Monday, September 9, 2024

 वृत्त क्र. 823 

कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगावर उपाययोजना 

नांदेड दि. 9 सप्टेंबर :- सद्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी तथा मुसळधार पावसामुळे कपाशीवर आकस्मिक मर (पॅराविल्ट) हा रोग दिसून येत आहे. साधारणतः आकस्मिक मर ही विकृती पिक फुलोरा अवस्थेत तसेच बोंडे परिपक्व झालेले असताना अधिक प्रमाणात दिसून येते. पावसाच्या मोठ्या खंडामुळे, कपाशी पिकास पावसाचा तान बसल्यास व त्यानंतर लगेच मोठ्या पावसामुळे निर्माण झालेले जमिनीतील आर्द्रता व साचलेले पाणी यामुळे आकस्मिक मर या विकृतीचा कापूस पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. 

आकस्मिक मर या विकृतीमुळे कापसाच्या झाडातील तेजपणा नाहीसा होऊन झाड एकदम मलूल तथा सुकल्यासारखे दिसते. तसेच त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त कपाशीची सर्व पाने फुले खालच्या दिशेने वाकतात किंवा पिवळे पडतात. तसेच पात्या, फुले व अपरिपक्व बोंडे सुकून गळतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. रोगट झाडाची मूळे कुजत नाहीत. रोगग्रस्त झाडास हमखास नविन फूट येते. 

आकस्मिक मर: उपाय योजना

कापूस पिकाच्या वाढीच्या मुख्य अवस्थेत सिंचनाची सोय उपलब्ध असल्यास पाणी द्यावे. पिकास प्रदीर्घ पाण्याचा ताण पडू देऊ नये. अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. साचलेले पाणी चर काढून त्वरित शेताबाहेर काढून टाकावे. शेतातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आकस्मिक मर या विकृतीचे लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी खालील पैकी आळवणी (ड्रेचिंग) करावी. यासाठी पुढील पैकी एका बुरशीनाशकाचा वापर करावा. कॉपर ऑक्सीक्लोराइड (25 ग्रॅम) किंवा कार्बेन्डाझीम (10 ग्रॅम) + युरिया (200 ग्रॅम ) / 10 लीटर पाणी या प्रमाणात द्रावण करून प्रती झाडास 250-500 मिली द्रावणाची झाडाच्या मुळाशी आळवणी (ड्रेचिंग) करावी. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी 2 टक्के डीएपी (200 ग्रॅम / 10 लि. पाणी) याची आळवणी (ड्रेचिंग) करून लगेच हलके पाणी द्यावे, हा कृषि संदेश कृषि कार्यालयाच्यावतीने दिला आहे.

0000

 वृत्त क्र. 822 

बाल लैंगिक शोषणावरील मूलभूत समुपदेशन व परिणाम या विषयावरील प्रशिक्षण संपन्न 

नांदेड दि. 9 सप्टेंबर :- प्रत्येक बालकाला सुरक्षितता मिळाली पाहिजे. बालकांच्या काळजी व संरक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या हेतूने नांदेड शहरामध्ये अर्पण फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने दिनांक 4 5 सप्टेंबर  या कालावधीत दोन दिवसांचे अनिवासी प्रशिक्षण हॉटेल विसावा पॅलेस नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. बाल लैंगिक शोषणावरील मूलभूत समुपदेशन व परिणाम या विषयावर आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती जिल्हा 'महिला व बाल विकास अधिकारी आर.पी. रंगारी यांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करुन करण्यात आले. 

आयोजित कार्यक्रमामध्ये 18 वर्षाखालील बालकांच्या सर्वांगीण हित व सुरक्षेच्यादृष्टीने विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. यामध्ये अर्पण फाऊंडेशनच्यावतीने प्रशिक्षक असलेल्या आरती शिंदे, नेहा व चंद्रीका यांनी बाल लैंगिक शोषणाच्या प्रकारामध्ये सुरक्षित असुरक्षित परिसराबद्दल त्यावर पिडीत बालकास समुपदेशकाने समुपदेशनाच्या माध्यमातून समस्यामुक्त करण्यासाठी वापरावयाचे तंत्र-कौशल्य याबाबत प्रशिक्षणामधून प्रशिक्षणार्थीना अवगत करून दिल्या. 

