Wednesday, April 8, 2020


परदेशातून, परराज्यातून, बाहेर जिल्ह्यातून
प्रवास करुन आलेल्या नागरिकांची माहिती दयावी
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश  
            नांदेड, दि. 8 :- जी व्यक्ती परदेशातून, परराज्य व परजिल्ह्यातून प्रवास करुन आली आहे परंतू स्वत:हून केलेल्या प्रवासाची माहिती प्रशासनास दिली नाही तसेच प्राथमिक तपासणी देखील करुन घेतली नाही अशा व्यक्तींनी किंवा अशा व्यक्तींना ओळखणाऱ्या नजीकच्या व्यक्तींनी त्यांची माहिती संबंधीत तहलिसदार यांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे कळवावी, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा‍ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
            जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना (कोव्हिड 19) या विषाणमुळे पसरत चालेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा  1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजी अधिसुचना निर्गमीत केली आहे.
त्यानुसार जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केले आहे. त्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात परदेशातून, परराज्यातून, जिल्ह्याच्या बाहेरुन जिल्ह्यात प्रवास करुन आलेल्या नागरिकांची माहिती घेण्यात आली आहे.
तथापि अशी व्यक्ती, जी परदेशातून, परराज्यातून व परजिल्ह्यातून प्रवास करुन आली आहे परंतू सदर व्यक्तीने स्वत:हून केलेल्या प्रवासाची माहिती प्रशासनास दिली नाही / प्राथमिक तपासणी देखील करुन घेतली नाही अशा व्यक्तींनी किंवा अशा व्यक्तींना ओळखणाऱ्या नजीकच्या व्यक्तींनी संबंधीत तहलिसदार यांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे संबंधितांची माहिती कळवावी. जेणेकरुन संबंधीत व्यक्तींची तपासणी करुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे सुलभ होईल.
तसेच सर्व संबंधीत तहलिसदार यांनी स्वत: या कामी लक्ष देऊन त्यांच्या स्तरावरुन अशी माहिती संकलित करावी. त्यांच्याकडील व जनतेतून प्राप्त होणारी माहिती दररोज उपजिल्हाधिकारी (लसिका) श्रीमती संतोषी देवकुळे (भ्रमणध्वनी क्र. 9422961090) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे दयावी, असे आदेश नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा‍ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
000000


जिल्‍हयातील ग्रामीण भागात ऑडीयो पब्‍लीसीटीच्‍या माध्‍यमातून
कोरोना जनजागृती अभियानाचे आयोजन
क्षेत्रीय लोकसंपर्क ब्‍यूरो कार्यालयाचा उपक्रम


नांदेड दि.08 – कोरोना विषाणुचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्‍यूरो नांदेडच्‍यावतीने जिल्‍हयातील ग्रामीण भागामध्‍ये जनजागृती करण्‍यात येत आहे.
दिनांक 08 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेल्‍या ऑडीयो पब्‍लीसीटी कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून  जिल्‍हयातील  नांदेड, कंधार, नायगाव, लोहा, अर्धापुर तालुक्‍यातील 60 गावांमध्‍ये जनजागृती मोहिम राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेच्‍या माध्‍यमातून घरी थांबणे, किराणा आणि जिवनावश्‍यक वस्‍तुंचा साठा न करने, अति महत्‍वाच्‍या वेळी बाहेर पडणे, शेती उपयोगी कामे करता येणे, गर्दी टाळणे, समाज माध्‍यमांवरिल अफवांना बळी पडु नका तसेच आरोग्‍य विषयक संदेश गावक-यानां देण्‍यात येत आहेत.   
सदर अभियान दिनांक 13 एप्रिल पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 दरम्‍यान राबविण्‍यात येणार आहे. या अभियानात नांदेड तालुक्‍यातील धनेगाव, बळीरामपुर, गोपाळचावडी, बाभुळगाव,गुंजडेगाव, ढाकणी, वाजेगाव, काकांडी, तुप्‍पा, किक्‍की, राहेगाव, भायेगाव, विष्‍णुपुरी, पासदगाव, सुगाव, वांगी, कासापरखेडा, पासदगाव, पिपळगाव, कोटीतिर्थ, वाघी, नाळेश्‍वर, सोमेश्‍वर, राहटी, जैतापुर, पिंपरणवाडी, ढोकी, नागापुर, राहटी, पुणेगाव या गांवाचा समावेश आहे. लोहा तालुक्‍यातील किवळा, टेळकी, मारतळा, कहाळा,धनगरवाडी, जानापुरी, सोनखेड, बोरगाव, कारेगाव, हरबळ, दगडगाव, लोहा, दापशेड उस्‍माननगर या गावांमध्‍ये कोरोना विषयी  जनजागृती करण्यात येणार आहे.  अर्धापुर तालुक्‍यातील , देगाव, मालेगाव, कामठा, गणपुर डेरला, पिंपळगाव, देगाव येळेगाव या गावांचा समावेश करण्‍यात आला आहे. मुदखेड तालुकयातील आमदुरा , इजळी, चिकाळा, मुगट, मुदखेड, ब्राम्‍हणवाडा या गावांमध्‍ये जनजागृती करण्‍यात येणार आहे.
0000


