Friday, January 5, 2018

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2017
भाग घेण्याचे आवाहन
        नांदेड, दि. 5 :- राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. 2017 या कॅलेंडर वर्षा करीता दि. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2018 अशी आहे. या स्पर्धेचे माहिती पत्रक, अर्जाचे नमुने www.maharashtra.gov.in, www.dgipr.maharashtra.gov.in  तसेच www.mahanews.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
            तरी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार, छायाचित्रकार यांनी मोठ्या संख्येने  या स्पर्धेत भाग घ्यावा. लातूर विभागातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात संबंधितांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत, असे आवाहन यशवंत भंडारे, उपसंचालक (माहिती), लातूर विभाग, लातूर यांनी केले आहे.

00000
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा
नांदेड, दि. 5 :- राज्याचे ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 6 जानेवारी 2018 रोजी मुंबई येथून विमानाने दुपारी 2.20 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व वाहनाने परळी जि. बीडकडे प्रयाण करतील.

000000
विरोधी पक्षनेता धनजंय मुंडे यांचा दौरा
नांदेड, दि. 5 :-  महाराष्ट्र विधानपरिषदचे विरोधी पक्षनेता धनजंय मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार 7 जानेवारी 2018 रोजी परभणी येथून रात्री 11 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.
सोमवार 8 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित बैठकीस उपस्थिती. त्यानंतर नांदेड शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने शिरुर ताजबंद जि. लातूरकडे प्रयाण करतील.

00000
निवृत्ती वेतन धारकांना
आयकराबाबत आवाहन
नांदेड, दि. 5 :-  राज्य निवृत्ती वेतन धारकानी आयकरास सूट मिळण्याबाबत पात्र असलेल्या बचतीचे विवरणपत्र आवश्यक त्या पावत्या, पॅनकार्ड, आधारकार्डच्या छायांकित प्रति स्वाक्षरीसह कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतन शाखेत गुरुवार 18 जानेवारी 2018 पुर्वी सादर करावीत, असे आवाहन कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
वित्तीय वर्ष  2017-18 वर्षाचे आयकर कपातीचे परीगणना जिल्हा कोषागार कार्यालय नांदेड येथे फेब्रुवारी 2018 च्या सेवानिवृत्ती वेतनातून कपात करण्यात येऊन आयकर कपातीस पात्र असलेल्या सेवा निवृत्ती वेतन धारकास वेतनातून अनुज्ञेय आयकर कपात करण्यात येणार आहे, असेही कोषागार अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

000000
स्पर्धा परीक्षेतील यशासाठी
"उज्ज्वल नांदेड" उपक्रम फलदायी
- प्रा. अभिजित राठोड
नांदेड, दि. 5 :- सध्याचा काळ स्पर्धेच्या असून खासकरुन स्पर्धा परीक्षेची तयारी करताना करावी लागणारी स्पर्धा   सातत्यपूर्ण अभ्यास, ग्रंथालयाची उपलब्धता योग्य मार्गदर्शन या सर्व बाबींचा विचार करता जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल "उज्ज्वल नांदेड" उपक्रम स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत फलदायी ठरणार आहे, असे प्रतिपादन प्रा. अभिजित राठोड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, सेतू समिती,नांदेड-वाघाळा शहर मनपा जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने उज्ज्वल नांदेड मोहीमेअंतर्गत आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरा राज्यसेवा पूर्व परीक्षा रणनिती : अर्थशास्त्र राज्यव्यवस्था या विषयावरील व्याख्यानामध्ये प्रा.राठोड बोलत होते.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरास पोलिस निरिक्षक  सुभाष राठोड, आरती कोकूलवार, संजीव कार्ले, प्रा. श्रीकांत आडे, प्रा. निलेश राठोड, प्रा. रितेश पाटील, प्रा.मलेश तलांडी राहूल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रा.अभिजित राठोड यांनी पहिल्या सत्रामध्ये परीक्षेची रणनिती दुसऱ्या सत्रामध्ये अर्थशास्त्र राज्यव्यवस्था यावर सखोल असे मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.     पोलिस निरीक्षक श्री. राठोड यांनी मार्गदर्शन करताना जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास सातत्य बाळगून अभ्यास केल्यास यश हमखास मिळते असे सांगीतले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री हुसे यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 8 जानेवारी ते 26 मार्च याकालावधीत दर सोमवारी सराव परीक्षेचे नि:शुल्क आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगीतले.
सुरवातीला व्याख्यात्यांचे स्वागत ग्रामगीता देऊन करण्यात आले. त्यानंतर प्रा. हनमंत हतनुरे लिखीत साईनाथ डहाळे संपादित 'मराठी इंग्रजी प्रश्नसंच' या ग्रंथाचे प्रकाशन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांचे हस्ते संपन्न झाले. दिवसभर चाललेल्या या मार्गदर्शन शिबिरामोठया संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता.  सूत्रसंचलन नितीन कसबे, व्याख्यात्यांचा परिचय मुक्तीराम शेळके यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे संयोजन प्रताप सुर्यवंशी, अजय ट्टमवार, कोंडीबा गाडेवाड, बाळू पावडे, रघूवीर श्रीरामवार, लक्ष्मण शेनेवाड, सोपान यनगुलवाड, कृष्णा वाईकर आदी संयोजन केले.

