Thursday, August 11, 2022

 मागासवर्गीय विकास महामंडळाच्या

विविध योजनांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- राज्यातील ओबीसी प्रवर्गातील लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने शासनाने बहुजन कल्याण विभागांतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत कृषी संलग्न, लघु उद्योग, सेवा उद्योग इत्यादी नवीन व्यवसाय किंवा व्यवसाय वाढीसाठी वित्त पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.

 

इतर मागास वर्गीय प्रवर्गातील इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाचा दूरध्वनी 02462-220865 या क्रमांकावर किंवा www.msobcfdc.org या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेड यांनी केले आहे.

 

बीज भांडवल कर्ज योजना

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करण्यात येईल. महामंडळाचा सहभाग 20 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के व बँकेचा सहभाग 75 टक्के राहील. महामंडळाच्या रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याज दर असून परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. बँकेच्या रक्कमेवर बँक नियमानुसार व्याज दर आकारण्यात येईल.

 

थेट कर्ज योजना थेट कर्ज योजना

महामंडळाकडून व्यवसायानुसार महत्तम एक लक्ष रुपयापर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेत लाभार्थी सहभाग नाही. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. नियमित 2 हजार 85 रुपये 48 समान मासिक हप्त्यांमध्ये मुद्यल परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज द्यावे लागणार नाही परंतू थकीत झालेल्या हप्त्यांवर दसादशे 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल.

 

वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना

गरजू व कुशल व्यक्तींना व्यवसायाकरिता बँकेमार्फत वैयक्तिक कर्ज देण्यात येते. व्यवसायानुसार कर्ज रक्कम 1 ते 10 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत कर्ज देण्यात येते. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम महत्तम 12 टक्क्यांच्या मर्यादित व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरुपात बँक प्रामाणिकरणानुसार लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. लाभार्थीने ऑनलाईन वेबपोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अपलोड करावे.

 

गट कर्ज व्याज परतावा योजना

महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या निकषांनुसार वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्था बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जाईल. त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकरणानुसार महामंडळकडून अदा करण्याची ही योजना आहे.

 

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

उच्च शिक्षणासाठी राज्य, देशाअंतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थींनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करणे. अभ्यासक्रमासाठी 10 लक्ष रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी 20 लक्ष रुपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इमाव  प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, असे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ नांदेडचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

 पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील जयंती निमीत्त शेतकरी दिन संपन्‍न

नांदेड (जिमाका), दि. 11 :- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जयंती निमित्‍त जिल्‍हा स्‍तरावर शेतकरी दिन कार्यक्रम आत्‍मा कार्यालयातील सभागृहात आज संपन्‍न झाला. या कार्यक्रमात जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रगतशिल शेतकरी प्रशांत तिर्थे, सुरेश श्रीराम पावडे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषदेचे अध्‍यक्ष भागवत देवसरकर तसेच सिजेंटा कंपनीचे जिल्‍हा प्रतिनिधी विनोद राऊत यांनी मार्गदर्शन केले.

 

शेतकऱ्यांनी कृषि विभागातील विविध योजनांचा लाभ घेउन तंत्रज्ञान आधारित शेती करावी. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्‍प (पोकरा), प्रधानमंत्री सुक्ष्‍म अन्‍न प्रक्रिया उद्योग योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्‍यवसाय व ग्रामिण परिर्वतन (स्‍मार्ट) प्रकल्‍प यामधून जास्‍तीत जास्‍त गट, कंपनी व शेतकऱ्यांनी लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी मार्गदर्शन करतांना केले.

 

सिजेंटा कंपनीचे जिल्‍हा प्रतिनिधी विनोद राऊत यांनी भाजीपाला बिजोत्‍पादन बद्दल माहिती दिली. त्‍याच प्रमाणे प्रमुख पाहूणे प्रगतशील शेतकरी प्रशांत तिर्थे, सुरेश श्रीराम पावडे यांनी शेतकऱ्यांनी आधुनिक पध्‍दतीने शेती करुन आपल्‍या उत्‍पादनात वाढ करावी, असे सांगून शेतकरी दिनानिमित्‍त शेतकरी बांधवांना शुभेच्‍छा दिल्‍या.

 

या कार्यक्रमामध्‍ये धनु‍का कंपनीचे राजेंद्र ढाले यांनी किटकनाशके फवारताना घ्‍यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करुन कंपनी मार्फत फवारणी संरक्षण किट उपस्थित शेतकऱ्यांना वाटप केली. कार्यक्रमास स्‍मार्ट प्रकल्‍पाचे अरुण घुमनवाड, विशाल बि-हाडे, राहूल लोहाळे, अभिषेक व्‍हटकर, नांदेडचे मंडळ कृषि अधिकारी श्री सावंत, तालुका तंत्रज्ञान व्‍यवस्‍थापक (आत्‍मा) चंद्रशेखर कदम तसेच नांदेड तालुक्‍यातील सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि स‍हाय्यक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक उपविभागीय कृषि अधिकारी एस. बी. मो‍कळे यांनी केले. प्रस्‍तावनामध्‍ये त्‍यांनी पद्मश्री डॅा. विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या कार्याची ओळख करुन दिली. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन कृषि स‍हाय्यक  सी. एल. भंडारे यांनी केले तर आभार माधव चामे यांनी मानले.