तसेच प्रशिक्षणास आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीकडून बालकांच्या संरक्षणाच्यादृष्टीने विविध भूमिका सादरीकरण करुन घेवून खेळी-मेळींच्या वातावरणात प्रशिक्षणार्थीना आकलन होईल, अशा साध्या-सरळ भाषेत बाल लैंगिक शोषणाविषयी जागृत केले. प्रशिक्षणार्थीचा पण उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिसून आला, सदरच्या प्रशिक्षणाचा सर्व प्रशिक्षणार्थीना उपयुक्त ठरेल. या कार्यक्रमास महिला राज्य गृहचे अधिक्षक अविनाश खानापूरकर, जिल्हा परिवीक्षा अधिकारी विजय नरसीकर,  जिल्हा संरक्षण अधिकारी प्रशांत हनवते यांची प्रमुख उपस्थिती होती. 

महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी-कर्मचारी, सखी वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी, बालगृह, बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच महिला व बालकांविषयी काम करणाऱ्या अनेक संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचे आभार महिला व बाल विकास विभागाच्यावतीने परिवीक्षा अधिकारी संतोष दरपलवार यांनी मानले.   

00000

 

 वृत्त क्र.  821

होमगार्ड नोंदणीबाबत उमेदवारांना सूचना

 

नांदेड दि. 9 सप्टेंबर :- नांदेड जिल्हयातील होमगार्ड अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आली आहे. होमगार्ड नोंदणी प्रक्रियेचे आयोजन नांदेड जिल्ह्यात 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2024  पर्यंत केले होते.  मात्र नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने होमगार्ड नोंदणी प्रक्रियेमध्ये खंड पडून नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. ही नोंदणी प्रक्रिया पुन्हा दिनांक 6 ते 10 सप्टेंबर 2024 या दरम्यान राबविण्यात येत आहे.

 

सदर नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही उमेदवार काही तांत्रिक कारणानेवैद्यकीय कारणानेअतिवृष्टीमुळे किंवा अन्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. अशा सर्व ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये आवेदन सादर केलेल्या उमेदवारांना नैसर्गिक न्याय तत्वानुसार संधी मिळावी या उद्देशाने दिनांक 9 सप्टेंबर अखेर जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय भाग्यनगर नांदेड येथे किंवा दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी गैरहजर राहण्याच्या सबळ कारणासह अर्ज घेऊन सकाळी 5 वाजता पोलीस मुख्यालय नांदेड येथे हजर राहतील. दिनांक 10 सप्टेंबर रोजी 8 वाजेनंतर अशा कोणत्याही अर्जाचा अथवा उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.  या कालावधीनंतर कसल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संगणक प्रणालीमध्ये अद्यावत राहावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे.

000

 वृत्त क्र.  820

ध्वनीक्षेपकाचा वापर मर्यादेपेक्षा जास्त करण्यास मनाई

 

नांदेड दि. 9 सप्टेंबर :- जिल्‍हाधिकारी कार्यालय व शासकीय दवाखानाच्‍या भोवतालच्‍या 100 मिटर परिसरात ढोलताशाडॉल्‍बी सिस्‍टीम इत्‍यादी कर्णकर्कश वाद्य वाजविण्‍यास तसेच सभेसाठीभाषणासाठी व इतर प्रयोजनासाठी ध्‍वनीवर्धक, ध्‍वनीक्षेपक यांचा वापर हा विहीत मर्यादे (दिवसा सकाळी 6 ते रात्री 10  यावेळेत 50 डेसीबल व रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत 40 डेसीबल) पेक्षा जास्‍त वारंवारतेने करण्‍यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 नुसार याद्वारे प्रतिबंध केले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 (1) अन्‍वये आदेश निर्गमीत केले आहेत. हा आदेश 10 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील.

