Wednesday, January 8, 2020


बावरीनगर दाभड येथे
अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्त
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड, दि. 8 :- बावरीनगर दाभड येथे 10 ते 11 जानेवारी 2020 पर्यंत बौद्ध बांधवाच्यावतीने 33 व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  या परिषदेस 3 ते 4 लाख बौद्ध भाविक व दलित बांधव मोठ्या प्रमाणात राज्य व परप्रांतातून येतात. त्यामुळे या कालावधीत कार्यक्रम शांततेत पार पाडावेत व त्यात कसल्याही प्रकारची बाधा येऊ नये व जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1959 चे कलम 36 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये 9 जानेवारी मध्यरात्रीपासून ते 11 जानेवारी 2020 च्या मध्यरात्री पर्यंत नांदेड जिल्ह्यातील पोलीस स्टेशन स्वाधिन अधिकारी अर्धापूर असलेले अमंलदार वरिष्ठ अधिकारी यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम 36 मधील पोट कलम अ ते ई प्रमाणे पुढील अधिकार प्रदान केले आहेत.
प्रदान करण्यात आलेले अधिकार पुढीलप्रमाणे - रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशा रितीने चालावे व कोणत्या रितीने वागावे याविषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व पुजा अर्चेच्या प्रार्थनास्थळाच्या सर्व जागेच्या आसपास पुजा-अर्चेच्या वेळी कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागा येथे गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा शक्यता असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे. सर्व रस्त्यावर किंवा रस्त्यामध्ये, सर्व धक्क्यावर किंवा धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागेच्या ठिकाणी व जागेमध्ये, इतर सार्वजनिक स्थळी, लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये इतर कर्कष्य वाद्य वाजविण्याचे नियम करण्याबाबत व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुचना देण्यासंबंधी. तसेच सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी ध्वनिक्षेपकांचा उपयोग करण्याचे नियम करणे त्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत.  मुंबई पोलीस अधिनियम 1959 चे कलम 33, 35, 37 ते 40, 42, 4345 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे आदेश देण्याबाबत.
हा आदेश लागू असेपर्यंत सदरच्या पोलीस स्टेशनचे परिसरात जाहीर सभा, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस फौजदार किंवा त्याच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा, मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पूर्व परवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे. सदर जाहीर सभा, मिरवणुका, पदयात्रा यात समायोजित घोषणा सोडून ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये. हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई कायदा 1959 चे कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी जारी केले आहेत.                                                        
000000


शासकीय तंत्रनिकेतनमध्ये
मराठी ग्रंथ वाचन कक्ष सुविधा

नांदेड, दि. 8 :- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतमध्ये मराठी ग्रंथ वाचन कक्ष सुविधा सुरु करण्यात आली आहे.  
दरवर्षी प्रमाणे 1 ते 15 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे राबविले जात आहेत. यावर्षी संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांच्या कल्पनेतून संस्थेतील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्यासाठी संस्थेतील ग्रंथालयात मराठी ग्रंथ वाचन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या कक्षात मराठी विश्व कोश संच, महात्मा गांधी यांच्या लिहिलेली विविध पुस्तके तसेच प्रेरणादायी महापुरुषांची आत्मचरित्रे वाचनासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय मराठी मासिक, नियतकालिके, साप्ताहिके संस्थेत नेहमीच उपलब्ध असतात. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे समन्वयक आर. एम. सकळकळे विभाग प्रमुख यंत्र अभियांत्रिकी आणि ग्रंथपाल जे. जी. शिंदे, प्रा. एस. आर. मुधोळकर, प्रा. अजय यादव, डॉ. ए. ए. जोशी, एस. आर. जगताप यांनी परिश्रम घेतले.

