Tuesday, June 6, 2023

 गुन्ह्याचा तपास योग्य दिशेने दोषींविरुद्ध कठोर कारवाई

- जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

 

▪️

 तात्काळ कारवाई करून गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल शांतता समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले समाधान


समता व एकोप्याचा समृद्ध वारसा जतन करण्याचा शांतता समितीच्या बैठकीत निर्धार

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोणत्याही गावातील जातीय तणाव हे रोजच्या जीवन व्यवहाराला, एकोप्याला बाधा आणणारे असतात. यात वर्षोनिवर्षे पिढ्यान पिढ्यांपासून जपलेली एकात्मता आपण अशा घटनांमधून हरवून घेता कामा नये. समाजातील सकारत्मतेसाठी, एकात्मतेसाठी आपण सारे पुढे येऊ यात. गुन्हेगारांवर कठोर कारवाई नक्की होईल. विश्वास ठेवा व समाजातील एकात्मतेचा विश्वास वाढवा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी करून येथील एकात्मतेला कोणी बाधा पोहचवत असेल तर ते खपून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले.

 

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे बोंढार हवेली घटनेच्या अनुषंगाने शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे, प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, मनपा आयुक्त डोईफोडे, भदन्त पय्या बोधी, श्रीमती साखरकर, बाबा बलवंतसिंघ, शिवा नरंगले, उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव, शाम निलंगेकर, गजानन पाळेकर, प्रा. डी. बी. जांभरूनकर, भगवान ढगे, रमेश सोनाळे, शाम कांबळे, संजय पाटील, दिशांत सोनाळे, प्रल्हाद इंगोले, शाम पाटील वडजे, भालेराव, डॉ. गंगाधर सोनकांबळे, म. अजरूद्यीन व शांतता समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

 

घटना घडली हे सत्य आहे. त्याच दिवशी पोलीसांनी आरोपी पकडले हे सुद्धा सत्य आहे. काही संशयीत असतील. परंतू ज्या जलदगतीने पोलीसांनी या घटनेप्रकरणी अटक करून तपास चालू केला याबद्दल पोलीसांच्या तत्परतेचे आपण अभिनंदन केले पाहिजे. या पिडीत कुटुंबाला शासनातर्फे तात्काळ आर्थीक मदतही पोहचवली जात आहे. एकाबाजुला या सर्व बाबी प्रशासकीय पातळीवरून सुरू असतांना समाजानेही संयमाची भूमिका ठेऊन एकात्मता, शांतता याला प्राधान्य दिले पाहिजे असे आवाहन माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केले. महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज या महापुरूषांचा वारसा आहे. या सर्व महापुरूषांचे जयंती उत्सव सर्व गावांनी एकत्र येऊन साजरे करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावेत. द्वेष भावना काढून एकोप्याने राहण्यातच सर्व समाजाचे हीत असल्याची भावना त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

 

समाजातील शांतता भंग होण्यामध्ये सोशल मिडियावर कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता केलेल्या पोस्ट या घातक ठरतात. जबाबदार नागरिकांनी याकडे दूर्लक्ष करून सामाजिक सोहार्दता, एकोपा, आपसी भाईचारा, परस्परावरील विश्वास अधिक दृढ कसा होईल यावर भर देण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी केले. याचबरोबर जर समाजाला विघातक असलेल्या पोस्ट सोशल मिडियाद्वारे कोणी करत असेल तर त्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

कोणत्याही प्रकारचे वैमनस्य निर्माण होऊ नये ही सर्वांचीच धारणा आहे. वैचारिक मतभेद असू शकतात पण याचे रुपांतर हातात शस्त्र घेऊन जर होत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नाही. असे कृत्य होऊ नये यासाठी समाजानेही अधिक दक्ष होऊन एकोपा ठेवला पाहिजे. सर्व धर्मात एकोपा राहणे ही काळाची गरज असून आपण शांतीचे दूत होऊ यात, असे आवाहन भदन्त पय्या बोधी यांनी केले.

 

यावेळी बाबा बलवंतसिंघ, शाम पाटील वडजे, शाम निलंगेकर, भगवान ढगे, प्रल्हाद इंगोले, शाम कांबळे, रमेश सोनाळे, गजानन पाळेकर, वैजनाथ देशमुख, डॉ. गंगाधर सोनकांबळे, शिवा नरंगले, दिशांत सोनाळे, संजय पाटील, महमंद अझरूद्यीन आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सोशल मिडियावर चुकीच्या पोस्ट बद्दल रोष व्यक्त करून शांतता व सदभावना यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. पोलीसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले.

