Wednesday, July 28, 2021

 

जिल्ह्यातील 64 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 64 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. गुरुवार 29 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर एकूण 19 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, हिमायतनगर, लोहा, माहूर, मुदखेड, बारड या 7 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस दिले आहेत. ग्रामीण रुग्णालय बिलोली, मांडवी, नायगाव, उमरी या 4 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस दिले आहेत. 

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 14 ठिकाणी कोव्हॅक्सीन प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण भागात 24 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस तर 6 प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रत्येकी 50 डोस कोविशील्डचे देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 27 जुलैपर्यंत एकुण 7 लाख 92 हजार 912 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात कोविड लसींचा साठा खालीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 6 लाख 15 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 84 हजार 640 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 99 हजार 670 डोस प्राप्त झाले आहेत.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात शुक्रवार 13 ऑगस्ट 2021 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 30 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 13 ऑगस्ट 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 

 

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 832 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 168 एवढी झाली असून यातील 87 हजार 463 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 50 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, मुखेड तालुक्यात 1 असे एकूण 2 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 50 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1, देगलूर कोविड रुग्णालय 2, मुखेड कोविड रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 39  व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 144 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 53 हजार 30

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 50 हजार 920

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 168

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 463

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-42

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-50

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 

बांबू लागवड मोहिमेचा जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते शुभारंभ

धनेगाव येथे 1 हजार बांबु रोपांची लागवड 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्हा फळरोप वाटीका धनेगाव येथे  राज्य शासनाचा कृषी विभाग व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बांबू लागवड मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे हस्ते आज करण्यात आला. 

बांबू लागवड विषयी प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आज बांबू लागवड मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते जिल्हा फळरोप वाटीका धनेगाव येथील प्रक्षेत्रावर 1 हजार बांबू रोपट्यांची लागवड करण्यात आली. हे बांबु रोपे वृक्षमित्र फाऊंडेशन मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

पर्यावरणातील बांबूचे महत्त्व सांगून जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी बांबूपासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त आर्थिक लाभाविषयी माहिती दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गोदावरी, पैनगंगा, मन्याड आसना आदी नदी काठावरील भागात सामूहिक तसेच वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतावर बांबू लागवड करावी असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते बांबु रोपे देण्यात आली. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी यावर्षी जिल्ह्यात 1 हजार एकर क्षेत्रावर बांबू लागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच कृषी विभाग व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विभागाच्या, रोपवाटिका तसेच तालुका बीज गुणन केंद्र, कृषी चिकित्सालय आदी क्षेत्रावर 5 हजार बांबूची झाडे लावण्याचे नियोजन केले असून झाडे लागवडीस सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. 

बांबू लागवड मोहिमेच्या या शुभारंभ प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) योजनेंतर्गत शेतकऱ्यास वैयक्तिक लागवडीसाठी लक्षांक व अनुदान उपलब्ध असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन केले. 

यावेळी नांदेडचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकळे, कृषी अधिकारी सानप, कृषी पर्यवेक्षक गोपाळ चामे, वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर आदीसह कृषी सहायक वसंत जारीकोटे, चंद्रकांत भंडारे, श्रीमती देशमुख प्रतिभा, कोलगिरे वर्षा, बोराळे यांची उपस्थिती होती.  

*****




 

खरीप हंगाम पिक स्पर्धेच्या निकषात बदल ; शेतकऱ्यांना पिक स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- खरीप हंगामापासून पूर्वीच्या पिकस्पर्धेच्या निकषात शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने पिक स्पर्धा खरीप हंगाम 2021 राबविण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै तर ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन पिकासाठी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत आहे. पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाने केले आहे. 

पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यात भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन,  सात/बारा, आठ-अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषि कार्यालयात द्यावे लागणार आहे. राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागात शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने राज्यात कृषि विभागाच्यावतीने पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.  

सध्याच्या पीकस्पर्धेतील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत. पिकस्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिके ज्वारी, बाजरी, तुर, मुग, उडीद, सोयाबीन  असे  पिके आहेत. प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5 आहे. पीकस्पर्धेत सहभागी लाभार्थ्याचे शेतावर त्यापिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीकस्पर्धा संबंधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5    आदिवासी गटासाठी 4 राहिल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.  प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम 300 रुपये एवढी राहिल. 

पिकस्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप हे तालुका पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिसे रुपये पहिले 5 हजार रुपये, दुसरे 3 हजार रुपये तर तिसरे 2 हजार रुपये तर जिल्हा पातळीवर पहिले 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे बक्षिस 5 हजार रुपये, विभाग पातळीवर पहिले 25 हजार, दुसरे 20 हजार तर तिसरे 15 हजार रुपये, राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दुसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रुपये राहिल. 

रब्बी हंगाम 2020 मध्ये पिकस्पर्धेसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुग व उडीद पिकांसाठी 31 जुलै पुर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पुर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे  यांनी केले आहे.

