Tuesday, February 20, 2024

 वृत्त क्रमांक 154

मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी 23 व 24 फेब्रुवारीला लातूर येथे विभागीय भव्य नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर

·        ऑनलाईन नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ कार्यान्वित

नांदेड (जिमाका) दि. 21 :  राज्य शासनाने प्रत्येक महसुली विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा अनुक्रमाने 23 व 24 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर येथे होणार आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता https://nmrmlatur.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. तरी मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी या संकेतस्थळवर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन राज्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लातूर शहरातील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात येणार आहे. यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे. तसेच 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यात विविध उद्योजक, व्यावसायिक प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार युवक-युवती यांची मुलाखतीद्वारे निवड करतील.

23 फेब्रुवारीला मार्गदर्शन शिबिरातून मिळणार करिअरच्या नवीन वाटांची माहिती

दहावी, बारावी किंवा पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी, करिअरच्या नव्या वाटांची माहिती युवक-युवतींना व्हावी, यासाठी नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी, 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ज्ञ व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कृषि उद्योग, पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, नर्सिंग यासारख्या विविध क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगारातील संधीविषयी व्याख्यान, चर्चासत्र आदी कार्यक्रम होतील. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभाग, बँकामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहितीही दिली जाणार आहे.

24 फेब्रुवारी रोजी भव्य महारोजगार मेळाव्यातून रोजगाराच्या संधी

नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील विविध ठिकाणहून उद्योजक उपस्थित राहून शैक्षणिक पात्रता व मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. यासाठी 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 पासूनच लातूर शहरातील बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच विविध विषयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय (सर्व ट्रेड) आदी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत.

रोजगार मेळाव्यासाठी येथे करा ऑनलाईन नोंदणी

मराठवाड्यातील युवक-युवतींनी लातूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरात उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करावी. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी  https://nmrmlatur.in  हे संकेतस्थळ (क्यू आर कोडसह) कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये ‘उमेदवार’ पर्याय निवडून लॉगीन करावे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, महास्वयंम नोंदणी क्रमांक यासह इतर माहिती भरून छायाचित्र, सी.व्ही. (बायोडाटा) अपलोड करावा.

*****





 

वृत्त क्रमांक 153

विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराबाबत माहिती मिळणार एकाच ठिकाणी

·         23 फेब्रुवारीला करिअर मार्गदर्शन शिबीर, 24 फेब्रुवारीला नमो महारोजगार मेळावा

·         नमो महारोजगार मेळाव्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन

·         स्वयंरोजगाराबाबत तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन; स्टार्टअप, शासकीय योजनांविषयी प्रदर्शन

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :  मराठवाड्यातील युवक-युवतींना लातूर येथे 23 व 24 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळाव्यामुळे रोजगाराच्या संधी, स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे.  लातूर शहरातील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर आयोजित या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक-युवतींनी https://nmrmlatur.in या संकेतस्थळवर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि लातूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

युवक-युवतींना व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत माहिती देण्यासाठी 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ज्ञ व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन आणि अनुभव कथन करणार आहेत. तसेच व्यवसाय, स्वयंरोजगाराची निवड करीत स्टार्टअप उद्योग, व्यवसायांची माहिती देणारी विविध दालने याठिकाणी उभारण्यात येणार आहेत. स्वयंरोजगारासाठी, उद्योगासाठी सहाय्य करण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी विविध शासकीय विभाग, महामंडळे आणि बँकांची स्वतंत्र दालने राहतील.

नमो महारोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा

नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील विविध ठिकाणहून उद्योजक उपस्थित राहून मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. यासाठी 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 पासूनच लातूर शहरातील बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच विविध विषयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय (सर्व ट्रेड) आदी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी  https://nmrmlatur.in  हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

*****



 वृत्त क्रमांक 152

दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

 

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव तथा सहा.सचिव ए.आर.कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिक साठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं. 8379072565, एम.यु.डाळिंबे (व.लि) मो.नं. 9423777789, एस.जी.आरसुलवाड (व.लि) मो.क्र. 7767825495 तर माध्यमिक साठी ए.पी. चवरे (व.अ)  मो.क्र. 9421765683 तर एस.एल.राठोड (क.लि) मो.क्र. 8830298158, ए.एल. सुर्यवंशी (क.लि) मो.क्र. 7620166354 हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857,  बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

00000

 वृत्त क्र. 151 

दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- फेब्रुवारी / मार्च-2024 मध्‍ये घेण्‍यात येणाऱ्या इयत्‍ता 10 वी व 12 वीच्‍या परीक्षेतील गैरप्रकार / कॉपी रोखण्‍यासाठी परीक्षा केंद्र परीसरात कलम 144 लागू केले आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील दहावीच्या 196 केंद्र तर बारावीच्या 101 परीक्षा केंद्रापासून 100 मीटर परिसरात 21 फेब्रुवारी ते 26 मार्च 2024 (सुट्टीचे दिवस, रविवार व 21 व 23 मार्च 2024 वगळून)  या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच दर्शविलेल्या या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स/एस.टी.डी./आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे  कलम 144  अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहे.