00000


शेतकरी सन्मान योजनेसाठी
आधार जोडणी करु घ्यावी
नांदेड, दि. 8 :- पंतप्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजनेतर्गंत लोहा तालुक्‍यातील 13 हजार 725 लाभार्थ्‍यांचे आधार जोडणी प्रलंबित आहे. त्‍यामुळे या शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळत नाही, त्‍यामुळे आधार जोडणी तात्‍काळ करुन घ्‍यावे, असे आवाहन लोहा तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केली आहे.
      लोहा तालुक्‍यातील 13 हजार 725 लाभार्थ्‍यांचे आधार जोडणी अद्याप झाली नाही. त्‍यामुळे शेतकरी सन्‍मान योजनेचा लाभ यापुढे पात्र लाभार्थ्‍यांना मिळण्‍यास अडचण येत आहे. ज्‍यांनी आधार जोडणी केलेली नाही अशा पात्र लाभार्थ्‍यांनी सेतु सुविधा केंद्रे व सीएससी सेंटर वर जाऊन आधार दुरुस्‍ती व जोडणी तात्‍काळ करुन घ्‍यावी, जोपर्यंत दुरुस्‍ती करण्‍यात येणार नाही तोपर्यंत पुढील पीएम किसान योजनेचा लाभ शेतक-यांना मिळणार नाही ,असेही आवाहन तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
     प्राधानमंत्री किसान सन्‍मान योजनेत शेतक-यांनी तात्‍काळ आधार जोडणी करावी यासाठी नायब तहसिलदार अशोक मोकले, नायब तहसिलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड व सेतु सुविधा केंद्राची टीम प्रयत्‍नशील आहे. 
0000


संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
2018-19 चा विभागस्तरीय निकाल जाहीर
नांदेड, दि. 8 :- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2018-19अंतर्गत विभागस्तरीय निकाल जाहिर करण्यात आला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम प्रथम पुरस्कार कोळवाडी, ता.जि.बीड या ग्रामपंचायतीला घोषीत करण्यात आला आहे. तर व्दितीय पुरस्कार मावलगाव ता. अहमदपूर, जि.लातुर यांना तर तृतीय पुरस्कार टोकवाडी, ता. परळी, जि.बीड आणि आलियाबाद, ता. तूळजापूर, जि. उस्मानाबाद या ग्रामपंचायतींना विभागून जाहिर करण्यात आला आहे. अशी माहिती उप आयुक्त (विकास) सूर्यकांत हजारे यांनी दिली.
00000


राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी
प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
नांदेड, दि. 8 :- स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारी 2020 पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. दिल्लीस्थित व महाराष्ट्राबाहेरील लेखक, प्रकाशक विहित नमुन्यातील प्रवेशिका महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली या  कार्यालयास पाठवू शकतात.
            राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार योजनाराबविण्यात येते. प्रकाशन वर्ष 2019  च्या पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशकांकडून31 जानेवारी 2020पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र असतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेशया सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्:मय पुरस्कार- 2019 नियमावली व प्रवेशिका  शीर्षाखाली व ‘What’s New’ या सदरात ‘Late Yashvantrao Chavan State Literature Award -२०१९ Rules Book and Application Form’ या शीर्षाखाली आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध आहेत.तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रात या स्पर्धेच्या प्रवेशिका व नियमपुस्तिका विनामूल्य उपलब्ध आहेत.
            दिल्लीस्थित व महाराष्ट्राबाहेरील लेखक, प्रकाशक पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्लीया कार्यालयास पाठवू शकतात. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटयमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई -400025 या पत्त्यावरही थेट प्रवेशिका पाठविता येतील. लेखक, प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2019 साठी प्रवेशिकाअसा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत असे साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या प्रसिध्दीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.     
००००


सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी
कार्यालयातून सुरू केले कामकाज
मुंबई, दि. 8 : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री अशोक चव्हाण यांनी आज मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला. यावेळी त्यांनी पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पावलाच्या ठशाने वाहनाची पुजा करणाऱ्या कोल्हापुरातील नागेश पाटील या पित्याला लावला आणि त्याच्याशी संवाद साधला.
श्री. चव्हाण यांनी खातेवाटप झाल्यानंतर तातडीने कामकाज सुरू केले होते. कार्यालय व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी आज कार्यालयात प्रवेश करून कामकाजास औपचारिक सुरूवात केली. त्यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, "सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून अविकसित भागाला न्याय देण्याची माझी भूमिका आहे.  मध्यंतरी मी टीव्हीवर बातमी बघितले की, लहान मुलांना पायी नदी ओलांडून शाळेत जावे लागते. अशी तातडीची गरज असेल तिथे पहिले निधी देऊ. पायाभूत सुविधा उत्तम असल्या पाहिजे. कमतरता असेल तिथे निश्चित लक्ष देऊ".
लेकीवर अपार प्रेम करणाऱ्या पित्यास फोन करून कामकाजाची सुरुवात
श्री. चव्हाण यांनी कालच श्री. पाटील यांच्या व्हॉट्सअपवर आलेला टिकटॉकचा हा व्हिडीओ ट्विट केला होता. मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले नागेश पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी नवीन वाहन खरेदी केले होते. त्या वाहनाची पूजा करताना त्यांनी आपल्या दोन वर्षीय मुलीचे पाय कुंकवात बुडवून लक्ष्मीची पावले म्हणून त्यांची छाप नव्या गाडीच्या बोनेटवर उमटवली होती. लेकीवरील अपार प्रेम व्यक्त करणारा हा व्हिडिओ अशोक चव्हाण यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करून एक पिता म्हणून आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या. श्री.चव्हाण यांनी आज सकाळी कार्यालयात आल्यानंतर पहिला फोन श्री. पाटील यांना केला व त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. 
००००


पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर
मुंबई दि. 8 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
1.      पुणे- श्री. अजित अनंतराव पवार
2.      मुंबई शहर- श्री. अस्लम रमजान अली शेख
3.      मुंबई उपनगर- श्री. आदित्य उद्धव ठाकरे  
4.    ठाणे- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
5.     रायगड - कुमारी आदिती सुनिल तटकरे
6.      रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
7.     सिंधुदुर्ग- श्री. उदय रविंद्र सामंत
8.     पालघर- श्री. दादाजी दगडू भुसे
9.      नाशिक- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
10.  धुळे- श्री. अब्दुल नबी सत्तार
11.  नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
12.  जळगाव- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
13.  अहमदनगर- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
14.सातारा- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली- श्री. जयंत राजाराम पाटील
16.  सोलापूर- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद- श्री. सुभाष राजाराम देसाई
19.  जालना- श्री. राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21.  हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
24.     उस्मानाबाद- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
25.  लातूर- श्री. अमित विलासराव देशमुख
26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27.अकोला- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ- श्री. संजय दुलीचंद राठोड
31.  नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा- श्री. सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34.     गोंदिया- श्री. अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
-----000-----


रस्ता सुरक्षा अभियान 2020
निबंध स्पर्धांचे आयोजन
नांदेड, दि. 8 :-  रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत  जिल्हयातील सर्व शालेय विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमधील विजेत्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
केंद्र शासनाने 31 वा रस्ता सुरक्षा सप्ताह दि.11.01.2020 ते 17.01.2020 या कालावधीमध्ये आयोजित करण्याचे सूचित केले आहे. मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा नागरिकांमघ्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार प्रसार होण्याकरिता दरवर्षी संपूर्ण देशभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा अभियान 2019 च्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्यावतीने जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
निबंध स्पर्धेसाठी गट विषय पुढील प्रमाणे राहतील.  मध्यम गट (इयत्ता 5 ते 8 पर्यत) रस्ते सुरक्षा हे घोषवाक्य नसून ती जीवनशैली आहे. वरिष्ठ गट (इयत्ता 9 ते 12 पर्यत) अपघातमुक्त समाजासाठी आपले योगदान.
स्पर्धेच्या अटी शर्ती पूढील प्रमाणे आहेत. निबंध स्पर्धेतील इच्छूक स्पर्धेकांनी त्यांना दिलेल्या विषयावरील आपला निबंध लिहून संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांचेकडे जमा करावेत. संबंधीत शाळेच्यावतीने प्रत्येक शाळेतून एका गटासाठी तीन सर्वोत्कृष्ट निबंधाची निवड करुन या कार्यालयात बुधवार 15 जानेवारी 2020 पर्यत कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी जमा करावेत. हे निबंध प्रादेशिक परिवहन कार्यालयातील खिडकी क्र.7 वर जमा करावेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयातील दुरध्वनी क्र.(02462) 259900 वरिष्ठ लिपीक श्री. गाजुलवाड यांचा मोबाईल क्र.7875422228 वर संपर्क करावा. स्पर्धेचा निकाल वृत्तपत्रामधुन या कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिध्द केला जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत  यांनी दिली आहे.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...