Monday, January 2, 2023

वृत्त क्रमांक 4

ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचा बहाद्दरपुरा येथे  

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 

·    शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी

पुष्पचक्र अर्पण करून दिली श्रद्धांजली 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- मराठवाड्यातील कंधार, लोहा, मुखेड या तीन तालुक्यांच्या सिमेवर असलेल्या डोंगराळ भागातील शेतकरी कष्टकऱ्यांचा लोकनेता म्हणून गणल्या गेलेल्या स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांच्यावर आज बहाद्दरपुरा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शासनाच्यावतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.      

स्वातंत्र्यसेनानी केशवराव धोंडगे यांना जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. केशवराव धोंडगे यांच्या अर्धांगिनी चंद्रप्रभावतीबाई धोंडगे यांच्याकडे पार्थिवावरील तिरंगा यथोचित सन्मानाने सुर्पूद करण्यात आला. ॲड मुक्तेश्वर धोंडगे, प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे या दोन सुपुत्रांसह त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांना यावेळी शोक अनावर झाला.  यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शोकसंदेशाचे वाचन करण्यात आले.

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार विक्रम काळे, आमदार बाबासाहेब पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांताताई पाटील, माजी मंत्री कमलकिशोर कदम, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, माजी आमदार गुरुनाथराव कुरूडे, ईश्वराव भोसीकर, पाशा पटेल, ओमप्रकाश पोकर्णा, रोहिदास चव्हाण, शंकरअण्णा धोंडगे, ज्ञानोबा गायकवाड, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. उद्धवराव भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000




वृत्त क्रमांक 3

 औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक

कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण संपन्न   

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- निवडणूक आचारसंहितेबाबत भारतीय निवडणूक आयोगाने स्वयंस्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घेतली पाहिजे. यासंदर्भात दिरंगाई, इतर कारणे लक्षात घेतली जाणार नाहीत, असे निर्देश, जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले. 

05-औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यपद्धतीबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे प्रशिक्षण आज आयोजित केले होते.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपरजिल्‍हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संतोषी देवकूळे, तहसिलदार ज्योती चव्हाण व निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले सर्व तालुक्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांचे निराकरण जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी योग्यरितीने झाली पाहिजे यासाठी आपण शासन, प्रशासन म्हणून काम केले पाहिजे असे अपरजिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगितले.   

औरंगाबाद शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीत तीन पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकामध्ये फ्लाईग स्कॉड टीम (FST), व्हिडीओ सरव्हायलन्स टीम (VST), व्हीडीओ व्हिवींग टीम (VVT)  याचा समावेश आहे. ही पथके भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तयार करण्यात आली आहेत. या पथकात नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आचारसंहितेचे उल्लंघन व आचारसंहितेबाबत तक्रार प्रकरणांची चौकशी, मतदारास लाच देणे, धमकी देणे, गैरवाजवी दडपण टाकणे, समाजकंटकाच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, शस्त्र बाळगणे, मतदारांना लाच देण्यासाठी मद्य व पैशाचा वापर करणे यासंदर्भात प्राप्त तक्रारीची चौकशी करणे, निवडणूक संदर्भात होणाऱ्या खर्चाबाबत प्राप्त तक्रारींची चौकशी करणे आदी जबाबदारी आहे.  प्रत्येक महत्वाच्या घटनांचा तपशिल पाहून निरीक्षणे नोंदविणे तसेच सीडीत आढळलेल्या बाबींचा अहवाल त्यादिवशी सादर करण्याबाबतचे प्रशिक्षण व सादरीकरण निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोषी देवकूळे यांनी केले.

