Monday, April 2, 2018


मतदारांनी ओळखपत्रासाठी रंगीत छायाचित्रे
बीएलओ, तहसील कार्यालयात जमा करावीत
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
            नांदेड, दि. 2 :- ज्या मतदारांची मतदार ओळखपत्रात कृष्णवल छायाचित्रे आहेत त्यांनी रंगीत छायाचित्रे संबंधीत बीएलओ किंवा तहसील कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेची बैठक जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांचे अध्यक्षस्थेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.  
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप कच्छवे तसेच नायब तहसीलदार उपस्थित होते.
00000



पोटनिवडणूक मतदानासाठी
मतदारांना 6 एप्रिलला सुट्टी
नांदेड, दि. 2 :- जिल्ह्यातील पंचायत समिती बिलोली 66-सगरोळी निर्वाचक गण व पंचायत समिती लोहा 83-मारतळा निर्वाचक गण तसेच कुंडलवाडी नगरपरिषद प्रभाग क्र. 5 ब साठी पोटनिवडणुकीचे मतदान शुक्रवार 6 एप्रिल 2018 रोजी घेतले जाणार आहे. या क्षेत्रातील मतदारांना मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासाची सवलत देण्यात आली आहे. याबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने  शासन परिपत्रक 31 मार्च 2018 रोजी निर्गमीत केले आहे.  
सदर क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कमागारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधीत मनपा आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधीत आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. मतदारांकडून मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.
000000


आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची
माहिती सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 2 :- मासिक वेतन मार्च 2018 चे देयक दाखल करताना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आवाहन असे सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी केले आहे.
माहिती बाबतचे मार्च 2018 अखेरचे इ-आर-1 त्रैमासिक विवरणपत्र सोमवार 30 एप्रिल 2018 पर्यंत भरावयाची मुदत आहे. www.mahaswayam.gov.in ऑनलाईन इ.आर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय वेतन देयके स्विकारले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापुर्वीच कळविण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी व फोन नंबर, पत्ता टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असेही आवाहन सहायक संचालक यांनी केले आहे.
000000


हरवलेल्या व्यक्तीचा शोध
नांदेड, दि. 2 :-  मस्तानपूरा येथून सनाकौसर (वय 15 वर्षे) या मुलीस पळवून नेले आहे. या मुलीचा रंग गोरा, बांधा मध्यम, उंची 5 फुट, अंगात लाल रंगाची टॉप व पांढऱ्या रंगाची लेगीज, चेहरा गोल, पायात लाल रंगाची सँडल, काळ्या रंगाचा बुरखा त्यावर गोल्डन रंगाची स्कॉर्फ आहे. मराठी, हिंदी भाषा बोलता येते. शिक्षण दहावी उत्तीर्ण, सोबत लाल रंगाची पर्स, डोळे काळे, नाक सरळ, कपाळ सपाट, डाव्या हातात पांढऱ्या धातुची अंगठी असे वर्णन आहे. या वर्णनाची मुलगी दिसल्यास पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधवा, असे आवाहन पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
0000


जलसमृद्धी यंत्र सामग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत
कर्ज मंजुरीचे पत्र सादर करण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 2 :- जलसमृद्धी यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील अधिकृत वित्तीय संस्था, बँककडील कर्ज मंजुरीचे पत्र संकेतस्थळावर लॉगइन आयडीद्वारे सादर करण्यासाठी शुक्रवार 13 एप्रिल 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची संबंधित लाभार्थ्यांनी नोंद घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.   
राज्यातील जलयुक्त शिवार अभियान तसेच जल मृद संधारणाची कामे करण्यासाठी जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्र सामुग्री व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र अर्जदारास विनाअट कर्जमंजुरीचे पत्र 28 मार्च पर्यंत सादर करणे अपेक्षित होते. परंत अर्जदारांची संख्या कमी असल्यामुळे विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र सादर करण्यासाठी पात्र सुशिक्षित बेरोजगार अर्जदारांना मंगळवार 13 एप्रिल 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रथम दर्शनी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना महाऑनलाईनद्वारे एसएमएसच्या माध्यमातून यादी प्रसिद्ध केल्याबद्दल कळविण्यात आले आहे. ज्या पात्र अर्जदारांनी विहित मुदतीत अयोग्य कर्ज मंजुरीचे पत्र सादर केले आहे अशा सर्व कर्जदारांना विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र पुन्हा सादर करण्याबाबत मुख्य व्यवस्थापक / नियंत्रक राज्यस्तरीय बँकर्स कमिटी यांना कळविले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...