विशेष वृत्तलेख :


  
रक्षकांच्या रक्षणासाठी 300 लिटर्स सॅनिटाझर
पोलीस अधिक्षक घेतायेत आपल्या दलातील प्रत्येकाची काळजी

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी लॉकडाऊन आणि त्यापाठोपाठ उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णालयात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि रस्त्यावर पोलीस कर्मचारी सदैव जागरुकतेने आणि जीव जोखमीत घालून  आपले रक्षण करत आहेत. या रक्षकांचेही कोविड 19 या कोरोना विषाणूपासून रक्षण करता यावे यासाठी पोलीस दलाचे पालक म्हणून  नांदेड पोलीस अधिक्षक  विजयकुमार मगर हे आपल्या दलातील प्रत्येकाची काळजी घेत आहेत. त्यासाठी सॅनिटायझर वाटप करण्यात येत आहे. भोकर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी 300 लिटर सॅनटायझर वाटप करण्यात आले आहे.
सध्या कोरोनाच्या  प्रतिबंध व्हावा म्हणून नागरिकांसाठी पोलिस दल मदतीला आपल्या जीवाची पर्वा न करता हे पोलीस रोज रस्त्यावर आपल्यासाठी तत्पर आहेत. खाकी वर्दीतला अधिकारी किंवा कर्मचारी हा देखील माणूसच आहे. त्यासाठी पोलीसांच्या आरोग्याची काळजीही आपल्या प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी घेतली आहे.
कोरोनाच्या आपत्ती सोबत दोन हात करताना सॅनिटायजर लावलेले हात हे देखील महत्त्वाचे ठरत आहेत. यामुळे भोकर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी 300 लिटर सॅनिटायझर वाटप केलेले आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय, पोलीस स्टेशन मोटार व परिवहन विभाग यांच्या विविध शाखा व कार्यालय परिसरात जंतुनाशक फवारणीसाठी पंप वाटप केले आहेत. या पंपाद्वारे फवारणी करण्यात येत असून कार्यालयाचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना हँडवाश वाटप केले, कोरोनाच्या संक्रमण पासून बचाव करण्यासाठी पोलिसांना  मास्क, चष्मे  इ. साहित्य  देण्यात आले, त्याचप्रमाणे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या विविध साहित्याचा पुरवठा देखील  करण्यात आला आहे. कर्तव्यावर असणाऱ्या नांदेड शहरातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य ठिकाणावर जेवण पोहोचविले जात आहे. आपल्या दलाच्या जवानांच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घेण्यासाठी नांदेड पोलिस दल  सेवेस तत्पर आहे असंच म्हणता येईल.   

-          मीरा ढास , 
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड.

नांदेड जिल्ह्यात 5531.16 मेट्रिक टन अन्न धान्याचे वाटप
येत्या 13 एप्रिल पासून मोफत तांदुळ होणार उपलब्ध

नांदेड, दि. 8 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून 1 ते 7 एप्रिल 2020 या सात दिवसात नांदेड जिल्ह्यातील 231005 शिधापत्रिकाधारकांना तब्बल 55311.56 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती नांदेडचे जिल्
हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर व जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलीक यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 21 लाख आहेत. या लाभार्थ्यांना नांदेड जिल्हयातील स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. बीपीएलकार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत 2 रुपये किलो दराने प्रती कार्ड 15 किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने प्रती कार्ड 20 किलो तांदूळ दिला जातो.त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते.

तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना व एपीएल शेतकरी पात्र लाभार्थ्यांना 2 रु किलो दराने प्रती व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रु किलो दराने प्रती व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो. नांदेड जिल्ह्यात यासर्व योजनेमधून सुमारे 33719.85 क्विंटल गहू, 21290.11 क्विंटल तांदूळ, तर 301.6 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 6352 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशनकार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती 5 किलो तांदुळ येत्या 13 एप्रिल 2020 पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेकरिता तांदळाचे नियतन केंद्रीय वखार महामंडळकडून प्राप्त करून घेतले जाते 13 एप्रिल 2020 पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरु करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जुन मध्ये सुध्दा त्या-त्या महिन्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई

नांदेड जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे, आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.

0000000
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या
उपाययोजनांच्या माहितीसाठी महाइन्फोकोरोना’ संकेतस्थळ

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकार

            मुंबईदि. 8 - कोवीड-19 या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहेकोवीड 19 अर्थात कोरोना विषाणूविषयीची खरी माहितीकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासन करत असलेली कार्यवाहीकोरोना आजारापासून मुक्ती मिळालेल्यांची माहितीलॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांसाठी कुठे-कुठे कॅम्प उभारले आहेतवेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना या सर्वाची एकत्रितअधिकृत व खात्रीशीर माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने https://www.mahainfocorona.in/ या संकेतस्थळाची (वेबसाईट)ची निर्मिती केली आहे. हे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले झाले आहे. 
            जगभरासह देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नयेयासाठी केंद्रबरोबरच राज्य शासन विविध उपाय योजत आहे. त्याचबरोबर कोरोना बाधितांची योग्य ती काळजी घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अविरत झटत आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेआरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्री आपआपल्या विभागामार्फत राज्यातील जनतेची काळजी घेत आहेत. या सर्वाची माहिती प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योग्य रितीने पोहचणे आवश्यक आहे. समाजमाध्यमाद्वारे अनेकवेळेस चुकीची माहिती पसरली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. कोवीड 19 अर्थात कोरोना विषाणूची माहितीराज्य शासन करत असलेल्या प्रयत्नांची खात्रीशीर माहिती वेळोवेळी तत्काळ मिळावीयासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. 
वेळोवेळी माहिती होणार अपडेट
            या संकेतस्थळावर कोवीड 19 ची सर्वसाधारण माहिती दिली आहे. ज्यामध्ये हा रोग कसा होतोकोरोना संसर्गापासून बचावासाठी काय काळजी घ्यावीकोरोनाच्या प्रतिबंधासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय रोजच्या रोजची आकडेवारी इन्फोग्राफीकसह माहिती दिली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कॉल सेंटर व राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाचे क्रमांकही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर जिल्हानिहाय हेल्पलाईनचे क्रमांकही या ठिकाणी देण्यात आले आहेत.
            तसेच सार्वजनिक सुविधा या सदरात प्रत्येक जिल्ह्यात कोणकोणत्या सोईसुविधा केल्या आहेतत्याची जिल्हानिहाय सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या अन्नधान्य पुरवठ्याचीही माहिती उपलब्ध आहे.  
            घडामोडी या सदरात राज्य शासनाचे विविध विभागानी घेतलेले निर्णयजिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीमुख्यमंत्रीइतर मंत्रीविभागीय आयुक्तजिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदांचे व बैठकांची माहितीराज्यात घडणाऱ्या ठळक घडामोडी आदींची माहिती देण्यात आली आहे. माध्यमांपर्यंत लवकरात लवकर माहिती मिळावीयासाठी हे सदर वेळोवेळी अद्ययावत होणार आहे. 
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ट्विटर आणि फेसबुकवर देण्यात येणाऱ्या माहितीची लिंकही येथे देण्यात आली आहे. 
            विश्लेषण सदरात राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने कोरोना प्रादुर्भावाचा राज्यातील स्थिती याचे विश्लेषणात्मक माहितीचा अहवाल देण्यात आला आहे. ही माहिती येथून डाऊनलोडही करता येणार आहे. 
मुख्यमंत्री सहायता निधी-कोवीड 19 च्या खात्याचा क्यूआर कोड
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी-कोवीड 19 च्या खात्याची माहितीही देण्यात आली असून या खात्याची क्यूआर कोडही येथे देण्यात आली. जेणेकरून इच्छुकांना थेट मदत देता येईल. 
       कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांची अधिकृत व खात्रीशीर माहितीसाठी माहिती व जनसंपर्कच्या https://mahainfocorona.in/en/home या संकेतस्थळावर नियमित भेट देण्याचे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 
०००

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...