Thursday, February 18, 2021

सुधारित वृत्त

58 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

35 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- गुरुवार 18 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 58 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 30 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  35  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 619 अहवालापैकी 558 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 22 हजार 988 एवढी झाली असून यातील 21 हजार 905 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 281 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. बुधवार 17 फेब्रुवारी रोजी भोकर येथील 75 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 591 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 23, किनवट कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 7, भोकर तालुक्यांतर्गत 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, हैदरबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 35 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.28 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 19, भोकर तालुक्यात 2, हिमायतनगर 1, पुणे 1, नांदेड ग्रामीण 2, हदगाव 1, हिंगोली 2 असे एकुण 28 बाधित आढळले.  ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 18, किनवट तालुक्यात 5, बिलोली 1, परभणी 1, मुदखेड 2, कंधार 1, देगलूर 1, यवतमाळ 1 असे एकूण 30 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 281 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 27, किनवट कोविड रुग्णालयात 15, हदगाव कोविड रुग्णालय 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 146, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 32, खाजगी रुग्णालय 33 आहेत.   

गुरुवार 18 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 159, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 82 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 20 हजार 670

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 93 हजार 270

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 22 हजार 988

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 905

एकुण मृत्यू संख्या-591

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.28 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-281

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.          

0000


 

संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे नियुक्ती 

भारतीय सूचना सेवेचे वरिष्ठ अधिकारी संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष अजमेरा हे सन 2008 तुकडीचे अधिकारी आहेत. सध्या तेभारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. 

विविध माध्यमातून सरकारी योजनांची माहिती समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवीणे आणि जनजागृती करणे,हे या विभागाचे कार्य आहे. संतोष अजमेरा यांनी साचेबद्ध जनजागृती प्रकारांना फाटा देत, नवीन माध्यमांचा उपयोग करत, अनेक नवीन संकल्पना राबविल्या. भारत सरकारच्या विविध योजना, जनजागृती अभियानकार्यक्रम जसे की स्वच्छता अभियान,जलशक्ती अभियान, आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, आंतरराष्ट्रीय योग दिन, कोरोना जागृती, कोरोना लसीकरण इ. विषय तळागाळापर्यंत नेले आणि लक्षवेधी बनविले. सामाजिक वर्तणूक बदल घडवून आणण्यात मोठा हातभार लावला. ग्रामीण तसेच शहरी भागात या उपक्रमांना लक्षणीय प्रतिसाद मिळाला. 

यापूर्वी देखील नवी दिल्ली येथे 2013च्या सुमारास न्यू मीडिया विंगचीस्थापना करण्याची जबाबदारी अजमेरा यांनी पार पाडली आहे. याअंतर्गत ‘Talkathon’सारखा अनोखा कार्यक्रम समोर आणला गेला, ज्याला बरेच यश मिळाले. त्यानंतर पुणे स्थित राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) येथे राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेसाठी (NationalFilmHeritageMission) विशेष अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. भारतीय चित्रपटांचा वारसा जतन करून ठेवण्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली. राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेसह प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा राज्य)चा कार्यभार एकाचवेळी ते सांभाळत होते. या सर्व विभागातील त्यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे अजमेरा यांची नेमणूक करण्यात आली आहे.येत्या राज्य व केंद्रीय निवडणुकांमध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका असू शकते. 

मराठवाडा भागातून पुढे आलेले संतोष अजमेरा बॅडमिंटन खेळाडू असून लेखक देखील आहेत.आतापर्यंत त्यांनी लिहिलेल्या सात पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. अजमेरा यांनी लिहिलेले ‘Ethics,Integrity and Aptitude’ हे पुस्तक अमेरिका स्थित MC Graw Hill Publication यांनी प्रकाशित केले आहे. महात्मा गांधी यांच्या जीवनाचा अभ्यास सध्या ते करत आहेत. याकरिता आयुष मंत्रालय, भारत सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे.

00000

 

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय

पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 18 :- स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी 3 मार्च 2021 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. नांदेड जिल्ह्यातील लेखकांना व प्रकाशकांना या योजनेंतर्गत प्रवेशिका सादर करणे सुलभ व्हावे म्हणून या स्पर्धेसाठी माहिती पुस्तिका व प्रवेशिकेची प्रत सामान्य शाखा-1 जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.      

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2020 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात 1 फेब्रुवारी 2021 ते 3 मार्च 2021 पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिक सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. 

महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेशया सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार- 2020 नियमावली व प्रवेशिकाया शीर्षाखाली व ‘What’s New’ या सदरात ‘Late Yashvantrao Chavan State Literature Award -2020 Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 फेब्रुवारी ते 3 मार्च 2021 या विहित कालावधीत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करुन शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संसकृती मंडळ, रविंद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी मुंबई – 4000 25 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन‍ जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य 1 फेब्रुवारी ते 3 मार्च 2021 या विहित कालावधीत पाठवावे, असे आवाहन सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.   

लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकिटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2020 साठी प्रवेशिकाअसा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दिनांक 3 मार्च 2021 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर (दि. 1 फेब्रुवारी 2021 ते 3 मार्च 2021) येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत, असेही आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संसकृती मंडळाचे सचिव यांनी केले आहे.

000000

 

योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी

22 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होणार तपासणी

नांदेड, (जिमाका) दि. 18:-  छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज बंद असणार आहे. ज्या वाहनांनी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी पूर्वनियोजित अपॉईटमेंट घेतली आहे. अशा वाहनांची त्या पुढील आठवड्यात 22  ते 26 फेब्रुवारी दरम्यान वाघी येथील ब्रेक टेस्ट ट्रॅक येथे तपासणी होणार आहे. यांची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी असे, आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

00000

 

 

सुरक्षित वाहतुकीसाठी

वाहतूक नियामांचे पालन करा

-         प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत

नांदेड (जिमाका) दि. 18 :- सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करुन रस्ते अपघातातील जखमींना मदत करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित 32 वा रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात आज पार पडला, यावेळी अध्यक्षस्थानावरुन श्री. कामत बोलत होते.   

याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या अभियानानिमित्त विद्यार्थी नागरिकांसाठी आयोजित केलेल्या निबंध चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण यावेळी करण्यात आले. 

जिल्ह्यातील रस्ते अपघात अपघातील मृत्यू कमी करण्याच्या उद्दिष्टाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी याकाळात सायकल रॅली, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, पथनाट्य, चित्ररथाद्वारे जनजागृती कार्यक्रम, प्रबोधन शिबिरे अशा विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या अभियानात जिल्ह्यातील मोटर ड्रायव्हिंग स्कूल वाहन वितरक पीयूसी सेंटर फकीरा सेवाभावी संस्था विविध संघटना संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याबद्दल त्यांचा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित विद्यार्थी पालकांपैकी काहींनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रुपाली येंबरवार श्रीमती जयश्री वाघमारे यांनी केले तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.राजेश गाजूलवाड, श्री.नंदकिशोर कुंडगीर, श्रीमती भलगे तसेच कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

00000




  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...