00000

वृत्त क्रमांक 2

 प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे  

तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबीर

 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीसाठी जानेवारी ते मार्च 2023 मध्ये तालुका शिबिर कार्यालयाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधीन राहून ऑनलाईन अपॉटमेंट प्रत्येक महिन्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु करण्यात येईल. अपॉटमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याबाबतची नोंद घ्यावी व शिबिर कार्यालयास उपस्थित राहावेअसे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

 

तालुकानिहाय शिबिराचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे आहे. कंधार येथे 4 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 3 मार्च 2023 तर किनवट येथे 6 जानेवारी, 6 फेब्रुवारी, 6 मार्च 2023 आहे. मुदखेड येथे 9 जानेवारी, 8 फेब्रुवारी, 8 मार्च 2023 रोजी आहे. हदगाव येथे 11 व 20 जानेवारी, 10 व 20 फेब्रुवारी, 10 व 20 मार्च 2023 रोजी आहे. धर्माबाद येथे  13 जानेवारी, 13 फेब्रुवारी, 13 मार्च 2023 रोजी आहे. तर हिमायतनगर येथे 27 जानेवारी, 24 फेब्रुवारी , 29 मार्च 2023 रोजी आहे. माहूर येथे 16 व 30 जानेवारी, 16 व 28 फेब्रुवारी, 16 व 30 मार्च 2023  रोजी आहे. यानुसार शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्रमांक 1

 नांदेड येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- रस्ते अपघातात होणारी वाढ व यात होणारी जीवीतहानी दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. परिवहन विभागाने जे नियम दिले आहेत त्या नियमानुसार वाहनांची निगा व गतीबाबत दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले तर प्रत्येकाच्या जागरुकतेतून अपघातांची ही संख्या आपल्याला कमी करता येऊ शकेल. कायद्याच्या पालनासह वाहन चालवितांना योग्य ती दक्षता घेतली तर यात होणारे मृत्यूचे प्रमाण आपल्याला कमी करता येऊ शकेल, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर-जज यांनी केले.

 

रस्ता सुरक्षा अभियानाच्या आज आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. हेलमेंट परिधान केलेल्या दुचाकीस्वार व सीटबेल्ट परिधान केलेल्या चारचाकी चालक व इतर प्रवाशी यांना गुलाबपुष्प देऊन त्यांच्या हस्ते आज प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी पोलीस विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाबाबत जनतेला आवाहन करून वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याबाबत सांगितले. अशा उपक्रमातून लोकांनी लोकांचे प्रबोधन केल्यास सुरक्षिततेची भावना व काळजी मोठ्या प्रमाणात वाढीस लागेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.

 

आज सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालय चौक येथे सकाळी राबविलेल्या या उपक्रमामुळे चालक व प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण झाली. हे अभियान उद्या 3 जानेवारी रोजी आयटीआय चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, देगलूर नाका, कर्मवीर अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राबविले जाणार आहे. यावेळी सर्व वाहन चालकांना वाहतुक चिन्हे यांची माहितीपत्रके वाटप करण्यात येतील. त्यामुळे वाहनचालकांना भविष्यात वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहित होण्यास मदत होईल.

 

बुधवार 4 जानेवारी 2023 रोजी प्रबोधनात्मक उपक्रमात देगलूर नाका येथे सकाळी 9 वा. वाहतुक नियमांचे पालन न करणारे वाहन चालक हेल्मेट / सिटबेल्ट परिधान न केलेले वाहन चालक, ट्रिपल सीट वाहन चालविणारे वाहनचालक यांना रस्त्याच्या बाजुला थांबवून वाहतुक नियमांबाबत व होणाऱ्या अपघाताच्या तीव्रतेबाबत प्रबोधन करण्यात येणार आहे.

 

गुरुवार 5 जानेवारी 2023 रोजी पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यात स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे विद्यार्थी व फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्यामार्फत पथनाट्याद्वारे गर्दीच्या ठिकाणी अपघाताबाबत प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरकारी आस्थापना, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

 

शुक्रवार 6 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9 वा. उजव्या बाजुने चालणे हा अभिनव उपक्रमात सर्व विभागप्रमुख, एनसीसी, स्काऊट गाईड, एनएससचे विद्यार्थी, मान्यवर यांच्याद्वारे उजव्या बाजुने चालणेबाबत शपथ घेतल्यानंतर शहरात दोन प्रतिनिधीक स्वरुपात रॅलीद्वारे संचलन करण्यात येईल. कार्यक्रमाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे होणार आहे. रस्ता सुरक्षा अभियान 2023 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे ज्ञान व अपघातांबाबत करण्यात येणाऱ्या माहिती व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000 






  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...