000000

 वृत्त क्र. 150 

आजपासून बारावीची परीक्षा ;

संवेदनशील 28 केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त

 

गैरप्रकार केल्यास गय केली जाणार नाही : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- उद्या 21 फेब्रुवारी पासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता 12 वीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे जिल्ह्यामध्ये प्रशासनाने 28 संवेदनशील केंद्राची निवड केली आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात आला असून कुठेही गैरप्रकार झाल्यास केंद्रप्रमुखांपासून जबाबदारी देण्यात आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईलअसे सक्त निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जाहीर केले आहेत.

 

सन 2024 परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने सर्व केंद्रावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. याबाबत तक्रार निवारण्यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

 

जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारीविस्तार अधिकारीकेंद्रप्रमुखपरीक्षकप्राचार्यमुख्याध्यापक,‍ संस्था प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक नुकतीच कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज संवेदनशील केंद्रांची यादी जाहीर करत या केंद्रावर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना केंद्रप्रमुखांसोबतच जबाबदार ठरविण्यात आले आहे जागेवरच कारवाई केली जाईल हे लक्षात ठेवून जबाबदारीने परीक्षा पार पाडण्याचे त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बजावले आहे.

 

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या समवेत या संदर्भात बैठक घेण्यात आली आहे. संवेदनशील केंद्रांवर देखील भरारी पथकांनी अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार होणार नाही व अनावश्यक जमाव दिसणार नाहीयाची दक्षता घ्यावी. यासाठी परीक्षा केंद्रावर मोबाईल वापरावर 100 टक्के बंदी घालावी. त्यामुळे यावर्षीची परीक्षा ही भयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात होईल या दृष्टीने सर्वांनी नियोजन करावे. मुख्याध्यापककेंद्रसंचालकसंस्था प्रतिनिधी यांनी गैरप्रकाराला कोणत्याही प्रकारे समर्थन देवू नयेतसे आढळल्यास त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावीअसेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

00000

वृत्त क्र. 149

 जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमधून अष्टपैलू खेळाडू घडावेत

-   प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड 


·    ग्रामीण टेक्निकल कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन 

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आश्रम शाळातील विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक निर्माण करणारे अष्टपैलू खेळाडू घडावेतअशी अपेक्षा इतर मागास बहुजन कल्याण (प्रादेशिक) विभाग लातूरचे प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड यांनी व्यक्त केली. सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नांदेड व सर्व संस्था प्रमुख प्राथमिकमाध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा (विजाभज) जिल्हा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा-2024 च्या उद्घाटन प्रसंगी ग्रामीण टेक्निकल अँडमॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपुरी नांदेड येथे ते बोलत होते.  

 

विद्यार्थ्यात नेतृत्वगुण विकसित करीतशारीरिक सौष्ठत्व व सांघिक भावनेचा विकास होऊन देशासाठी व राज्यासाठी सर्वार्थाने विकसित खेळाडू निर्माण करण्यात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पूरक ठरतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. हरणे आणि जिंकणे या खेळाच्या दोन बाजू असतातविद्यार्थ्यांनी हरण्याची भीती न बाळगता उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावेअसे आवाहन प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड यांनी केले. या स्पर्धांमध्ये जिल्ह्याच्या 91 आश्रम शाळेतील जवळपास 540 स्पर्धकांनी खो-खोकबड्डी व व्हॉलीबॉल स्पर्धामध्ये सहभाग घेतला आहे.

 

प्रसंगी सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याण नांदेडचे शिवानंद मिनगीरे म्हणाले नांदेड जिल्ह्याच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खेळाची प्रेरणा मिळावीविद्यार्थ्यांची बुद्धी तल्लख व्हावी व त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित व्हावे यासाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा प्रभावी माध्यम ठरतात. विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजूनजीवनात लढण्याची ऊर्जा मिळावी व आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्तम व्यासपीठ आहेअसे मत मांडले. क्रीडा स्पर्धात जिद्दीने प्रयत्न केल्यास या विद्यार्थ्यांना ऑलिंपिक्स पर्यंत मजल मारता येईल. स्वतःच्या नावासोबतचआई-वडील आणि राज्याचे स्वप्न देखील पूर्ण करता येतील त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल विश्वातून बाहेर पडत विविध खेळातून सक्रिय सहभाग घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.

