वृत्त क्र. 815
'दक्ष ' परिषदेत नांदेडचे किशोर कुऱ्हे सन्मानित
आपत्ती व्यवस्थापन कार्याचा गौरव
नांदेड, दि. ६ सप्टेंबर : आपत्ती व्यवस्थापनामध्ये आणीबाणीच्या वेळी योग्य निर्णय घेऊन तात्काळ प्रतिसादाच्या सेवेसाठी नांदेडचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांना संभाजीनगर येथे सन्मानित करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सभागृहात गुरुवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित ‘दक्ष’ आपत्ती व्यवस्थापन परिषद २०२४ मध्ये हा सन्मान करण्यात आला.
पारिषदेचे उद्घाटन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी काही प्रमुख अधिकाऱ्यांचा उल्लेखनीय कार्यासाठी सत्कार करण्यात आला. यामध्ये नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर अशोकराव कुऱ्हे यांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूरच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय राठोड, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (महसूल) नयना बोंदार्डे, उपायुक्त (सामान्य प्रशासन) जगदीश मिनियार यांच्यासोबत विभागातील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किशोर कुऱ्हे यांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या आपत्तीमध्ये ही उल्लेखनीय कार्य केले होते यावेळी महाराष्ट्राच्या टीमचे त्यांनी प्रतिनिधित्व केले होते त्यासाठीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
000
No comments:
Post a Comment