Saturday, October 16, 2021

 कोविड-19 मुळे मृत्यू पावलेल्या वारसांना

सानुग्रह अनुदान वितरणासाठी समिती गठीत 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- कोविड-19 अर्थात कोरोनामूळे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) मधून 50 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानुसार नांदेड जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना सदर सानुग्रह अनुदानाचे वितरण अधिक सुविधाजनक व्हावे यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. 

या नियोजनाअंतर्गत कोरोनामूळे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्यांच्या वारसांना काही प्रशासकीय दृष्टीने अडचणी, तक्रार असेल तर जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील औषध वैद्यकशास्त्र विभाग प्रमूख हे सदस्य असतील. 

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाना शासनातर्फे कोविड-19 वरील उपचाराची परवानगी दिली गेली होती. या अथवा शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू प्रमाणपत्रासंदर्भात कोणतीही तक्रार जर वारसांना असेल तर त्याबाबत ही समिती निर्णय घेईल. संबंधित रुग्णालयातील उपलब्ध व आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्राची व तथ्याची पडताळणी आवश्यकतेप्रमाणे करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय तक्रार समितीला असेल. वारसांना अथवा कुटुंबातील सदस्यांना अर्ज करताना सुलभता यावी व त्रुटी युक्त अर्जाची संख्या कमी होण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देश जारी केले आहेत. यात प्रामुख्याने रुग्णाला ज्या रुग्णालयात दाखल केले होते. त्या रुग्णालयातील वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या आस्थापनाच्या प्रतिनिधीना नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत. हे संबंधित नोडल अधिकारी कोविड-19 मूळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईक वारस, कुटूंब सदस्यांना सानुग्रह अनुदान अर्ज करताना आवश्यक असलेल्या त्यांच्या आस्थापनाशी निगडीत सर्व अभिलेख्याची पूर्तता करुन देतील. 

कोविड-19 च्या आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना अधिकृत दस्ताऐवज जारी करण्याचे संबंधिताना निर्देश करण्याचा अधिकारही या समितीला आहेत. सदर समितीकडे तक्रार आल्यास त्या अर्जावर 30 दिवसाच्या आत समिती निर्णय घेईल. एखाद्या तक्रारीत समितीचा निर्णय हा पिडीत वारसाच्या /कुटूंब सदस्याच्या बाजूने नसेल तर समिती तसे स्पष्ट कारण दिलेल्या निकालात नोंदवेल. पिडीत वारस कुटूंबाना अर्ज सादर करण्यासाठी अधिक सुलभता यावी यादृष्टीने ऑनलाईन स्वरुपात अर्ज प्राप्त करुन घेणे व या अर्जाच्या योग्य कार्यवाहीसाठी जिल्हा विज्ञान अधिकारी, राष्ट्रीय विज्ञान सूचना अधिकारी समितीच्या सदस्याशी समन्वय साधेल. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी याबाबत आदेश निर्गमित केले असून ते पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील. 

महानगरपालिका पातळीवर समिती गठीत

जिल्हा पातळीवरील समितीच्या धर्तीवर महानगरपालिका अंतर्गतही मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड येथील कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीची खात्री करुन त्यांच्या वारसांना हे सानुग्रह अनुदान अर्थसहाय्य सुलभ वितरीत करण्याच्या दृष्टीने एक समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही व अंमलबजावणी करेल. सदर समिती मनपा झोन निहाय असून डॉ. जमदाडे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, उपायुक्त शुभम क्यातमवार, विभाग प्रमुख अजितपालसिंघ संधु  या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत झोनल अधिकारी व वैद्यकीय अधिकारी काम पाहतील.   

सद्यस्थितीत सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय नांदेड नियंत्रण कक्ष / आपत्ती व्यवस्थापन प्रभाग तळमजला, वजिराबाद नांदेड-431601. संपर्क क्र. (02462) 235077, टोल फ्री क्र. 1077 वेब साईट:-www.nanded.gov.in   ई-मेल:- nandedrdc@gmail.com यापत्त्यावर संपर्क साधता येईल. ऑनलाईन कार्यपद्धती लवकरच अधिसूचित करण्यात येईल.  

0000

 नांदेड जिल्ह्यात एक कोरोना बाधित झाला बरा  

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 664 अहवालापैकी 661 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 352 एवढी झाली असून यातील 87 हजार 680 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 20 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आज जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आज 20  कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 44 हजार 987

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 41 हजार 439

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 352

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 680

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-20

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...