 

प्रसंगी सचिव डॉ. विजय पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच प्रकृती स्वास्थ्यासाठी गुंतवणूक करावी असा सल्ला दिला. ग्रामीण संस्था आयईडीएसएसए क्रीडा स्पर्धामध्ये मागील पाच वर्षांपासून जनरल चॅम्पियनशिप मिळवीत असल्याचे आवर्जून सांगितले. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये गुण दर्शविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळावेअसे मत मांडले. नांदेड जिल्ह्याचे सहायक क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी खेळाडूंना शासनातर्फे मिळणाऱ्या सुविधांबद्दल मार्गदर्शन केले. क्रीडा स्पर्धांसाठी अनेक शाळांच्या मुख्याध्यापकक्रीडा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी इतर मागास बहुजन कल्याण नांदेडचे समाज कल्याण निरीक्षक व आश्रमशाळेतील शिक्षकसंस्थां मधील सर्व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. सूत्रसंचालन डॉ. ओमप्रकाश दरक यांनी तर आभार सहशिक्षक एम. एम. कांबळे यांनी मानले.

00000

 विशेष लेख : 

बदलत्या काळात मनरेगाला तंत्रज्ञानाची जोड

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये 100 दिवसांपर्यत रोजगाराची हमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरच्या उर्वरीत दिवसाच्या रोजगाराची हमी राज्य सरकार देते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही फक्त रोजगार देणारी नसून तर उत्पादक मत्ता निर्मना करणारी योजना आहे. मनरेगा योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध प्रकाराची वैयक्तिक व सार्वजनिक कामे केले जातात. या कामांच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना समृद्ध व ग्राम समृद्धी करण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना वैयक्तिक कामांचा लाभ देऊन कुटुंब समृद्ध करण्यावर शासन भर देत आहे.

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाते. तसेच या योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून योजनेंतर्गत काम करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांच्या कामाची मजूरी आधार आधारित पेमेंट प्रणाली (ABPS) मार्फत थेट यांच्या बँक / पोस्ट खात्यात जमा करण्यात येते. ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसह शाश्वत मत्ता निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायत ही मनरेगा योजनेचा केंद्रबिंदू असून यामार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. अकुशल काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रौढ व्यक्तीने कामाची मागणी केल्यानंतर 15 दिवसाच्या आत गावातच काम उपलब्ध करून दिले जाते. जर 15 दिवसांत काम दिले गेले नाही तर बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद देखीत या योजनेमध्ये आहे. स्त्री असो वा पुरुष सर्वांना समान दराने कामाचा मोबदला देणारी ही देशातील एकमेव महत्वकांक्षी योजना आहे.

 

महात्मा गांधी नरेगा योजनेंतर्गत 266 प्रकाराची कामे करता येतात. मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांवर विशेषत: भर देण्यात येत असून या माध्यमातून गुणवत्तापूर्ण टिकाऊ उत्पादक मत्ता निर्माण करून गरीब कुटुंबांकरीता मत्तापासून उत्पादकता वाढवून कुटुंब समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक युगात मनरेगा योजनेमध्ये अधिक पारदर्शकता यावी या उद्देशान तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजूरांची हजेरीप्रत्रक देखील ई-मस्टर स्वरूपात काढण्यात येते व नरेगासॉफ्ट वर भरले जातात. ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत हाती घेण्यात येणारे कामांची अंदाजपत्रक, तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी SECURE प्रणालीद्वारे देण्यात येते. केंद्र शासनाद्वारे विकसित करण्यात आलेल्या मोबाईल ॲप नॅशनल मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम (NMMS) प्रणाली द्वारे कामांवर उपस्थित मजुरांची उपस्थिती अक्षांस व रेखांशसह नोंदविण्यात येते. त्याचप्रमाणे पारदर्शकतेच्या दृष्टीने NMMS प्रणालीमध्ये चैहऱ्याची ओळख (Facial Recognition) प्रणालीचा समावेश करण्याबाबत केंद्र शासनाचा मानस आहे. जिओ मनरेगा मोबाईल एप्लीकेशनच्या माध्यमातून मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांची भौगोलिक स्थानांची नोंद घेण्यासाठी काम सूरु होण्याच्या आधी, चालू असतांना व काम पुर्ण झाल्यानंतरचा फोटो घेऊन जिओ ट्यागींग करण्यात येते.

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून आर्थिक वर्ष 2023-24 करीता 8 कोटी 50 लाख मनुष्यदिवसाचे उद्दीष्ट प्रात्प होते. त्यानुसार राज्यात मनरेगा अंतर्गत यावर्षी 8 कोटी 71 लाख मनुष्यदिवस निर्मिती झालेली आहे. तसेच या आर्थिक वर्षामध्ये 21 लाख 48 हजार कुटुंबातील 36 लाख मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 3398.64 कोटी इतका खर्च झाला असून त्यापैकी 2236.74 कोटी मजूरीवर खर्च झालेला आहे.