00000













 छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेला दृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध

- पालकमंत्री गिरीश महाजन यांचा संदेश
समाजाच्या प्रेरणेसाठी शिवस्वराज्य दिन महत्वाचा
- खासदार प्रताप पाटील चिखलीकर
जिल्हा परिषदेत शिवराज्य दिन उत्साहात साजरा
नांदेड (जिमाका) दि. 6 :- राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत आज “शिवस्वराज्य दिन” साजरा होत आहे याचा आम्हाला आनंद आहे. राज्य शासनाने समाजातील सर्व घटकांना प्रेरणा मिळावी यादृष्टीने या उपक्रमाकडे एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून पाहावे लागेल. महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगदंब तलवारीकडे पाहतो, ती तलवार आणि वाघनखे राज्यात परत आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल असा विश्वास, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात “शिवस्वराज्य दिन” सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पोलीस उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप, कामाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या प्रेरणेचे मुख्य स्त्रोत आहे. त्यांच्या जीवन कार्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाला या विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शासनाने घेतलेल्या या पुढाकाराला अधोरेखीत केले. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी समयोचित भाषण करून शुभेच्छा दिल्या. संतोष देवराये यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर लोककल्याणकारी राज्याचा बाणा जपला. हाच बाणा स्थानिक स्वराज्य संस्थांनी जपण्याला प्राधान्य देऊन सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक भक्कम केली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या शुभसंदेशाचे वाचन करण्यात आले.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेला दृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध
पालकमंत्री गिरीश महाजन यांचा संदेश
इतिहासाच्या पानात डोकावून पाहिले तर मुघलांनी प्रजेवर राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या जुलूम, जबरदस्ती, अत्याचार, अन्याय केल्याचे दाखले पानोपानी मिळतात. मुघलांच्या अन्यायामुळे महाराष्ट्र खचून गेला होता. या राज्याला स्वराज्याच्या स्वरुपात आणण्याचे धैर्य छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविले. माझ्या रयतेवर कोणाची वाईट नजर पडणार नाही, माझ्या आई-बहिणी-लेकीबाळींवर कोणी अत्याचार करणार नाही याचा आदर्श मापदंड छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवन कार्यातून निर्माण केला. शेतकऱ्यांकडून कोणी दडपशाहीने शेतसारा वसूल करणार नाही, माझी रयत, माझी प्रजा स्वतंत्र असेल एवढा व्यापक विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. छत्रपती शिवरायांच्या या स्वराज्य संकल्पनेला दृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या शुभेच्छा संदेशाद्वारे सांगितले.
शिवराज्याभिषेक करतांना हाच उद्देश त्यांनी जपला. या उद्देशाला दृढ करण्यासाठी शासनातर्फे आपण विविध उपक्रम राबवित आहोत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड येथे जाऊन राज्यातील प्रजेच्या कल्याणासाठी ही कटिबद्धता आणखी दृढ केली आहे. लोककल्याणकारी राज्यासाठी आपण सर्व हा “शिवस्वराज्य दिन” अधिक व्यापक करू, असे त्यांनी आपल्या शुभसंदेशात सांगितले.
00000



इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचे आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

 इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेचे

आवेदन पत्र भरण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 6 :- इयत्ता दहावीची परीक्षा मार्च 2023 परीक्षेचा निकाल माहे जून-2023 मध्ये जाहिर झालेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये घेण्यात येणार आहे. इयत्ता 10 वी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने इ. 10 वीसाठी  www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळा मार्फत पुनर्परीक्षार्थी , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (परीक्षेस प्रविष्ठ न झालेले) श्रेणी सुधार व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit  घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा, नियमित शुल्क बुधवार 7 जून 2023 ते शुक्रवार 16 जून 2023 पर्यत आहेत. विलंब शुल्क शनिवार 17 जून ते 2023 ते बुधवार 21 जून 2023 असा आहे.

माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा, गुरुवार 8 जून 2023 ते गुरुवार 22 जून 2023,  माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख शुक्रवार 23 जून 2023 आहे.

या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे माध्यमिक शाळामार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना मार्च- 2023 परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल. परीक्षेस प्रथमत: प्रविष्ठ झालेल्या व श्रेणीनुसार करुन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2023 व मार्च 2024 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी. नियमित, विलंब शुल्कासह आवेदनपत्र सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारे भरण्यात यावे. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीत संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000 

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...