असल्याशिवाय प्रसारण करु नये, असेही स्पष्ट केले आहे. मुद्रित माध्यमाच्या जाहिरातींसाठी मात्र शेवटच्या दोन दिवसात परवानगी घ्यावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

00000

वृत्त क्र. 1072

शुक्रवारी नायगाव मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तीसरी तपासणी

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 89-नायगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची  निवडणूक खर्चाची तीसरी तपासणी तहसील कार्यालय, नायगाव येथे शुक्रवार 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 5 वाजता या कालावधीत होणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे. 

या तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी असे ८९-नायगांव विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

वृत्त क्र. 1071

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याच्या मदतीला टपाली मतदान सुविधा

नांदेड, दि. १२ नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व निवडणूक कामात असलेले कर्मचारी मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर कार्यरत असल्यामुळे मतदान करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांना टपाली मतदान करण्याची सुविधा सुलभता केंद्रावर उपलबध करुन देण्यात आली आहे. 

 या प्रक्रियेतील अंतिम टप्पा सध्या सुरू असून यासाठी सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये टपाल मतदानाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे. वेळेत आणि दिलेल्या तिथीवर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्यामुळे आता ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीचा वापर केला जात आहे.

टपाली मतदान करण्यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांना फार्म नं. १२ भरुन यापूर्वीच दिला आहे. यासोबत मतदान कार्ड, झेरॉक्स जोडून फॉर्म भरावा लागतो. तो फार्म महाइलेक्शनवर अपलोड करुन त्यानंतर विवरणपत्र 4 तयार होते. त्यानंतर ते पोस्टल बॅलेट टपाली कक्षात जमा करण्यात येते. 

नांदेड जिल्हयातील लोकसभा पोटनिवडणूक व नऊ विधानसभा मतदार संघातील अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्याचा फार्म नं. १२ पहिल्या ट्रेनिंग मध्ये भरुन घेण्यात आला आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदार सघासाठी दिनांक 12 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 10 ते 5 या कालावधीत केंद्रीय विद्यालयात, तर त्या त्या ठिकाणी दुसऱ्या ट्रेनिंग मध्ये टपाली मतदान करुन घेण्यात येणार आहे.   नांदेड उत्तर मतदार संघासाठी 14 ते 18 नोव्हेंबर रोजी नियोजन भवनला सकाळी 10 ते 5 या कालावधीत टपाली मतदान करुन घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी दिली आहे. 

00000

  वृत्त क्र. 1070

अॅडमीन साहेब ! तुमचा ग्रुप ओन्ली अॅडमीन करा !

सोशल मिडीयाचा निवडणुकीचा काळात जबाबदारीने वापर करावा

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात असून या काळात कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही तसेच माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या निर्देशाचा भंग होणार नाही यासाठी विविध व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन व सर्व ग्रुप ओन्ली एडमिन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

समाज माध्यमांवर व्यक्त होताना अतिशय जबाबदारीने व्यक्त होण्याचा हा काळ आहे. मात्र अनेकजण या काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रचार प्रचाराचा भाग होऊन जातात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया मॉनिटरिंग सुरू आहे . त्यामुळे याबाबत ॲडमिनने अधिक दक्ष असण्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाने काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.

लोकसभा पोटनिवडणुक 2024 व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 पर्यत आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर 2024 रोजी व निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. या कालावधीत व्हॉटसॲप ग्रुपचे ॲडमीन यांनी ग्रुपच्या सेंटीगमध्ये ओन्ली ॲडमीन बदल करुन घ्यावा, जेणेकरुन ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोट करणार नाहीत असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे. 

तरी नागरिकांनी सोशल मिडीयाद्वारे फेसबुक, इस्टाग्राम, व्हॉटसअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरुपाच्या पोस्ट, कॉमेटस, स्टोरी स्टेटस, डिजीटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करु नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करु नये, डिजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाही, रंग गुलाल उधळणार नाही. संबंधीत विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करु नयेत. व्हॉटसॲप ग्रुपचे ॲडमीन यांनी 15 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीत त्यांच्या ग्रुपच्या सेटींगमध्ये ओन्ली ॲडमीन करुन बदल करुन घ्यावा. जेणेकरुन ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट् ग्रुपवर टाकणार नाहीत. जर ॲडमीन यांनी सेंटीगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्याला व ॲडमीनला जबाबदार धरुन योग्य ती कायदेशिर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी,असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस विभागातर्फे केले आहे. 

0000

 वृत्त क्र. 1069

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाई 2 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. 11 नोव्हेंबर रोजी विभागाने 13 ठिकाणी धाडी टाकून एकूण 2 लाख 56 हजार 850 रुपयांच्या मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

11 नोव्हेंबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये विविध ठिकाणी एकुण 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या जानमालामध्ये एकूण 13 गुन्हे, वारस 13, अटक आरोपी 14, देशी मद्य 84.95 लि.,  विदेशी मद्य 84.95 लि, बिअर 31.20 लि, जप्त वाहन संख्या 04  जप्त असे एकूण सर्व मुद्येमाल 2 लाख 56 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागास दक्ष राहण्याचे व आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिले आहेत. त्यानंतर जिल्ह्यामध्ये विभागामार्फत धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. निवडणूक काळामध्ये यामध्ये अधिक वाढ करण्यात आली असून अवैध दारू विक्रीवर विभागाची काटेकोर नजर आहे.  