 

केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी संकल्पनेनुसार हर खेत को पाणी या अंतर्गत Catch the rain when it falls where it falls या पार्श्वभूमीवर राज्यात 'प्रत्येक शेताला पाणी' या संकल्पनेतून महात्मा गांधी नरेगा योजनेची अमलबजावणी करण्यात येत असून योजनेंतर्गत राज्यात दशलक्ष सिंचन विहिरी खोदण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 15 सिंचन विहिरीचे बांधकाम करण्यात येईल तसेच 10 शेततळयांची कामे व प्रत्येक एक एकर शेतामागे एक शोष खड्डा (जलतारा) तयार करण्याचे संकल्प शासनाने केला आहे. त्यानुषंगाने राज्यात मोठ्या संख्येने सिंचन विहिरींची कामे चालू असून त्यामुळे शेतात पाण्याची सोय झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच वाढ होऊन त्यांचा जिवनमान जीवनमान चांगले होईल व ते समृद्ध होणार. त्यानुषंगाने, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांनी सिंचन विहिरीचा लाभ घ्यावा या उद्देशाने MAHA-EGS Horticulture / Well App हा मोबाईल ॲप्लिकेश तयार केला असून याचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर व बागायत लागवडीचा लाभ देण्यात येत आहे. मनरेगा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे मिशन मोडवर करून वंचित घटकाच्या उत्थानासाठी व गरिबी निर्मूलनासाठी शासन प्रयत्नशील आहे.

महात्मा गांधी नरेगा योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी एक महत्त्वाची सनियंत्रण यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने एरिया ऑफिसर एप्लिकेशन (Area Officer Mobile Application) तयार केले आहे. सदर अँपमध्ये राज्यस्तरीयजिल्हास्तरीय आणि तालुका स्तरावरील विविध अधिकाऱ्यांद्वारे चालू व पुर्ण झालेल्या कामांची तपासणी व निरीक्षण केले जाते. अधिकारी कामावर भेट देतात, कामाचा आढावा घेतात आणि एरिया ऑफिसर एप्लिकेशन मध्ये कामाचा फोटोसह तपशील सादर करतात.

 

मनरेगा योजनेच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी नागरिक जागरूकता अत्यंत महत्वाची असल्याने जनमनरेगा मोबाईल अॅपच्या माध्यमातून योजनेत पारदर्शकता आणि सुशासनाच्या संकल्पनेला अधिक बळकट करण्यासाठी केंद्र शासनातर्फे जनमनरेगा (JANMANREGA) मोबाईल ॲपची निर्मीती करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंबाबत नागरीकांचा सकारात्मक दृष्टीकोन वाढवून नागरीकांना जनमनरेगा मोबाईल ॲपच्या माध्यमातून योजनेत सहभागाची होण्याची संधी या ॲपच्या मध्यमातून मिळते. या ॲपच्या माध्यमातून नागरीक त्यांच्या परिसरात किंवा त्यांच्या वर्तमान स्थानापासून (Current Location) 5000 मीटर क्षेत्रात मनरेगा अंतर्गत झालेल्या कामांची माहिती मिळवू शकतात. तसेच Geo Tagging झालेल्या कामांना मॅपच्या सहाय्याने भेट देऊन झालेल्या कामांविषयी अपले अभिप्राय (Feedback) देऊ शकतात.

 

श्री. अजय गुल्हाने, (भा.प्र.से),

आयुक्त मनरेगा, महाराष्ट्र

00000




 वृत्त क्र. 148 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत

शुक्रवारी उद्योग भवन येथे मेळावा 

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या ऑनलाईन पोर्टलवर ज्या अर्जदारांनी त्यांची कर्जप्रकरणे ऑनलाईन पद्धतीने सादर केली आहेत परंतू बँक शाखांकडे मंजूरीस्तव प्रलंबीत आहेत अशा बँकेकडे मंजूरीस्तव प्रलंबित कर्ज प्रकरणाबाबत शुक्रवार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. उद्योग भवन, शिवाजीनगर नांदेड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. ज्या अर्जदारांची बँक शाखेकडे मंजूरीस्तव कर्जप्रकरण प्रलंबीत आहेत अशा अर्जदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह शुक्रवार 23 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वा. या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

 

औद्योगिक धोरण-2019 अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) हा शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरावरुन जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयामार्फत राबविण्यात येते. या योजनेकरीता सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी दोन्ही कार्यालयाचे मिळून सुशिक्षित बेरोजगारांचे कर्ज प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समिती DLTFC द्वारे जिल्हयातील विविध बँक शाखांना शिफारस करण्यात आलेले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

 वृत्त क्र. 147 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या  पात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मार्च 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.  

 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला/दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 फेब्रुवारी  रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मार्च 2024  रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.  

 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...