Tuesday, February 26, 2019


शासकीय तंत्रनिकेतन येथे
माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न
नांदेड, दि. 27 :- शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला आहे. यावेळी पुलवामा येथे शहीद भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. संस्थेचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा घेण्यात आला.  
यावेळी संस्थेचे माजी विद्यार्थी उच्च शिक्षण विभागाचे लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, संस्थेचे उपप्राचार्य पी. डी. पोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गर्जे यांनी माजी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या विकासासाठी लागणारा सहभागा याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करुन उपस्थित इतर माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यांच्यावतीने कार्यकारणीचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे माजी विद्यार्थी श्री. पाचंगे व उपाध्यक्ष श्री. उश्केवार यांची निवड करण्यात आली. प्रस्ताविक व्ही. बी. उश्केवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.मती डॉ. एस. व्ही. बेट्टीगेरी तर आभार समन्वयक दि. म. लोकमनवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
00000


मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू
नांदेड, दि. 27 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 27 फेब्रुवारी 2019 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 26 मार्च 2019 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000


क्रीडा सवलतीचे वाढीव गुणासाठी प्रस्ताव सादर करावेत
नांदेड दि. 27 :- जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीत शिकत असलेल्या सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विद्यार्थ्यांनी क्रीडा सवलतीचे वाढीव गुणासाठी विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह शारीरिक शिक्षक यांचेमार्फत 5 एप्रिल 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी केले आहे.  
इयत्ता दहावी व बारावीत शिकत असलेल्या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त खेळाडू विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याबाबत 20 डिसेंबर 2018 रोजी शासननिर्णयानुसार सन 2018-19 या शालेय वर्षापासून सुधारीत नियमावलीनुसार क्रीडागुण सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व सादर करावयाच्या प्रस्तावाच्या विहित नमुन्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय 20 डिसेंबर 2018 व शुद्धीपत्रक 25 जानेवारी 2019 चे अवलोकन करावे, असेही आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


रोजगार मेळाव्याचे आयोजन
नांदेड दि. 27 :- जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार 28 फेब्रुवारी 2019 रोजी महात्मा फुले मंगल कार्यालय फुले मार्केट आयटीआय जवळ नांदेड येथे सकाळी 10.30 वा. आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गर्शन केंद्राचे सहायक संचालक यांनी केले आहे.
या मेळाव्यात रायटर सेफग्राऊंड प्रा.लि.मंबई, धुत ट्रान्समिशन प्रा. लि. औरंगाबाद, नवभारत फर्टीलायझर प्रा. लि. औरंगाबाद, इंडिया मेगा ग्रो आनाज लि. कृष्णूर. पायोनिर डिस्टिलरीज लि. धर्माबाद, या कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरीता मुलाखती घेण्यात येणार आहेत. ट्रेनिऑप्रेटर, वर्कशॉप वेल्डर, हेल्पर, वरिष्ठ कार्यकारी, सहायक व्यवस्थापक, फिल्ड ऑफिसर, कस्टोडियम, सिफ्ट केंमिस्ट या पदाकरीता किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी किंवा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यावेळी उमेदवारांनी सेवायोजन नोंदणी कार्ड सल्यास शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती सोबत घेऊन यावे, असेही आवाहन सहायक संचालक उल्हास सकवान यांनी केले आहे.
00000


मराठी भाषा गौरव दिन साजरा
करण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश   
नांदेड, दि. 27 :- ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करावा, असे निर्देश सर्व विभाग प्रमुख व संबंधित विभागांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहेत.
ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून विविध उपक्रम आयोजित करुन समारंभपूर्व सोहळा साजरा करण्याच्या सुचना मराठी भाषा विभागाने 7 फेब्रुवारी 2019 रोजी परिपत्रकान्वये दिल्या आहेत. सर्व विभाग प्रमुख व संबंधित विभागांनी कार्यवाही करुन त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश दिले आहेत.  
00000


प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत
2 लाख 74 हजार शेतकरी कुटूंबांची नोंदणी
बॅकेद्वारे 2 हजार रुपयाचा पहिला हप्ता सुरु

नांदेड, दि. 26 :- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर उत्तर प्रदेश येथून रविवार 24 फेब्रुवारी रोजी करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात या योजनेत माहिती अपलोड केलेल्या 2 लाख 74 हजार 93 शेतकरी कुटुंबाना 2 हजार रुपयाचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येत आहे.  
या योजनेचा शुभारंभ मान्यवर व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी एकाच दिवशी संपन्न झाला. नांदेड येथील जिल्हास्तरीय कार्यक्रमात मान्यवरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या व शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मानही केला.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत मंगळवार 26 फेब्रुवारी अखेर जिल्ह्यात परिशिष्ट अ प्रमाणे अनिवार्य माहिती संकलीत गावे 1 हजार 568 तर परिपूर्ण पात्र शेतकरी कुटुंब 2 लाख 91 हजार 866 एवढी आहेत. एनआयसी पोर्टलवर 1 हजार 561 गावांची व 2 लाख 74 हजार 93 शेतकरी कुटूंबाची माहिती अपालोड करण्यात आली आहे. यात जिल्ह्यात अपलोड पात्र कुटुंबाची टक्केवारी 93.91 एवढी आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना 3 हप्त्यात 6 हजार रूपये मिळणार आहेत.
ज्या शेतकरी कुटुंबाची विविध ठिकाणी मिळून 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती आहे अशा कुटुंबाची स्वतंत्र यादी तयार केली आहे. पात्र खातेदाराचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड, आधार क्रमांक ओळखपत्र, जन्म दिनांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक आदिची माहिती परिशिष्ट-अ मध्ये गावनिहाय नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून संकलीत करुन ती संबंधित तहसील कार्यालयातून पोर्टलवर अपलोड केली जात आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...