 

या आदेशाची अमंलबजावणी करण्‍याची जबाबदारी ही पोलीस अधिक्षक तथा  ध्‍वनी प्राधिकरणउपप्रादेशिक अधिकारीमहाराष्‍ट्र प्रदुषण मंडळ नांदेड (सदस्‍यध्‍वनी प्रदुषण संनियंत्रण समिती) व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था (नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड) यांची राहील. प्रस्‍तुत आदेशाचे उल्‍लंघन झाल्‍याचे आढळून आल्‍यास संबधीताविरुद्ध ध्‍वनीप्रदूषण (नियमन व नियंत्रणनियम 2000  पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्‍यात यावी, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

00000

वृत्त क्र.  819


नांदेड जिल्ह्यातील संकटातील सर्व शेतकऱ्यांना

शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार - ना. अनिल पाटील

 

 • बांधावर जाऊन मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी केली पाहणी

 

नांदेड दि. 9 सप्टेंबर :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावर त्यांचा प्रतिनिधी म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आजचा दौरा आहे. मी प्रत्यक्ष पाहणी केली असता नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आपण स्वत: शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाची जाणीव असून सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे केले.

 

नांदेड तालुक्यातील आलेगाव, निळा या गावाच्या शेतशिवारात जाऊन त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आसना नदीच्या काठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जमीन खरडून जाणे, पिके वाहून जाणे, रस्ते वाहून जाणे, पुलांचे नुकसान होणे, घराची पडझड होणे अशा पद्धतीचे सगळेच नुकसान या भागात झाले आहे. आज पाहणी दरम्यान शेकडो शेतकरी मंत्र्यांसोबत शेत दाखवायला, नुकसान दाखवायला उपस्थित होते.

 

शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद  साधला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.  

 

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यामध्ये 4 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचा प्रचंड जोर होता, नदी-नाले तुडुंब वाहत होते. त्यामुळे परिसरातील शंभर टक्के पीक बुडाले आहे. अंतिम पंचनामे झाल्यावर नेमकी आकडेवारी पुढे येईल. पूर्ण पंचनामे झाल्यावरच नेमके किती नुकसान झाले हे ठरवता येईल, असे सांगितले.

 

शेतकऱ्यांना 446 कोटींचे वाटप

सन 2023 मध्ये झालेल्या नुकसानापोटी नांदेड जिल्ह्यामध्ये 5 लक्ष 82 हजार 126 शेतकऱ्यांना 446 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. केवळ 10 हजार शेतकऱ्यांनी आपले बँकखाते अपूर्ण ठेवल्याने केवायसी न केल्याने वाटप प्रलंबित आहे. मात्र शेतकऱ्यांचे खाते व्यवस्थित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांना ही रक्कम मिळेल. शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. तातडीने यावर्षीची रक्कमही त्यांच्या खात्यात वळती करण्यासाठी पंचनाम्याची गती वाढवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

 

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, नांदेड मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता अजय दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये झालेली जिवीत हानी, जनावरांचे नुकसान, घराची पडझड याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बॅकवॉटरमुळे अनेक ठिकाणी विपरीत परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या बॅकवॉटरच्या संदर्भात मुंबई मंत्रालयात जलसंपदा विभागासोबत बैठक लावण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.  

 

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी आपत्ती सौम्यीकरण प्रस्ताव मांडला व त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. तसेच राज्य आपत्कालीन राखीव दलाच्या तुकडीचे मुक्कामाचे ठिकाण धुळे ऐवजी हिंगोली येथे करण्यात यावे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळू शकते, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

 

वीजपुरवठा कंपनीचे जवळपास 205 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे यावेळी अभियंत्यांनी स्पष्ट केले. मात्र आज 6 दिवस अतिवृष्टीला झाले असल्यामुळे प्रत्येक गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, गावनिहाय याबाबत खातरजमा करण्यात यावी, असेही यावेळी मंत्री महोदयांनी निर्देश दिले.भविष्यात दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्याची व पीक पद्धती मध्ये बदल करावा लागेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले

00000



























 

  वृत्त क्र.  818

श्री गणेश उत्सव कालावधीत डॉल्बी सिस्टीम वापरास प्रतिबंध 

नांदेड दि. 8 सप्टेंबर :- जिल्ह्यात श्री गणेश उत्सव 7 ते 19 सप्टेंबर 2024 या कालावधीत डॉल्बी सिस्टीम मालक, चालक, इतर कोणत्याही व्यक्तीस डॉल्बी सिस्टीम वापरात / चालविण्यास भारतीय सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत  यांनी काढला आहे.   

जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत  यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार 7 ते 19 सप्टेंबर रोजी श्रीचे विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक / चालक / गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात / उपयोगात आण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी. हा आदेश 7  रोजीच्या मध्यरात्रीपासून ते 19 सप्टेंबर 2024 रोजी  24 वाजेपर्यंत  श्रीचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील, 

डॉल्बीचे आवाजामुळे व कंपनामुळे लहान मुले, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच आजारी व सामान्य नागरीक यांच्या कानास, ऱ्हदयास आरोग्यास,जिवितास धोका होण्याची तसेच सामाजिक स्वास्थ बिघडण्यास व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी मालक / चालक यांचेवर बंदी घालण्यात आली आहे. असेही आदेशात नमुद केले आहे.

00000

 वृत्त क्र.  817

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा दौरा

नांदेड दि. 8 सप्टेंबर :-राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता राज्यराणी एक्सप्रेसने मनमाड येथून नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 7.40 वाजता शासकीय निवासस्थान नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.50 वाजता शासकीय निवासस्थान नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे  आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मौजे कासारखेडा, आलेगाव व निळा ता. नांदेडकडे प्रयाण व या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. दुपारी 12.30 ता. वसमत जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.

0000

 वृत्त क्र.  816

मुख्यमंत्री योजनादूत’उपक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन 

राज्यात २५ हजार तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार २२७ उमेदवारांची नोंदणी 

योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन

त्वरा करा ; १३ सप्टेंबरपर्यंतच नोंदणी करता येणार

        नांदेड, दि. ८ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. राज्यात एकूण ५० हजार योजनादूत नेमण्यात येणार असून रविवार दुपारी  २ वाजेपर्यंत राज्यात २५ हजार तर एकट्या नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार २२७ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

 ७ सप्टेंबर २०२४ पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून येत्या १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  

    महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. 

असे आहेत निवडीचे निकष

  या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

ही कागदपत्रे आवश्यक 

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org  या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.

            ०००००


 

6.9.2024

 वृत्त क्र.  815

'दक्ष ' परिषदेत नांदेडचे किशोर कुऱ्हे सन्मानित 

 आपत्ती व्यवस्थापन कार्याचा गौरव 

नांदेड, दि. ६ सप्टेंबर : आपत्ती व्यवस्थापनामध्ये आणीबाणीच्या वेळी योग्य निर्णय घेऊन तात्काळ प्रतिसादाच्या सेवेसाठी नांदेडचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांना संभाजीनगर येथे सन्मानित करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सभागृहात गुरुवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित ‘दक्ष’ आपत्ती व्यवस्थापन परिषद २०२४ मध्ये हा सन्मान करण्यात आला.

पारिषदेचे उद्घाटन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी काही प्रमुख अधिकाऱ्यांचा उल्लेखनीय कार्यासाठी सत्कार करण्यात आला. यामध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर अशोकराव कुऱ्हे यांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी  दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय राठोड, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल) नयना बोंदार्डे, उपायुक्त (सामान्य प्रशासन) जगदीश मिनियार यांच्यासोबत विभागातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 किशोर कुऱ्हे  यांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या आपत्तीमध्ये ही उल्लेखनीय कार्य केले होते यावेळी महाराष्ट्राच्या टीमचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते त्यासाठीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

000




  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...