00000



 कृषी पायाभूत सुविधा निधी योजना

कृषी संगम कार्यशाळा संपन्न

 

नांदेड (जिमाका), दि. 11 :- आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना कृषी संगम कार्यशाळा दि. 10 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेकडून आयोजित कृषी कार्यशाळेत उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. यावेळी शेती क्षेत्रात उद्योग करू इच्छिणाऱ्या शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शेतीमध्ये बदल होत असून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात नवीन उद्योग उभारले जात आहेत. अल्प तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर सुविधा मिळाव्यात यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना पाठबळ दिले जात आहे. याच हेतूने आत्मा यंत्रणने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.

 

जिल्ह्यातील सर्व वित्तीय आणि सहभागी, भागदारी संस्था, विविध शासकीय विभाग, महामंडळे आणि प्रगतशील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी  उत्पादक कंपनी यांच्यात समन्वयासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. कृषी पायाभूत सुविधा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा झाली.

 

या कार्यशाळेस जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड दिलीप दम्यायावार, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रवीण खडके, जिल्हा अग्रणी  बँकेचे अधिकारी श्री. गचके सोबत इतर बँकेचे अधिकारी उपस्थित होते. त्यासोबत माविमचे चंदनसिंह राठोड, रेशीमचे देशपांडे, खादी ग्राम उद्योगचे कंधारे, इतर विभागाचे अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी व बीटीएम एटीएम उपस्थित होते. कृषी पायाभूत सुविधा योजनेतून दोन कोटी पर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज व पतहमी अधितम 7 वर्षापर्यंत देण्यात येते. नाबार्ड योजनेबाबत नाबार्डचे दमय्यावार, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग व पोकरा योजनेबाबत आर. बी. चलवदे व स्मार्ट योजनेबाबत श्रीमती एम. आर. सोनवणे, बँकेविषयी माहिती श्री. गचके यांनी सादरीकरणाद्वारे दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती पुनम चातरमल, श्रीमती प्रियंका वालकर, श्रीहरी बिरादार, राहुल लोहाळे, संतोष मानेवर, गोविंद देशमुख, गवळी यांनी परिश्रम घेतले.

0000





Attachments area

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त

देगलूरमध्ये  विविध कार्यक्रमाचे आयोजन 

 

सर्वांनी उपस्थित राहावे तहसीलदार राजाभाऊ कदम यांचे आवाहन 

 

नांदेड (जिमाका), दि. 11 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभर अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देगलूरमध्ये देखील यानिमित्त दिनांक 12, 13, व 14 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्या सर्व कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असून शहरातील जास्तीत जास्त  नागरिकांनी, शालेय व  महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले. ते नियोजन बैठकीत बोलत होते. यावेळी आमदार जितेश अंतापुरकर पोलीस निरीक्षक सोहन माछरे, मुख्याधिकारी गंगाधर इरलोड, गटविकास अधिकारी शेखर देशमुख हे उपस्थित होते.

 

दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वा. सायकल रॅली देगलूर कॉलेज ते  मुख्य रस्त्यावरून  तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. दुपारी तहसील कार्यालयात 75 कुटुंबप्रमुखांना नवीन रेशन कार्डचे  वाटप करण्यात येणार आहे. तसेच 75 नागरिकांचे मतदान कार्ड आधार लिंकशी जोडण्यात येणार आहेत. दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता प्रभात फेरीचे आयोजन केले असून ही प्रभात फेरी अण्णाभाऊ साठे चौक येथून सुरू होऊन मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयासमोर समारोप होणार आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता येथील राजशेखर मंगल कार्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशभक्तीपर वैयक्तिक व समूहगीत,  वेशभूषा आदी  कलेचे सादरीकरण होणार आहे. या सर्व कार्यक्रमास सर्वांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले आहे.