जिल्ह्यात आचारसंहिता लागू असून या काळामध्ये कोणीही अवैध मद्य खरेदी करू नये. तसेच स्वत:जवळ बाळगू नये, असे आवाहन विभागाने केले आहे. मद्याचा गैरवापर निवडणूक काळात होत असल्यास या संदर्भात विभागाला नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसॲप क्र. 8422001133 यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कारवाईमध्ये अधिक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नमाला गायकवाड, जावेद कुरेशी, आशिष महिंद्रकर, सरकाळे यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

0000

नांदेड पोलिसांचे आवाहन


 

 वृत्त क्र. 1068

नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 

अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण  संपन्न

११०० प्रशिक्षणार्थ्यानी घेतले प्रशिक्षण

नांदेड, १२ नोव्हेंबर:-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेतील शिस्तबद्धता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण नागार्जुना पब्लिक स्कुल,कौठा, नांदेड येथे आज 12 नोव्हेंबर रोजी  यशस्वीरित्या संपन्न झाले. 

आजच्या प्रशिक्षणामध्ये जवळपास 1100 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटकांवर तसेच ईव्हीएम मशीन (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) व वीव्हीपॅटच्या (VVPAT) वापरावर विशेष प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी डॉ खल्लाळ यांनी प्रथम क्षेत्रिय अधिकारी यांना सूचना देवून मार्गदर्शन केले. 

त्यानंतर मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक प्रक्रियेतील संपूर्ण माहिती देणाऱ्या लोकविधान पोर्टलचे महत्त्व विशद करुन या पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षण स्थळी जागोजागी या पोर्टलचा वापर करण्यासाठी बारकोड लावण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षणपीठावर मनपा उपायुक्त सुप्रिया टवलारे, सहायक आयुक्त मनिषा नरसाळे, तहसिलदार प्रविण पांडे,नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलु, संजय नागमवाड यांची उपस्थिती होती.

मुख्य प्रशिक्षक संघरत्न सोनसळे यांनी प्रशिक्षण देतांना मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, पारदर्शकता, मतदारांची ओळख तपासणी, गुप्त मतदान प्रक्रिया, मतपेटी हाताळणी, तसेच ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत  ईव्हीएम आणि वीव्हीपॅटची कार्यप्रणाली स्पष्ट करून कर्मचाऱ्यांना मशीनच्या सुसज्जतेबाबत दक्ष राहण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी मतदान केंद्रांवरील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तंत्रांचा वापर कसा करावा ,याचेही मार्गदर्शन केले.मतदानाच्या प्रक्रियेत काटेकोर पालन करणे कसे महत्त्वाचे आहे यावर त्यानी भर दिला. ईव्हीएम मशीनची सुरक्षित हाताळणी, मशीन प्रमाणपत्र तपासणे, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतपेट्यांचे सुरक्षित हस्तांतरण यासारख्या विषयांवर त्यांनी प्रशिक्षण दिले.  तसेच मतदान केंद्रांवरील सुरक्षा व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले.

 मतपेटी आणि ईव्हीएमची सुरक्षित हाताळणी, मतमोजणी प्रक्रिया आणि मतदानाच्या वेळी शक्य असलेल्या तांत्रिक अडचणींवर मार्गदर्शन केले. ईव्हीएम आणि वीव्हीपॅट वापराचे तंत्र आणि त्यातील तांत्रिक बाबींसाठी कर्मचार्‍यांना विशेष निर्देश दिले, ज्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत सुलभता निर्माण होईल. यावेळी काही मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी आपले प्रश्न उपस्थित केल्यामुळे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कोणत्या समस्या निर्माण होतात आणि उपाय कोणते, हे सर्वांना समजले. प्रशिक्षण दरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रियेत येणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत प्रश्न विचारले आणि त्यांना तज्ञांकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली.

या प्रशिक्षणमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला असून, ते आता आगामी निवडणुकीसाठी अधिक सज्ज झाले आहेत. यानंतर  एकूण  15 विविध कक्षामध्ये प्रत्येकी 40 जणांस तंत्रज्ञानाचा अचूक वापर करुन प्रत्यक्ष कृतीतून प्रशिक्षण देण्यात आले.  प्रशिक्षण कंटाळवाणे  होवू नये प्रशिक्षणार्थांनी सुध्दा सक्रीय सहभाग घेऊन या आधुनिक तंत्राचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतला.ही प्रक्रिया राबविण्यासाठी शाळेचे संचालक केशव गड्डम यांनी आपल्या संपूर्ण तंत्रज्ञ टिमसह तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी भरीव सहकार्य केले आहे. तंत्रज्ञ म्हणून सुशील माळवतकर, मोईन खान यांनी कार्य केले. प्रत्यक्ष मतदान यंत्र कसे हाताळावे याचे प्रात्यक्षिक मास्टर ट्रेनर मोहन कलंबरकर, धर्मेंद्रसिंग शिलेदार, सचिन राका, गजानन मस्के यांनी दाखवले.या प्रशिक्षणाचे सुत्रसंचालन व आभार संजय विश्वनाथ भालके यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पेशकार राजकुमार कोटुरवार,नियोजन सहाय्यक बी.एस.पांडे,मकरंद भालेराव, राजेश कुलकर्णी, एस.व्ही.भालके प्रा. डॉ.घनश्याम येळने,डॉ सचिन नरंगले, बालासाहेब कच्छवे, हनुमंत राठोड,जमील शेखसह सर्व नांदेड तहसील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

०००००
























 वृत्त क्र. 1067

लोकसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी

नांदेड, दि. 12 नोव्हेंबर :- लोकसभा पोट निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची  निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी कै. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, नांदेड येथे बुधवार 13 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 10 ते 5 वाजता या कालावधीत होणार आहे. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षकासमोर सादर करणे आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम , 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वत: किंवा त्याच्या, तीच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्याला, तीला नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्या दिनांकापासून निवडणुकीच्या निकाल लागण्याच्या दिनांकापर्यत दोन्ही दिनांक धरुन, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे.

या तपासणीस अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार कार्यवाहीस पात्र असतील तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल यांची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...