महासंस्कृती महोत्सवातंर्गत शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन
' आयटीआय 'त रांगोळी प्रदर्शनासह आता छायाचित्र प्रदर्शनही
शिवजयंती निमित्त उद्या रात्री दहा वाजेपर्यत प्रदर्शन खुले
नांदेड (जिमाका) दि. १८ : नांदेड येथे महासंस्कृती महोत्सवातंर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवकालिन विविध पारंपारिक खेळांच्या स्पर्धा, नवा मोंढा मैदानावर तीन दिवशीय बहारदार सुप्रसिध्द सिने व नाटय कलांवताचे व स्थानिक कलावंताचे कला सादरीकरणाचे कार्यक्रम, नंदगिरी किल्ल्यावर छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन यासोबत आज आयटीआय परिसरात भव्य शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयटीआय प्राचार्य एस.व्ही.सूर्यवंशी, उपप्राचार्य व्हि.डी.कंदलवाड, कार्यक्रमाधिकारी एम.जी.कलंबरकर, राष्ट्रीय सेवा योजना एस.एम.राका, आर.पी.बोडके, प्रा.ओमप्रकाश दरक यांची उपस्थिती होती. दिनांक 18 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाअंतर्गंत शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयटीआय परिसरात आयोजन केले आहे. या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजाच्या विविध कलाकृतीचे दर्शन होणार आहे. ही रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेमध्ये दोनशे साठ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. या कार्यक्रमात डॉ. सविता बिरगे यांनी शिवचरित्राचा महिमा वर्णन करुन त्यांच्या जीवनातील अनेक रोमांचक प्रसंगाचे कथन करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
छायाचित्र प्रदर्शनही 'आयटीआय 'मध्ये
शिवचरित्रावर आधारित रांगोळी स्पर्धा व प्रदर्शनासोबत छायाचित्र प्रदर्शनही आयटीआय येथे 19 व 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 5 या कालावधीत राहणार आहे. यापूर्वी छायाचित्र प्रदर्शन नंदगिरी किल्ला येथे होते. आयटीआयमधील शिवजयंती निमित्त हे प्रदर्शन रात्री दहा वाजेपर्यंत खुले राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले. तर आभार सुनील मुत्तेपवार व संजय भालके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालासाहेब कच्छवे, सुनील कोमवाड, संजय भालके, सुनील मुत्तेपवार,आर.जी.कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.