*****

 

अकरावीच्या सामाईक प्रवेश परीक्षेचे  ऑनलाईन अर्ज करण्यास 2 ऑगस्टची मुदत   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय 28 मे व 24 जून 2021 नुसार इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात राज्यात सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) चे आयोजन करण्यात आले आहे. राज्य मंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण / प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने बुधवार 28 जुलै पासून 2 ऑगस्ट 2021 अखेर रात्री 11.59 पर्यंत https://cet.11thadmission.org.in या संकेतस्थळावरुन भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 178 रुपये अधिक बँकिंग चार्जेस / पेमेंट गेटवे चार्जेस असे शुल्क भरावे लागणार आहे. यासाठी पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरण्यासाठी पुढील माहिती नोंदवावी लागणार आहे. ई-मेल आयडी (उपलब्ध असल्यास), मोबाईल क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांने परीक्षेचे माध्यम नोंदविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने सेमी इंग्रजीचा विकल्प निवडल्यास त्याला इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांच्या प्रश्नांसाठी इंग्रजी माध्यम असेल परंतू सामाजिक शास्त्रे- इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल या विषयासाठी विद्यार्थ्यास अन्य एक माध्यम निश्चित करावे लागेल. 

राज्यमंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण, प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी इत्यादींनी फोटो आयडी, पासपोर्ट साईज फोटो, नमुना स्वाक्षरी इत्यादी कागदपत्रे स्कॅन करुन संगणक प्रणालीत अपलोड करावी लागणार आहेत. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यास त्याच्या तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्षा केंद्र मिळण्यासाठी जिल्हा व तालुका / शहराचा विभाग निश्चित करावा लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांनी अर्ज दिव्यांगत्वाचा प्रकार निवडून निश्चित करावा तसेच त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे संगणक प्रणालीत अपलोड करावी लागतील. प्रथम आवश्यक माहिती तयार / निश्तिच करुन ठेवावी व त्यानंतर इयत्ता 11 वी प्रवेशासाठी आयोजित सामाईक प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. 

ज्या विद्यार्थ्यांनी 20 व 21 जुलै कालावधीत संपूर्ण प्रक्रिया करुन सामाजिक प्रवेश परीक्षेसाठी मंडळाकडे अर्ज सादर केले आहेत त्यांना आपल्या अर्जाचा तपशील पूर्वीचा अर्ज क्रमांक व अर्ज भरताना नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून संकेतस्थळावर पाहता येईल. या प्रक्रियेदरम्यान परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रक्रिया पूर्ण करुन न शकलेल्या उमेदवारांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध नसल्यास त्यांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक राहिल. 

सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा तपशील मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना या प्रक्रियेच्या तांत्रिक बाबीसंदर्भात अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 9823 0098 41 या टोल फ्री क्रमांकावर सकाळी 10 ते सायं 7 यावेळेत संपर्क साधावा. हा क्रमांक संकेतस्थळावर होम पेजवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

राज्यमंडळाची इयत्ता 10 वी परीक्षा सन 2021 पूर्वी उत्तीर्ण / प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी, पालक व संबंधित अन्य घटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

*****

 

विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत कार्यवाही करावी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 27 :- नांदेड जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत व ऑफलाईन अर्ज केलेले आहेत अशा एकुण 1 लाख 14 हजार 825 प्रकरणांबाबत संबंधित विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईबाबत त्वरीत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. 

जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी एस. बी. नादरे, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. भेदे, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णीचे शास्त्रज्ञ डॉ. डी. ए. देशमुख, विमा कंपनीचे प्रतिनिधी सौरभ पारगल, शैलेंद्र शर्मा, रवी थोरात, गौतम कदम, नांदेड व देगलूरचे उपविभागीय कृषि अधिकारी आदी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनानंतर नैसर्गिक आपत्तीतून दिलासा मिळावा या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांने पुढे येऊन पीक विमा काढलेला आहे. नैसर्गिक आपत्तीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी पीक विमा हा मोठा आधार आहे. परिस्थितीचे गांभीर्य विमा कंपनीने लक्षात घेऊन जिल्ह्यातील 1 लाख 14 हजार 825 अर्जांचा तात्काळ निपटारा करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा कंपनीकडील प्राप्त अर्जांवर कृषि विभागाच्या समक्ष तात्काळ पंचनामे करुन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी विमा कंपनीला दिल्या. 

पुढील काळात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान आल्यास विमाधारक शेतकऱ्यांनी टोल फ्री क्रमांक 1800 103 5490 तसेच पिक विमा ॲपच्या माध्यमातून व ईमेल supportagri@iffcotokio.co.in द्वारे किंवा कृषि व महसूल विभागात प्रत्यक्ष अर्ज देऊन 72 तासात नुकसानीची पूर्व सूचना शेतकऱ्यांनी द्यावी, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी यावेळी केले.

*****

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...