000000
विष्णुपुरी प्रकल्पातील पाणी पाळीसाठी
बागायतदारांना अर्ज करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 5 :- शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात 15 ऑक्टोंबर रोजी उपयुक्त साठ्यावर रब्बी हंगाम सन 2017-18 साठी तीन पाणी पाळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यातील प्रथम पाणी पाळी 23 डिसेंबर रोजी सुरु झाली असून दुसरी 20 जानेवारी व तिसरी 20 फेब्रुवारी रोजी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील बागायतदारांनी नमुना नं. 7 व 7 अ मध्ये पाणी अर्ज करावीत, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उ.) कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख यांनी केले आहे.
बागायतदारांना पाणी अर्जाचा विहित नमुना संबंधीत शाखा कार्यालयात विनामुल्य मिळेल. पाणी अर्जात पिकाची मागणी विस आरच्या पटीत नोंदवावी. अर्जातील पुर्ण माहिती भरुन पाणी अर्ज कार्यालयीन वेळेत शाखा कार्यालयात सादर करुन पोच पावती घ्यावी. पाणी अर्ज भरतेवेळेस थकबाकीदार लाभधारकांनी मागील थकबाकी व चालू पिकाची अग्रीम पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे म्हणजे दिलेला पाणी अर्ज मंजूर होईल. नियमानुसार पाणीपट्टी भरणा न केल्यास पाणी अर्ज नामंजूर होईल तेंव्हा नामंजूर क्षेत्रास कालव्याद्वारे पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. मंजूर क्षेत्रास कालव्याचे पाणी अग्रक्रमाने देण्यात येईल. नामंजूर व अनाधिकृत क्षेत्रास कालव्याचे पाणी देण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर राहणार नाही. मंजुरी घेवूनच पिकाचे नियोजन करावे. प्रत्येक लाभधारकांना ठरवून दिलेल्या तारखेप्रमाणेच पिकास पाणी घ्यावे तसेच दिवस-रात्र पाणी घेणे बंधनकारक आहे. दिवसा किंवा रात्री जेंव्हा पाणी पाळी येईल तेंव्हा पाणी घेतले नाही तर नदी, नाल्यास पाणी वाया जाते, त्यामुळे सिंचनाचा कालावधी वाढतो. पर्यायाने पाणी पाळी अंतरात वाढ होते. त्यामुळे असे पाणी वाया गेल्यास मुदतीत पाणी देणे शक्य होणार नाही व त्याची जबाबदारी या कार्यालयास राहणार नाही, याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. सिंचन करतेवेळी मंजूर क्षेत्राचा पास जवळ ठेवावा. कमी पाण्यात व कमी वेळात सिंचन करुन राष्ट्रीय जलसंपत्तीचा काटेकोरपणे वापर करावा. पाणी नाश कटाक्षाणे टाळावा. जलसंपदा विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी नुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन कार्यकारी अभियंता आर. एम. देशमुख यांनी केले आहे.

00000
जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड, दि. 5 :- जिल्ह्यात बुधवार 17 जानेवारी 2018 रोजी मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
आगामी काळातील सण, उत्सव आणि इतर सार्वजनिक कार्यक्रम, विविध प्रकारची संभाव्य आंदोलनाची शक्यता यांच्‍या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात बुधवार 3 ते 17 जानेवारी 2018 रोजीच्‍या मध्यरात्रीपर्यत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...