00000

 नांदेड जिल्हा पोलीस विभागातर्फे

महिला सुरक्षा जनजागृतीसाठी शक्ती रॅली

 

नांदेड (जिमाका), दि. 11 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज नांदेड जिल्हा  पोलीस विभागातर्फे महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृतीच्या उद्देशाने शक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले. अडचणीच्यावेळी तात्काळ मदत व्हावी यासाठी मुली व महिलांच्या सुरक्षितेच्यादृष्टिने पोलीस विभागातर्फे शक्ती मोबाईलची निर्मिती करण्यात आली आहे. नांदेड येथे शैक्षणिक केंद्र लक्षात घेता खासगी शिकविणी, महाविद्यालय, शाळा व इतर गर्दीच्या ठिकाणी शक्ती मोबाईल पथक तात्काळ मदतीसाठी तत्पर असेल, असे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सांगितले. त्यांच्या व पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या संकल्पनेतून मोबाईल शक्ती पथक याची निर्मिती करण्यात आली आहे.

 

या पथकाबाबत व महिला सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती साठी खास शक्ती रॅलीचे आज आयोजन आले होते. महापौर जयश्रीताई पावडे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेड मनपाचे आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 

शक्ती रॅलीचे प्रतिनिधित्व पोलीस उपनिरीक्षक प्रियंका अघाव, गंगुताई नरतावार, रंजना शेळके, क्रांती बंदखडके, शुभांगी जाधव, रेखा चक्रधर, पडगीलवाड, पद्मीन जाधव, सुशिला जानगेवार, सुनिता मलचापुरे, सुनिता मैलवाड, वंदना घुले, बालिका कंधारे, बालिका बरडे, ज्योती गायकवाड, उज्ज्वला सदावर्ते आदी महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भाग घेतला

 

यावेळी श्री कोठारे, द्वारकादास चिखलीकर, प्रशांत देशपांडे, माणिक बेद्रे, विजय धोंडगे, अनिल चोरमले, शिवाजी लष्करे, श्रीमती एस. एम. कलेटवाड, कमल शिंदे, प्रियंका अघाव, स्नेहा पिंपरखेडे, शेरखान पठाण, विठ्ठल कत्ते यांची परिश्रम घेतले.

00000






 जीवन गाण्यातील संवेदना जेंव्हा कारागृहातील कैदी जपण्यासाठी कटिबद्ध होतात

माणुस म्हणून जगण्यासाठी कटिबद्ध होऊ

- न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज
· जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे’ कार्यक्रम

नांदेड (जिमाका), दि. 11 :- जन्मताच कोणताही व्यक्ती हा गुन्हेगार असत नाही. माणसाची वृत्ती ही गुन्हेगारीच्या पातळीवर कोणालाही घेऊन जाऊ शकते. आपल्याकडून काही तरी गंभीर चुका या झालेल्या आहेत म्हणून तुम्ही आज या कारागृहाच्या भिंतीत बंदिस्त आहात. छोट्या-छोट्या कारणांमुळे माणसाची हिंसक वृत्ती वाढत आहे. याला जर टाळायचे असेल तर आपल्या रागावर नियंत्रण ठेवून सदैव परिवार आणि समाजाचा विचार कराल तेंव्हा तुम्ही गुन्हेगारी वृत्ती पासून प्रवृत्त व्हाल असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश श्रीमती डी. एम. जज यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्याचे मूल्य व परस्परांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, मानवतेचे मूल्य सर्वांपर्यंत पोहचावे या उद्देशाने आज येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी "जीवन गाणे गातच जावे..." या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे हा उपक्रम राज्यातील सर्व कारागृहात घेण्यात आला.

आपण कोणाचे तरी भाऊ आहोत. आपण कोणाचा तरी मुलगा आहोत. आपल्या आई-वडिलांना आपल्या कडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपण ज्या समाजात राहतो त्या सर्वांचे हित जपण्याचे कर्तव्य एक नागरिक म्हणून आपल्याकडून अभिप्रेत आहे. ज्या चुका आपल्याकडून आयुष्यात घडल्या त्याला इथेच विसरून आपण या बंदिगृहातून बाहेर या. नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याच्या पालनासह समाजासाठी ही मोठे योगदान भविष्यात आपण द्याल, असा विश्वास जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी व्यक्त केला. कोणताही व्यक्ती जन्मताच गुन्हेगार असत नाही. यावर नितांत विश्वास ठेवा. तुमच्यातही मानवी संवेदना जीवंत आहेत. एक नागरिक म्हणून आपली देशाला गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना; स्वातंत्र्य, देशभक्ती, योगाचे महत्त्व पटावे, त्यांचे प्रबोधन व समुपदेशन व्हावे या उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार हा उपक्रम घेत असल्याची माहिती जिल्हा कारागृह अधीक्षक सुभाष सोनवणे यांनी दिली. यावेळी जिल्ह्यातील स्थानिक कलावंत प्रा. कैलास पपुलवाड, प्रजापती भिसे, अभिजित वाघमारे, विजय गजभारे, चंद्रकांत तोरणे, अनिल दुधाटे, सिद्धांत दिग्रसकर, वैष्णवी इंगळे, अंजली आदींनी देशभक्तीपर गिते सादर केली.
0000


वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...